No products in the cart.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री: इकडे लक्ष देणार?
जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील सुमारे दीडशे कला शिक्षकांच्या भरतीच्या जाहिराती लोकसेवा आयोगानं अलीकडेच प्रसारित केल्या आहेत. या जाहिराती प्रकाशित झाल्यापासून ‘चिन्ह‘कडे सातत्यानं उमेदवारांचे फोन येत आहेत. ऑनलाईन फॉर्म भरणं किती अवघड आहे हे जसं त्या उमेदवारांकडून सांगितलं जात आहे तसंच लोकसेवा आयोगानं उमेदवारांकडून गुणवतेबाबत ज्या अवाजवी अपेक्षा जाहिरातीत व्यक्त केल्या गेल्या आहेत त्याविषयीदेखील उमेदवारांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्याविषयी या आठवड्यात आम्ही आणखीनही काही लेख प्रसिद्ध करणार आहोत.
आज प्रसिद्ध करतो आहोत ‘महाराष्ट्र चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघ (महा-कॅटना) या संघटनेनं सर्वश्री राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सचिव उच्च व तंत्रशिक्षण या सर्वांना सदर पत्राच्या प्रती धाडल्या आहेत. ते पत्र आम्ही अंशतः दुरुस्ती करून देत आहोत.
हा विषय अतिशय ज्वलंत आहे. ‘चिन्ह’ हा विषय लावून धरणारच आहे. पण चित्रकला शिक्षक, चित्रकार, संस्थाचालक यांनीदेखील हा विषय उचलून धरणं अत्यावश्यक आहे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणूनच आपण या विषयावर मोकळेपणानं व्यक्त व्हावं अशी आमची जाहीर विनंती आहे. त्यासाठी चिन्हच्या वेबसाइटवरील व्हाट्सअप लोगोवर क्लिक करा आणि आपल्याला जे वाटतंय ते मनमोकळेपणानं मांडा. आम्ही त्यास प्रसिद्धी देऊ. नामोल्लेख नको असल्यास तसे अवश्य कळवा.
*****
“महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १३/०९/२०२३ रोजी कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्रातील कला महाविद्यालयातील BFA व AT.D. या अभ्यासक्रमासाठी क्रमशः प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख व अधिव्याख्याता या पदाकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात आली आहे. या जाहिरातीत B.FA या डिग्रीला समकक्ष असलेल्या G.D. Art (Diploma) या अभ्यासक्रमाची पात्रता स्वीकारली जात नाही आहे. G.D.Art (Diploma) हा अभ्यासक्रम कला संचालनालयाअंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय व अनेक अनुदानीत व विनाअनुदानीत कला महाविद्यालयात सुरू आहे. अनेक विद्यार्थी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करून Master of Fine Art (M.F.A.) व Ph.D. झाले आहेत. तसेच आताही काही विद्यार्थी (G.D. Art – Diploma, MFA होऊन) Ph.D. करीत आहेत. कला संचालनालया तर्फे G.D.Art (Diploma) झालेल्या विद्यार्थ्यांना B.FA या डीग्रीला G.D. Art (Diploma) समकक्ष असल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे आणि G.D. Art (Diploma) च्या विद्यार्थ्याना Master of Fine Art (M.FA.) करीता समकक्षता प्रमाणपत्रा सोबतच N.O.C. प्रमाणपत्रदेखील दिलेले आहे. त्या आधारावर आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निघालेल्या जाहिरातीनुसार अर्ज केले होते. आणि त्यातील पात्र असलेले काहीजण सेवेत रुजूही झालेले आहेत.
महाराष्ट्रातील अनुदानित संस्थेत अधिव्याख्याता या पदावर 20 ते 15 पासून अखंडीतपणे कलाध्यापन करित असलेले अनेक कलाशिक्षक आहेत. आपण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला, सदर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी जो मसुदा पाठविलेला आहे. त्यात कुठलाही अनुभवी अध्यापक पात्र ठरणार नाहीत याची काळजी घेऊन बनविण्यात आला असून तो आम्हा सर्व प्रकारच्या कलाध्यापकांवर अन्याय करणारा तर आहेच महाराष्ट्रातील कलाशिक्षण परंपरा खंडित करणारा देखील आहे. हे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत, त्या संदर्भातील त्रुटी आणि चुका खालीलप्रमाणे आहेत. त्यांचा गांभीर्यपूर्वक तसेच सहानुभुतीसह कलाशिक्षणाच्या हिताच्या दृष्टीकोनातून विचार करून अध्यापकाच्या भविष्याचा – चरितार्थाचा विचार करावा ही विनंती.
१) पदभतींचे सुधारीत नियम (रिक्रुटमेंट रुल RR):
सदर सुधारीत नियमावली बनविण्यासाठी दृश्यकला क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी आणि कला प्रशासनाचं ज्ञान असलेल्या व्यक्तींची समिती निर्माण करून, त्यांच्या सूचनेनुसार RR बनवावयास हवे होते. सध्याच्या सर्व जाहिरातीतील नियम अटी- पात्रता या अतार्किकपणे बनवून दृश्यकला क्षेत्राला लावल्या आहेत. ज्या अतिशय चुकीच्याच नाहीत तर अन्यायकारक सुध्दा आहेत. त्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या नाहीत हे प्रथम दर्शनीच लक्षात येते.
२) शैक्षणिक अर्हता:
सदर जाहिरातीत, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. या शैक्षणिक स्तरांचा उल्लेख असून पैकी एका ठिकाणी, पदवीत्तर प्रथम श्रेणीची मागणी केलेली आहे. वास्तविक पदवी शिक्षण हे अलिकडील २०-२२ वर्षात सुरु झालेले आहे. गेल्या काही वर्षांपासून या विषयामध्ये प्रथम श्रेणी + मार्क मिळायला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी प्रथम श्रेणी अभावानेच मिळत होती. मात्र या जाहिरातीमध्ये प्रथम श्रेणी मागितल्यामुळे अनेक अनुभवी अध्यापकांना अर्ज करण्याची संधी नाकारली जाणार आहे. तथापि, जी. डी. आर्ट ही पदविका गेली ८०+ वर्षापासून सर्व कलाशिक्षण शाखांमध्ये आजही आहे. किंबहुना सध्याच्या पदवी + स्नातकांना दृश्य कलाध्यापन करणारेही बव्हंशी ठिकाणी, जी.डी. आर्ट ही पदविका प्राप्त ज्येष्ठ व अनुभवी अध्यापकच आहेत. जे त्या त्या वेळचे गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी होते. दिनांक १३/०९/२०२३च्या जाहिरातीनुसार जी. डी. आर्ट पदविकेसोबतच MFA व उच्चशिक्षण तसेच शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष पदाच्या जाहिरातीवर ऑनलाईन अर्ज केल्यास are not eligible for this post असे लिहून येऊन अर्ज रद्द करण्यात येत आहे किंवा अर्ज पुढे जात नाही आहे. ज्यांना डिग्री समकक्षता प्रमाणपत्र ही देण्यात आलेले असून त्यांच्याकडे पद्धतशीरपणे अक्षम्य दुर्लक्ष करून, त्यांच्या अर्हतेवर आणि अनुभवांवर अन्याय तर केलाच आहे, शिवाय महाराष्ट्रातीला अनुभवी कला अध्यापकांना वगळून कलाक्षेत्राचे नुकसान करण्याचा घाट घातलेला आहे.. महोदय, भारतातील युजीसी मान्य युनिव्हर्सिटीतील MFA प्रथम श्रेणी असलेले उमेदवार हा या जाहिरातीनुसार द्वितीय श्रेणीत येतो, म्हणजे MPSC युनिव्हर्सिटीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करते आहे.
३) सेवावृत्तीचे वय:
VITI, मेडिकल, विद्यापीठीय संलग्न सर्व महाविद्यालये, इंजिनियरिंग अशा सर्वच विभागातील प्राध्यापक व समकक्ष पदांचे निवृत्तीचे वयाचे निकष, इथेही लावावयास हवेत.
(४) आमच्या दृश्यकला क्षेत्रातील, सर्वच विभागांत त्या त्या दृश्यकला ध्यापकांनी निर्माण केलेल्या कलाकृती या, त्यांचे स्वतःचे सृजन असते, संशोधन असते. अशावेळी इतरांना सादर करण्यासाठी जे संशोधनात्मक लेखन, अपेक्षित असते, त्या समकक्ष सदर दृश्यकला कृतीची प्रात्यक्षिके / पेपर प्रेझेंटेशन / इतर महाविद्यालयीन लेक्चर व कलाकृतीच्या प्रदर्शनाची तुलना करावी.
(५) आमच्या सध्याच्या दृश्यकला क्षेत्रात शासनाच्या संबंधित विभागाकडून आमच्या शैक्षणिक गुणवत्तेचा, शासनाला अपेक्षित असलेला दर्जा प्राप्त करण्यासाठी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रशिक्षणे, प्रोत्साहनात्मक योजना, सेमिनार किंवा धोरणात्मक निर्णय राबविले गेले नाहीत हे सखेद नमूद करावे लागत आहे, तसेच उच्च शिक्षणा संदर्भात पी.एच.डी. साठी कुठल्याही प्रकारची विद्यापीठीय सुलभता तर नाहीच, तसेच काही प्रात्यक्षिक विषयांसाठी आजही देशभरात कुठेही पीएचडीची सुविधा, उपलब्ध नाही. तसेच ज्या विद्यापीठात कला विषयाची पीएचडीच उपलब्ध असल्यास गाईड उपलब्ध नाही व त्या विद्यापीठातील कॉलेजमध्ये पीएचडी आणि ८ रिसर्च पेपर मागणे संयुक्तिक नाही यांचाही विचार तज्ञांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला इच्छा असुनही, शासनाला अपेक्षित असलेली शैक्षणिक गुणवत्ता मिळविण्यात अडथळे आले आहेत.
सहयोगी प्राध्यापक या पदासाठी दिलेली शैक्षणिक अर्हता ही PHD व 6 रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले हवेत. महोदय, महाराष्ट्रातील 4 शासकीय कला महाविद्यालय वगळता कुठेही BFA अभ्यासक्रम असणारी मोजकीच कला महाविद्यालय आहेत त्यातही पेंटिंगचा अभ्यासक्रम असणारी कमीच, महोदय कला संचालनालय अखत्यारीत असलेल्या महाविद्यालयासाठी कला संचालनालयाने कुठलाही सेमिनार किंवा व्हिज्युअल आर्ट कॉन्फरन्स अथवा वर्कशॉप वगैरे आयोजन केल्याचं मागील 30 वर्षात तरी दिसलेलं नाही.
सदर जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्हता मधील १०.१.१ नुसार शासन पत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग या मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जर Fine Art विषयाच्या शिक्षकीय पदाची समकक्षता AICT ने जाहिर केलेली नाही. तरीही, जाहिराती मधील मुद्दा क्र.12.7 नुसार प्रस्तुत पदाची निवड प्रक्रीया ही AICT . Degree Regulation कशी घेण्यात येईल या बाबत संभ्रम आहे. या व अशा अनेक दुर्दैवी कारणांची नोंद घेऊन शासनाने, सदर तुघलकी जाहिराती रद्द करून, कलाक्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीची नेमणूक करून सुधारित RR बनवावेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या जाहिरातीला स्थगिती देऊन नविन सुधारीत जाहिराती प्रसिध्द करावी ही विनंती
संदर्भ: १) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जेव्हा पासून कलाअध्यापक पदे भरण्यास सुरुवात झालेल्या जाहिराती पासून तर सन २०१६ पर्यंतच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निघालेल्या सदर पदाच्या जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता, पात्रता, वय इत्यादी अटी व नियम पाहावे.
२) आपल्या आयोगामार्फत कला संचालकपदाची काढलेली जाहिरात (धारिका. 2044 (12-अ) / 1100/ सात- अ. जाहिरात क्र. 14/2016. यात वरील पदासाठी 55% मागितले आहेत. तर आता ही अट का?
*****
Related
Please login to join discussion