No products in the cart.
आता वाजले की बारा !
जेजेमध्ये शिकवण्याऐवजी इतर अनेक ‘अर्थ’पूर्ण कामं करणाऱ्या विश्वनाथ साबळे यांचे शंभर अपराध भरले आहेत. एआयसीटीईच्या मान्यतेचा इतका भयानक गुंताडा झाला आहे की इतके दिवस साबळ्यांच्या साऱ्या चाळ्यांकडे हेतुतः दुर्लक्ष करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याला देखील कारवाई करणं भाग पडलं आहे. ही कारवाई करण्यात येण्यामागे असलेला संपूर्ण घटनाक्रम वाचा सतीश नाईक यांच्या लेखातून.
अखेरीस उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आली. इतके दिवस मी लिहीत होतो. व्हिडीओज करीत होतो. मुलाखती देत घेत होतो. महाचर्चा घडवून आणत होतो. इतकंच नाही तर जाहीरपणे आरडा ओरडा देखील करीत होतो. जेजेतल्या भानगडी अक्षरशः मी चव्हाट्यावर आणल्या होत्या, पण उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना मात्र जाग येत नव्हती.
काय लिहायचं शिल्लक ठेवलं होतं मी ? जेजेतल्या कारभाराची अब्रू मी अक्षरशः चव्हाट्यावर मांडली होती. ती मांडत असताना अनेकदा ती मातृसंस्था असल्यामुळे मला संयम ठेवावा लागत असे, या संस्थेतच मी शिकलो होतो. त्यामुळे अनेकदा जेजेचं नाव घेऊन टीका करताना अतिशय संकोच वाटत असे. पण इतकं करूनही साबळे आणि त्यांच्या गणंगांना मात्र जाग येत नव्हती. आपलं कोण काय वाकडं करणार हीच गुर्मी त्यामागं असावी. पण अखेरीस ती एआयसीटीईवाल्यानी उतरवलीच. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा’ अशी भयंकर परिस्थिती त्यांनी संस्थेवर आणून ठेवली.
जेजेत शिक्षण घेणाऱ्या चारशे साडेचारशे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ‘न भूतो न भविष्यती’ असा निर्माण झाला, तेव्हा कुठं उच्च व तंत्रशिक्षण खात्याला जाग आली. जेजेच्या १६६ वर्षाच्या इतिहासात एवढी भयंकर परिस्थिती आतापर्यंत जेजेवर कधीच ओढवली नव्हती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अधिकृत मान्यताच नसेल तर त्यांनी पुढं करायचं तरी काय ? जेजेत शिकणाऱ्या साऱ्याच विद्यार्थ्यांचं भवितव्य आता अक्षरशः धोक्यात आलं आहे.
ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की एक दोन दिवसात ती सुटेल असंही नाही. किंबहुना नाहीच सुटणार. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की राजीव मिश्रा यांच्या सारखा कुठलंही काम फत्ते करून येणारा अधिकारी दिल्लीला पाठवला म्हणजे हा प्रश्न सुटेल. पण एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांनी मिश्रा यांना हात चोळत परत पाठवलं. कारण जेजेचं हे दुखणं इतकं गंभीर आहे की ते दुखणं आता त्या संदर्भात निर्णय घेणाऱ्या समिती शिवाय कुणालाही बरं करता येणार नाही.
या संदर्भात कानावर आलेली माहिती अशी की नोव्हेंबरमध्ये जेव्हा केव्हा एआयसीटीईच्या संबंधित समितीची पुन्हा बैठक होईल त्याच वेळी जेजेला पुढं मान्यता द्यायची किंवा नाही या संबंधीचा निर्णय घेतला जाणार आहे. याचाच अर्थ असा की तोपर्यंत जेजेमध्ये चालणारं शिक्षण हे अनधिकृतच ठरणार आहे. समजा त्यातूनही धाडस करून जेजेनं आपले अभ्यासक्रम पुढं रेटण्याचे प्रयत्न तसेच चालू ठेवले आणि समजा नोव्हेंबरमध्ये एआयसीटीईच्या समितीनं त्यांना मान्यता देण्यासच नकार दिला, तर ? किती गंभीर परिस्थिती ओढवेल ? हे लक्षात येतं ?
ज्या कला महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापक जवळ जवळ नाहीत ( जे आहेत त्यांना भूतसंवर्गात टाकायची उपसचिव सतीश तिडके यांना ‘जोराची घाई’ लागलेली आहे. ) कलेचा इतिहास, सौन्दर्यशास्त्र या सारखे महत्वाचे विषय शिकवण्यासाठी देखील जिथं शिक्षकांची अक्षरशः वानवा आहे, ज्या कला महाविद्यालयात ५५% पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिकतात तिथं विद्यार्थिनीच्या प्रसाधन गृहासाठी विद्यार्थ्यांना संप करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या बॉईज कॉमनरूमची अवस्था देखील तीच आहे.
२००८ साली लाखो रुपये खर्च करून शासनाने तयार करून दिलेली कॉम्प्युटर लॅब देखील २०२२-२३ सालात कॉम्प्युटरसह भंगारात काढली जाते. तिच्यातले मॅकचे लॅपटॉप देखील लंपास केले जातात. ( त्याचा कुणाला मागमूस देखील लागत नाही. ) फर्लांगभर अंतराच्या गटारासाठी सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाते. ( जे गटार आता पावसाळ्यात बदाबदा भरून वाहतं आहे ) कायमस्वरूपी शिक्षक नाही म्हणून भरती केलेल्या कंत्राटी आणि हंगामी कला शिक्षकांवर कुणाचाही अंकुश नाही. ते केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. ( त्यातले बहुसंख्य शिक्षक आपल्या व्हिजिटिंग कार्डावर स्वतःचा नामोल्लेख ‘प्राध्यापक’ असा करतात. आता बोला ! ) बहुसंख्य शिक्षक वर्गात सतत गैरहजर असतात किंवा सकाळी सह्या करून निघून जातात. आठवडा आठवडाभर वर्गात शिक्षक अनुपस्थितच राहतात. ( काही महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या तक्रारीमध्ये खूपच वाढ झाल्यामुळे या संदर्भात शिक्षण सचिव विनय रस्तोगी यांच्याकडेच प्रस्तुत लेखकानं व्हाट्सअपद्वारे थेट तक्रार केली होती. पण पुढं काय झालं ठाऊक नाही ! तिच्याकडे पाहावयास बहुदा शिक्षण सचिवांना वेळ मिळाला नसावा. )
लाखो रुपयांची व्यावसायिक कामं हे शिक्षक करतात. काही शिक्षक तर कोट्यवधी रुपयांची कामं करतात. ( त्यावर पुढे सविस्तर लिहिणारच आहे. ) जे जे स्कूल ऑफ आर्ट मधली जागा एखाद्या ‘टेबल स्पेस’ सारखी वापरली जाते. दाखवलं जातं की विद्यार्थ्यांना ‘कार्यानुभव’ देतो. पण प्रत्यक्षात हा शिक्षकांचा ‘अर्थानुभव’ असतो. ( याचेही किस्से भयंकर आहेत.त्यावरही लवकरच लिहिणार आहे. ) १६६ वर्षाच्या नामांकित कॉलेजमध्ये जिथं विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून ‘कलावेध’ सारखे आचरट आणि पोरकट उपक्रम चालवले जातात. ( त्याचे हिशोब देखील जाहीर केले जात नाहीत. ) आणि जिथं एआयसीटीईच्या नियमांची पायमल्ली अगदी उघड उघडपणे केली जाते. त्या संस्थेला कुठली नियमन करणारी केंद्रीय संस्था मान्यता देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेईल ?
समजा ही मान्यता नोव्हेंबरमध्ये देखील दिली गेलीच नाही तर जेजेमध्ये शिकणाऱ्या ४०० ते ४५० विद्यार्थ्यांचं भवितव्य काय ? त्यांनी शिकायचं तरी कुठं आणि कसं ? दुसऱ्या कुठल्यातरी खाजगी कॉलेजात जाऊन शिक्षण घ्यायचं का ? समजा तिकडे प्रवेश मिळाला नाही तर ? मग काय करायचं ? मिळाला तर तिथली भरमसाठ वार्षिक फी कोण देणार ? मुळात असे प्रवेश मिळणार तरी आहेत का ? या सारखे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
या साऱ्याला कारणीभूत असलेल्या श्री साबळे यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा अधिकारी धजावत नव्हता. त्यामुळे साबळे साहेबांनी जेजेत ‘हम करे सो कायदा’ राबवला. एक तपापेक्षा जास्त काळ श्री साबळे त्या पदावर कार्यरत आहेत. त्या काळात त्यांनी शिक्षण विषयक कोणत्याही सुधारणा जेजेत राबवल्या नाहीत किंवा अभ्यासक्रमात देखील काही बदल केले नाहीत.
जे शिक्षणाबाबत तेच व्यवस्थापनाबाबत श्रीकांत जाधव, अनंत निकम, अनिल नाईक, यांच्यासारखे कलावंत म्हणून प्रसिद्ध पावलेले चित्रकार ( खरं तर हे सारे साबळे यांचे शिक्षक ) पण एका सरकारी फतव्यानं या शिक्षकांना सेवानिवृत्त होईपर्यंत साबळेंच्या हाताखाली काम करावं लागलं. अखेरीस ३०-३०-३५ वर्ष नोकऱ्या करून ही मंडळी ज्या पदावर जेजेत आली त्याच पदावरून सेवानिवृत्त झाली. किती भयंकर आहे ना हे सारं ? पण ही वस्तुस्थिती आहे. डीन म्हणून साबळे यांनी या आपल्या शिक्षकांसाठी काही देखील केलं नाही. उलट त्यांना जेवढा म्हणून त्रास देता येईल तेवढा दिला. जीवावरच्या दुखण्यातून उठलेल्या यातल्या एका शिक्षकाला तर त्याचं सेवानिवृत्ती वेतन वेळेवर मिळावं म्हणून देखील त्यांनी काही एक केलं नाही. हे प्रस्तुत लेखकानं अगदी जवळून अनुभवलं आहे.
आता मात्र शिशुपालासारखे प्राध्यापक ( ? ) विश्वनाथ साबळे यांचे शंभर अपराध भरले आहेत. एआयसीटीईच्या मान्यतेचा इतका भयानक गुंताडा झाला आहे की इतके दिवस साबळ्यांच्या साऱ्या चाळ्यांकडे हेतुतः दुर्लक्ष करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याला देखील कारवाई करणं भाग पडलं आहे. त्यांनी जर ती केली नसती तर मंत्रालयातल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या जेजेचं डेस्क सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरच सरकारला कारवाई करावी लागली असती. त्यामुळेच बहुदा दबकून जाऊन खात्यानं श्री साबळे यांना सोमवारी दुपारी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या नोटिसीला साबळे यांना आता उत्तर द्यावच लागणार आहे. साबळे यांनी केलेली चूक इतकी भयंकर आहे की, ‘इकडचे तिकडचे’ अधिकारी ‘वळसे घेत घेत’ देखील आता त्यांना वाचवण्याच्या फंदात पडणार नाहीत हे निश्चित. आणि पडलेच तर त्यांच्या समाचार घ्यायला ‘चिन्ह’ तयारच असेल हे त्यांनी पुरतं लक्षात ठेवावं. या नोटिसीला आता साबळे साहेब काय उत्तर देतात हे पाहायचं.
या पुढल्या लेखात आणखीन खळबळजनक खुलासे आम्ही करणार आहोत. अवश्य वाचा…
********
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
www.chinha.in
Related
Please login to join discussion