No products in the cart.
स्त्री जन्मा तुझी (मूक) कहाणी !
केमोल्ड प्रेस्कॉट रोड आर्ट गॅलरी येथे शकुंतला कुलकर्णी यांचे ‘Quieter than silence’ हे प्रदर्शन ३० एप्रिल पर्यंत सुरु आहे. या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना म्हणजे माणसाच्या जीवनातील दुःख, वेदना, फरफट! ही सुख दुःख स्त्री पुरुष दोघानांही भोगावी लागली, तरी बाईचं सोसणं हे सर्वार्थाने वेगळं असतं. सतत उपभोगाची दुय्यम वस्तू म्हणून समाज बाईकडे बघत आला आहे त्यामुळे तिची वेदना, दुःख अमूर्तततेसारखी अवकाश भरून व्यापलेली असते. मूक असली तरी क्षुब्ध, आतल्या आत घुसमटणारी वेदना. या वेदनेला शकुंतला कुलकर्णी यांनी चित्ररूपातून मांडलं आहे. रेखाटन स्वरूपातील या सात कहाण्या सूचकपणे विषयाचा आशय आणि गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचवतात. चित्रकलेचे अभ्यासक विनील भुर्के या प्रदर्शनाचे रसग्रहण आणि शकुंतला यांची कला कारकीर्द या लेखामधून खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी मांडत आहेत. हा लेख वाचून जर प्रदर्शनाला भेट दिली तर वाचकांचा चित्रानुभव नक्कीच समृद्ध होईल याची खात्री आहे.
‘Quieter than silence (Compilation of short stories)’ नावाचे शकुंतला कुलकर्णी यांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील Chemould Prescott Road आर्ट गॅलरीमध्ये सध्या होत आहे. ९ मार्चला त्याचे उद्घाटन झाले, तर ३० एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. यामध्ये Quieter than silence (Compilations of Short Stories) या चित्र संग्रहातील ‘स्वाहा’, ‘Stuck in the shadow’, ‘Fallen warrior’, ‘Lullaby’, ‘Shattered’, ‘Imbalance’, ‘अंतहीन’ (Endless) अश्या अनेक चित्रमालिका पाहायला मिळतात.
चित्रांमधून पडणारे प्रश्न
या सर्वच कामांमध्ये एक समान तत्त्व दिसते ते म्हणजे मनुष्यजीवन आणि त्यातील वाटचाल, त्यातील दु:ख, वेदना, फरफट. ‘स्वाहा’ या चित्रमालिकेमध्ये ते तत्त्व आपल्या समोर येते ते एका स्त्रीच्या आकृतीच्या रुपाने.
ती डोक्यावर गाठोड्यासारखे काहीतरी वाहून नेते आहे, असे दिसते. ते जे काहीतरी आहे, ते ती कुठेतरी वाहून नेते आहे, आणि नंतर ती ते कुठेतरी समर्पित करणार आहे, असे वाटते. ते जे काहीतरी आहे ते काय आहे? तिला ते तिच्या जगण्याचे ओझे वाटते आहे का आणि ते तिला कुठेतरी खाली ठेवावेसे वाटते आहे का? किंवा फेकून द्यावेसे वाटते आहे का? की त्याला डोक्यावर घेऊन ती त्याचा सन्मान करते आहे? स्त्री म्हणून निसर्गाने दिलेले मातृत्वाचे गाठोडे तिने आनंदाने डोक्यावर घेऊन मिरवायचे की पुरुषप्रधान समाजाने लादलेले ओझे समजून फेकून द्यायचे? तिला ते ओझे वाटत असेल तर ती ते फेकून देईल का? फेकून देऊ शकेल का? तसे वाटत नसेल तर जीवनाच्या अंतापर्यंत ती ते असेच वाहून नेत राहील का? ‘स्वाहा’ म्हणजे काय? आयुष्याच्या यज्ञामध्ये ती तिच्या जीवनातील दु:खांच्या समिधा अर्पण करत ‘स्वाहा’चा मंत्र जपते आहे का? त्या यज्ञाचा अग्नी कुठला? आत्मपरीक्षणाचा की थेट मृत्यूचा? या ओझ्यामधून तिची सुटका कोण करणार? तो अग्नी? की ती स्वत:? तिला मुक्ती मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न विचारायला भाग पाडणारी ही चित्रमालिका आहे. सर्व चित्रे काळ्या रंगात असली तरीही प्रत्येक चित्रात मालिकेच्या मुख्य विषयाचीच परंतु काहीशी निराळी छटा दिसते, त्यामुळे त्या अर्थाने ती सर्व चित्रे वेगवेगळ्या रंगात आहेत, असेही भासते. खरंतर हे वैशिष्ट्य या संपूर्ण प्रदर्शनामधील सर्वच चित्रमालिकांमध्ये जाणवते. सर्वच चित्रे काळ्या रंगातील आहेत. त्यासाठी ऍक्रॅलिक रंग, चारकोल, dermatograph pencil (Grease किंवा wax pencil) अशा विविध रंग-माध्यमांचा मुक्त वापर करून, तसेच काच, हस्तनिर्मित खादी कागद, म्यूजियम ऍक्रॅलिक शीट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर ही चित्रे साकारलेली आहेत. त्यामधून शकुंतला कुलकर्णी यांची इतक्या विविध चित्रकला माध्यमांवर असलेली पकड आणि त्यांची दुर्दम्य प्रयोगशीलता लक्षात येते.
प्रश्न मांडणाऱ्या चित्रांचा प्रवास
प्रत्येक मालिकेमध्ये अनेक चित्रे आहेत आणि प्रत्येक चित्रातील या मनुष्याकृती एकेकट्या आहेत. त्यांचे समूह दिसत नाहीत. या चित्रांमध्ये त्यांचे जे भावविश्व आहे ते त्यांचे स्वतःचे, अगदी वैयक्तिक असे भावविश्व आहे. त्या व्यक्ती किंवा स्त्रिया स्वतःशीच काहीतरी बोलत असताना, पुटपुटत असताना आपल्याला त्यातील काहीतरी ओझरते ऐकायला मिळते आहे, असा भास होतो. एकट्या असल्यामुळेच की काय, या व्यक्ती आपण दुसऱ्याच्या दृष्टीतून कसे दिसतो आहोत याबद्दल बेफिकीर होऊन फक्त स्वतःला शोधत आहेत, व्यक्त होत आहेत, असे वाटते. ‘Stuck in the shadow’ या चित्रमालिकेमध्ये तर हे त्यांचे भावविश्व चक्क त्यांची सावली बनून समोर येते. त्या सावलीचा लहानसा परीघ हेच त्यांचे जग. त्याबाहेर पाऊल टाकणेही त्यांना शक्य होत नाही. आपण स्वतःच निर्माण केलेल्या स्वतःच्याच जीवनाच्या व्याख्येमध्ये त्या इतक्या गुरफटून गेलेल्या आहेत की त्याबाहेर काही असू शकते, याचाच त्यांना विसर पडला आहे. त्या परिघाबाहेर एक पाऊल ही टाकणे त्यांना शक्य होत नाही. इतर मालिकांमध्ये ही सावली प्रत्यक्ष दिसत नसली तरी प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकेकटी असणे आणि जगाची फिकीर न करता तिचे व्यक्त होणे हे मात्र सतत घडत राहते. परंतु हे घडत असताना प्रत्येक चित्रमालिकेमधील विषय वेगवेगळा असतो. कधी ‘Fallen warrior’ मध्ये युद्धात हरलेली, जखमी शरीराचे आणि त्या शरीराचे संरक्षण करणाऱ्या चिलखताचे ओझे गळून पडलेली व्यक्ती दिसते, ‘Shattered’ नावाच्या चित्रमालिकेतही चिलखत नसले तरी, तोच हरून गेल्याचा भाव दिसतो. ‘Imbalance’ या चित्रमालिकेत आयुष्याची कसरत करताकरता चित्र-विचित्र शारीरिक स्थिती (Poses) धारण केलेल्या स्त्रिया दिसतात, Lullaby या चित्रमालिकेमध्ये आपल्या कृश बालकाला कवटाळणारी स्त्री दिसते, तर ‘अंतहीन’ या चित्रमालिकेमध्ये एक न संपणारा प्रवास बघायला मिळतो. या सर्वच चित्रमालिका प्रत्यक्षच बघाव्यात, अशा आहेत.
शकुंतला कुलकर्णी यांचा कलाकार म्हणून प्रवास
कलाकार म्हणून शकुंतला कुलकर्णी यांचा प्रवास देखील असाच प्रदीर्घ आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून १९७२ मध्ये कलेची पदवी संपादन केल्यावर आजतागायत गेल्या पन्नास वर्षांचा सकस अनुभव त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत त्यांनी साधारण १० एकल प्रदर्शने, २७ समूह प्रदर्शने, ५ व्हिडिओग्राफी प्रदर्शने तसेच स्लाइड प्रदर्शने सादर केलेली आहेत. त्यांच्या कलाक्षेत्रातील कामांसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प अशा विविध कलाप्रकारांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. तसेच प्रिंटमेकिंग सारख्या तंत्रामध्ये बरोडा येथील फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट आणि शांतिनिकेतन मधील विस्वभारती येथे शिक्षण-प्रशिक्षण घेऊन, तसेच Performance art सारख्या अनोख्या कलाप्रकारात स्वत: प्रयोग करून या सर्व कलाप्रकारांमध्ये मुक्तसंचार करत त्यांनी आपले कलाविष्कार सादर केलेले आहेत. कलाक्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अमूर्त चित्रकलेमध्ये काम केलेलं असलं तरीही सुरुवातीपासूनच ‘माणसे आणि माणसांची दुर्दशा’ हा विषय त्यांच्या कामांमध्ये नेहेमीच येत राहिलेला आहे.
साधारणपणे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच त्या विषयात अधिक खोलवर जात त्यांनी स्त्रियांच्या जीवनाकडे विशेषत: शहरी भागांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांकडे लक्ष केंद्रित केलं. पुरूषांचे वर्चस्व असलेल्या समाजात जगत असताना प्रत्येक ठिकाणी, म्हणजे घर, कार्यालय आणि कुठल्याही सार्वजनिक ठिकाणच्या अवकाशात स्त्रियांना जखडून ठेवणारा अदृश्य घटक शोधण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आहे. स्त्रियांना उपयोगाची किंवा उपभोगाची एक वस्तू समजणे, त्यांच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करणे, सामाजिक उतरंडीत त्यांना दुय्यम स्थान देणे, अश्या गोष्टी आपल्या समाजात उघडपणे किंवा गाजावाजा न करता घडत असतात. याचा परिणाम स्त्रियांच्या मानसिक जडणघडणीवर होत असतो, त्यामधून त्यांना भीती, चिंता, परकेपणाची भावना, बंदिस्त जागी कोंडलेपणाची भावना इत्यादी भयगंड निर्माण होतात, आणि त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात, अशी निरीक्षणे शकुंतला कुलकर्णी नोंदवतात. त्यातूनच त्यांचे कलाविष्कार निर्माण होतात. त्यासाठी त्या काळ, आकार आणि अवकाश या मितींमध्ये मुक्त संचार करू शकतात. या त्यांच्या मुक्तसंचार करण्याच्या कौशल्याचे श्रेय त्या सत्तरच्या दशकात त्यांनी केलेल्या नाट्यक्षेत्रातील कामाच्या अनुभवाला देतात. ‘Of bodies, armour and cages’ हे २०१२ मधील त्यांचे प्रदर्शन विशेष गाजले होते. कारण त्यात त्यांनी, स्त्रियांचे शरीर ही एक वस्तू मानून समाजाने त्यांच्यावर केलेले अत्याचार आणि त्याविरोधात स्त्रियांच्या मनात तयार झालेली चिलखती प्रतिक्रिया, त्याचे त्यांच्या शरीरावर आणि मनावर आलेले दडपण यांचे भेदक वास्तव त्यांनी तयार केलेले बांबूचे चिलखतसदृश आकार स्वत: अंगावर परिधान करत मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर केलेले जिवंत सादरीकरण (Performance art) हे अतिशय मर्मग्राही असे होते.
एक सच्चा कलाकार कुठल्याही एका माध्यमामध्ये अडकून राहू शकत नाही, राहू इच्छित नाही, कारण माध्यम ही कलाकाराची ओळख नसून आपल्या कलाकृतींच्या द्वारे कलाकाराने व्यक्त केलेले भाव आणि मांडलेले विचार ही त्याची ओळख असते. हे शकुंतला कुलकर्णी यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
त्यांच्या कलाक्षेत्रातील कामांच्या मागोवा घेत असताना, त्यांच्या कलाकृतींच्या मागे असणारा त्यांचा विचार समजावून घेताना, The Mohile Parikh Center for the Visual Arts या मुंबईतील संस्थेने घेतलेली त्यांची एक मुलाखत बघायला मिळाली. त्यामध्ये “मूलभूत पातळीवर कलेच्या माध्यमातून तुम्ही काय करू पाहत आहात?” या प्रश्नाचे उत्तर त्या असे देतात की, “माझ्यासाठी कला म्हणजे माझे जीवनविषयक अनुभव मांडण्याची संधी. माझ्या आजूबाजूला, समाजात दिसणाऱ्या गोष्टींबद्दल मला वाटणाऱ्या चिंता आणि कला-विषयासंबंधी माझ्या मनात वसणाऱ्या कलात्मक संकल्पना यांचे मिश्रण होऊन एखादी कलाकृती निर्माण करणे, हे माझ्यासाठी जणू एखाद्या साहसाप्रमाणे आहे!”
समाजात राहत असताना आपल्या समाजातील माणसांचे व विशेषत: स्त्रियांचे आयुष्य, त्यातील भावभावना, दु:ख, भीती, चिंता, वात्सल्य, जीवनातील संघर्ष, त्यात झालेली दमछाक, हरलेपण, कोंडमारा या सगळ्याकडे डोळेझाक करायची, की हे सगळे मन क्षुब्ध करणारे जाणिवांचे ओघ कलाकृतींच्या स्वरूपात मुक्तपणे स्वत:च्या अंगावर येऊ द्यायचे, हे तुम्हीच ठरवायचे आहे. ज्यांना डोळे झाकून घ्यायचे असतील, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन नाही!
संदर्भ:
शकुंतला कुलकर्णी यांचा कलाविषयक विचार व त्यांचे काम समजावून घ्यायचे असेल, तर या संकेतस्थळांना अवश्य भेट द्या.
शकुंतला कुलकर्णी यांचे संकेतस्थळ
http://shakuntalakulkarni.com/
Chemould Prescott Road आर्ट गॅलरीचे संकेतस्थळ
The Mohile Parikh Center for the Visual Arts या मुंबईतील संस्थेने अनेक कलाकारांवर, त्यांच्या कामांवर अनेक व्हिडिओ तयार केले आहेत. त्यापैकी शकुंतला कुलकर्णी यांच्यावर असलेला व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Shakuntala Kulkarni Introduction
https://v-ideo.art/videos/73
*****
– विनील भुर्के
लेखक स्वयंशिक्षित चित्रकार व कला-अभ्यासक आहेत.
Related
Please login to join discussion