No products in the cart.
वीरचंद धरमसी : एका बहुश्रुत विद्वानाचे स्मरण
सुप्रसिद्ध विद्वान आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे रौप्यपदक विजेते वीरचंद धरमसी यांचे ६ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांच्या विद्वत्तापूर्ण प्रकल्पांमध्ये मग्न होते, ज्यात ‘अवनव’ नावाच्या गुजराती पुस्तकाच्या संकलनाचा समावेश होता. २७ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथील एशियाटिक सोसायटीमधील ‘दरबार हॉल’मध्ये एका औपचारिक कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण करत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन केले गेले.
कार्यक्रमच्या सुरुवातीला श्री मुरली आर यांच्याशी झालेल्या संभाषणात इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ‘अवनव‘चे संपादक डॉ. हेमंत दवे यांनी श्रोत्यांना सांगितले की, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे गुजराती पुस्तक प्रकाशित केले जाण्याचा हा एक दुर्मिळ प्रसंग आहे. याआधी गुजराती पुस्तकाचे प्रकाशन तब्बल १८० वर्षांपूर्वी म्हणजे १८४३ मध्ये केले गेले होते. ‘अवनव‘ या गुजराती शब्दाचा अर्थ आधुनिक, विलक्षण, वैविध्यपूर्ण, अलौकिक आणि अद्भुत असा आहे, जो या पुस्तकातील वैविध्यपूर्ण साहित्याचे यथायोग्य वर्णन करतो. पुरातत्व, नाट्य, चित्रपट, दृश्यकला आणि गुजराती व पारसी समाजांच्या सामाजिक-सांस्कृतिक पैलूंसह विविध विषयांवर धरमसी यांनी लिहिलेल्या निबंधांचा संग्रह या पुस्तकात आहे.
कार्यक्रमच्या सुरुवातीला श्री मुरली आर यांच्याशी झालेल्या संभाषणात इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि ‘अवनव‘चे संपादक डॉ. हेमंत दवे यांनी श्रोत्यांना सांगितले की, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे गुजराती पुस्तक प्रकाशित केले जाण्याचा हा एक दुर्मिळ प्रसंग आहे. याआधी गुजराती पुस्तकाचे प्रकाशन तब्बल १८० वर्षांपूर्वी म्हणजे १८४३ मध्ये केले गेले होते. ‘अवनव‘ या गुजराती शब्दाचा अर्थ आधुनिक, विलक्षण, वैविध्यपूर्ण, अलौकिक आणि अद्भुत असा आहे, जो या पुस्तकातील वैविध्यपूर्ण साहित्याचे यथायोग्य वर्णन करतो. पुरातत्व, नाट्य, चित्रपट, दृश्यकला आणि गुजराती व पारसी समाजांच्या सामाजिक-सांस्कृतिक पैलूंसह विविध विषयांवर धरमसी यांनी लिहिलेल्या निबंधांचा संग्रह या पुस्तकात आहे.
भारताचे आघाडीचे कलाकार श्री अतुल दोडिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी स्वर्गीय धरमसीभाई आणि त्यांचे सर्वात जवळचे मित्र श्री करमसी यांच्याशी असलेल्या त्यांच्या आयुष्यभराच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. दोडिया यांनी टिप्पणी केली की, माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून या दोघांच्या सहवासाचे भाग्य मला मिळाले. त्यांनी धरमसी यांच्या हृद्य आठवणी सांगितल्या आणि त्यांना ज्यात रस होता अशा सिनेमा, साहित्य, पुरातत्व, चित्रकला आणि शिल्पकला इत्यादि विविध गोष्टींचा उल्लेख केला. या सर्व विषयांचे ज्ञान धरमसी यांच्या व्यक्तिमत्त्वात एकरूप झालेले होते, असेही त्यांनी सांगितले. दोडिया यांनी आवर्जून सांगितले की धरमसी यांची विविध क्षेत्रातील आवड केवळ वरवरच्या माहितीपुरती मर्यादित नव्हती, तर ते प्रत्येक गोष्ट सखोलपणे आत्मसात करायचे. ते आपले ज्ञान इतरांना द्यायलाही तयार असत, ते मला अनेक महत्त्वाचे संदर्भ पाठवत असत, अशी आठवण दोडिया यांनी सांगितली. धरमसी यांनी ‘उकियो-ई’ या जपानी कलाप्रकारासंबंधी एक पुस्तक त्यावेळी कला-विद्यार्थीनी असलेल्या व नंतर अतुल दोडिया यांच्या पत्नी झालेल्या अंजू यांना भेट दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्या पुस्तकाचा अंजू दोडिया यांच्या कलाकृतींवर लक्षणीय प्रभाव पडला होता, असेही त्यांनी नमूद केले. १९७६ मध्ये गुजराती पाक्षिक ‘समर्पण’मध्ये प्रसिद्ध झालेली धरमसी यांनी घेतलेली प्रख्यात भारतीय चित्रकार श्री प्रभाकर बरवे यांची मुलाखत वाचल्याचा दोडिया यांनी विशेष उल्लेख केला. बरवे यांची ती महत्त्वाची मुलाखत ‘अवनव’ मध्ये समाविष्ट आहे. योगायोग असा की, धरमसीभाईंनी त्यांच्या मृत्यूच्या दोनच आठवड्यांपूर्वी, चिन्ह प्रकाशनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी घेतलेल्या प्रभाकर बरवे यांच्या त्या मुलाखतीसंदर्भात विस्ताराने सांगितले होते. चिन्ह प्रकाशनाच्या प्रभाकर बरवे यांच्यावरील नियोजित ग्रंथासाठी त्यांनी ही मुलाखत दिली होती.
याप्रसंगी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षा प्रा विस्पी बालापोरिया यांनी आपल्या भाषणात धरमसी यांचा एक सक्रिय वाचक म्हणून आणि एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य म्हणून अभ्यासपूर्ण कार्यकाळ विशद केला. डॉ हेमंत दवे यांनी पुरातत्वशास्त्रासह विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या धरमसी यांच्या अभ्यासाविषयी आणि भारतातील पुरातत्व अभ्यासासाठी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठासोबतच्या त्यांच्या सहकार्याविषयी सांगितले. प्रकाशन समितीच्या अध्यक्षा डॉ मीना वैशंपायन यांनी या पुस्तकातील बारकावे उपस्थितांना सांगितले. सुप्रसिद्ध गुजराती कवी, लेखक आणि दृश्य कलाकार प्रबोध पारीख यांनी धरमसी यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीच्या वैयक्तिक आठवणी सांगून श्रद्धांजली वाहिली. अग्रगण्य भारतीय चित्रपट अभ्यासक आणि इतिहासकार श्री अमृत गांगर यांनी त्यांच्या दीर्घ भाषणातून धरमसी यांचे वैयक्तिक गुण श्रोत्यांसमोर आणले. त्यांनी नमूद केले की भारतीय चित्रपट इतिहासाच्या अभ्यासाला ताठ कणा मिळवून देण्यात धरमसी यांचा महत्त्वाचा वाटा होता. गांगर यांनी एशियाटिक सोसायटीच्या प्रतिष्ठित सदस्यांच्या प्रसिद्ध ‘अड्ड्या’ची आठवण जागी केली, ज्यात धरमसी यांचे घनिष्ठ स्नेही असलेले दुर्गा भागवत आणि अरुण कोलटकर यांसारखे दिग्गज साहित्यिक असत. वीरचंद धरमसी यांचे सुपुत्र श्री तत्सू यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या, ज्यावरून लक्षात आले की धरमसी यांनी त्यांच्या मुलांना आणि कुटुंबीयांना साहित्य, चित्रकला आणि संगीत यांसह सर्व कलाप्रकारांमध्ये रस कसा घ्यावा, हे शिकवले. गेली ६० वर्षे धरमसी यांच्याशी विवाहित असलेल्या त्यांच्या पत्नी श्रीमती नवलबेन यांनी हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय प्रेमाने पाहिला. शेवटी उपस्थितांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. त्यांच्यासोबत त्यांचा सुपुत्र तत्सू, त्याची पत्नी हेमा, मुलगी मनीषा आणि तिचा पती जयेश, तसेच नातवंडे – विस्मय, जान्हवी आणि भूमी – उपस्थित होते. वीरचंद धरमसी यांना चिरशांती मिळावी यासाठी आम्ही आमच्या वाचकांच्या प्रार्थनांमध्ये नम्रपणे सहभागी आहोत.
‘अवनव’ हे पुस्तक मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. www.asiaticsociety.org.in
******
– विनील भुर्के
लेखक स्वयं-शिक्षित कलाकार आणि कला-अभ्यासक आहेत.
Related
Please login to join discussion