No products in the cart.
कला – समाज यांना जोडणारा सांधा हरवला !
चित्रकार, संयोजक विवान सुंदरम यांचं आज सकाळी निधन झालं. भारतीय चित्रकला क्षेत्रातलं हे एक ठळक नाव. १९९० नंतर ज्या नवकलेचं वारं भारतात आलं त्याची सुरुवात एक प्रकारे विवान सुंदरम यांनी केली. इन्स्टॉलेशन, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी अशा विविध माध्यमात त्यांनी काम केलं. या नवमाध्यमांना नुसतं स्वतः हाताळलं नाही तर नव्या पिढीला त्यांची दारं उघडून दिली. चित्रकार म्हणून काम करणारे अनेक जण आहेत. ते आपल्या कोशात राहून काम करतात. समाजाशी फारसा संबंध येऊ देत नाहीत. पण विवान केवळ उत्तम चित्रकारच नव्हते तर त्यांचं सामाजिक भान अतिशय चांगलं होतं. त्यामुळेच चित्रकार, संयोजक, संपादक, लेखक अशा विविध भूमिका त्यांनी लीलया पेलल्या.
खरं तर अमृता शेरगील यांच्या बहिणीचा मुलगा अशी त्यांची एक ओळख होती. एखाद्या प्रचंड मोठ्या नावाची सावली जेव्हा आपल्या मागे असते ना तेव्हा अनेक जण या सावलीमुळे झाकोळून जातात. त्या नावाचं दडपण येतं, सोबत त्या मोठ्या व्यक्तीच्या शैलीचा प्रभावही येतो. पण विवान यांनी असं कुठलंही दडपण स्वतःवर येऊ न देता स्वतःची मोठी रेष आखली आणि शैलीही स्वतंत्र तयार केली. १९९० पर्यंत ते कॅनव्हासच्या माध्यमातून काम करत होते. हे माध्यम खरं तर तेच होत जे अमृता शेरगील यांचं होतं. पण या माध्यमात काम करताना विवान यांनी कुठेही आपल्या कामावर शेरगील यांचा ठसा येऊ दिला नाही. संपूर्णतः स्वतंत्र आणि स्वतःच्या शैलीत काम केले. हे सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून चित्रकार म्हणून ते खूप मोठे होते.
विवान यांचे वडील लॉ कमिशनचे चेअरमन होते. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी उच्चभ्रू वर्तुळाची होती. डून स्कूल , बडोदाचं महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि स्लेड स्कूल अशा शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. उच्चभ्रू वर्तुळाचा भाग असूनही त्यांच्या सामाजिक जाणीवा टोकदार होत्या. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण होती. जरी राजकीय दृष्टया ते कधीच सक्रिय नसले तरी कम्युनिस्ट विचारांशी त्यांची बांधिलकी होती. त्यामुळे अमृता शेरगील यांच्यावरील कलाकृती सोडल्या तर त्यांच्या चित्रांना सामाजिक जाणिवांचा पुसटसा का होईना स्पर्श होता.
केवळ चित्रकार या भूमिकेत न अडकता त्यांनी कलेचं डॉक्युमेंटेशनही उत्तम केलं. ते केवळ चित्रकारच नव्हते तर एक विद्वान चित्रकार होते. त्यामुळेच समाजातले जे इंटलेक्चुअल लोक आहेत त्यांच्या वर्तुळात त्यांची उठबस होती.
१९९० नंतर जागतिकीकरणाची सुरुवात भारतात झाली. हे जागतिकीकरण विवान यांनी कलेच्या क्षेत्रातही आणलं. शब्दश: सांगायचं तर भारतीय कलाकारांसाठी त्यांनी चित्रकलेची जागतिक दारं खुली केली. याचा अर्थ भारतीय कलेला जगभरात पोहोचवणं नाही ( तशी ती आधीच पोहोचली होती ) तर कलेतील नव्या प्रयोगांना त्यांनी भारतात आणलं. नव्या चित्रकारांना या नवमाध्यमांचा परिचयही करून दिला. फोटोग्राफी, इन्स्टॉलेशन, व्हिडीओग्राफी या माध्यमात त्यांनी खूप काम केलं. या नवमाध्यमांच्या वापरातून त्यांनी आपल्या सामाजिक जाणीवा अधिक चपखलपणे मांडल्या. ते प्रयोग भारतीय कलाक्षेत्रासाठी नवीन होते. त्यामुळे हे काम जितकं धाडसी होतं तितकं कलाक्षेत्राला नवसंजीवनी देणारं होतं.
सामाजिक जाणिवांचं भान असल्यामुळे विवान सुंदरम केवळ स्वतःपुरतं काम करत राहिले नाही तर त्यांनी चित्रकारांची अनेक वर्कशॉप्स घेतली. अनेक प्रकल्प आखले. ‘सहमत’ फौंडेशनचे ते प्रमुख होते. या फौंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी प्रचंड काम केलं. कसौली येथे त्यांनी चित्रकारांची आर्ट वर्कशॉप्स आयोजित केली. चित्रकार सुधीर पटवर्धन या आर्टकॅम्पची एक आठवण सांगतात. ” नवीन चित्रकार विशेषत: विद्यार्थ्यांसाठी विवान यांनी खूप काम केलं. कसौली येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप आयोजित केलं होतं. या वर्कशॉपच्या वेळी त्यांनी खूप धावपळ केली. वर्कशॉप नंतर विद्यार्थ्यांच्या कामाचं उत्तम प्रदर्शन आयोजित केलं. खरं तर बडोद्याच्या विद्यार्थ्यांना माहीतही नव्हतं की एवढा मोठा चित्रकार आपल्यासाठी वर्कशॉप घेतोय. नंतर जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते विद्यार्थी खूप आश्चर्यचकित झाले. माणूस एकदा मोठा झाला की तो इतरांसाठी काही करत नसतो. विद्यार्थ्यांना तर कोणीच वाली नसतो. पण विवान यांचं हे वेगळेपण होतं. आपलं मोठेपण बाजूला ठेऊन ते इतरांसाठी तळमळीनं काम करत.”
सुधीर पटवर्धन विवान सुंदरम यांना दोन आठवड्यापूर्वीच भेटले होते. याबद्दल सांगताना ते म्हणाले ” गेल्या काही वर्षांपासून विवान यांना तब्येतीच्या अनेक अडचणी भेडसावत होत्या. त्यांची मणक्याची ऑपरेशन्स झाली होती. शिवाय मागील महिन्यात त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. शेवटच्या महिन्यातच ते कोमामध्ये गेल्यामुळे कार्यरत नव्हते. त्यांनी तब्येतीच्या तक्रारी असूनही खूप काम केलं. “
शेरगील – सुंदरम फाऊंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी कलेसाठी मोठं काम केलं. अमृता शेरगील यांचं चरित्र लिहिण्याचं कामही विवान यांनी केलं. त्याच बरोबर पुरालेख शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी मोठं काम केलं आहे. विवान यांनी अमृता शेरगील यांचं दोन खंडामध्ये लिहिलेलं चरित्र तर उत्तम चरित्र लेखनाचं एक उदाहरण आहे. या चरित्रात अमृता शेरगील यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश आहे. या पत्रांच्या साहाय्याने अमृता शेरगील यांच्या चित्रांची दृश्य भाषा वाचकांना समजत जाते. चरित्र लेखनातील हा वेगळा प्रयोग विवान सुंदरम यांनी केला.
वेगवेगळ्या भूमिकांमध्ये उत्तम काम करणारे विवान एक विद्वान चित्रकार होते. त्यांचं जाणं हे चित्रकला विश्वासाठी खूप मोठी पोकळी निर्माण करणारं आहे. कारण त्यांनी केवळ चित्रच काढली नाही तर कला समाजापर्यंत पोहोचवली. कला आणि समाज याना जोडणारा सांधा म्हणजे विवान सुंदरम. तो सांधाच आज हरवला आहे !
****
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion