No products in the cart.
मास्टर ‘स्ट्रोक्स’
महाराष्ट्रात पोर्ट्रेट चित्रणाची खूप मोठी परंपरा आहे. ए. ए. भोंसुले, त्रिंदाद, लँगहॅमर, हळदणकर, गोपाळराव देऊस्कर, आत्ताचे वासुदेव कामत, अनिल नाईक यांसारख्या महत्वाच्या पोर्ट्रेट चित्रकारांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे दत्तात्रय पाडेकर. दत्तात्रय पाडेकरांनी टाइम्स ऑफ इंडियासाठी खूप कामे केली. पण त्याचबरोबर त्यांनी आपली पोर्ट्रेट चित्रणाची आवड जोपासली. टाइम्स ऑफ इंडियामध्ये इलस्ट्रेटरची नोकरी सांभाळून पाडेकरांनी आपली पोर्ट्रेट्स करण्याची आवड जोपासली. विशेष म्हणजे त्यांनी व्यावसायिक पोर्ट्रेट्स कधीही केली नाहीत. व्यावसायिक पोर्ट्रेट्स करताना स्वतंत्र विचाराने काम करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे त्यांनी कायम पोर्ट्रेट्स स्वतःची आवड म्हणून केली पण अगदी व्यावसायिक पद्धतीने. प्रस्तुत पुस्तक ‘पोर्ट्रेट्स’ दत्तात्रय पाडेकर यांच्या निवडक पोर्ट्रेट्सचा संग्रह आहे.
अनेक चित्रकार आपल्या चित्रांबद्दल भरभरून लिहितात. पण शब्द वाचण्यापेक्षा चित्र ‘वाचणे’ महत्वाचे हे दत्तात्रय पाडेकरांचे तत्वज्ञान आहे. आणि ते किती योग्य आहे हे ‘पोर्ट्रेट्स’ हे पाडेकरांचे पुस्तक पाहिल्यावर कळते. पाहिल्यावर हे मुद्दाम लिहिले आहे कारण या पुस्तकात पाडेकरांचे मनोगत सोडले तर इतर सर्व पाने आपण त्यांची फक्त पोर्ट्रेट्स बघण्याचा आनंद घेऊ शकतो. दत्तात्रय पाडेकर हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी. तिथले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये इलस्ट्रेटरची नोकरी केली.
या पुस्तकात पाडेकरांची जवळपास ५७ पोर्ट्रेट्स समाविष्ट आहेत. ऑइल, जलरंग, पेस्टल, पेन इंक अशा सर्वच माध्यमात पाडेकरांनी काम केले आहे. पाडेकरांच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे ती एका विशिष्ट शैलीत बांधलेली नाहीत. प्रत्येक पोर्ट्रेट एक स्वतंत्र चित्रशैली आहे. हे बहुदा पाडेकरांच्या इलस्ट्रेशनच्या कामातून आले असावे. इलस्ट्रेटरला कुठल्याही एका शैलीला धरून राहता येत नाही, कामाच्या गरजेनुसार दर वेळी नवे प्रयोग करावे लागतात आणि हे मोठे आव्हान असते. एक कसलेला चित्रकारच ते करू शकतो. त्यामुळे इलस्ट्रेशन्स प्रमाणे पाडेकरांची पोर्ट्रेट्सही वेगवेगळ्या माध्यमातून आणि शैलीतून आपल्या समोर येतात.

पाडेकरांचे प्रत्येक पोर्ट्रेट एक स्वतंत्र अनुभव आहे. काही पोर्ट्रेट्समध्ये ब्रशचे वेगवान फटकारे अनुभवता येतील तर काही पोर्ट्रेट्स ही ‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताप्रमाणे निरव शांततेचा अनुभव देतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असं व्यक्तिमत्व असतं . त्यांच्या स्वभावाचे कंगोरे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यामुळे पोर्ट्रेट चित्रण म्हणजे केवळ चेहऱ्याचा लाइकनेस चित्रात उतरवणे एवढेच नसते तर मॉडेलचं व्यक्तिमत्व चित्रात उतरणेही तितकेच महत्वाचं असतं. आणि पाडेकरांची चित्रे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या मॉडेलचा स्वभावही आपल्याला चित्रातून दिसतो. शांत, कष्टाळू, धसमुसळ्या स्वभावाची मॉडेल्स कुठली हे ही पोर्ट्रेट्स बघून चटकन सांगता येईल. संपूर्ण पुस्तकात खरं तर सुंदर सुंदर पोर्ट्रेट्सची रेलचेल आहे. पण इथे वाचकांसाठी काही निवडक पोर्ट्रेट्स देत आहे.

‘फिगर टू’ हे चित्र बघा. कड्यावर बसलेला तरुण खरं तर पाठमोरा आहे. पण त्याच्या पाठमोऱ्या आकृतीवरूनही तो दूरवर नजर लावून कुठल्या तरी विचारात गढलेला आहे असे दिसते. हा परिणाम फक्त वर्षानुवर्षाच्या चित्र तपस्येनंतरच साधता येतो. आणि त्या तरुणाचे केस तर एखाद्या ऍबस्ट्रॅक्टचा अनुभव देतात.
‘मग्न’ हे वॉटर कलरमधील आणखी एक अप्रतिम चित्र.
पाडेकरांनी अनेकदा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दिली. अनेकदा आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे लाईट जसा असेल तसा वापरून, मॉडेलची पोझ जशी मिळेल तशी वापरून त्यांनी आपल्या चित्रामध्ये अनेक प्रयोग केले. विशेष म्हणजे विनय (पान नं. ४५)सारख्या चित्रांमध्ये मॉडेलच्या पाठीमागून प्रकाशरचना केली आहे. अशा प्रकारचे पोर्ट्रेट्स छायानाट्याचा सुंदर अनुभव देतात.

आजच्या घडीला आयुष्य हे वेगवान झालं आहे. दोन घडी निवांत बसावे, चहाच्या एक एक घोटाबरोबर काही निवांत वेळ घालवावा असे अनुभव फार कमी येतात. पण पाडेकरांची आदिल जसावाला, चंद्रकांत, मग्न ही चित्रे केवळ निवांतपणा अनुभवण्यासाठी बघावीत अशीच आहेत. ही चित्रे बघून आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण काय मिस करतोय याची जाणीव होते. आणि ती चित्रे मग पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात.

हार्डबाऊंड कव्हरसह संपूर्ण रंगीत पानांचं आर्ट पेपर छापलेलं हे पुस्तक कलेक्टर्स एडिशन या प्रकारात मोडतं. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या मोजक्याच प्रती छापलेल्या असून प्रत्येक प्रतीवर दत्तात्रय पाडेकर यांची स्वाक्षरी आणि प्रत क्रमांक आहे. चित्रकला अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक महत्वाचं आहेच. कारण किती वेगवेगळ्या माध्यमात पाडेकरांसारखे ज्येष्ठ चित्रकार लीलया काम करतात हे अभ्यासकांना यातून अभ्यासात येईल. त्याचबरोबर कलारसिकांसाठीही हे पुस्तक आनंददायक ठरणार आहे. आनंदी किंवा नैराश्य अशा कुठल्याही मूडमध्ये हे पुस्तक आपली साथ देईल आणि दोन क्षण अप्रतिम अशा पोर्ट्रेट्सचा आनंद घेऊन मन ताजेतवाने होईल याची मला खात्री आहे.
*****
पोर्ट्रेट्स – दत्तात्रय पाडेकर
स्वयं प्रकाशन
मूल्य 1000 रू. + कुरिअर चार्जेस.
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क :
दत्तात्रय पाडेकर – मो. 90828 37340
*****
– कनक वाईकर
chinha.in
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion