Features

मंगेश, कविता, चित्र आणि बरंच काही !

गेल्या एप्रिल महिन्यात ‘टागोर इंटरनॅशनल लिटरेचर अँड आर्ट फेस्टिव्हल’मध्ये मंगेश नारायणराव काळे यांना टागोर सन्मान दिला गेला. त्या निमित्तानं त्यांचे मित्र कवी सौमित्र ( किशोर कदम ) यांनी फेसबुकवर जो एक लेख लिहिला होता तो येत्या शनिवारी ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये मंगेश नारायणराव काळे सहभागी हो असल्यामुळं इथं पुन्हा प्रसारित करीत आहोत.
मंगेश त्याच्या ” मायाविये तेहेरीर ” मध्ये म्हणतो..
म्हणजे हिचेय का कविता तुझी
जिला मी तृष्णा समजलो होतो इतका वेळ
म्हणजे काहिली समजलो होतो जीवाची
ती तगमग होती देहभान विसरायला लावणारी.
ती हिचेय का झरणारी देहातून ?
अस्वस्थता ही कलावंताच्या पाचवीला पुजलेली असते. त्या अस्वस्थतेतूनच तो सतत सैरभैर होत असतो. काहीतरी कमी आहे, काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी सुटत चाललंयची भावना त्यातूनच निर्माण होत असते. म्हणूनच ज्याच्याकडे शब्द असतात तो कविता, कथा, कादंबरी लिहितो… लिहिता लिहिता स्वतःच्या अस्वस्थतेचा तळ गाठण्याचा वारंवार प्रयत्न करतो.

कुठल्या कलावंताला आजवर तो तळ सापडला आहे ? वर्षानुवर्षं कविता लिहून जेव्हा कवी कवितेतही मावेनासा होतो तेव्हा तो शब्दांतून बाहेरचं काही शोधायला लागतो. कुणी स्वरांकडे वळतो, कुणी वाद्याकडे, कुणी रंगांकडे. मंगेश चित्रांकडे वळला याचं कारण त्याला कवितेत मावेनासं झालं असावं. आपल्याकडे कवितेत न मावणारी आणि चित्रांकडे वळलेली डहाके, चित्रें, कोलटकर, दिनकर मनवर सारखी महत्वाची नावं आहेत. डहाकेंच्या एका कविता संग्रहाचं नावच “चित्रलिपी” असं आहे. अस्सल कवीला कवितेतली अमूर्तता जर चित्रात शोधावी वाटली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. म्हणजेच कविता आणि भावनांच्या सीमारेषेवर कवी कधी कधी निहत्ता, शस्त्रहीन होत असावा. विस्तीर्ण अशा रिकाम्या वाटेवर त्याला जगण्याचा कॅनव्हास खुणावत राहात असावा आणि म्हणूनच तो त्यावर कुठल्यातरी अपरिहार्य क्षणी मनाचं चित्र काढायला घेत असावा आणि चित्र आणि अचित्रासारख्या अभिव्यक्तीतून त्याला काहीतरी आंतरिक गवसत असावं.

हा पहा हा एक नवा कोरा कॅनव्हास
मी रंगवायला घेतलेला कधीपासूनचा
म्हणजे आक्खा कोराचंय तो अजूनही
नि मी तर वाट पाहातोय सालोसाल समोर बसून
नाहीचेय उतावीळ कधीच नव्हती. प्रतीक्षाय फक्तं
उसवू दे कळ. फिटू दे वस्त्र मी पणाचे जरठ नि सुटू दे स्वतःतून.
मगच रंगवीन तुझं चित्र इबादतीनं…..
एखाद्या कॅनव्हासचा तळ गाठणं शक्य आहे का ?
एखाद्या रंगाचं खोल स्वत्व सापडणं शक्य आहे का ?
दोन रंग एकमेकांत मिसळल्यानंतर तयार होणाऱ्या तिसऱ्या रंगाच्या छटेत अर्थाचा एखादा नवा किरण परावर्तित होत असावा का ?
कॅनव्हासवर एकामागून एक रंग लावत टाकत, लेपत, ओतत, जेव्हा कुणी उभा असतो तेंव्हा तो नेमका कोण असतो ?
चित्रकार ? कवी ?
कि त्या त्या रंगाचा एकांत ?
पुन्हा पुन्हा रिकाम्या कॅनव्हास समोर उभा राहून त्याचा हताशपणा विकोपाला जातो तेव्हा काय होतं ?
आणि ते विकोपाला जाण संपून गेल्यावर जो नितळ अवकाश उरतो त्यात त्याला जे भरावं, काढावं, सजवावं, रूजवावं, अर्थावं, निर्थावं लागतं ते चित्र असतं का ?
असे एक नव्हे अनेक प्रश्न आपल्या सारख्या चित्रनिरक्षर लोकांना एखादं चित्र पाहातांना पडलेले असतात. सारेच कवी शब्दांतून आपली अस्वस्थता भरत, कोंडत, सांडत, मांडत असतात पण मंगेश काळे सारख्या एखाद्याच कवीची अस्वस्थता शब्द फोडून कॅनव्हासपर्यंत पोहोचते, कारण इतकी वर्ष निगुतीनं कविता लिहीत राहणं हा सुद्धा त्याचा भविष्यकाळात चित्रकार होण्याचा रियाज होता की काय असं म्हणावं लागेल. कधीतरी एक क्षण कॅनव्हास होऊन आला आणि मंगेश त्यावर काही त्यालाही न कळणार अपरिहार्यपणे चितारू लागला असेल. निरनिराळे आकार, रेषा बिंदू, नक्षी यांच्यातून त्यानं स्वतःचं मन रिझवू पाहिलं असेल. एक-दोन-चार-सहा असे अनेक कॅनव्हास त्याने भरभरून टाकले असतील .. मग हे काय आहे याचा अर्थ तोच शोधत बसला असेल.. त्याचा अर्थ शोधण्याच्या नादात पुन्हा कागद काढला असेल आणि शब्दात मिसळून गेला असेल. मंगेशचा चित्रकार आणि कवी हा प्रवास असाच असला असेल असं वाटतं.
तो एका ठिकाणी म्हणतो..
रंगांचा उरूस होईल. होऊ दे
रंगांचा कोलाहल संपेल. संपू दे
रंगांचेच होतील शब्द. होऊ दे …..
एखाद्याने कधीतरी अस्वस्थ होऊन एखादं दुसरं चित्र काढणं वेगळं आणि मंगेश सारखं कॅनव्हासमध्ये खोल उतरून चित्र म्हणजे नक्की काय ?किंवा मी म्हणजे नक्की कोण ? हे समजून घेण्यासाठी झोकून देऊन स्वतःच एकांतचित्त होत कॅनव्हासचा एकांत होणं आणि त्यातून मग हळूहळू त्याची एक चित्रकार म्हणूंन आयडेंटिटी निर्माण होणं आणि “कवी मंगेश नारायण काळे” हे नाव “चित्रकार मंगेश एन.राव काळे” होणं आणि त्या पुढे “टागोर पारितोषिकाने सन्मानित“ हे बिरूद येणं , या मागे मंगेशचे किती कष्टं, किती आसोशी किती काळ गेला असेल हे समजून घ्यायचं असेल आणि आपल्याला चित्र साक्षरतेच्या दिशेने एक छोटंसं का होईना पाऊल टाकायचं असेल तर मंगेशचं “चित्रसंहिता” हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
मं काय होतं ते ?
म्हणजे काहिच का अदमास नाहीच का करता येत ?
चित्र तर रोजच काढतो ना मं नेमकं रंग भरतांना काय होतंय की काहीतरी भयंकर ढासळत जातंय आत आत.
विखरून जातंय सगळं विस्कटतं सगळंच ?
म्हणजे काळा तर जास्तच येतोय बोटावर
नि सारखा काळोखच सांडतोय चित्रातून
म्हणजे काय असेल हे किल्मिष कळवणारं…..
म्हणजे होतं तरी काय हे मुठीतून सुटून जाणारं घरंगळत जाणारं देहातून.
संतत सतत डसणारं
की रुख़सत झालेयत सगळे रंग तुझ्या संहितेतले ?
म्हणजे खरच नाहीयेत का तुझ्या जवळ रंग अस्मानी ?
मंगेशच्या कवितेतल्या बळकट आणि घट्ट भाषेत सतत रंग आणि चित्र येत राहतात. त्याच्या कवितेत एकाच अर्थाचे पर्यायी शब्द पुन्हा पुन्हा येतात..
एकाच अर्थाच्या ओळी पुन्हा पुन्हा ती भावना गडद करत राहतात..
एखाद्या चित्रात जसे काही रंग ठरवून वेगवेगळ्या छटा घेऊन येतात.
आपला समाज हा चित्रनिरक्षर समाज आहे हे धादांत सत्य आहे.
“दिसणे” आणि “पाहाणे” यांच्यातला फरकच न कळणारा निवांत समाज आहे.
पण मंगेशच्या बाबतीत पाहाणं हे शब्दांच्या आधीच येत असावं. एखादं लहान मूल आधी पाहातं आणि ते ओळखतं.. नंतर बोलतं.. मंगेशही आधी पाहातो मग ओळखतो मग लिहितो. म्हणूनच तो म्हणतो “प्राचीनय पाहाणं”
मी झाड पाहतो
तेंव्हा संपूर्ण असतं झाड
एक संपूर्ण घटना असते झाड पाहणं ………………….
……………..
गरज नसतानाही नेहेमीच झाडासोबत
झाडाची सावलीही संपूर्ण पाहातो प्रत्यक्षात
म्हणजे अपूर्ण नसतंच झाड कधीच सावलीशिवाय
तरीही प्रत्यक्षात झाड पाहाणं सावलीशिवाय अपूर्ण असतं
संपूर्ण पाहातो सावली सोबत झाड, म्हणून संपूर्ण असतं झाड
मी पाहतोय.
प्रदीर्घ पाहातोय.
पुरातनय पाहाणं……………
मी पाहतोय खूप दूर पर्यंत.
अतिप्राचीनय पाहाणं जसं की हे चित्रय रिऍलिस्टिक.
प्राचीनेय ते नि दडलाय रंगाच्याआड समुद्र.
जो मी पाहातोय.
ही घटना अर्वाचीनय नि छुपारुस्तुमय समुद्र जो मी पाहातोय तो चित्रातचय
म्हणजे चित्रातचय त्याचा रुतबा नि आदीमेय वुजूद त्याचा
म्हणजे चित्रातला समुद्र पाहाणं व्हर्जनय साक्षात वर्तमानातलं प्रत्यक्षातल्या समुद्राला कवितेत पाहण्याचं. उतावीळ आवेगी
नि ही घटना म्हणजे नैसर्गिकय पाहाणं दोघातलं.
मी पाहातोय. प्रदीर्घ पाहतोय. प्राचीनय पाहाणं.
त्याच्या “मायाविये तेहेरीर” मधल्या सात दीर्घ कवितांमधल्या भाषेतून तो संबंधांकडे असाच दाही दिशांतून पाहातो आणि शब्दांच्या महाजालात त्या वस्तू आणि संबंधांना वेगळाच वुजूद प्राप्त करून देतो.
“मायाविये तेहेरीर”मध्ये मंगेश ने घडवलेली भाषा अतिशय घट्ट आणि लाघवी आहे. अनेक उर्दू शब्द तो लीलया वापरून संबंधांच्या रंगाला एक वेगळाच आयाम देतो.
विसर दास्ताँ विसर विसर नज़र विसर जुनूँ
विसर अफ़साना विसर विसर दस्तूर-ए-फ़िरदौस
विसर निआमत विसर विसर मुक़म्मल विसर विसर
विसर मुस्तका़बिल विसर विसर कुफ़्र विसर ईमान विसर
विसर दस्तूर विसर विसर बरहनगी विसर नंग-ए-वुजूद
विसर असीरी विसर विसर जराहत
विसर मूआमला विसर
विसर शिरक़त विसर विसर विसर चरॉंगॉं विसर बयॉंबा
विसर बज़्म विसर विसर बू-ए-गुल विसर वहशत विसर
विसर फ़रेब विसर विसर दश्न-ए-पिन्हा विसर बला विसर
विसर रुस्वाई विसर विसर नाला-ए-दिला विसर एतिबार विसर
या संग्रहासाठी म्हणूनची मंगेशने घडवलेली ही भाषा गंगा-जमुनी तेहेजी़बचा एक आदर्श नमुना म्हणावा लागेल. आज देशातली सामाजिक परिस्थिती काही असली तरी या कवितेतला भाषा संकर हा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे हे आपण विसरत चाललो आहोत, आणि प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस हा मनाने आपोआप शायराना होत मनातल्या मनात उर्दू शिंपत राहातो तशी ही भाषा त्याकडे आली असावी.
आपली मराठी भाषा, आपले शब्द त्याच्या कवीतिक भावनेच्या धबधब्यात अपुरे पडले म्हणून की काय, त्याने एखाद्या रागात वर्ज सूर अगदी बेमालूमपणे घेणाऱ्या बुजुर्ग गवैया सारखे उर्दू शब्द सहज वापरले आहेत, आणि ही मर्यादाही त्याला खटकत असावी… म्हणूनच तो रंग आणि कोऱ्या कॅनव्हासकडे वळला असावा.

चित्रकलेला आपण समाजजीवनात दुय्यम स्थान दिलेलं आहे कारण लोकांसमोर चित्रकला फारशी येतच नाही. झाडांची, डोंगरांची, नद्यांची, पक्षांची, प्राण्यांची हुबेहूब चित्र काढणं यालाच आपल्यात चित्रकला म्हणतात पण आता परिस्थिती हळूहळू बदलते आहे.

मंगेशने चित्रकलेच्या शोधार्थ वैचारिक वणवण केली ती चित्रकला समजून घ्यायची असल्यास चित्रकलेचा इतिहास परंपरा माहित असणं ही प्राथमिक गरज मानली म्हणून. तो प्रस्तावनेत लिहितो
“दृश्यकलेच्या या अफाट अरण्यात माझ्यासारख्य नवख्याने वावरणे कुतूहलाने पहाणे, पाहिलेले, ऐकलेलं वाचलेले, समजलेले स्वतःच्या तोकड्या ज्ञानावर अनुभवावर उगाळून पाहाणे हे खरे धारिष्ट्याचे होते..”
पण जर हे धारिष्ठय त्यानं केलं नसतं तर इतकं सुंदर आणि महत्वाचं पुस्तक मराठीत अवतरलं नसतं. मराठीत काव्य, साहित्य समीक्षा आढळते पण चित्रसमीक्षा अतिशय तुरळक अवस्थेत आढळते कारण वर म्हणल्या प्रमाणं आपला समाजच मुळी चित्र साक्षर नाही. हे एक पुस्तक वाचून चित्र निरक्षरता निर्मूलन पावेल असा दावा नाही पण चित्र दिसणे, पाहणे आणि समजणे या रस्त्यावर आपलं पाहिलं दमदार पाउल पडेल याची खात्री वाटते.
पुस्तकाचं वेगळेपण हे त्याच्या आवरण संकल्पनेपासूनच सुरु होतं. त्या आवरणावर अतिशय महत्वाच्या वेगवेगळ्या शैलीतली अशी तीस बत्तीस चित्र छापलेली असल्याने पुस्तक हाती घेताच आतल्या ऎवजाचा आवाज आपल्याला येऊ लागतो. चित्रार्थ, अमूर्तता, चित्रसूत्र, चित्रभाषा यापासून अज्ञाताचे प्रदेश, कलेचं प्रत्यय, प्रयोजन, दायित्व आणि आज चित्रकलेचा झालेला बाजार इथपर्यंत मंगेश आपल्याला चित्रकलेचा कॅनव्हास उलगडून दाखवतो.
अतिशय महत्वाच्या या पुस्तकाला सरबजीत गरचा या बहुभाषिक जाणत्याच्या “कॉपर कॉईन” या प्रकाशन संस्थेनं अतिशय उच्चं दर्जाचं निर्मितीमूल्य सांभाळत चित्रकला आणि त्या संबंधीच्या ऐवजाचा मान राखण्याचा सुसंस्कृतपणा दाखवला आहे.
“टागोर” पुरस्कारासारखं महत्वाचं बिरुद बहाल करण्यात आलं ही मराठी साहित्य जगतातली एक महत्वाची घटना आहे, कारण कवीतून फूटून बाहेर आलेला चित्रकार कसा दिसतो हे आपल्याला पाहायला मिळेल. कलावंताच्या अस्वस्थतेला वय नसतं. मंगेश वयाच्या कुठल्या टप्प्यावर चित्र पाहू लागला, कुठल्या टप्प्यावर त्याला ती कळू लागली आणि त्याने त्याचा आगाज़ कधी केला या प्रश्नात अर्थ उरत नाही जेव्हा शब्दांसोबत चित्रातही त्याची स्वतःची ओळख निर्माण होते आणि म्हणूनच टागोर पुरस्काराने त्याला गौरवलं जाणं महत्वाचं ठरतं.
आता शब्द आणि रंग , कागद आणि कॅनव्हास यांच्या सीमेवर मंगेश सतत भिरभिरत राहील तेंव्हा आपल्याला गा़लिबचा एक शेर नेहेमीच आठवत राहील…

सौमित्र

खूप खूप अभिनंदन मंगेश एन. राव काळे !

“हजा़रों ख्वा़हिशें ऐसीं कि हर ख्वा़हिश पे दम निकले
बहोत निकले मेरे अरमान लेकिन फिरभी कमी निकले ….”

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.