No products in the cart.
शिवाजी महाराजांना देखील या समकालीन महाराष्ट्रीयांनी सोडलं नाही!
महाराष्ट्राचे प्रभारी कला संचालक श्री राजीव मिश्रा यांनी बहुसंख्य वृत्तपत्रांना आणि वाहिन्यांना मुलाखती देण्याची आपली हौस यानिमित्तानं भागवून घेतल्याचे स्पष्ट दिसते. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांवर ‘चिन्ह’ने आतापर्यंत अतिशय सडेतोड अशी टीका केली आहे. त्यांनी जे जे चुकीचे निर्णय घेतले त्यावरही ‘चिन्ह’ने टीकेचे आसूड ओढले आहेत. पण त्यावेळी कधी ते उत्तर देण्याच्या भानगडीत पडल्याचं आठवत नाही. आणि आता मात्र दे दणादण माध्यमांना मुलाखती देत सुटले आहेत. याचा अर्थ उघड आहे की त्यांना तसं ‘वरून’ सांगितलं गेलं असणार.
या मुलाखतीतली त्यांची भाषा अत्यंत हास्यास्पद आहे. जी उत्तरं त्यांनी दिली आहेत, ती पटणारी नाहीत. काय तर म्हणे आम्ही सहा फुटाच्या मॉडेलला मान्यता दिली होती, नंतर आम्हाला त्याविषयी काहीही सांगितलं गेलं नाही. एखाद्या अधिकाऱ्याने असं उत्तर देणं योग्य आहे का ? ज्या पुतळ्याच्या घडवणुकीमध्ये राज्य सरकारचा सहभाग आहे, इतकंच नाही तर त्यात नेव्हीदेखील सहभागी आहे, असं असताना अशा प्रकारचं उत्तर अतिशय बेफिकीरीनं देताना एखादा अधिकारी दिसतो त्यावरूनच कोणे एके काळी देशात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनाची काय भयंकर अवस्था झाली आहे याची पूर्ण कल्पना येते.
ज्या पुतळ्याच्या उदघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार आहेत, नुसते येणार नाहीयेत तर पुतळ्याचं अनावरण करून नेव्हीतर्फे जी प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत त्याची पाहणीही ते करणार आहेत, ही गोष्ट राजीव मिश्रांना ठाऊक नव्हती ? त्यांना कुणी सांगितली नाही ? यात त्यांची काहीही जबाबदारी नाही ? पुतळ्याची पाहणी करायला जे तज्ज्ञ म्हणून गेले होते ते कोण होते ? तर जेजेचे अधिष्ठाता साबळे आणि त्यांच्या शिल्पकला विभागातला एक हंगामी शिक्षक. ( हंगामी शिक्षकाला कुठला अधिकार असतो ? त्याचं नाव तरी घेतलं जातं का ? त्याचा परिचय तरी करून दिला जातो का ? पुतळ्यासंदर्भात त्याला कुठलीतरी माहिती दिली जाते का ? ज्याचं शिल्प त्याला पाहायचंय त्याचे फोन नंबर तरी त्याला शेयर केले जातात का ?) साबळेंचा आणि शिल्पकलेचा काय संबंध ? निसर्गचित्र काढण्यात त्यांनी आतापर्यंतचा आपला वेळ व्यतीत केला आहे त्यांना महाराष्ट्रातल्या शिल्पांना मंजुरी देण्याचे अधिकार दिले तरी कुणी ? शिल्पांना मंजुरी देत ते गावगन्ना फिरत असतात ते कुठल्या अधिकारात ? फेसबुकला जी मागची पोस्ट टाकली होती त्या पोस्टवर चिपळूणच्या एक कलावंतानं लिहिलं आहे की, मालवणमध्ये जो समारंभ झाला त्याच्या दोन दिवस आधी कला संचालनालयाचे दोन प्रतिनिधी चिपळूणमध्ये होते. कशासाठी गेले होते ते ? शासकीय काम होतं ? हे प्रतिनिधी म्हणजे जेजेमधलेच दोन हंगामी शिक्षक असणार. विद्यार्थ्यांना टाकून ते तिथे गेले तरी कसे ? रजा मांडली आहे त्यांची तिथं मस्टरवर ? का वर्षानुवर्षे दांड्या मारून सरकारकडून दर महिन्याचा पगार घेतला जातो तसंच याबाबतीत घडलंय ? आतातरी याची दखल उच्च व तंत्रशिक्षण सचिव घेणार आहेत का ?
*
हा पुतळा किती फुटाचा होणार आहे ? त्याची आखणी कशी होणार आहे ? त्याची बांधणी कशी होणार आहे ? त्याचं कास्टिंग कसं होणार आहे ? हे सर्व विचारणं कला संचालकांचं कर्तव्य नव्हतं ? हे सर्व त्यांनी विचारणं अतिशय आवश्यक होतं. इतकंच नाही तर वेळोवेळी पुतळा जिथं घडवला जात होता त्या जागेला भेट देऊन कामाची पाहणी करणं आवश्यक होतं. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या अर्ध्या दिवसाच्या संचालनाचे फ्लोट्स तयार होत असताना महाराष्ट्राचे कलासंचालक तिथं आठवडा-आठवडा ठिय्या मारून बसत असत, तर ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, ज्या समारंभाला नेव्हीचे सर्व मोठे अधिकारी येणार आहेत, महाराष्ट्र मंत्रिमंडळ तिथं उपस्थित राहणार आहे, तर त्या पुतळ्याची योग्य ती चौकशी करणं, पाहणी करणं हे कला संचालनालयाचं, पर्यायानं त्या समिती सदस्यांचं ( पर्यायानं साबळे यांचं ) आणि कला संचालकांचं ( पर्यायानं राजीव मिश्रा यांचं ) काम नव्हतं ? अत्यंत निर्लज्जपणे मिश्रा वाहिन्यांना उत्तरं देत आहेत की ‘आम्हाला यांनी काही सांगितलं नाही !’ आणि महाराष्ट्र सरकारमधला एकही मंत्री किंवा अधिकारी त्यांना त्याबद्दल जाब विचारत नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनाची अवस्था किती भयानक झाली आहे हे या एकाच उदाहरणावरून दिसतं.
प्रत्येक अधिकारी या प्रकरणात लपवाछपवी करतोय. बहुसंख्य जबाबदार अधिकारी तर मूग गिळून गप्प बसलेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तर हे सारं काम नेव्हीच्या अधिकाऱ्यांवर ढकलून दिलं आहे. कलेच्या आणि कलावंतांच्या विकासासाठी स्थापन झालेलं कलासंचालनालय मात्र यासाठी कलावंतालाच जबाबदार धरतंय. आहे की नाही गंमत ? महाराष्ट्रात एवढे मातब्बर शिल्पकार उपलब्ध असताना एका नवख्या शिल्पकाराकडे इतकं मोठं काम सोपवायचा निर्णय घेतला कुणी ? याची आधी चौकशी व्हायला पाहिजे. तरंच नंतरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळू शकतील.
चाळीशी देखील न ओलांडलेल्या शिल्पकारावर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा आरोप घालणं हे मेंदू जागेवर नसल्याचं लक्षण आहे. ज्या कुणा अधिकाऱ्याच्या किंवा राज्यकर्त्याच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली त्यांना मालवणच्या समुद्रात लॉन्चवर उलटं टांगून राजकोट किल्ल्यासमोरच्या खडकाळ जागेतून फरफटवलं पाहिजे ! अरे त्या मुलाचा चेहरा तरी तुम्ही कधी पाहिला आहेत का ? त्यानं आयुष्यात कधी मुंगी देखील मारली नसेल. त्याच्यावर तुम्ही मनुष्यवधाचा आरोप लावता ? एवढी तुम्ही आपली अक्कल भ्रष्टाचाऱ्यांकडे गहाण टाकली आहे ? या प्रश्नांची उत्तरं आज ना उद्या तुम्हाला द्यावीच लागतील.
मला नाही वाटत तो तरुण शिल्पकार कुणाकडे काम मागायला गेला असेल. त्याला या कामाची व्याप्ती निश्चितपणे ठाऊक असणार. तो नक्कीच अशी हिंमत करू शकणार नाही. अतिशय संवेदनशील कलावंत आहे तो. त्याचे दोन लेख आम्ही ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले होते. असलं वेडं धाडस तो कधीच करणार नाही. केलं असतं तर त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला बाहेर काढलं पाहिजे होतं. माझी खात्री आहे त्याच्याकडे राजकारण्यांपैकी कुणीतरी प्रस्ताव घेऊन गेलं असणार. ‘आम्ही आहोत पाठीशी ! काय काळजी करतोस तू ?’ असं सांगून त्याला भरीला पाडलं असणार. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना स्वतःच्या कर्तृत्वाविषयी पूर्णपणे खात्री आहे की आपण कुणालाही मॅनेज करू शकतो आणि त्यातूनच त्याला काम करावयास भाग पाडलं असणार. या भयंकर घटनेनं त्या गुणी कलावंताचं करियरच या लोकांनी बरबाद करून टाकलं आहे. यातून तो कितपत उठेल याविषयी माझ्या मनात शंका आहे. आतापर्यंत तो जिवंत राहिला हेच आपलं नशीब आहे !
निष्पक्ष चौकशी जर झाली ( ती कितपत होईल यावर मला खरोखरच दाट शंका आहे ) तर सर्व खऱ्या गोष्टी बाहेर येतील आणि यात नेमकं कुणी शेण खाल्लं आहे ते लक्षात येईल. महाराष्ट्र तर त्यांनी बुडवलाच आहे, पण आता शिवाजी महाराजांना देखील या समकालीन महाराष्ट्रीयांनी सोडलं नाही अशी काळी नोंद इतिहासात राहून जाईल ! ही सर्वात भयंकर गोष्ट आहे.
ता.क. : या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट देखील झालं आहे. जोपर्यंत खरी गोष्ट बाहेर येत नाही तोपर्यंत यावर लिहायचं असा संकल्प सोडला आहे. काही वाचकांना या लेखात पुनरुक्ती होते आहे असं वाटेल, काहींना मी अतिशय अतिशयोक्ती करतो आहे असेही वाटेल. पण कुणाला काय वाटतं याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. मला आतून कुठंतरी वाटतं लिहावंसं म्हणून मी लिहितो आहे. हजारो, लाखो लोकं या पोस्ट वाचताहेत, फेसबुकच तशी नोंद करून ठेवतं आहे. त्यामुळे मला वाटतं आहे तोपर्यंत मी लिहीतच राहणार आहे.
आणखीन एक कारण म्हणजे मी मूळचा जेजे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाच्या निसर्गरम्य परिसरात मी आयुष्यातले मंतरलेले दिवस घालवले आहेत. त्यातच माझं गाव मालवण हे आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधताना महाराजांनी ज्या बारा वाड्या वसवल्या त्यातल्या एका वाडीत आमचं आजही घर आणि मालमत्ता आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे भारतीय आरमार स्थापन केलं त्या आरमारात आमचे पूर्वज आघाडीवर होते. लढाया, युद्ध यामध्ये जे काही भोगावं लागतं ते सारं आमच्या पूर्वजांनी आयुष्यभर भोगलं आहे. म्हणूनच हे जे काही दिसतंय त्याविषयी सातत्यानं व्यक्त व्हावंसं वाटतंय. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता लिहावंस वाटतंय आणि मी देखील आणखीन काही काळ ते लिहिणारच आहे !
सतीश नाईक
sateesh.naik55@gmail.com
‘चिन्ह’च्या वेबसाईटवरील जयदीप आपटे यांचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Related
Please login to join discussion