No products in the cart.
जॉन तुन सेन : अंतर्मुख प्रतिभावंत
27 डिसेंबर 2022 रोजी चित्रकार जॉन तुन सेन यांचे फ्रिबर्ग, जर्मनी येथे निधन झाले. जॉन हे जेजेचे माजी विद्यार्थी. जेजेच्या ज्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झाले त्यापैकी एक म्हणजे जॉन. हल्ली आंतरधर्मीय, आंतरराष्ट्रीय लग्ने मोठ्या प्रमाणात होतात. पण जुन्या काळातील आंतरराष्ट्रीय जोडप्याचे एक मूल म्हणजे जॉन तुन सेन. जॉन यांची आई बरमीज तर वडील तमिळ. आशा त्या काळच्या मानाने आगळ्या वेगळ्या जोडप्याचे मूल म्हणून जॉन वृत्तीने खुल्या मनाचे होते. या खुल्या मनामुळेच की काय जेजेमध्येही ते स्पर्धेपासून दूर राहून काम करायचे. जॉन कोलते सरांचे जवळचे विद्यार्थी आणि चित्रकार भगवान चव्हाण यांचे जवळचे मित्र. भगवान चव्हाण यांनी या लेखातून त्यांच्या आठवणी मांडल्या आहेत.
जॉन जेजेमध्ये आला तो चित्रकलेची आवड म्हणून. त्यापूर्वी त्यानं बीकॉम पूर्ण केलं होतं. जेजेमध्ये असताना तो इतर विद्यार्थ्यांमध्ये फारसा मिसळत नसे. फार कमी लोकांशी त्याची मैत्री होई. आणि त्याच्या आतल्या वर्तुळात फार कमी जणांना मित्र म्हणून प्रवेश मिळे. तर अशा जवळच्या मित्रांमध्ये मी एक होतो. मी जॉनला दोन वर्षे सिनिअर होतो. आमची मैत्री का झाली याला काही असं विशेष कारण सांगता येणार नाही. काही लोकांशी पहिल्याच भेटीत आपले सूर जुळतात तसंच काहीसं हे होतं.
जॉन स्वभावाने अंतर्मुख होता. विचारांच्या बाबतीत तो काळाच्या पुढेच होता म्हणा ना. आईवडील वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून आल्यामुळे त्याचे विचार झापडबंद कधीच नव्हते. याचा फायदा त्याला त्याच्या चित्रकलेच्या कारकीर्दीमध्ये खूपच झाला. जॉन हा कोलते सरांचा जवळचा विद्यार्थी. त्यांचा सर्वच बाबतीत जॉनवर खूप प्रभाव होता. जॉनच्या चित्रातही त्यामुळे कोलते सरांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो. जॉन सर्वच माध्यमात काम करायचा. कोलते सरांच्या प्रभावामुळे त्याला अमूर्त माध्यमातील अभिव्यक्ती जवळची वाटू लागली. असं असलं तरी त्याच्या चित्रांमध्ये नेहमीच स्वतःचं असं काहीतरी खास असायचं. जे शब्दात सांगणं कठीण आहे.
जॉन बांद्रा होस्टेलमध्ये राहत असे. मीही तिथेच होतो पण दुसऱ्या वर्षानंतर मी ते सोडलं. मग मी तिथे जॉनला भेटायला जात असे. कॉलेजचे विद्यार्थी होस्टेलमध्ये कसे राहतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या रूममध्ये गेलं तर ही अडगळीची खोली आहे की काय असं वाटावं इतकं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. जॉनची रूम मात्र याला अपवाद होती. तो रूम अतिशय स्वच्छ आणि टापटीप ठेवायचा. एवढंच नाही तर अतिशय कलात्मक दृष्टीने त्या रुमचं इंटेरिअरही करायचा. त्याची ही सुंदर रूम बघण्यासाठी आम्ही सगळे त्याच्या रूममध्ये गर्दी करायचो.
जॉन अंतर्मुख होता. तो फार कमी बोलायचा. कलेच्या क्षेत्रात मौनाचं महत्व खूप आहे. त्या कॉलेजच्या नवथर वयात हे समजून घेणं आमच्या सर्वांसाठी कठीण होतं. पण जॉन मात्र त्या वयातही काहीसा धीर गंभीर आणि मौन व्रतात असल्यासारखा राहायचा. असं असलं तरी त्याची एक सवय फार खटकायची. तो कायम आपल्याच धुंदीत असायचा. त्याकाळात अंमली पदार्थांवरचे विशेषतः अफूवरचे नियम आजच्या इतके कडक नसावेत. त्यामुळे तो चक्क दारू, गांजा वगैरे अंमली पदार्थांचे सेवन करून धुंदावस्थेत कॉलेजमध्ये यायचा. आणि आपल्यातच हरवायचा. त्यामुळे त्याचं मौन असणं हे अंगीभूत होतं की अंमली पदार्थांचा प्रभाव हे ठरवणं कठीण आहे. असं असलं तरी तो प्रतिभावंत कलावंत होता हे निश्चित त्यामुळे आपल्या समाजाच्या साचेबद्ध चौकटीत त्याच्या या वागणुकीला बसवणं योग्य ठरणार नाही.
माझं जेजेचं शिक्षण संपल्यानंतर मला ललित कला अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली आणि मी 1984 मध्ये चेन्नईला आलो. पुढे स्कॉलरशिपचा कालावधी संपल्यानंतरही एक स्टुडिओ घेऊन मी चेन्नईतच काम करत होतो. दरम्यान जॉनचही जेजेमधलं शिक्षण संपलं आणि तो चेन्नईला आपल्या घरी परत आला. इकडे आल्यानंतर तो रोज माझ्या स्टुडिओमध्ये येत असे. येताना तो आपलं ड्रिंक आणि सिगारेट वगैरे घेऊनच येई. मग काय सिगरेट आणि दारूच्या अंमलात त्याची तंद्री लागे आणि तो अतिशय लक्षपूर्वक माझ्या कामाचं निरीक्षण करत असे. जवळपास एक वर्ष हे सत्र चालू होतं आणि या काळात त्यानं कुठलंच काम केलं नाही. पुढे कधीतरी जॉनला आपला सूर गवसला आणि त्यानं झपाट्यानं काम करायला सुरुवात केली. ऑइल कलर, ऑइल पेस्टल अशा विविध माध्यमात तो काम करू लागला.
पुढे जॉनची चेन्नईतच कॅरिन या जर्मन मुलीशी भेट झाली. या ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करायचं ठरवलं. लग्नानंतर जॉन जर्मनीत सेटल झाला. असं असलं तरी भारताच्या ओढीतून तो दरवर्षी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिने चेन्नईत राहत असे. मग तो काही काम जर्मनीत करत असे आणि काही काम भारतात करत असे. भारतात आप्पाराव गॅलरीत त्याची नेहमी प्रदर्शने होत असत.
एप्रिल 2022 मध्ये आम्ही मिळून ‘विदिन | विदाऊट’ हे प्रदर्शन केलं होतं. खुप छान अनुभव होता तो. पण तेव्हा असं मुळीच वाटलं नाही की ते आमचं शेवटचं प्रदर्शन ठरेल. आणि काळ इतक्या लवकर जॉनला आपल्यातून ओढून नेईल.
जॉन कायम प्रसिद्धी पराङ्मुख राहिला. आज अनेक जण प्रसिद्धीसाठी वाटेल ते करतात. अनेकांना पीआरची आवश्यकता भासते. पण जॉनच्या कामाच्या गुणवत्तेनेच त्याला कलेच्या क्षेत्रात मान्यता मिळवून दिली. जॉनने अगदी जेजेपासूनच कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला नाही. पुरस्कार वगैरे सारख्या भानगडीत न पडता सदैव आपले काम करत राहिला. म्हणूनच कलाकार म्हणून तो श्रेष्ठ कलाकृती तयार करत राहिला. जॉनला अजून खूप काम करायचं होतं पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि जॉन आपल्यातून निघून गेला. असं असलं तरी त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून तो आपल्यात कायम असेल.
जॉन मित्रा, तुला या लेखाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली.
– भगवान चव्हाण, चेन्नई.
शब्दांकन – कनक वाईकर
Related
Please login to join discussion