No products in the cart.
स्त्री’शक्ती’ आणि रिनी धुमाळ !
दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळं आपण बडोद्याच्या रिनी धुमाळ यांच्यासारख्या चित्रकर्त्रीला गमावलं. भारतीय चित्रकलेच्या दृष्टीनं ती मोठी हानी होती. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टनं देखील त्यांच्या कामाचं महत्व जाणून त्यांच्या आजवरच्या कला निर्मितीचं दर्शन घडवणारं एक प्रचंड मोठं प्रदर्शन ‘शक्ती’ २१ मे पासून मुंबईत भरवलं आहे. हे प्रदर्शन त्याच्या मांडणी मुळे पाहणाऱ्याला अक्षरशः भारून टाकतं. संपूर्णपणे काळ्या रंगाच्या आणि अंधाराच्या पार्श्वभूमीवर मर्यादित प्रकाशझोतांचा वापर करून रिनी धुमाळ त्यांच्या कलाकृती ज्या पद्धतीनं गॅलरीनं प्रेक्षकांपुढे सादर केल्या आहेत त्याला तोड नाही. शशिकांत सावंत यांनी सादर केलेला हा त्या प्रदर्शनाचा लेखाजोखा !
रिनी धुमाळ यांच्या चित्रांचं सिंहावलोकन प्रदर्शन मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये चालू आहे. वयाच्या ७३व्या वर्षी म्हणजे मागच्या ०९ सप्टेंबरला कोरोनामुळे त्यांचं बडोद्यात निधन झालं. महाराजा सयाजीराव विद्यापीठात त्या फाइन आर्ट शिकवत होत्या. के.जी.सुब्रमण्यम आणि कृष्णा रेड्डी यांसारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण केलं. त्या शिक्षणाचा प्रभाव रिनी धुमाळ यांच्या कामावरही होता. नॅशनल गॅलरीमध्ये जे प्रदर्शन चालू आहे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आत शिरल्या शिरल्या लक्षात येतं. नॅशनल गॅलरीमध्ये भरलेली ही प्रदर्शनं आपण कायमच व्यवस्थित उजेडात पाहत आलो आहोत. अनेकदा एक चित्र पाहत असताना शेजारी दुसरं चित्र दिसत राहतं. म्हणूनच की काय नॅशनल गॅलरीने रिनी धुमाळ यांचं संपूर्ण प्रदर्शन हे पूर्णपणे काळोखातच सादर केलं आहे. म्हणजे असं की, नॅशनल गॅलरीच्या दालनात प्रवेश केल्यावर दिसतो तो पूर्णतः अंधार आणि या अंधाराच्या पार्श्वभूमीवर केवळ प्रत्येक चित्राच्या फ्रेमवर टाकलेला स्पॉटलाइट. त्यामुळे होतं काय की, आजूबाजूचा सगळा भाग विसरून आपण चित्राकडे एकाग्रपणे बघतो. ही कल्पना अत्यंत अभिनव आहे यात शंकाच नाही. तळमजल्यापासून सुरुवात केल्यावर रिनी धुमाळ यांची वेगवेगळ्या कालखंडातली चित्रं दिसतात. दुसरं म्हणजे निरनिराळी माध्यमं त्यांनी हाताळली. कॅनव्हास असेल, कागद असेल किंवा साध्या प्लेटसारख्या गोष्टीवर केलेली चित्रं असतील. काही ठिकाणी फ्रेमचा वेगळा आविष्कार आठवतो. याबाबत अँजोली इला मेनन यांच्याशी त्यांचं साम्य आहे. जुन्या घराच्या ज्या खिडक्या असतात. त्या फ्रेम म्हणून वापरुन त्याच्याच चौकटीतून रेखाटन करणं हे देखील त्यांनी केलेलं आढळतं.


या प्रदर्शनाचं नाव ‘शक्ती’ असं आहे. अर्थातच शक्ती म्हणजे ऊर्जा आणि स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार. काही मोजकी चित्रे सोडली तर रिनी धुमाळ यांच्या चित्रात एक स्त्रीचा चेहरा किंवा आकृती आढळते. स्त्री ही सशक्त आहे. कधी रंगांच्या मोजक्या फटकार्यातून जीवंत होते तर कधी अत्यंत हिशोबीपणे केलेल्या एकावर एक स्तरांनी तयार होते. विशेषत: वॉटर कलरमध्ये आपण मूळ रेखाटन, त्याच्यावर फिरवलेला हात हे सगळं आपण बघू शकतो. हयुमन ऍनाटॉमीची त्या फारशी पर्वा करत नाहीत. म्हणजे त्यांच्या चित्रातले आकार हे कितीही लवचिक होऊ शकतात. एका चित्रात देवीसारख्या दिसणार्या स्त्रीने पुरुषाचं मुंडकं पकडलेलं आहे. ही अशी चित्रं तुम्हाला आकर्षित करतात. रंगांचाही विलक्षण वेगळा पट त्या उघडतात. कधी निळसर, कधी लालसर, कधी एखादं चित्र पूर्ण लालभडक रंगात रंगवलेलं. विशेषत: ब्लॅक अँड व्हाइट स्प्रेड्समध्ये त्यांच्या चित्रात एक वेगळेपणा जाणवतो.
भारतात प्रिंट मेकर्सची परंपरा आहे. शिवाय स्टॅनली हेटरसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराकडे प्रिंट मेकिंगचं शिक्षण घेतलं. या प्रिंट मेकिंगमध्ये प्रामुख्याने त्या काळा रंग वापरतात किंवा अगदी मोजके रंग. पण त्यांच्या कॅनव्हास आणि कागदात रंगांची जी एक असोशी आढळते. रंग वापरणं यात जो उत्साह आढळतो तो त्यात अजिबात दिसत नाही. अनेक ठिकाणी त्या चित्रांचा समूह साजरा करतात. प्लेटवर आहे तसा समूह, छोट्या छोट्या प्लेटचा समूह. आता हा समूह एकत्रितच पाहावा लागतो. त्यात एका चित्राची दुसर्या चित्राशी लिंक नसली तर ती एका समान काळात अवतीर्ण झालेली आहे. त्यांच्या मागे काळाचा एक स्तब्धपणा दिसतो. एका विशिष्ट काळात त्यांनी ही चित्रं केलेली आहेत. मग ती काही दिवसातली असतील किंवा काही महिन्यातली असतील ते कळतं.


रिनी धुमाळ यांच्या स्टुडिओची छोटी प्रतिकृती तिथे उभारण्यात आलेली आहे. म्हणजे कपाट, त्याच्यात ठेवलेले रंग, ट्यूबस् आणि इथेच मोठ्या पडद्यावर त्यांची मुलाखत देखील पाहता येते. जिच्यात त्या कलानिर्मितीची रचनेची प्रक्रिया उलगडून दाखवतात. शिक्षक असल्यामुळे त्यांचा बराच काळ हा शिकवण्यात खर्च झाला. शिकवणे हे एक आव्हान आहे असं त्यांना कायम वाटायचं. म्हणूनच जेजेचं देशभर नाव असलं तरी बडोदा स्कूल हे त्याच्या विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीमुळे, नरेटिव्ह विचारसरणीमुळे, आकृत्यांना महत्त्व देणार्या आणि फॅंटसीचा वापर करणार्या चित्रांमुळे प्रसिद्ध झालं आहे. किंबहुना बडोदा स्कूलची अनेक चित्रं ही ओळखू येतात. याचं कारण हेच की तिथे शिकवणारे दीपक संन्यालपासून ते रिनी धुमाळपर्यंतचे शिक्षक. या शिक्षकांनी अनेक पिढ्यांवर मोठा संस्कार केला आणि त्यांना जागतिक चित्रकलेच्या पायर्या चढू दिल्या. खरंतर बडोदा हे छोटं शहर. मुंबईच्या मानाने किंवा मद्रासच्या मानाने त्याचा प्रभाव फारच कमी. चित्रकारांना नेहमी वेगळ्या वातावरणात राहायचे असते ते मात्र तिथे शक्य नाही. तरी बडोदाने जे नाव मिळवलं ते का, हे रिनी धुमाळ यांचं चित्र प्रदर्शन पाहताना दिसतं. विलक्षण प्रयोगशीलता, विलक्षण रेखाटनं यातून साकार झालेली अक्षरश: शेकडो चित्रं आपल्याला पाहायला मिळतात. पिकासोबद्दल त्या असं म्हणतात की, त्याने एक डोळा कधी दुसर्यासारखा रंगवला नाही.
रिनी धुमाळ यांची पिकासोशी तुलना न करता एकच म्हणता येईल की, त्यांच्या या चित्र रंगवण्याच्या शैलीमुळे आणि स्पॉटॅनिटीमुळे सर्वत्र जरी स्त्रीची आकृती दिसतं असली तरी त्यातली प्रत्येक स्त्री ही युनिक आहे. तिची ऊर्जा ही वेगळी आहे. दुसरं म्हणजे त्या विलक्षण आकारात काम करतात. कधी अगदी ५ बाय ६ फूट किंवा ६ बाय ८ फूटात काम करतात तर कधी अगदी छोट्या वितभर चित्रांमध्ये. हे फारच कमी चित्रकार करू शकतात. त्यामुळेच त्यांचे संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यावर आणि स्टुडिओचं इन्स्टॉलेशन पाहिल्यावर मनावर एक कोरला जातो तो एका स्वतंत्र स्त्रीने स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध. हा शोध खूप सकारात्मक आहे, भावात्मक आहे.


देशातल्या स्त्रीवर अत्याचार होतात, कुटुंबात, बाहेर, करियरमध्येही स्त्रियांना आजही इतकं स्थान नाहीये. उदा., एखादी स्त्री रिक्षा चालवायला लागली तर लोकांना त्याचं कौतुक वाटतं. पण त्याचबरोबर विमान उडवण्यापासून ते अनेक क्षेत्रात स्त्रिया कार्यक्षम आहेत. पण त्या शहरी आणि सुशिक्षित. रिनी धुमाळ यांची स्त्री अशा कुठल्याही आयडेंटिटीच्या पलीकडे जाते आणि एक स्त्री म्हणून तिचे व्यक्तिमत्व चित्रातून ठाशीवपणे मांडते. तिच्या पिढीतील्या बहुतेक स्त्री-पुरुष चित्रकारांवर पाश्चात्य चित्रकलेचे संस्कार होते पण रिनी धुमाळ यांनी पाश्चात्य प्रभावापासून ते भारतीय लोककलेपर्यंतचे अनेक संस्कार रिचवून स्वतःची शैली निर्माण केली.
७०च्या दशकात अमेरिकेत पुरुषांच्या तोडीच्या महिला चित्रकार का नाहीत अशी चर्चा सुरू झाली होती. अगदी तिथे देखील घर, कुटुंब इ. जबाबदार्या सांभाळूनच कलेची साधना करावी लागते हा मुद्दा पुढे आला. अर्थात भारतात काही वेगळी परिस्थिती नव्हती. तरीही इथे बी. प्रभा, माधवी पारेख, अर्पिता कौर, अँजली इला मेनन, सरोजपाल गोगी, शकुंतला कुलकर्णी, रिनी धुमाळ यांच्यासारख्या महिला चित्रकार मागच्या पिढीत निर्माण झाल्या. पण पुरुष चित्रकारांच्या तुलनेत त्यांची संख्या कमीच होती. शिल्पकलेत तर स्त्रिया अपवादानेच आढळतात.


नॅशनल गॅलरीतील या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांच्या परिचयाचे अनेक जण त्यांच्याबद्दल बोलले. विशेषत: बडोदा स्कूलमधील त्यांच्या मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी. त्या मनस्वी चित्रकार होत्या. केवळ दीर्घकाळ चित्र काढता यावं म्हणून त्यांनी शिकवणं सोडून दिलं, असं त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं. त्या जवळपास ९-१० तास काम करत. चित्रकला हे त्यांचं विलक्षण पॅशन होतं तसंच सर्वच कलांबद्दल. त्यांना प्रवासाची आवड होती. त्यांच्या जवळच्या एका मैत्रिणीने सांगितलं की त्यांना उत्तम जेवण करता येतं, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यांनी जवळजवळ सर्वच माध्यमात काम केलं. साड्या देखील डिझाईन केल्या. टेराकोटा, कॅनव्हास, कागद इ. आणि इंग्रेविंग, एचिंग या सर्व माध्यमांवर त्यांची हुकूमत होती असं असूनही त्या फार अंतर्मुख व्यक्ती होत्या. गर्दीत मिसळणारा त्यांचा स्वभाव नव्हता, पण जिने जन्मभर कलेचा ध्यास घेतला. तो ध्यास या प्रदर्शनाच्या निमित्तानं गॅलरीत लावलेल्या शेकडो चित्रांमधून आपल्यापर्यंत पोचतो हे मात्र नक्की.
नॅशनल म्युझियमने त्यांच्या स्मरणार्त खूप मोठं प्रदर्शन आयोजित केलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष नॅशनल गॅलरीमधील प्रदर्शनांचा दर्जा अधिकाधिक आंतरराष्ट्रीयतेकडे जात आहे हे या प्रदर्शनातून स्पष्टपणे जाणवतं.


वि.सू. : प्रदर्शन कधी संपणार यासंदर्भात गॅलरीनं आपल्या जाहिरातीत कोणतीही नोंद केलेली नाही याची कृपया नोंद घ्यावी !
अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर फोन करावा : 022 2288 1969

Related
Please login to join discussion