No products in the cart.
डिनोव्होतले खडे
डिनोव्होचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नवीन आलेल्या सरकारने याचे महत्व जाणून घेऊन त्वरित कारवाई केली आहे. अक्षरशः आठवड्याभरात चंद्रकांत दादांनी टास्कफोर्स समितीची स्थापना केली त्यामुळे डिनोव्होला आता गती मिळेल यात शंकाच नाही. पण झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यांच्यासंदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी याच विवेचन करणारा हा या आंदोलनाचे नेतृत्व करणारे चित्रकार आशुतोष आपटे यांचा विशेष लेख.
नुसतं स्वातंत्र्य मिळून चालत नाही,
स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी
नीट व्यवस्था प्रस्थापित करावी लागते…
तसंच
सकृतदर्शनी लढाई जिंकली
हे सत्य भासत असलं
तरी ते आभासी सत्य असतं
किंवा अपूर्ण सत्य असू शकतं….
कधी कधी अवघड वाटणारा
अगदी महत्वाचा मोर्चा
आपण जिंकलेला असतो…,
पण बालेकिल्ला अद्याप बाकी असतो..!
आणि अशा क्षणी गाफीली दाखवली,
मिळालेल्या यशाने हुरळून गेलो,
तर अंतिम लढाई धोक्याची होऊ शकते…
गनिम पुरता ठेचायला हवा
चुकूनही त्याने फणा काढता कामा नये..
शहाणा सेनापती
विजयाचा गवगवा करत नाही
आनंदोत्सवात मश्गुल होत नाही..
जिंकलेल्या मोर्चाची सुव्यवस्था लावून घेतो
व सैन्यबलाचा जोर
जराही कमी होऊ न देता
पुढच्या युध्दाची तयारी करतो..
कारण त्याला माहित असतं
मैदानी युध्द जिंकलं असलं
तरी अंतर्गत छुटपुट चकमकी
चालूच असणार आहेत..!
त्यामुळे सावधान!
चिलखताचे ओझे भिरकावू नका
समशेर म्यान करु नका
नजर तेज तर्रार ठेवा
अंतिम लढाई अजुन बाकी आहे… !
काही नाही..!
आपल्या जे. जे. डिनोव्हो बद्दलच
बोलतोय मी..!
आताचे शिक्षणमंत्री मा. चंद्रकांत दादा
हे खूप चांगले आहेत…
त्यांनी शिताफीने निर्णय घेतले..
जे. जे. डिनोव्हो प्रक्रियेमधले
निर्णयाची दिरंगाई करणारे
प्रशासकीय अडथळे दूर केले
याबद्दल त्यांचे मनापासून आभार..
आधीच उशीर झाला होता
यु. जी. सी. ने मंजुरी देऊन
डिनोव्होची तयारी करण्यासाठी
तीन वर्षांची मोहलत दिली होती..
त्यातले एक वर्ष वाया गेले…
शासन निर्णय होऊनही
कला संचालनालयाने
आपल्या गलथान कारभारामुळे
साधे पत्र काढावयास दोन महिने वाया घालवले…
पण मा. चंद्रकांत दादांनी स्वतः लक्ष घालून
सक्षम आय ए एस ऑफिसरांच्या अध्यक्षतेखाली
डिनोव्होच्या शासन स्तरावरील
सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी
टास्क फोर्स नेमला…
आता निश्चितच गती येईल
व भराभर हालचाली होतील…
याची शाश्वतीही आली…
चंद्रकांत दादांनी १९८५ सालीही
आपल्या जेजेला मदत केली होती..
तेव्हा शिक्षणमंत्री हे विदर्भातील
मा. राम मेघे हे होते…
त्याकाळी
जेजेच्या आर्ट्स एण्ड क्राफ्टला
डीग्री मिळण्यासाठी
आणि तत्कालीन कला संचालक प्रा. बाबुराव सडवेलकर
यांना पदावरून दूर करण्यासाठी
मी जेजेतून संप पुकारला होता..
तेव्हा मा. चंद्रकांत दादा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे
पूर्णवेळ कार्यकर्ता
व महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री होते..
आणि त्यांनी त्यावेळी मा. राम मेघेंकडे
परिषदेतर्फे आपल्या जेजेला
भक्कम पाठिंबा दिला होता..
त्यामुळे मा. चंद्रकांत दादांना
जेजे व जेजेचा लढा पूर्व परिचित आहेच..
आज ते स्वतःच शिक्षणमंत्रीपद भूषवित आहेत
ही जेजे डिनोव्होसाठी भाग्याची गोष्ट आहे..
तरीही दोस्तांनो,
आपण सजग राहून जेजे हितासाठी
शिक्षणमंत्री व डिनोव्होचे कार्यकर्ते
यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे..
डिनोव्हो प्रकरण मार्गी लागले आहे..
पण पूर्ण व्हायला वेळ आहे..
आणि एक
भात शिजायला टाकण्याआधी
तांदळातले खडे बाजुला काढावे लागतात
नाहीतर जेवताना कचकच लागते
ही बाबही लक्षात ठेवायला हवी..!
डिनोव्होच्या मार्गातील खडे,
गवताचे बी, भाताची तूस
असे सारे दूर होवो ही सदिच्छा
****
– आशुतोष राम आपटे
(आपट्याची पानं)
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion