No products in the cart.
फेअर अनुभव सांगणारी रफ स्केचेस !
चित्रकार सुभाष अवचट यांचं ‘रफ स्केचेस’ हे विविध मान्यवरांचं व्यक्तिचित्र रेखाटणारं पुस्तक समकालीन प्रकाशनानं काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पुस्तकाची निर्मिती उत्तम आहे. अनेक वलयांकित व्यक्तिमत्वाच्या शब्दचित्रांबरोबर अवचटांची शैलीदार रेखाटनंही या पुस्तकाचं बलस्थान आहे. अवचटांच्या चित्रांप्रमाणेच ही शब्दचित्रं वाचकांना भुरळ घालतात. या पुस्तकाचा परिचय चित्रकार प्रतोद कर्णिक यांनी या लेखातून करून दिला आहे.
“रफ स्केचेस् “, हे प्रख्यात चित्रकार सुभाष अवचट याचं पुस्तक अलीकडेच माझ्या वाचनात आलं. समकालीन प्रकाशननं प्रसिद्ध केलेलं हे अतिशय वेगळ्या धाटणीचं पुस्तक आहे. एका कलंदर पण ताकदीच्या चित्रकाराचं हे स्केचबुकच. आपल्या मुक्त, स्वच्छंदी भटकंतीत, वाटेत भेटलेल्यांची ही रॅपीड स्केचेस. पण चित्रां ऐवजी शब्दातून साकारलेली. एखादी भली मोठी पोतडी उलटी करावी आणि त्यातून भसाभसा असंख्य मौल्यवान वस्तूंचा एक मोठा ढिग समोर यावा, तसं या पुस्तकातून आपल्याला खूप माणसं, त्यांच्या बरोबर असलेल्या अवचट सरांच्या आठवणी असं सगळं भांडारच गवसतं.
यात जशा सुनीताबाई देशपांडे आहेत, शांताबाई शेळके आहेत, आरती प्रभू, अरविंद गोखले आहेत तशीच चमचमत्या सिनेसृष्टीतली लखलखती तारका श्रीदेवी पण आहे, जगप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेनही आहेत आणि आपल्या तत्वज्ञानानी जगाला मोहित करणारे ओशोपण आहेत. चित्रकार सुभाष अवचट यांची ही एक भन्नाट मुशाफिरी, त्यात भेटलेले आणि कायमचे आपुलकीच्या नात्यात जोडले गेलेले त्यांचे हे आप्त, यांच्या बद्दल वाचताना, आपल्या आयुष्यातल्या आपल्या भूतकाळातल्या आठवणीं बरोबरही नकळत आपण जोडले जातो. अवचट सरांच्या चित्राचं गारुड माझ्यासारख्या माझ्या पिढीतल्या असंख्य चित्रकारांवर आहेच, पण ही त्यांची शब्दचित्रं सुद्धा त्यांच्या चित्रांइतकीच ताकदीची आहेत.
ज्या मोठ्या भावाच्या मित्रामुळे अवचटसर चित्रकलेकडे वळले, तो त्रिभुवन. अवचटांच्या लेखणीतून आपल्या डोळ्यांसमोर नुसता साकारत नाही, तर आपल्याही आयुष्यात आलेल्या अशाच कोणा त्रिभुवनच्या, म्हणजे मित्राच्या आठवणीनं वाचताना व्याकुळ करतो.
शांता शेळके या साक्षात सरस्वतीचं वरदान लाभलेल्या प्रतिभावंत म्हणून महाराष्ट्राला ठाऊक आहेतच, पण या अलौकीक प्रतिभेच्या कवयित्री, लेखिकेच्या आयुष्यातला, एकलेपणाचा कप्पा आपल्याला यात पहायला मिळतो. आणि आयुष्याच्या सांजवेळी या एकाकीपणातून ज्या आपुलकीनं अवचट त्यांना परत त्यांच्या जगात अलगदपणे आणतात, तेव्हा या अवलियाकडे नुसती माणसं वाचण्याचीच जादू नाहीये, तर समोरच्याचं आयुष्य, सुखदुःख समजून घेत, आयुष्य नव्यानी समृद्ध करण्याची किमयासुद्धा अवगत आहे, हे मनाला भावतं.
चिं. त्र्यं. खानोलकर म्हणजे कवी आरती प्रभू या प्रतिभावंताच्या प्राक्तनातलं दारिद्रय आणि उपेक्षा पाहून आपणही गलबलून जातो. बेचैन होतो. हे स्केच मनाला खोलवर चटका लावून जातं. शुभ्र ताठ रेघ… या नेमक्या शब्दांतून भेटणाऱ्या सुनिताबाई आपल्यापैकी अनेकांनी पाहिल्या, अनुभवल्या आहेत. पण अवचट सरांचा आणि त्यांचा स्नेह हा खूप लोभस आहे. दिलखुलास तात्या माडगूळकर आणि वन्य प्राणी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या बरोबरच्या आठवणीं, त्यातली भूताची गोष्ट आणि… नको. सगळं आत्ताच सांगितलं तर तुम्हाला वाचताना ती गंमत ऐंजॉय कशी करता येईल ?
जहांगीरच्या पायऱ्या वाचताना माझ्यासारखे सगळे चित्रकारही नॉस्टॅल्जिक होतात.
यात गहन, गुढ जी. ए. आहेत… परिस्थितीचे चटके सोसतही आपली प्रतिभा फुलवणारे रापलेले रोबर्स्ट नारायण सुर्वे आहेत. साहित्य सहवासातून फेरफटका मारताना समोरुन जा ये करताना भेटणारे विं.दा., नाटकवेडाने झपाटलेले सत्यजीत दुबे, व.पु., गौरी देशपांडे असे अनेक साहित्यिक कलावंतही या स्केचबुकमधे लेखकानं चितारले आहेत.
पाण्यावरची सही जशी पहाता पहाता पाण्यात मिसळून जाते, तसे ओशोही नकळत आपल्या मनाच्या अंतरंगात जाऊन एक वेगळीच अनुभूती देतात. भयावह बालपणातल्या यातनांनंतरही बाहुलीसारखी गोड गोजिरी असलेली श्रीदेवी आणि आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना, त्या चमचमत्या चंदेरी दुनियेकडे पाठ फिरवून जे बालपण आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही, ते आपल्या मुलींना देण्यासाठी धडपडणारी श्रीदेवी… आणि या बदलात तिच्या चित्रांच्या आवडीतही झालेले आमूलाग्र बदल… लेखक अतिशय सुंदर प्रकारे रेखाटतात.
यातले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री आणि त्यांची वाई हे जणू एखादा नितांत सुंदर चित्रपट पहावा, तसे लेखकांनी साकारले आहेत.
आपल्या कलेविषयी, स्वत: विषयी लिहिताना अवचट सर पटकन आत्मचिंतनात मग्न होतात. आपणही त्यांच्या या चिंतनाचा एक भाग होऊन वाचत असतो. त्यांचा “जिझस” असो की तळ, माझ्यात मी, वेदनेशी दोस्ती, निर्वाण, किमया या स्केचेस मधून त्यांच्या कलानुभवातून सहजपणे आपणही त्यांच्या डोळस चिंतनाशी एकरुप होतो.
एवढी मोठमोठी मातब्बर मंडळींची स्केचेस आणि त्या बरोबरच आयुष्यावर भाष्य करताना चितारलेले विविध आकार, अमूर्त स्केचेस् असं हे एक विलक्षण आणि वेगळं पुस्तक आहे.
घरात जसे आपल्या लहानपणी आई गोडा, तिखटाचे खाऊचे डबे भरुन ठेवत असे. भूक लागली की कधी त्यातले लाडू, कधी चकली, कधी गुळपापडी, कधी आईच्या हातचा खमंग चिवडा… जे त्यावेळी खावंस वाटेल, तो डबा उघडून बशीत हवं ते घेऊन खाण्यातली जी मजा होती… तीच मजा, तोच आनंद “रफ स्केचेस” हे सुभाष अवचट सरांचं पुस्तक वाचतानाही आपल्याला मिळतो. एकदा वाचून झालं की परत जेव्हा आपल्याला आपल्या मूड प्रमाणे जे वाचावंस वाटेल… पुस्तक उघडून ते वाचत वाचत तसाच आनंद घेत रहायचा. म्हणूनच चित्रकार सुभाष अवचट यांच्या लेखणीतून चितारलेली ही त्यांची “यादोंकी बारात”, विलक्षण आणि परत, परत हवी, हवीशी वाटणारी आहे.
****
– प्रतोद कर्णिक
Related
Please login to join discussion