No products in the cart.
‘शाकम’ अधिष्ठात्यांना कोण आवरणार?
जेजे पाठोपाठ आता ‘चिन्ह’ने ‘शाकम’ छत्रपती संभाजीनगरकडे आपला मोर्चा वळवला आहे. किंबहुना तो आम्हाला वळवावाच लागला. कारण आजी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आमच्याशी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधला. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हीच आता आमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडू शकता. ‘चिन्ह’चा आवाका इतका मोठा नाही की अशा प्रकारे चाललेल्या शैक्षणिक भ्रष्टाचाराला तो वाचा फोडू शकेल. हे काम खरं तर साऱ्या समाजाचंच आहे. ज्यांना भ्रष्टाचार होऊ नये असं वाटतं त्या सभ्य सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आता पुढं यायला हवं. तरच ही प्रकाशाची बेटं वाचवता येतील. अन्यथा भविष्यात निराशाच पदरी येईल.
हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं मराठवाड्यात महाराष्ट्र सरकारतर्फे मोठा शासकीय महोत्सव दि १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ आणि शासकीय अधिकारी दि १६ व १७ रोजी छत्रपती संभाजीनगरात ठाण मांडून बसले होते. संपूर्ण मराठवाड्यात या निमित्तानं १६ रोजी झेंडावंदनाचे कार्यक्रम झाले. ‘शाकम’ म्हणजे शासकीय कला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर इथंही झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम साजरा करण्याचे शासकीय आदेश असून सुद्धा ‘शाकम’ छत्रपती संभाजीनगरचे अधिष्ठाता श्री वडजे हे त्या दिवशी झेंडावंदनाला गैरहजर होते. इतकंच नाही तर तिथं कायम स्वरूपी ज्यांच्या नेमणुका असलेले शिक्षक या महत्वाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. उपस्थित होते ते फक्त कंत्राटी, हंगामी, अस्थायी शिक्षक. विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला फिरकले नाहीत.
अशा प्रकारच्या समारंभांचं श्री वडजे यांना वावडं असल्याचं ‘शाकम’ परिसरात बोललं जातं. त्यामुळे मागच्या १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला देखील ते आजारी आहोत असे सांगून अनुपस्थित राहिले होते. गेल्या वर्षी तर १५ ऑगस्टच्या झेंडावंदन कार्यक्रमाला ते म्हणे अमरावतीला गेले होते. अमरावतीला का तर म्हणे एमएफए शिल्पकलेची परीक्षा द्यायला. हे गृहस्थ म्हणे छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिष्ठाता म्हणून ‘शाकम’चं काम पाहतात आणि त्याच वेळी ते अमरावतीच्या संजय कुऱ्हे मॉडर्न आर्ट कॉलेजमध्ये शिल्पकला या विषयात म्हणे एमएफए करतात. हे भन्नाट आहे ना ? म्हणजे एक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला ‘शाकम’मध्ये अधिष्ठाता म्हणून सरकारी नोकरी करतो आणि त्याच वेळी तो म्हणे अमरावतीच्या संजय कुऱ्हे मॉडर्न आर्ट कॉलेजमध्ये एमएफएचं शिल्पकलेचं शिक्षण घेतो. आहे ना खरोखरंच भन्नाट प्रकार ? आता त्यांनी किंवा ज्या कॉलेजमध्ये ते शिकतात त्या संजय कुऱ्हे मॉडर्न आर्ट कॉलेजने आपलं शिल्पकलेचं कसब वापरून एखादा क्लोन निर्माण केला असणार असंच ‘शाकम’ छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात बोललं जातं. खरं खोटं स्वतः श्री वडजे जाणोत. किंवा अमरावतीच्या त्या कॉलेजचे संचालक श्री कुऱ्हे जाणोत.
एवढं सारं वाचल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एकच माणूस एका कॉलेजमध्ये तेही सरकारी अधिष्ठाता म्हणून पूर्णवेळ नोकरी करतो आणि त्याच वेळी तो अमरावतीच्या एका कला महाविद्यालयात चक्क एमएफए करतो. एमएफए करतो याचा अर्थ बीएफए देखील तिथूनच केलं असणार हे उघड आहे. ही अशी कुठली शिक्षण व्यवस्था कला संचालनालयाने किंवा एमएफएची डिग्री देणाऱ्या विद्यापीठानं निर्माण केली आहे याचा म्हणे अनेक शिक्षण तज्ञ शोध घेत आहेत.
शिक्षण सचिवांपर्यंतच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांपर्यंत देखील शोध घेण्याची मजल संबंधितांनी मारली आहे. कला संचालक श्री राजीव मिश्रा यांच्याकडे संबंधितांनी या संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत पण त्यावर कोणतीही कारवाई श्री मिश्रा यांनी केलेली नाही. खरं तर असा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी श्री वडजे यांनी कला संचालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं. पण तीही त्यांनी घेतलेली नाही. इतकंच नाही खरं तर हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट कडून मायग्रेशन सर्टिफिकेट घेणं अत्यावश्यक होतं. ते घेतलं आहे किंवा नाही याविषयी ‘शाकम’ परिसरात असंख्य वदंता आहेत. तर खरं खोटं ते वडजे साहेबच जाणोत. अर्थात साबळे साहेबांप्रमाणे वडजे साहेबांची देखील मंत्रालयात प्रचंड वट असल्यामुळं कुणी त्यांचं काहीही वाकडं करणार नाही याची त्यांना खात्री आहेच.
हे वडजे साहेब तर म्हणे दर शुक्रवारी नाशिकला आपल्या घरी निघून जातात आणि सोमवारी पुन्हा ‘शाकम’मध्ये अधिष्ठाता पदी रुजू होतात. खरं तर कुठल्याही ज्येष्ठ अधिकाऱ्याला असं विनापरवानगी मुख्यालय सोडता येत नाही. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तर नाहीच नाही. पण तरीही सारे नियम धुडकावून लावून श्री वडजे दर शनिवार रविवारी नाशिकला जातात. गेल्या शुक्रवारपासून ते छत्रपती संभाजीनगरमधून गायब झाले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरात उपस्थित असताना मराठवाडा मुक्ती संग्रामच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आपले सहकारी विजय सुरळकर यांच्यावर ‘शाकम’ची जबाबदारी सोपवून हे गृहस्थ नाशिकला जाऊन बसले आहेत. शनिवार झाला, रविवार झाला आज सोमवार आजही ते गैरहजर आहेत. उद्या गणेश चतुर्थीची सुट्टी असल्यामुळं ही रजा देखील त्यांनी लावून घेतली आहे. आश्चर्य म्हणजे या त्यांच्या सर्व रजा भर पगारी आहेत. ( कसे ते फक्त वडजे साहेबच सांगू शकतात )
खरं तर आज विद्यापीठामध्ये एमएफए फायनल सेमिस्टरची परीक्षा होती. चार विद्यार्थिनी या परीक्षेला बसल्या होत्या. त्या विद्यार्थिनी परीक्षेसाठी विद्यालयात गेल्या असता परीक्षा २५/०९/२०२३ रोजी घेण्यात येईल असं सांगण्यात आलं. परीक्षा पुढं ढकलण्याचं कोणतंही कारण त्यांना दिलं गेलं नाही. यावर अधिष्ठाता साहेब बिनधास्त उत्तरं देतात ‘कुठंही तक्रार करा, माझं कुणीही वाकडं करू शकणार नाही ! विद्यार्थिनी स्नेहा गेडाम यांनी ०९/०२/२०२३ रोजी प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग व कला संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केली पण कुणीही याची नोंद घेतली नाही. पुन्हा १७/०७/२०२३ रोजी राजीव मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार गेली त्याचीही दखल घेतली नाही. आज पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याचे सांगितल्यावर आज त्यांनी पुन्हा राजीव मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
श्री वडजे यांनी रजेवर जाताना ज्यांच्याकडे या परीक्षेची सूत्र सोपवली होती ते अंबादास जाधव नावाचे शिक्षक आज परीक्षा असताना सुद्धा कॉलेजमध्ये उपस्थित नव्हते. ( ते म्हणे मराठवाड्यात पाथर्डीला ज्ञानेश्वर माऊली चित्रकला विद्यालय नावाचं एटीडीचं विनाअनुदानित कॉलेज चालवतात आणि इकडे बहुदा फावल्या वेळात ‘शाकम’ छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यादानाचं पवित्र कार्य करतात. ) त्यांना म्हणे बोलावून आणावं लागलं. आता त्या विद्यार्थिनीने धाडस दाखवून केलेल्या त्या तक्रारीची प्रत आम्ही या लेखासोबत प्रसिद्ध करत आहोत. कला संचालकांना थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर या साऱ्या प्रकरणाची चौकशी करणार का ? का मागच्या सारखंच एका विद्यार्थिनीने केलेल्या गंभीर तक्रारीच्या वेळी जसं साबळे साहेबांना चौकशीसाठी पाठवून ते प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं. तसंच ते आताही करणार का ते आता पाहायचं.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion