No products in the cart.
शिक्षण खात्याचा आणखी एक पराक्रम!
गेल्या २५-३० वर्षांमध्ये स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारनं शिक्षण मंत्रीपदी राजकीय नेमणूक करण्यातच धन्यता मानली. कोणे एके काळी शिक्षणतज्ज्ञ व्यक्ती त्या पदावर नेमण्याची प्रथा होती. पण ती प्रथा नाहीशी झाली आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक दुरावस्थेला सुरुवात झाली. आजही ती संपलेली नाही. कशी ती पाहा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ संगीत महाविद्यालयाच्या नेमणुकीवरून…
गणेशोत्सवाचे दिवस आहेत, मंगेशकर कुटुंबीयांनी म्हटलेल्या गणपतीच्या आरत्या आणि भजनं किंवा गीतांच्या तालावर लहानाची मोठी झालेली आमची पिढी. बहुदा ७० च्या दशकात रेकॉर्ड झालेल्या त्यांच्या आरत्या आणि गणेशवंदनाने त्या काळात रेकॉर्ड्स विक्रीचे प्रचंड मोठे विक्रम केले होते. घरोघरी, मंडपा-मंडपात फक्त मंगेशकर कुटुंबियांच्याच रेकॉर्ड्स वाजत. रेकॉर्ड्स गेल्या, कॅसेट्स आल्या, कॅसेट्स गेल्या सीडीज आल्या, सीडीज गेल्या आणि आता पेनड्राईव आले. पण वर्षानुवर्षे त्या गाण्याने अगदी तसाच आनंद दिला आहे. आजही हा लेख लिहीत असताना दूर कुठेतरी ‘गणराज रंगी नाचतो’ हे सूर वाजत आहेत.
‘चिन्ह आर्ट न्यूज’वर आम्ही नेहमीच चित्रकलाविषयक लेख, वृत्तांत आणि बातम्या प्रसिद्ध करत असतो. असं असताना आज गणेशोत्सवातच लता मंगेशकरांविषयी किंवा मंगेशकर कुटुंबीयांविषयी आपण हे काय लिहीत आहात असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. त्याचं उत्तर अगदी सोपं आहे.
लतादीदींचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं लतादीदींच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. कालांतरानं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ स्थापनेची घोषणा केली. त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्टचे प्रश्न माध्यमातून मोठे गाजत होते. उदय सामंतदेखील कला विद्यापीठ स्थापन करण्याच्या कल्पनेने भारले होते. जेजेचा निसर्गरम्य परिसर पाहून त्यांच्या मनात कल्पना आली की इथंच का ते विद्यापीठ स्थापन करू नये? आले मंत्री साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना! जवळजवळ सव्वाशे वर्ष जुना डीन बंगलो त्यांना मोकळा दिसला आणि या बंगल्यातच दिदींच्या स्मरणार्थ उभं राहणारं ते संगीत विद्यापीठ का स्थापन करू नये अशी भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली.
आजी-माजी आचरट कलासंचालकांनी ती अर्थातच उचलून धरली. पण ‘चिन्ह’नं त्यावेळी अतिशय कठोर भूमिका घेऊन त्या सगळ्या आराखड्यावर जळजळीत टीका केली. आजीमाजी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या त्यावर प्रतिक्रियादेखील आल्या. १००-१५० वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार असं काही तिथं करता येणं शक्यच नव्हतं हेही लक्षात आलं आणि तो प्रस्ताव बारगळला. कुणीतरी मंत्र्यांना शहाणपणाची सूचना केली की, जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये असं काही करण्यापेक्षा इकडे प्रभादेवीला रवींद्र नाट्यमंदिरात पु.ल. देशपांडे अकादमीत बक्कळ रिकामी जागा पडली आहे. तिथं तुम्ही संगीत अकादमी करा की! ते जास्त अन्वयार्थक होईल. नव्यानं बदलून आलेल्या प्रभारी कलासंचालकांना हे मान्य झालं नाही कारण हे ठिकाण त्यांना खूप दूर पडत होतं. जेजेमधलं प्राचार्य पद आणि हे दोन्ही एकाचवेळी कसं सांभाळायचं वगैरे प्रश्न त्यांना पडले होते. पण हो-ना हो-ना करता करता ती सूचनादेखील मान्य झाली आणि पु.ल. देशपांडे अकादमीतच संगीत महाविद्यालय सुरु करण्याचे निश्चित झाले.
खरं तर मंत्री उदय सामंत यांनी अक्षरशः आपल्याकडे ओढून आणलेला हा संगीत महाविद्यालयाचा प्रकल्प सामंत उद्योगमंत्री झाल्यामुळे जणू काही पोरकाच झाला होता. उदय सामंत यांच्याकडे काही व्हिजन असू शकेल. त्यांच्या काही योजनादेखील असतील. पण ते अचानक उद्योग खात्यात निघून गेल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण खात्याची पंचाईत झाली आणि हा प्रकल्प पुरा होणार की नाही अशा शंका निर्माण झाल्या.
याला कारण होतं ते असं की, उदय सामंत यांनी हा प्रकल्प कला संचालनालयाच्या गळ्यात घातला होता. खरं तर कला संचालनालय हे चित्रकला शिक्षण आणि कला प्रसारासाठी स्थापन झालं होतं. हे संगीत महाविद्यालय सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सोपवणं अधिक संयुक्तिक ठरलं असतं, पण उदय सामंत यांच्या हट्टापुढे कोणाचेच चालले नाही. काही दिवसातच सरकार बदललं आणि उदय सामंत उद्योग खातं सांभाळू लागले. इकडे कलासंचालनालयामध्ये राजीव मिश्रा हे प्रभारी कलासंचालक म्हणून काम पाहत होते. त्यांचा आणि चित्रकलेचा काहीही संबंध नसताना त्यांच्या गळ्यात हे कलासंचालनालयाचं घोंगडं अडकवण्यात आलं होतं. त्यात हा संगीत महाविद्यालयाचा प्रकल्पदेखील त्यांच्याच गळ्यात अडकवण्यात आला. त्यांचा आणि संगीताचादेखील अर्थाअर्थी काहीएक संबंध नाही. पण गेली २०-३० वर्ष प्रभारी कलासंचालक म्हणून ना-लायक लोकांच्या नियुक्त्या करण्याची खोड लागलेल्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं इथंही तोच घोळ घातला. मग काय, राजीव मिश्रा घरातून जे निघायचे ते थेट रवींद्र नाट्यमंदिरात पोहोचायचे. रवींद्र नाट्यमंदिरातून ते थेट मंत्रालयात जायचे. तोपर्यंत संध्याकाळ व्हायची. का मग ते कलासंचालनालयात प्रवेश करायचे. गेले अनेक महिने हाच प्रकार चालू होता. ‘मॅक्स महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीने त्यांच्या नेमणुकीचे आणि त्यांनी आजवर गाजवलेल्या त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचे व्हिडीओज प्रसारित केले आहेत. त्यावरून कला संचालनालायत कसे कामकाज चालले असेल याची कल्पना यावी.
(पूर्वार्ध समाप्त)
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion