No products in the cart.
शिल्पोत्सव: कला जगतातील आठवणींचा महोत्सव!
जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी, वसईमधील चित्रकार फिलिप डिमेलो यांनी नुकताच ‘शिल्पोत्सव’ नावाचा कलामहोत्सव आयोजित केला होता. त्या निमित्ताने चाळीस वर्षांपूर्वी जेजेमध्ये शिकलेल्या मित्रमंडळींना एकमेकांना भेटायची संधी मिळाली. या अतिशय हृद्य सोहळयाचा अनुभव चिन्हचे संपादक सतीश नाईक यांनी या लेखातून सांगितला आहे.
———
वसईमधला माझा चित्रकार मित्र फिलिप डिमेलो हा गेल्या वर्षापासून नाताळनंतर लगेचच आगाशीमधल्या कातरवाडीतल्या आपल्या घराच्या परिसरात एक कला महोत्सव आयोजित करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण बरेच मित्र, आप्त, स्नेही गमावले, त्यांच्या स्मृती जागवाव्यात या हेतूनं गेल्या वर्षी फ़िलीपनं पहिल्यांदा या कार्यक्रमाचं आयोजन केलं. फिलिपची सारी मित्रमंडळी या निमित्तानं एकत्र आली होती. वसई विरार परिसरातल्या कलावंताच्या कलाकृतींचं एक प्रदर्शनही या निमित्तानं आपल्या घराच्या परिसरात भरवून फ़िलीपनं कलाप्रसाराचा एक आदर्शच जणू घालून दिला होता. सकाळ सायंकाळच्या चहा पाण्यापासून दुपारच्या अत्यंत स्वादिष्ट अशा भोजनापर्यन्तचा साराच्यासारा खर्च फिलिपनं स्वतःच्या खिशातून केला होता. अगदी स्मरणात राहावं असं त्या कार्यक्रमाचं आयोज़न होतं. केवळ बांबू आणि पांढऱ्या कापडाचा उपयोग करुन फ़िलीपनं आपल्या घराच्या परिसरात जे कलादालनाचं वातावरण उभं केलं होतं ते तर अनेकांच्या स्मरणात राहिलं आहे.
यंदादेखील फ़िलीपनं नाताळच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ आणि २८ डिसेंबरला पुन्हा तशाच प्रकारच्या कला उत्सवाचं आयोजन केलं होतं. यंदा फिलिपच्या जोडीला दोन संस्था आल्या होत्या. एक वसई-विरार आर्टिस्ट फोरम आणि दुसरी होती प्रबोधन प्रतिष्ठान. या दोन्ही संस्थांनी मिळून यंदा शिल्पोत्सवाचं आयोजन केलं होतं. वसई विरार परिसरातील सचिन चौधरी, मधुकर वंजारी, शेखर वेचलेकर, संजय महाडिक, किरण अदाते, प्रदीप कांबळे, हितेश धानमेर, निलेश मेस्त्री आणि स्वतः फिलिप डिमेलो यांनी या शिल्प प्रदर्शनात आपली शिल्पं प्रदर्शित केली होती. फिलिप डिमेलो यांचं शिल्पकलेच्या क्षेत्रातलं पदार्पण अनेकांना अचंबित करुन गेलं. डिमेलो यांच्या बरोबरीनं सचिन चौधरी या शिल्पकारानं मात्र या प्रदर्शनावर आपली छाप पडली यात शंकाच नाही. परिसराशी नातं सांगणारी त्याची शिल्पं खरोखरच या उत्सवात सहभागी झालेल्यांवर निश्चितपणं आपली छाप सोडून गेली यात शंकाच नाही. न सोललेले नारळ, त्यांच्या करवंट्या, नारळाच्या झाडाच्या झावळ्या यांचा वापर करुन सचिननं केलेलं शिल्प साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत होतं. आगाशीच्या नारळी-पोफळीनं वेढलेल्या बागेत अतिशय योग्य ठिकाणी लावलेलं हे शिल्प मोठं खुलून दिसत होतं, आणि म्हणूनच त्याच्या सोबत फोटो काढून घेण्यात अनेक उपस्थितांची अहमहमिका लागलेली दिसत होती.
प्रख्यात लेखिका वीणा गवाणकर या सदर उत्सवाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. पण आपलं मोठेपण विसरून त्या या कार्यक्रमात इतक्या मोकळेपणानं, आपलेपणानं सहभागी झाल्या होत्या की उपस्थित असलेल्या साऱ्याच कलावंत, कला विद्यार्थी आणि कलारसिकांना त्यांच्यासोबत आपलं छायाचित्र काढून घ्यावंसं वाटत होतं. वीणाताईंसोबत श्रीयुत गवाणकर यांची उपस्थितीदेखील मोठी लक्षवेधक होती. अशा स्वरूपातल्या कलाप्रसाराचा हेतू ठेवून आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती कशी आणि किती अनौपचारिक पद्धतीची असावी याचा वीणाताईंनी घालून दिलेला हा आदर्श वस्तुपाठ सदैवच स्मरणात राहील. या संपूर्ण उत्सवातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे वीणाताईंच्या हस्ते झालेल्या शिल्पकार शांताराम सामंत यांच्या सत्काराचा. वीणाताईंनी केलेला त्यांचा सत्कार आणि त्या निमित्तानं त्यांनी केलेलं भाषण हे हृद्य होतं. ज्यांना ते ऐकावयाचे असेल त्यांनी फिलिप डिमेलो यांच्याकडून सदर भाषणाचा व्हिडीओ अवश्य मागवून घ्यावा. शक्य झालं तर ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनलवर सदर व्हिडीओ प्रसारित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
श्री शांताराम सामंत हे जे जे स्कूल ऑफ आर्टमधले आमचे एक शिक्षक. ते शिल्पकला विभागात कार्यरत होते. पण त्यांचा मित्रपरिवार संपूर्ण जेजे कॅम्पसमध्ये पसरलेला होता. हा मित्रपरिवार म्हणजे प्रामुख्यानं आम्ही विद्यार्थी होतो. वास्तविक पाहता माझा शिल्पकला विभागाशी काही एक संबंध नव्हता, पण कॅम्पसमध्ये कधीतरी अशीच ओळख झाली आणि त्यांच्याशी छान मैत्रीच झाली. आमची एक चहाची वेळ ठरलेली असायची. त्यावेळी आम्ही आर्किटेक्चर कॉलेजसमोरच्या ओपन एअर स्टेजजवळ भेटत असू. (ते स्टेज नंतर पाडलं गेलं असावं) जर एखाद्या दिवशी आम्ही उशीर केला किंवा विसरलो का खालून शिपाई येत असे बोलवायला. चला लवकर! सर बोलावतायत म्हणून सांगायला. चहापानाची ती पंधरा वीस मिनिटं मोठी मौजेची असत. कारण सामंत सर हमखास सुटलेले असत. कुणाची नक्कल कर, कुठले तरी किस्से सांग, हास्यविनोद असं सारं अखंड चालू असे. आणि सोबत अखंड धूम्रपान. त्या पंधरा मिनिटात संपायला आलेल्या सिगारेटवर सिगारेट पेटवून सर मनसोक्त धूम्रपान करीत जेजेतली सहा-सात वर्ष संपली आणि मग ते सारं संपलंच. कॉलेज संपल्यावर अधूनमधून सरांना भेटायला जाणं होई, छान गप्पा होत. पण सर सेवानिवृत्त झाले आणि तेही संपलंच.
तब्बल चाळीसएक वर्षानं परवाच्या कार्यक्रमात सरांची भेट झाली. भेट कशी होईल याविषयी मी जरा साशंकच होतो, कारण सर ९२ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत असं फिलिप म्हणाला होता सरांकडे पाहिलं आणि मी थक्क झालो. सर थोडेसे स्थूल झालेले दिसत होते. पण एकदम ताठ. पायऱ्या चढताना किंवा खुर्चीतून उठताना त्यांना जराशी मदत घ्यावी लागत होती पण त्यांच्या व्यक्तिमत्वात फारसा फरक झाला नव्हता. निदान मला तरी तो जाणवला नव्हता कार्यक्रम संपल्यावर त्यांना जाऊन भेटलो. तर त्यांचा चेहरा कोरा. म्हटलं ओळखलंत का सर मला? तर म्हणाले नाही. मग नाव सांगताच त्यांनी उसळून जो अविर्भाव केला तो पाहिल्यानंतर मात्र सर चाळीस वर्षांपूर्वी जसे होते तसेच आहेत याविषयी माझी खात्री पटली. मग उभ्याउभ्या भरपूर गप्पा झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. ठाण्याहून आगाशीला पोहोंचण्यासाठी केलेला ती साडेतीन तासांचा प्रवास सार्थकी लागला होता. जेजेसंदर्भात गेली तब्बल चाळीस वर्ष मी जे अगदी तळतळून लिखाण करतो आहे ते का म्हणून असा प्रश्न वारंवार मला विचारला जातो. त्या प्रश्नाचं उत्तरं जेजे परिसराशी, जेजेच्या वास्तूशी किंवा तिथल्या शिक्षकांशी हे असे भावबंध जोडले गेले होते हेच आहे.
माझा मित्र फिलिप डिमेलो याचे मी विशेष आभार मानतो कारण त्यानं सामंत सरांना शोधून काढलं, त्यांचा सत्कार केला, त्यांना मानपत्र दिलं आणि माझ्या सारख्या जेजेच्या विद्यार्थ्यांची आणि सरांची पुन्हा भेट घडवून आणली. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर हे काम सरकारचं आहे पण सरकारनं या बाबतीत नेहमीप्रमाणेच अनास्था दाखवली. फ़िलीपनं मात्र पुढाकार घेऊन एका संस्मरणीय क्षणांचं आम्हाला साक्षीदार केलं यात शंकाच नाही.
सतीश नाईक
Related
Please login to join discussion