No products in the cart.
कलेपेक्षा वेगळे अनुभव !
सायकलवरून भारतभ्रमणाला निघालेला शिल्पकार प्रतीक जाधव आता आंध्रमधल्या नरसापूरमध्ये आहे. त्याला चित्रकलाविषयक अनुभव लिहायला ‘चिन्ह’नं सांगितलंच होतं, पण त्याचबरोबर एवढ्या साऱ्या प्रवासात काही वेगळे अनुभव येत असतील, कविता लिहीत असशील, विचार मांडत असशील तर तेही अधनं मधनं पाठव असं ‘चिन्ह’नं त्याला सुचवलं होतं. त्याने त्याचे दोन वेगळेच अनुभव पाठवले आहेत. अवश्य वाचा !
टाईम इज इक्वल टु मनी !
आय्यनार हे पूर्व वैदिक काळातील दैवत आहे. तामिळनाडू मधील एक ग्रामदेवता. सर्वसाधारणपणे गावाच्या सीमेवर याचं देऊळ असतं. प्रचंड मोठे दोन घोडे दिसले की समजायचं आय्यानारचं देऊळ आलं. देवळात देवाला वाहिलेल्या टेराकोटाची घोडे, हत्ती असतात. परवा रात्रीचा माझा मुक्काम एका मशिदीमध्ये होता आणि काल रात्रीचा या एका आय्यनारच्या देवळात.
गावापासून हे मंदिर बरंच दूर असल्यानं आजूबाजूला एकही घर नव्हतं. बाजूनं फक्त एक नदी वाहत होती. मंदिरात छोटी विहीर होती ज्यातून पाणी काढून मी रात्री अंघोळ करून कपडे धुतले होते. जवळपास हॉटेलही नव्हतं आणि पाऊस सुरू झाल्याने पुढे जाण्याचे चान्सेसही संपले होते. सूनसान अशा त्या मंदिरात काल एकटाच होतो. रात्री पौर्णिमेच्या चंद्राचा उजेड इतका होता की बाहेरच्या घोड्यांच्या मूर्त्या एकटक मलाच बघतायत असा भास व्हायचा मध्ये मध्ये. मधनं मधनं हवेने देवळाची घंटी वाजली की माझे डोळे तिकडे गोल फिरायचे. घुंगरासारखा आवाज काढणारा एक रातकिडा पण असतो. तो या वातावरणात अजून स्पेशल इफेक्ट्स देत होता. याआधी अगदी स्मशानात पण मी रात्र काढली होती पण एकंदरीत काल माझी जराशी फाटली होती. काल सिल्वाने दिलेली आंब्याची कैरी आणि सोबतचा थोडासा उरलेला चिवडा खाऊन झोपलो.
मध्यरात्र उलटून गेली असावी. गाढ झोपेत होतो. कोणीतरी डोळ्यावर बॅटरी मारत होतं. डोळे उघडले तर समोर तीन जण होते. दचकून उठलो, झोप क्षणात उडाली. टॉर्च धरलेला माणूस दिसत नव्हता. पण तो ,”मनी मनी” म्हणत होता.
बस्स ! मला वाटलं अखेर आज तो दिवस आलाच. ज्याची मी मानसिक तयारी करूनच प्रवास सुरू केला होता… आता हे मला पैशासाठी लुटणार असं वाटायला लागलं. मी पूर्ण भांबावलो होतो. मी त्या टॉर्चपासून फक्त नजर चुकवू शकत होतो. तो माणूस “मनी मनी” करताना मी काहीच बोलत नव्हतो, तेवढ्यात तो दुसरा माणूस म्हणाला ”टाईम टाईम?” तेव्हा मी चक्रावूनच गेलो. मोबाईल काढून बघितलं अडीच वाजले होते. सांगितलं त्याला. आणि ते निघून गेले. तिसऱ्याच्या हातात मासे पकडायचे जाळे होते. मी चक्रावून गेलो. यांनी काय मला रात्री अडीच वाजता वेळ विचारायला उठवलं ? आणि तो पहिला मनी मनी काय म्हणत होता. काहीच कळल नाही. सगळं अनाकलनीय. उठून त्यांच्या मागे मंदिराच्या गेट जवळ गेलो. त्यांची बाईक उभी होती. पटकन तिचा नंबर मित्रांना पाठवला. लोकेशन शेअर केलं. ते तिघे चंद्राच्या उजेडात नदीत उतरले. मासे पकडू लागले.
पुन्हा येऊन पडलो. मनी मनी डोक्यातून जायला तयार नव्हतं. मग रात्री मला उठवून हे लोक टाईम इज मनी तर सांगत नव्हते ना ? कारण एक जण मनी मनी करत होता, आणि एकजण टाईम टाईम. (आज मग एका तमिळ मित्राला फोन करून हा प्रकार सांगितला, त्यावर तो म्हणाला तमिळ मध्ये मनी म्हणजेच टाईम) ते मला टाईम विचारत होते.
टाईम इज इक्वल टु मनी !
काली माँ को जाके बोलो !
सकाळी लवकर उठून पुन्हा रस्ता पकडायचा. ऊन आजकाल सकाळी नऊ वाजताच चटका द्यायला लागलंय. दुपारी चांगलं सावलीदार झाड बघून आराम करतोय. त्यावेळेस मग बराच विचार चालू असतो डोक्यात, मग एखादी डुलकी घ्यायची, काही स्केचेस करून मग चार वाजता पुन्हा प्रवास सुरू करायचा ते अंधार होईपर्यंत.. सध्या असाच दिनक्रम चालू आहे.
साऊथमध्ये ढाबा हा प्रकार नसतोच शक्यतो. नॉर्थमध्ये ढाबा म्हणजे सुख असायचं. खाण्याची, रात्री झोपण्याची उत्तम जागा, पण आता आंध्र प्रदेशात आल्यापासून थोडे थोडे ढाबे दिसायला लागलेत. त्यातही पंजाबी आणि बिहारी ढाबे म्हणजे चांगलं झणझणीत नॉर्थ इंडियन जेवण मिळणारं ठिकाण. त्यामुळे जरा समाधान आहे आणि ढाबे म्हणजे रात्री झोपायला खाट मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे मुक्कामाची पण चिंता कमी झालीय.
आज सकाळी नऊ वाजता रस्त्याने नाष्टा शोधत होतो. एक छोटं दुकान दिसल्यावर थांबलो. बाहेरच दोन टेबल आणि काही खुर्च्या होत्या. एक बाई सांभाळत होत्या दुकान. मी डोसा सांगितला. तेवढ्यात सायकल बघून दोन जणं जे नुकतेच हात धुवून जायला निघाले होते ते माझ्याकडे परत आले. विचारपूस करू लागले. पण तेलगू मध्ये. मी म्हणालो तेलगू नाही येत मला, हिंदीत बोला. त्यावर तो माणूस म्हणाला, ‘थोडा भी तेलगू नई आता??’ मी म्हणालो, ‘नई.’ तो म्हणतो, ‘चेहरे से तो तेलगु ही लगते हो.’ नंतर इथल्या इडली बद्दल तो बोलू लागला. ‘यहाका इडली खाव. एकदम स्पायसी.’ आणि त्याने त्या बाईला मला दोन इडली द्यायलाच लावल्या. मग मीही डोसा कॅन्सल करून अजून दोन इडल्याच मागवल्या.
त्याने विचारले, ‘आगे कहाँ जाओगे ?’ मी म्हणालो, ‘बंगाल.’
‘कलकत्ता भी?’ मी होकारार्थी मान हलवली. ‘काली मंदिर जाओगे?’ मी पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग त्याने लगेच खिशातून वीस रुपये काढले आणि त्या बाईला दिले. आणि मला म्हणाला, ‘तू पैसे देऊ नकोस. मी भरलेत तुझे पैसे. आणि काली माँला जाऊन सांग की पुलिरायडूने मुझे खाना खिलाया.
क्या बोलोगे?… काली माँ, पुलिरायडूने मुझे खाना खिलाया. बोलनेका जाके. नाम लिखके लो.. वरना भूल जाओगे. वैसे खाया हुआ कोई नही भुलता. पर क्या बोलोगे ?’ शेवटी मी इडली खात खात म्हणालोच….. ‘काली माँ, पुलिरायडूने मुझे खाना खिलाया…’
‘कलकत्ता भी?’ मी होकारार्थी मान हलवली. ‘काली मंदिर जाओगे?’ मी पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग त्याने लगेच खिशातून वीस रुपये काढले आणि त्या बाईला दिले. आणि मला म्हणाला, ‘तू पैसे देऊ नकोस. मी भरलेत तुझे पैसे. आणि काली माँला जाऊन सांग की पुलिरायडूने मुझे खाना खिलाया.
क्या बोलोगे?… काली माँ, पुलिरायडूने मुझे खाना खिलाया. बोलनेका जाके. नाम लिखके लो.. वरना भूल जाओगे. वैसे खाया हुआ कोई नही भुलता. पर क्या बोलोगे ?’ शेवटी मी इडली खात खात म्हणालोच….. ‘काली माँ, पुलिरायडूने मुझे खाना खिलाया…’
हां..मग त्याने समाधानकारक मान डोलावली. आणि निघाला. त्यावर इडली वाली बाई पण दोन इडली घे घे करू लागली. मला नको होत्या, पण ती बाई म्हणाली, ‘पैसा मत दो.. खाओ…खाओ. काली मा को जाके बोलो…..’
ओंगोल, आंध्र प्रदेश.
शहर ओलांडून जाताना...
एक शहर ओलांडून जाताना तुम्ही फक्त रस्त्याने इमारती, गल्ल्या, चौक चौराहे मागे टाकत जाता का ?
इमारतीमधल्या कुजबुजी, रस्त्यावरची वर्दळ, चौकामधले नारे, भोंग्यावरची अजान, मंदिराची घंटी,
कोण्या आईची आरोळी, भिकाऱ्याची झोळी काही सांगतायत काय?
कापलेला वड, नवीन पूल, मेट्रोचे खड्डे, सिग्नलवरचा गोंगाट
हिजड्याची टाळी, भुकेची आरोळी काही सांगतायत काय?
कॅन्सर सारखं बेलगाम वाढत चाललेलं शहर, रेल्वे क्रॉसिंग, गटाराच्या काठावर वस्ती ,गुत्थ्यावरची मस्ती काही सांगतायत काय?
हातात बिडी, बदनाम गल्ली, ओठावर लाली, मंत्र्याची रॅली. काही सांगतायत काय?.
एक शहर ओलांडून जाताना तुम्ही फक्त रस्त्याने इमारती, गल्ल्या, चौक चौराहे मागे टाकत जाता का ? की आणखी काही ?
प्रतीक
सोडून देतो समुद्र त्याच्या आठवणी लाटांवर
माणूस म्हणतो शंख-शिंपले तरंगत आले काठावर
कोण हरवले असेल याचे या वाळूच्या वाटेवर
एक लाट का पुन्हा पुन्हा शोधत येते बेटावर
प्रतीक
Related
Please login to join discussion