Features

रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास : भाग-१

पल्लवी पंडित (कला इतिहास अभ्यासक)

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (.. 1861 – .. 1941) यांनी कवी, नाटककार, कादंबरीकार, संगीतकार,गायक,नट, नर्तक, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्वचिंतक म्हणून अशा बहुआयामी भूमिका समर्थपणे निभावून भारतीय सांस्कृतिक अवकाश समृद्ध केला आहे. प्रयोगशील कलासक्त आयुष्य जगलेल्या रवींद्रनाथांनी आयुष्याच्या उत्तरार्धात वयाच्या ६५ व्या वर्षी चित्र साकारण्यासाठी कुंचला हाती घेतला. याआधी त्यांनी साहित्य ,संगीत, अभिनय, नृत्य अशा माध्यमांद्वारे त्यांनी आत्माविष्कार समर्थपणे प्रकट केला होता. पण आपल्याला जाणवणारे अबोध,अस्पष्ट ,गहन असे काहीतरी आहे जे आपण कोणत्याही माध्यमातून व्यक्त करू शकलो नाही अशी भावना त्यांना तीव्रतेने जाणवू लागली आणि 1924 दरम्यान ते नकळत चित्रकलेकडे ओढले गेले. साहित्य आणि कलेच्या सर्व क्षेत्रांमध्ये असाधारण प्रतिभा प्रकट करणाऱे त्यांचे व्यक्तीमत्व कसे घडत गेले, कलेच्या सर्व क्षेत्रांत महत्वपूर्ण कलाकृतींची निर्मिती करून आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेकडे वळूनव्यक्ताकडून अव्यक्ताकडे’, झालेला त्यांचा विलक्षण जीवनप्रवास, चित्रकलेमुळे त्यांच्या आयुष्याला लाभलेली परिपूर्ती  *रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास* या लेखमालेमध्ये कला इतिहासाच्या प्राध्यापक पल्लवी पंडित  यांनी तपशीलवार मांडली आहे. ‘तत्रैवया द्वैमासिकाच्या सौजन्याने हे तीन लेखचिन्हआर्टच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

बंगालमध्ये टागोर हे अत्यंत जुने आणि प्रतिष्ठित घराणे. अत्यंत देखणे रूप, असामान्य बुद्धिमत्ता, कर्तृत्ववान, उदार आणि प्रगतीशील दृष्टिकोन असणारे द्वारकानाथ टागोर ही त्यांच्या काळातील असाधारण असामी होती. समाजात त्यांचे स्थान राजा राममोहन राय यांच्या खालोखाल होते.त्या काळातील संकुचित रूढींबद्दल त्यांना तिटकारा होता आणि नव्या विचारांच्या बाबतीत ते स्वागतशील होते. राममोहन रायांच्या ब्राह्मो सभेशी त्यांचा थोडाफार संबंध आला होता मात्र त्यांचे लक्ष मुख्यत्वे समाजाच्या प्रगतीवर आणि संस्कारितेवर होते. त्यांचे पुत्र देवेन्द्रनाथ  मात्र अगदीच त्यांच्या विरूद्ध म्हणजे धर्म जिज्ञासू होते. द्वारकानाथांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्थापन केलेल्याकार, टागोर आणि कंपनीया पेढीचे भांडवलापेक्षा कर्जच जास्त झाले आणि ती बुडाली. तेव्हा देवेन्द्रनाथांनी केवळ हप्त्याहप्त्याने कर्जदारांची देणी चुकती केली नाही तर ज्या ज्या संस्थांना द्वारकानाथांनी देणग्या देण्याचे कबूल केले होते त्यांना देणग्याही दिल्या. तत्त्वनिष्ठतेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. बंगालच्या जनतेने एकमुखाने त्यांनामहर्षिही पदवी प्रदान केली होती.

अशा या देवेन्द्रनाथांना जेव्हा जेव्हा आपण संसारात अधिकच गुंतत जात आहोत अशी जाणीव होत असे तेव्हा तेव्हा ते हिमालयाच्या कुशीत विसावत व आत्म्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करीत. असेच अचानक एके दिवशी हा संसार त्यागून हिमालयातच रहाण्याचे त्यांनी निश्चित केले आणि हिमालय गाठला. पण एके दिवशी हिमालयाने जणू देवेन्द्रनाथांना साक्षात्कार देत स्वगृही परतून संसार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे महर्षि हिमालयातून परतले आणि संसाराला लागले.

या प्रसंगानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 7 मे 1861 रोजी शारदादेवींच्या पोटी रवीन्द्रनाथांचा जन्म झाला. टागोरांच्या जोडासांको वाड्यात साधारणतः साठसत्तर लोकांचे भले मोठे कुटुंब रहात असे. आधीचे वैभव जरी नसले तरी कुटुंबाचा अडचणींचा काळ संपला होता आणि घराण्याची सांपत्तिक स्थिती पुष्कळच सुधारली होती. या वाड्यातील प्रत्येकाला अगदी नोकर वर्गाला देखील कोणत्या न कोणत्या कलेचे वेड होते. ही मंडळी सतत नवनिर्मितीच्या प्रयोगात मग्न असत. नाटके लिहिणेबसविणे, नृत्य, गीत, वेशभूषा, संगीत यांत विविध प्रयोग करून ते सादर करणे, विविध विषयांवर चर्चा करणे, कुस्तीचे पेच शिकणेशिकविणे असे असंख्य क्रियाकलाप या वाड्यात चालत.रवीन्द्रनाथांनंतर शारदादेवींनी दोन वर्षाच्या आत आणखी एका मुलाला जन्म दिला. मात्र हे मूल लगेचच वारले. शारदादेवी देखील खूप थकल्या होत्या. सुरूवातीला रवीला घरच्या आयादायांनी सांभाळले आणि थोडे मोठे झाल्यावर घरच्या गड्यानोकरांकडे सोपविले गेले. लहानग्या रवीला शिकण्याची उर्मी तर होती मात्र शाळेच्या शिस्तीच्या वातावरणात त्याची घुसमट होत असे. त्याला समजून घेणारे शिक्षक तर नव्हतेच पण मित्रही नव्हते.लहानगा रवी फारच एकाकी झाला होता. अशातच त्याला कविता लेखनाचा छंद जडला.

रवीचे परीक्षेतले यश, त्याचे काव्य लेखन, साहित्य, शास्त्र आणि संगीत या विषयांतील त्याची समज आणि गती यामुळे त्याच्या हुशारी बद्दल कुणालाच शंका नव्हती. परंतु तो शाळेत रमत नाही त्यामुळे पुढे त्याचे कसे होणार याची काळजीही घरच्यांना वाटत होती.रवी आता बारा वर्षाचा झाला होता. एके दिवशी वडिलांनी रवीलामाझ्या बरोबर हिमालयात चलतोस का?’ म्हणून विचारले. आणि शाळेच्या कंटाळवाण्या अभ्यासक्रमापासून आणि वाड्याच्या बंदिस्त जीवनापासून दूर असे हे मुक्त चार महिने रवीने आपल्या वडिलांच्या सहवासात आनंदाने घालविले. या काळात तो कितीतरी नवीन गोष्टी शिकत होता, आत्मसात करत होता….. अपूर्व आनंदाची अनुभूती घेत होता.

रवी कोलकत्याला परतला आणि पुन्हा शाळेचे निरस जीवन सुरू झाले. यावेळी मात्र रवीने बंड पुकारले आणि वयाच्या चैदाव्या वर्षी त्याने शाळेला कायमचा रामराम ठोकला. घरच्या वडील मंडळींनी हरप्रकारे त्याची समजूत घातली प्रसंगी रागावूनही पाहिले मात्र कशाचाच परिणाम झाला नाही. रवीने शाळा सोडली असली तरी ज्ञानार्जन करणे सोडले नव्हते. पण हे ज्ञान त्याला त्याच्या पद्धतीने ग्रहण करायचे होते आणि त्यासाठी घरातील वातावरणही अनुकूल होतेच. वाड्यात तत्त्वज्ञान, कविता, साहित्य, नाटके, राजकीय व सामाजिक मत प्रवाह, संगीत (पौर्वात्य व पाश्चिमात्य) अशा विविध विषयांवर चर्चा घडत. अशा या पार्श्वभूमीवर रवीच्या विचारांना, भावनांना मूर्त स्वरूप प्राप्त होत होते.

याच काळात म्हणजे 1875  मध्ये शारदादेवींचे निधन झाले, तेव्हा रवीला त्याचे थोरले बंधू ज्योतिन्द्रनाथ व त्यांच्या पत्नी कादंबरी देवी यांनी सांभाळले. ज्योतिन्द्रनाथांनी त्याच्या प्रतिभेला योग्य दिशा दाखविली व आवश्यक असलेली शिस्त लावली तर त्या वयात आवश्यक असलेली भावनात्मक प्रेरणा व मायेची ऊब कादंबरीदेवींनी दिली. शिवाय ज्योतिन्द्रनाथ त्याच्याशी अनेक विषयांवर चर्चा करीत आणि स्वतः लिहिलेल्या नाटकांवर त्याचा अभिप्राय घेत व त्यात अनुरूप बदलही करीत. ते कित्येकदा रवीने रचलेल्या पदांचा आपल्या नाटकात समावेश करीत. परिणामी रवीचा बुजरेपणा जाऊन त्याचा आत्मविश्वास वाढू लागला.रवीच्या या काळात आणखी एक व्यक्ति महत्त्वपूर्ण ठरली ती म्हणजे ज्योतिबाबूंचे मित्र अक्षयबाबू चौधरी. अत्यंत मस्तमौला असे हे व्यक्तिमत्त्व. त्यांनी रवीच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले आणि अल्पावधीतच त्याचे मिळालेले फळ म्हणजे पंधराव्या वर्षी रवीने साकारलेलेबनफूल हे दीर्घ काव्य जेज्ञानांकुरमासिकात प्रसिद्ध केले गेले.

या सुमारास ज्योतिन्द्रनाथांनीभारतीनावाचे मासिक सुरू केले होते. त्याच्या संपादक मंडळात त्यांनी रवीलाही घेतले व मासिकाची बरीचशी जबाबदारी त्याच्यावर टाकली. या मासिकामुळे रवीमधील लेखक प्रतिभेने चमकू लागला. वैविध्यपूर्ण आणि विपुल साहित्य लेखन रवीनीभारतीया मासिकातून केले. बंगालच्या साहित्य विश्वात जरी रवीन्द्रनाथ आपला ठसा उमटवू लागले होते तरी साहित्य हा काही अर्थार्जनाचा मार्ग नव्हता आणि केवळ साहित्यिकाला म्हणावी तशी सामाजिक प्रतिष्ठा ही नव्हती. त्यामुळे घरची मंडळी रवीन्द्रनाथांच्या भवितव्याविषयी चिंतीत असतानाच रवीन्द्रनाथांचे बंधू सत्येंद्रनाथ यांचे महर्षिंना पत्र आले. त्यात त्यांनी रवीन्द्रनाथांना आपल्याबरोबर विलायतेला नेण्याचा आणि स्वतः प्रमाणेच आय.सी.एस. करण्याचा विचार व्यक्त केला होता. आणि आय.सी.एस. नाही तर निदान बॅरिस्टर तरी होता येईल असे त्यांचे म्हणणे होते. महर्षिंना त्यांचे म्हणणे पटले

आपल्या आवडत्या साहित्यिकांची, कवींची विशेषतः महाकवी शेक्सपीअरची मातृभूमी आपल्याला पहायला मिळणार या कल्पनेने हरखलेले रवीन्द्रनाथ प्रत्यक्षात जेव्हा 1878 च्या सप्टेंबर महिन्यात सत्येन्द्रनाथांबरोबर जायला निघाले तेव्हा विलक्षण अस्वस्थ आणि अंतर्मुख झाले. शिवाय अलेक्झांड्रियाच्या बंदरात सगळ्या राष्ट्रांची गलबते उभी असताना भारताचे मात्र एकही गलबत नाही हे त्यांना प्रथमदर्शनीच जाणवले आणि त्यांचा राष्ट्राभिमान दुखावला गेला. विलायतेच्या त्यांच्या संपूर्ण वास्तव्यात त्यांचा हा व्यथित भाव अखंड जागृत होता हे त्यांचा तेथील समाज जीवनावरील भाष्यातून उत्कटतेने दिसून येते. ते लंडनला पोहचले तेव्हा सृष्टीची तिथली कळा पाहून त्यांचा खूपच भ्रमनिरास झाला. तिथले धुके, ओल, धूर आणि घाई वर्दळ पाहूनइतके सुतकी शहर यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते.” असे उद्गार त्यांनी काढले होते.

सत्येन्द्रनाथांनी एका पब्लिक स्कूलमध्ये रवीन्द्रनाथांना दाखल केले. पण येथेही त्यांचे मन रमेना तेव्हा त्यांना त्यांच्याच मार्गाने जाऊ द्यावे असा विचार सत्येन्द्रनाथांनी केला आणि त्यांना लंडनच्या रिचर्ड पार्क हॉटेल मध्ये ठेवले.काही कालावधीत रवीन्द्र लंडन विद्यापीठात दाखल झाले. येथे त्यांची ओळख लोकेन पलित या अत्यंत हुशार अशा तरूणाशी झाली. जितकी रूची त्याला शास्त्रीय गंथांची होती तेवढ्याच आवडीने तो कथाकांदबऱ्या वाचे व त्यावर चर्चा करे. साहित्यावरील अनेक व्याख्याने त्यांनी सोबतच ऐकली. थॉमस ब्राऊनचे रेलीजियो मेडिसी आणि शेक्सपीअरची  काही नाटकेही बरोबरीने अभ्यासली. ब्रिटिश म्युझियममध्ये ही दोघे खूप रमत आणि तेथील कलाकृतींवर सखोल चर्चा करीत. ते ब्रिटिश पार्लमेंटमध्येही जात. ब्रिटिश राजकारण्यांची अनेक व्याख्यानेही त्यांनी सोबत ऐकली होती.

मात्र ज्या कारणासाठी रवीन्द्रनाथ लंडनला आले होते म्हणजे बॅरिस्टर किंवा दुसरी एखादी पदवी घेण्याच्या दृष्टीने त्यांनी काहीहीसाध्य केले नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या घरच्या मंडळींनी त्यांना ताबडतोब घरी बोलावले. सतरा महिन्यांच्या वास्तव्यानंतर 1880 च्या फेब्रुवारी महिन्यात रवीन्द्रनाथ सत्येन्द्रनाथांबरोबर घरी परतले. सगळ्यांच्या दृष्टीने ते कुठलीही पदवी न घेता रिकाम्या हाताने परतले होते. पण रवीन्द्रांच्या हृदयात मात्र एका प्रदीर्घ भाव नाट्याचा जन्म झाला होता. घरी परतल्यावर त्यांनी चौतीस प्रवेशांचे आणि चार हजारांहून अधिक ओळींचेभग्न हृदय हे नाट्यकाव्य पूर्ण केले.

रवीन्द्रनाथांची साहित्य साधना

घरी परतल्यावर रवीन्द्रनाथांच्या प्रतिभेला जणू बहरच आला आणि त्यांनी समर्थपणेवाल्मीकि प्रतिभा या गीतनाट्याची रचना केली. अल्पावधीतच त्यांनीकालमृगया हे दुसरे गीतनाट्य रंगभूमीवर सादर केले. या दोन गीतनाट्यांची रचना करीत असताना पाश्चात्य साहित्य आणि संगीताची सिद्धांत संहिता रवीन्द्रनाथांना प्रेरणादायी ठरत होते. शिवाय या कालावधित त्यांनीबंगाली हे कवी का नाहीत?’ या निबंधात आपल्या लोकांमधील असलेला आळस आणि कुतुहलाचा अभाव या दोषांवर मार्मिकपणे टिप्पणी केली तर आणखी एका प्रबंधात त्यांनी साक्षात्कारवादी कवितेची सखोल मीमांसा केलेली आढळून येते.

तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती. गुलामगिरीमुळे आपल्या देशाला पदोपदी सोसावी लागणारी मानहानी आणि त्यामुळे आलेले पंगुत्व रवीन्द्रनाथांना तीव्रतेने जाणवत होते. त्यांची मूळ वृत्ती राजकारण्याची नव्हती पण राजकीय कार्यक्रमांतले दोष जाणवण्याइतकी संवेदनक्षमता त्यांच्याकडे होती आणि त्यावरील संभाव्य उपाय सुचविण्याची बौद्धिक क्षमताही होती. पण स्वतःच्या मर्यादांची जाणीव असल्याने रवीन्द्रनाथांच्या विषण्णतेत भर पडत होती. असे असले तरी ज्याप्रमाणे पश्चिमेकडील भौतिकवादाचा व तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्या वेळच्या बंगाली तरूणांवर होता तसाच काही प्रमाणात रवीन्द्रनाथांवरही होताच. त्यामुळे त्यांनी जोपासलेल्या मूल्यांना तडे जाऊ लागले होते आणि या गोष्टींची योग्य रीतीने सांगड कशी घालावी हे रवीन्द्रनाथांना कळेनासे झाले. द्विधा, व्याकुळ आणि काहीशा संभ्रमित अवस्थेतच रवीन्द्रनाथांचा स्वतःला शोधण्याचा प्रवास सुरू झाला आणि ते काव्य निर्मितीत मग्न झाले. या कालखंडात त्यांनीसंध्या संगीत साकारले. या कवितांमधील भाव भाबडा आणि स्वप्नाळू असला तरी अत्यंत सहज आणि अकृत्रिम आहे. संध्या संगीताला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि रवीन्द्रनाथांच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण घटना म्हणजे श्रेष्ठ लेखक बंकिमचन्द्र चटर्जी यांनी या कवितांचे विशेष कौतुक केले.

रवीन्द्रनाथांसाठी काव्य म्हणजे जणू जीवन साधनाच! त्यांनी विपुल कविता लेखन केले. यात निसर्ग कविता, प्रेमकविता, भक्ति कविता, राष्ट्रीय कविता, शिशु कविता, कथा कविता, नाट्य कविता जितके म्हणून प्रकार होऊ शकतात ते सर्व त्यांनी समर्थपणे हाताळले. यांतील कित्येक प्रकारांची बंगालीत ओळख त्यांनीच पहिल्यांदा करून दिली आणि हे प्रकार सर्वमान्यही झाले.ज्या प्रमाणे रवीन्द्रनाथांनी निसर्ग, स्त्री आणि मूल यांची विविध रूपे आपल्या कवितांमधून साकारली आहेत त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राचा जयघोषही त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये केलेला आढळतो. पण अगदी लहानपणापासूनचहे विश्वची माझे घरही जाणीव रवीन्द्रनाथांना होती आणि ही राष्ट्रभक्तीच्या विरूद्ध टोकाची भूमिका आहे असे त्यांनी कधीही मानले नाही.रवीन्द्रनाथांच्या काव्यावर आपल्याला जसा संस्कृत साहित्याचा प्रभाव दिसतो त्याच प्रमाणे वैष्णव कवींची विशेषतः बाऊल कवींची प्रेमगाथा, सूफींचा गूढवाद आणि इंग्रज रोमँटिक कवींचा कल्पनावाद यांचेही खोल संस्कार त्यांच्या काव्यावर झालेले आढळतात.

रवीन्द्रनाथांच्या कवितेला बंगाली रसिकांच्या अंतःकरणात जिव्हाळ्याचे आणि आदराचे स्थान मिळाले होते. पण त्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळाली ती त्यांच्यागीतांजलीतील साक्षात्कारवादी कवितांमुळे. याच कविता संग्रहाने त्यांना नोबेल पारितोषिक (1913) मिळवून दिले. जगातल्या सर्वश्रेष्ठ कवींनी, श्रेष्ठींनी आणि रसिक वर्गाने त्यांच्या या संग्रहाचे भरभरून स्वागत केले आणि त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले.योगी अरविन्द या कवितांसंदर्भात म्हणतात

रवीन्द्रांच्या कवितेने उद्याच्या उन्नत आणि विकासमान कवितेची पूर्वपीठिका तयार केली आहे. एका अभिनव आणि तरलस्पर्शी पद्धतीने जीवनाकडे पहायला आपल्याला शिकविले आहे आणि प्रतिभेने पाहिलेला प्रकाश आणि प्राणाने अनुभवलेली लय यांच्याद्वारा मानवी मन, प्राण आणि जीवन यांना सनातन अनंताशी पोहचता येईल असा पूल निर्माण केला आहे.”

लेखिकापल्लवी पंडीत  (कला इतिहास अभ्यासक)

संपर्क क्र. 9503750877

(‘तत्रैव द्वैमासिकातून साभार  )

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.