Features

काय घडलं त्या रात्री ? 

“सतीश नाईक ज्या पद्धतीनं जहाल लिखाण करीत आहात ते पाहता कदाचित त्यामुळे जेजेचा प्रश्न  सुटण्याऐवजी अधिक अवघड होईल असं नाही वाटत ?” असा प्रश्न अनेकांना पडतो, पण मला तो कुणी विचारण्याचं धाडस मात्र करत नाहीत, पण आडून आडून माझ्या काही जुन्या नव्या मित्रांकडे मात्र अशी विचारणा होत असावी.

जेजे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात त्यासंदर्भात चाललेली चर्चा परवा अगदी अभावितपणे कानावर आली. विचारणारा काहीशा काळजीनं, पण तरीही तावातावानं प्रश्न विचारत होता आणि उत्तर देणारा अगदी शांतपणे सांगत होता की ‘ते जे लिहीत आहेत त्यापेक्षाही भयंकर गोष्टी या परिसरात किंवा मंत्रालयातल्या संबंधित खात्यात घडल्या आहेत, घडताहेत, त्यामानानं ते फारच सौम्य लिहीत आहेत असं म्हणायला हवं, अशी परिस्थिती आहे.’ प्रश्न विचारणाऱ्याचं त्या उत्तरानं कितपत समाधान झालं असेल कुणास ठाऊक पण मला मात्र त्या घटनेनं लिहावयास एक विषय मिळाला यात शंकाच नाही.

उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत यांनी पदभार स्वीकारताच जेजे संदर्भात असंख्य चांगले निर्णय घेतले त्या साऱ्यांविषयी मी वेळोवेळी लिहीनच, पण त्यांनी जेजे संदर्भातले जे तीन मोठे निर्णय घेतले त्याविषयी मी आधी लिहिणार आहे. त्यातला पहिला निर्णय होता डिनोव्हो संदर्भातला. तर दुसरा होता अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयांसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या एका विशेष विभागाचा. हे दोन्ही निर्णय त्यांनी अतिशय धडाक्यानं घेतले, त्यासंदर्भात त्यांनी तातडीनं समित्या स्थापन करून त्यांच्या कामाला दिशा देखील दिली.

उदाहरणार्थ जेजे डिनोव्होसंदर्भात त्यांनी अतिशय त्वरेनं निर्णय घेऊन केंद्रशासनाबरोबर पत्रव्यवहार सुरु केला, अर्ज वगैरे भरून घेतले. इतकंच नाही तर त्यासंदर्भात जी रक्कम भरावयास हवी होती ( त्यातली एक रक्कम तर १५,००,००० इतकी मोठी आहे ) ती देखील भरून टाकली आणि त्यासंदर्भात काम करणाऱ्या समितीला त्यांनी एक प्रकारे दिशा देऊन टाकली. ती देत असतानाच बहुदा त्यांच्या समोर अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या आल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी त्यासंदर्भात देखील एक विशेष जीआर काढून डॉ. सुभाष पवार, सुधाकर चव्हाण, वसंत सोनवणी, राधा आंबेकर यांची समिती स्थापन करून त्यांच्याकडून या संदर्भातला संपूर्ण अहवाल मागवला. अतिशय संवेदनशीलता दाखवून उदय सामंत यांनी हे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं कलाशिक्षण क्षेत्रातून स्वागतच झालं.

इथपर्यंत सारं ठीक चाललं होतं… २० मार्च २०२२ रोजी रत्नागिरीत राज्यकला प्रदर्शन विद्यार्थी विभागाचा बक्षीस समारंभ होता, या बक्षीस समारंभात भाषण करत असताना उदय सामंत यांनी जेजे अनन्य अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासंबंधी आनंदाची बातमी म्हणून घोषणा देखील केली. पण नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी काय घडलं कुणास ठाऊक, २१ मार्चच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातील तिन्ही कला महाविद्यालयं मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापनेसंदर्भात सर्व बाबींचा विचार करून शासनास अहवाल देण्यासाठी डॉ. विजय खोले, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची एक समिती त्यांनी नेमून देखील टाकली. सदर शासन निर्णयावर २१ मार्च, मंत्रालय मुंबई अशी तारीख आहे. ( वर जो उदय सामंत यांनी घेतलेल्या तिसऱ्या निर्णयाचा उल्लेख मी केलाय तो यासंदर्भातच )

२० मार्च रोजी सायंकाळी मंत्री महोदय रत्नागिरीत होते. २१ मार्च रोजी वरील निर्णय झाला. मधल्या एका रात्रीत असं काय घडलं की त्यांना आपला आधीचा निर्णय फिरवावा लागावा ? याचं मला तरी राहून राहून आश्चर्य वाटतं ! तुम्हाला नाही वाटत ? गेले तीन – चार वर्ष चाललेली या संदर्भातली प्रशासकीय प्रक्रिया, केंद्रशासनाकडे भरावी लागलेली रुपये १५,००,००० इतकी प्रोसेसिंग फी, शिवाय आणखीन तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी द्याव्या लागलेल्या ५,००,००० रुपयांपेक्षा जास्त फिया, यांची काहीच का किंमत नाही ?

प्रदर्शनात जाहीरपणे अनन्य अभिमत विद्यापीठाची घोषणा करायची ( पुढील लिंकमध्ये त्यांचं भाषण दिलं आहे, क्लिक करा व स्वतःच ऐका आणि खात्री करून घ्या !  https://www.youtube.com/watch?v=leW5Sdh_ADg&t=3s ) आणि दुसरा दिवस उजाडतो ना उजाडतो तोच आधीचा निर्णय रद्द करून टाकण्यासाठी समिती बसवायची, हा नेमका काय प्रकार आहे ? का हा पोरखेळ आहे ? मंत्र्यांच्या शब्दाला आणि शासकीय आदेशाला व्यवहारात कवडीची देखील किंमत राहिलेली नाहीये का ? असं काय घडलं हा निर्णय रद्द करण्यामागे ? हे महाराष्ट्राच्या कलाप्रेमी जनतेला कळायलाच हवं ! मंत्री महोदय उदय सामंतजी या प्रश्नांचं उत्तर आपण द्यायलाच हवं ! प्रोसेसिंग फी पोटी दिलेली १५,००,००० रुपये ही रक्कम थोडी थोडकी आहे का ? तुम्ही निर्णय बदलल्यानं ती परत दिली जाणार आहे का ? मग असा आततायी निर्णय तुम्ही का घेतलात ? द्याल या प्रश्नांचं उत्तर ? तुमच्या या अकल्पितपणे घेतलेल्या तिसऱ्या निर्णयानं तुम्ही संवेदनशीलता दाखवून आधी घेतलेल्या निर्णयावर स्वतःहून पाणी फिरवलं आहे.

डी-नोव्होची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत त्यावर काम केलं, त्याला काहीच मोल नाही का ? महाराष्ट्र शासनातर्फे १५ लाख आणि पाच लाख पेक्षाही जास्त रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून भरली गेली तिलाही काही किंमत नाही का ? केंद्रशासनाशी संबंधित विविध विभागांशी केलेल्या पत्रव्यवहारांवर तुमच्या सह्या आहेत, त्यांनाही काही किंमत नाही का ? डी-नोव्हो संबंधात ज्या ज्या समित्या स्थापन केल्या गेल्या, ज्या ज्या बैठका केल्या गेल्या, जे जे निर्णय घेतले गेले त्यांनाही तुमच्या लेखी काहीच किंमत नाही का ?

तीच गोष्ट अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा. त्यांचंही काम जवळजवळ पूर्णत्वाला आलं आहे. त्यांनी तयार केलेला मसुदा देखील आता पूर्णत्वाला गेला आहे. ८० वर्षापेक्षाही जास्त वय असलेल्या ज्येष्ठ कलाशिक्षण तज्ज्ञांच्या शब्दांना देखील तुमच्या मते काहीच किंमत नाही का ? कुणासाठी तुम्ही करताय हे सारं ? द्याल आमच्या प्रश्नाचं उत्तर ? आमची तुम्हाला विनंती आहे की, जे तुम्हाला मंत्रालयात किंवा तुमच्या जनता दरबारात येऊन भेटतात त्या कलाशिक्षण संस्थाचालकांच्या कला महाविद्यालयांना तुम्ही एकदा तरी भेट द्या ! पाहिली आहेत एकदा तरी ती कला महाविद्यालये कशी आहेत ते तुम्ही ? कशी चालवली जात आहेत ती ? पाहिलं आहे त्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं जातं ते ? पाहिलं आहे तुम्ही त्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा तरी आहेत ते ?

बाकीचं नाही तर नाही, किमानपक्षी तुमच्या रत्नागिरीतल्या कला महाविद्यालयाला तरी एकदा भेट द्या ! ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, त्या जिल्ह्यातल्या कणकवलीच्या कला महाविद्यालयाला तरी एकदा भेट द्या ! रत्नागिरीहून मुंबईला मंत्रालयात येताना मधल्या गावांमध्ये जी कला महाविद्यालयं उघडली आहेत, त्यांना तरी किमान एकदा भेट द्या ! ती भेट दिल्यावर मला खात्री आहे, राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्याची तुमची हिंमतच होणार नाही. आव्हान देत नाही, विनंती करतो… स्वतःच्या डोळ्यानं पहा आणि मगच निर्णय घ्या ! तुमच्यासमोर येऊन गळे काढून रडतात, त्यांचं म्हणणं ग्राह्य धरू नका. शक्य झालं तर २००८ सालचा ‘चिन्ह’चा ‘कालाबाजार’ विशेषांक अवश्य वाचा. त्यात या कला महाविद्यालयांची आम्ही कुंडलीच मांडली होती. अर्थात त्यातली किती कला ,महाविद्यालयं आता सुरु असतील हे काही आम्ही ठामपणं सांगू शकत नाही. आम्हीच काय तुमचे दस्तुरखुद्द कला संचालक देखील सांगू शकणार नाहीत. म्हणूनच म्हणतो की, तुम्हाला शक्य असतील त्या वाटेवरच्या कला महाविद्यालयांना भेट द्या आणि मगच काय तो निर्णय घ्या.

जे जे स्कूल ऑफ आर्टचे आम्ही सारे माजी विद्यार्थी एकत्र आलो आहोत कारण आम्हाला जेजे वाचवायचं आहे. या बाजारबुणग्या कला महाविद्यालयांच्या कचाट्यातून जेजेला सोडवायचंय. आम्हाला खात्री आहे, यातल्या दोन-चार कला महाविद्यालयांचं दर्शन जरी आपण घेतलंत तरी आपण आमच्या मतांशी निश्चितपणं सहमत व्हाल !

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.