Features

शाहरुख, कमिटमेंट आणि मी

हल्ली शाहरुख, आमिर यासारख्या नटांना वाईट दिवस आलेत. सोशल मीडियावर यांना बॉयकॉट करा असे ट्रेंड्स फिरत असतात. मात्र शाहरुख ज्या स्टारपदावर पोहोचला तिथे पोहोचणे सोपे नाही. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि चिकाटीची गरज असते. पाचगणीच्या हॉटेलमध्ये शाहरुख स्वदेसच्या शूटिंगसाठी उतरला होता. तिथेच माझे चित्रप्रदर्शनही भरले होते. तेथील वास्तव्यात शाहरुखच्या विशेष गुणांचा मला आलेला अनुभव. 

सुनील काळे, पाचगणी

******

निसर्गरम्य पाचगणीत प्रवेश करत असताना उजव्या बाजूला टोलनाका आहे. हा टोलनाका पार केल्यानंतर रस्त्यालगतच हॉटेल (Ravine) रविनचा बोर्ड दिसतो. या हॉटेलमध्ये अनेक प्रसिद्ध, मान्यवर व्यक्ती आणि बॉलिवुडचे सिनेकलावंत, शुटींगसाठी येत राहतात. कारण हॉटेलच्या रूममधून दिसणारा कृष्णा खोऱ्याचा, धोम धरणाचा निसर्गरम्य व्हॅलीचा परिसर, पश्चिमेकडे महाबळेश्वरचे डोंगर, पूर्वेकडेचा सिडने पॉइंटचा परिसर सर्व मोसमांमध्ये नेहमीच विलोभनीय दिसतात. हॉटेलच्या मालकीणबाई बिस्मिल्ला सुनेसरा मॅडम व त्यांचा दक्ष परिवार येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना उत्तम काळजी घेतात. स्वादीष्ट जेवण, राहण्यासाठी सुसज्ज अत्याधुनिक सुखसुविधा व सर्वोत्तम सर्व्हीस देणारा येथील दक्ष स्टाफ यामुळे अनेक नामवंत बॉलीवुड कलाकार हॉटेल रविनमध्ये राहण्याला प्राधान्य देतात.

पाचगणीच्या हॉटेल रवीनचा बर्डस आय व्ह्यू ने काढलेला फोटो

   अशा या स्टार हॉटेलमध्ये माझे चित्रप्रदर्शन नुकतेच सुरू झाले होते.  त्या काळात शाहरुख खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यास्वदेस  चित्रपटाचे शुटिंग वाईजवळ मेणवली गावात सुरू होते. संपूर्ण दिवस शाहरुख खान शुटिंगमध्ये व्यस्त असायचा. त्याच्या स्वतंत्र व्हॅनिटी कॅराव्हॅनमधुनच तो येजा करत असल्याने व त्याचा मुक्काम हॉटेलच्या टॉप रुममध्ये असल्याने त्याचे दर्शन दुर्लभ झाले होते .

   एके दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकला सिडने पॉईंटच्या परिसरात चाललो होतो. त्यावेळी हॉटेलच्या परिसरात सकाळी सकाळीच खूप धावपळ सुरू झाली होती. मी सहज चौकशी केली त्यावेळी समजले आज मेणवली घाटावर सूर्योदयाचा शॉट आहे त्यासाठी आज भल्या पहाटे शाहरुख खान तयार होऊन निघाला आहे. प्रथम तो रिसेप्शनच्या शेजारी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. शाहरुख खान सकाळी फक्त एक ग्लास फ्रूट ज्यूस घेतो अशी माहिती तेथील ओळखीच्या वेटरने मला सांगितली. मग मी देखील कोपऱ्यातली एक जागा पकडून शाहरुखच्या दर्शनासाठी थांबलो .

शाहरुख शूटिंगसाठी याच व्हॅनमधून चित्रीकरण स्थळी यायचा

    इतक्यात धावपळ सुरू झाली. शाहरुख खान मस्त ऑफव्हाईट कॉटनची पॅन्ट व स्काय ब्लू कलरचा बाह्या दुमडलेला शर्ट घालून रेस्टॉरंटमध्ये आला. त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वांशी हसून सर्वांकडे प्रेमाने हात वर करून शुभेच्छांचा स्वीकार केला. नंतर त्याच्या फेव्हरेट फ्रुट ज्यूसची मागणी केली. परंतु रात्रीच्या मॅनेजरने सकाळच्या मॅनेजरला व वेटरच्या टीम लीडरला इतक्या लवकर शुटींग आहे याची माहिती दिली नव्हती त्यामुळे फ्रुट ज्यूस तयारच केला नव्हता. मुख्य वेटरने पाच मिनिटात नवीन ज्यूस तयार करतो असे सांगितले. हे ऐकताच शाहरुख खान जरा तडकला, मी रात्रीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवली होती तरी ज्यूस का तयार ठेवला नाही, अशी विचारणा त्याने केली. 

कमिटमेंट मिन्स कमिटमेंट, नेव्हर फरगेट”, असे तो बोलला आणि काचेचा दरवाजा उघडून शुटींगसाठी कॅराव्हॅनमधून थोड्या रागानेच  नाराजीने निघून गेला .

    इतक्यात हॉटेलच्या मालकीण बाई बिस्मिल्ला मॅडम येथे आल्या त्यांनी काय घडले याची सर्व माहिती घेतली. त्या कोणावरही रागावल्या नाहीत. सरळ किचनमध्ये गेल्या आणि संत्र्याचा दोन ग्लास ज्यूस स्वतःच्या हाताने त्यांनी तयार केला. तो ज्यूस एका मोठ्या बंदीस्त जारमध्ये भरला आणि मुख्य वेटरकडे देऊन ड्रायव्हरला हाक मारली आणि मेणवलीला ताबडतोब शाहरुखच्या गाडीच्या पाठोपाठ लगेच जायला सांगितले. इतक्यात त्यांनी मला पाहिले. इतक्या सकाळी पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले व माझ्यासमोरच मॅनेजरला सांगितले.

 कमिटमेंट मिन्स कमिटमेंट, नेव्हर फरगेट”, त्या मॅडम आपल्या इतर रोजच्या कामासाठी शांतपणे निघून गेल्या .

    मला मात्र राग आला. पाच दहा मिनिटे थांबला असता तर शाहरुख खानला काय धाड भरली असती का? हे सगळी स्टार मंडळी पैसा, प्रसिद्धी मिळाली की भाव खातात. त्यांना इगो येतो. फुकटची हुशारी व स्टाईल मारत राहतात व इतरांवर इम्प्रेशन मारत राहतात. असा विचार करत मी परत घराकडे निघालो . 

          मुख्य रस्त्यावरून जात असताना माझा एक जवळचा मित्र वाईच्या दिशेने मोटरसायकलवरून एकटाच चालला होता. माझ्या शेजारी मोटरसायकल थांबवून त्याने मला वाईला येतो का बरोबर, असे सहज विचारले. त्यावेळी मी मेणवली येथे शाहरुख खानच्यास्वदेसया पिक्चरचे शुटिंग चालू आहे व आत्ताच शाहरुख खान तिकडे गेला आहे असे त्याला सांगितले. हे ऐकताच आमचा मित्र चल, येतोस का मग मेणवलीला? असे विचारल्यानंतर मी ही लगेच तयार झालो. मला बघायचे होते की इतक्या घाईने शाहरुख खान का गेला? तिथे जाऊन तो काय असा तीर मारणार  होता? मग जरा वेगाने मोटरसायकल चालवत आमच्या मित्राने शाहरुखची व्हॅनिटी कॅराव्हॅन गाठली. त्याच्या पाठोपाठ हॉटेल रविनची गाडी ज्युस घेऊन चालली होती. त्याच्या पाठोपाठ पाठलाग करत आम्ही देखील मेणवली घाटावर पोहोचलो.

      मेणवली घाटावर पोहोचलो आणि मी थक्क झालो. सकाळच्या त्या थंडीत जवळपास तीनशे जणांचा समुदाय घाटावर उपस्थित होता.  दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेत्री गायत्री जोशी व इतर ज्येष्ठ स्त्रीपुरुष कलाकार व मॉब तसेच अनेक स्थानिक गावकरीही सीनसाठी उपस्थित होते. कॅमेरामन, सहाय्यक तंत्रज्ञ, ज्युनिअर ॲक्टर्स सर्व मंडळी शाहरुखचीच वाट पाहत होते. शाहरुखच्या नुसत्या एंट्रीनंतर सर्वांनाच जोश व उल्हास आला. सूर्याची कोवळी किरणे घाटावर व मंदिरावर नुकतीच पसरू लागली होती. आशुतोष लाऊडस्पीकरवरून कॅमेरामन व इतर तंत्रज्ञ व साहाय्यकानां सूचना देऊ लागला. सगळे युनिट शॉटच्या तयारीला वेगाने लागले. शाहरुख खानचा ड्रेसमन धावत आला. धोती व झब्बा घालून मेकअपसाठी समोर बसला. शाहरुख खानने एकदोन टेक मध्येच शॉट ओके केला आणि शुटींग विश्रांतीसाठी थांबली . 

  खुर्चीवर निवांतपणे बसलेल्या शाहरुख खानला पाहून रविन हॉटेलचा मुख्य वेटर ट्रे मधून ज्यूसचा ग्लास घेऊन समोर उभा राहीला. अनपेक्षितपणे शुटींगच्या जागेवर आठवणीने बिस्मिल्ला मॅडमने ज्यूस पाठवलेला पाहून शाहरुख खानही भारावला व त्याने वेटरला मिठी मारली आणि म्हणाला,“सॉरी,मी लगेच आलो. कारण या सूर्योदयाच्या शॉटसाठी माझ्यासाठी येथे तीनशे लोक पहाटेपासून थंडीत वेटींग करत आहेत याची मला जाणीव होती. कमिटमेंट्स मिन्स कमिटमेंट. सकाळी तुला रागावलो. सॉरी, वन्स अगेन.” हा प्रसंग मला नेहमी आठवतो आणि त्यामुळे स्वदेस माझा ऑल टाईम फेवरेट पिक्चर आहे .

  एखादा कलाकार त्याच्या कलेविषयी व वेळेप्रती किती कमिटेड असतो याचे हे उत्तम उदाहरण मी स्वतः पाहिले होते. पण आता दुर्दैवाने अनेक क्षेत्रात अशी कमिटमेंट न पाळणारी माणसेच जास्त मिळतात .

आपण एखाद्या चित्रकाराचे चित्र प्रदर्शन पाहायला जातो, त्यातील चित्र पाहत असताना चित्रातील रंग,आकार, टेक्चर, माध्यम, चित्रातील विषयाचे सादरीकरण मनाला का आवडते याचा विचार केला तर कळते की त्या चित्रकाराची त्या चित्रासोबत एक भावनिककमिटमेंटअसते म्हणून ते चित्र पाहणाऱ्याच्याही हृदयाला भिडते. पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते .

       एखाद्या गायकाचे श्रवणीय गाणे ऐकताना किंवा एखाद्या वादकाचे असामान्य कौशल्य पाहून सूर,ताल,लय, आवाजातील जादू शब्दफेक तुम्हाला का भावते? कारण गायकाची, संगीतकाराची, कवीची, वादकाची त्या गाण्यासोबत त्या वाद्यासोबत त्या कवितेसोबत एक मनःपूर्वक  कमिटमेंटअसते .

   एखादा अभिनेता, अभिनेत्री त्यांची भूमिका इतकी जिवंत व उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात की ते नाटक किंवा सिनेमा पाहताना प्रेक्षक स्वतःला विसरून जातात. कारण त्या कलाकाराची त्या सिनेमातील कॅरेक्टरशी एकरूप होण्याची एक वेगळीकमिटमेंटअसते. ती भूमिका ते जगतात. एकरूप होतात. समरस होण्याची, भूमिकेला न्याय देण्याची कृती, रसिकवृत्ती प्रेक्षकानां खूप भावते .

   एखादा फोटोग्राफर जीवनातील असा एखादा प्रसंग अशा बारकाईने व शोधक नजरेने टिपतो की तो फोटो पाहून प्रत्येक जण अचंबित होत जातो. हजारो शब्दांचे सामर्थ्य एका फोटोमध्ये असते, असे म्हणतात कारण त्या क्लिकमध्ये त्या फोटोग्राफरची दृश्य पकडण्याची एककमिटमेंटअसते .

   एखादा लेखक त्याच्या लेखातून शब्दांचे मायाजाल पसरतो की ते वाचत असताना वाचक मनातून फार हेलावून भारावून जातो. कारण त्या लेखकाची त्या लेखाशीकमिटमेंटअसते, हीकमिटमेंटअत्यंत महत्वाची असते.

   तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुमची कमिटमेंट त्या क्षेत्राशी प्रामाणिकपणाची असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होत राहाल याची खात्री आहे. तुम्ही शेतकरी असाल तर उत्कृष्ट बीबियाणे, उत्तम खते वापरून, मेहनतीने उत्तम पीक घेण्यासाठी तुम्ही कमिटेड असाल. 

   हॉटेल व्यवसायिक असाल तर तुमची सर्व्हीस व पदार्थांची चव चाखून हॉटेलबाहेर खाण्यासाठी रांगा लागतात लागणारच. उत्कृष्ट वकील, उत्कृष्ट प्राध्यापक, उत्कृष्ट दुकानदार, उत्कृष्ट कारागीर, उत्कृष्ट बिझनेस मॅन किंवा शालेय शिक्षक किंवा मोठे सरकारी ऑफिसर किंवा साधा कारकून असाल तरी तुम्ही तुमच्या क्षेत्राशी असलेलीकमिटमेंटपाळली तर यशाची शिखरे व दारे नेहमीच उघडी असतात. कारणकमिटमेंट मीन्स कमिटमेंट , नेव्हर फरगेट’!

    तर मी हे कमिटमेंटचे आख्यान का सांगत आहे?  याचे कारण म्हणजे दिनांक २४ ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान मुंबईच्या प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत AC गॅलरी व सर्क्युलर आर्ट गॅलरी येथे स्वाती व सुनील काळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सर्वानां अगोदरच सप्रेम निमंत्रण. 

या दोन्ही गॅलरीत भरपूर चित्रे लागणार आहेत. त्या प्रदर्शनाच्या नवीन चित्रांच्या नवनिर्मितीत सध्या स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे व्हॉटसअप, फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर उपस्थिती आता खूपच कमी असणार आहे. त्यासाठी मनापासून क्षमस्व.

कारण… ‘कमिटमेंट मिन्स कमिटमेंट, नेव्हर फरगेट ’!

******

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.