No products in the cart.
अजिंठ्याचे सात खंडी संशोधन एका खंडात !
‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमात एक निमंत्रित कलाकार होते. नाशिकचे प्रख्यात छायाचित्रकार प्रसाद पवार. त्यांनी झपाटून जाऊन फक्त आणि फक्त अजिंठयाचंच छायाचित्रण केलं आहे. त्यांच्या बरोबरच्या गप्पांमध्ये आत्यंतिक कुतूहलानं अजिंठ्याच्या निर्मिती काळाविषयी काही प्रश्न आम्ही विचारले होते. पण प्रसाद पवार त्या विषयी सुस्पष्ट असं उत्तरं देऊ शकले नव्हते, कारण पुरातत्व किंवा इतिहास संशोधन हा काही त्यांच्या अभ्यासाचा विषय नाही. पण गप्पांनंतर दोन दिवसांनी त्यावर टीका करणारी शुभा खांडेकर यांची एक पोस्ट फेसबुकवर प्रसारित झाली. त्यावर आम्ही प्रसाद पवार यांची बाजू मांडणारी पोस्ट लिहिली. जिचं शुभा खांडेकर यांनी मनमोकळं स्वागत केलं. त्याच वेळी शुभा खांडेकर यांना ‘गच्चीवरील गप्पां’चं निमंत्रण दिलं होतं. तोच कार्यक्रम येत्या १६ एप्रिल २०२२ रोजी ‘चिन्ह’च्या यु ट्युब चॅनलवर होणार आहे त्या निमित्तानं डॉ. वॉल्टर स्पिंक आणि शुभा खांडेकर यांचा अल्प परिचय.
अमेरिकेतून एक गृहस्थ वर्षातून दोन वेळा केवळ अजिंठ्याची लेणी पाहायला भारतात येत. तेही थोडी थोडकी नाहीत तर तब्बल ६६ वर्ष. १९५२ साली पहिल्यांदा ते भारतात आले. अजिंठ्याची लेणी पाहिली आणि भारावूनच गेले आणि त्यानंतर ते सतत भारतात येतच राहिले.
अलीकडेच म्हणजे २०१९ सालच्या २३ नोव्हेंबरला वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्याच्या जवळ जवळ आदल्या वर्षापर्यंत ते अजिंठ्याला येत होते. काय करत होते अजिंठ्याला येऊन ते ? स्वतःचं संशोधन तर ते करीतच होते आणि त्या संशोधनाचं सार आपल्या लेखनातून मांडत होते. आपल्या ६६ वर्षाच्या अथक संशोधनातून त्यांनी सात जाडजूड ग्रंथ लिहिले. अजिंठ्याच्या परिसरातच अनेक कार्यशाळा किंवा सेमिनार्स घेतले आणि असंख्य विद्यार्थी तयार केले. इतकंच नाही तर अनेक व्हिडीओ फिल्म्स त्यांनी तयार केल्या. दोनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले. प्राचीन भारताच्या कला इतिहासावर तर त्यांनी प्रचंड लिखाण केलं.
त्यांचं नाव डॉ. वॉल्टर स्पिंक. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात भारतीय कला इतिहास शिकवणाऱ्या स्पिंक यांनी अजिंठ्याला आपली कर्मभूमी मानलं. स्पिंक यांनी आपल्या संशोधनावरील लेखनातून ठाम पुराव्यानिशी अजिंठा लेण्यांचा निर्मिती काळ निश्चित केला. ही लेणी तयार करावयास दोनशे वर्ष लागली असा आधीचा जो समज होता तो त्यांनी सबळ पुराव्यानिशी खोडून काढला आणि केवळ २० वर्षातच एवढं अजस्त्र काम झालं असल्याचे निष्कर्ष जगासमोर पहिल्यांदा मांडले. त्यांच्या या निष्कर्षानी पुरातत्वाच्या जगात खळबळ माजली.
हे निष्कर्ष एवढे सूक्ष्मातिसूक्ष्म पुराव्यांवर आधारित होते की कुणाही संशोधकांना ते खोडून काढता आले नाहीत. अजिंठयाची निर्मिती ही राजकीय प्रेरणेतून झाली हे त्यांचं मत देखील कुणालाही खोडून काढता आलं नाही. पाचव्या शतकात वाकाटक राजवंशाच्या सम्राट हरिषेणाच्या सतरा वर्षाच्या कारकिर्दीत अजिंठ्याची निर्मिती झाली. हे सिद्ध करून स्पिंक यांनी ‘गुप्त’ काळात भरभराटीला आलेल्या सुवर्णयुगाची सांगता या महाराष्ट्र देशी ‘वाकाटक’ राजवंशाच्या सम्राट हरिषेण याच्या अवघ्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत झाली, असं प्रतिपादन केलं.
याच दोन दशकांच्या कालखंडात कला संस्कृती संवर्धनाचं मोठं कार्य झालं आणि विलक्षण नाट्यमय राजकीय घडामोडींनी सुवर्ण युगाचा शेवट देखील झाला. ज्याच्या कारकिर्दीत हे सारं झालं त्या सम्राट हरिषेण यांच्या कर्तृत्वावर नंतरच्या भारतीय इतिहासकारांनी दुर्लक्ष करून खूप मोठा अन्याय केला हे देखील त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं.
हे सारं वाचताना आपण काहीतरी वेगळं वाचतोय असं तुम्हाला वाटतंय ना ? हो आहेच हे सारं वेगळं ! आणि हे सारं लिहिलं आहे पत्रकार शुभा खांडेकर यांनी. त्यांनीच विविध नियतकालिकं तसेच संकेतस्थळांवर लिहिलेल्या लेखातील मजकुराचं हे संकलन आहे. त्यांच्या मूळ लेखाच्या लिंक्स लेखाअखेरीस दिल्या आहेत.
शुभा खांडेकर या मुळच्या दिल्लीच्या. तिथंच त्यांनी आर्कियॉलॉजीमध्ये एमए केलं. नंतर त्या पुण्याला आल्या. डेक्कनमध्ये काही काळ संशोधन केलं. लिखाणाची आवड असल्यामुळं त्या इंग्रजी पत्रकारितेत शिरल्या. नागपूरच्या हितवाद दैनिकांतून त्यांनी आपली पत्रकारिता सुरु केली. कालांतरानं म्हणजे १९८४ साली त्या मुंबईच्या ‘फ्री प्रेस जर्नल’ वृत्तपत्रात रुजू झाल्या. त्यानंतर तब्बल १२ वर्ष त्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्रात काम केलं. ‘अमर चित्रकथे’साठी देखील अनेक स्क्रिप्ट लिहिली. मुख्य म्हणजे आर्कियॉलॉजी संदर्भात त्यांनी ‘आर्कियोगिरी’ या शीर्षकाचं एक इंग्रजी पुस्तक लिहिलं आहे. लेखिकेची फारशी ओळख नसतांना देखील कोणतेही आढेवेढे न घेता डॉ. वॉल्टर स्पिंक यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली.
डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या सन्मानार्थ मुंबई विद्यापीठानं एक परिषद आयोजित केली होती आणि त्यावेळी शुभा खांडेकर या मुक्त पत्रकार म्हणून काम करत होत्या. त्याचं रिपोर्टींग करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तीच स्पिंक यांच्या कार्याची झालेली त्यांची पहिली ओळख ठरली. त्यांच्या बोलण्यानं, लिखाणानं आणि व्यक्तिमत्वानं त्या अक्षरशः भारावून गेल्या. डॉ. स्पिंक यांच्या अजिंठ्याच्या एका साईट सेमिनारला देखील त्या गेल्या. आणि नंतर स्पिंक यांच्याविषयी त्या वाचतच गेल्या. याच प्रवासात त्यांच्या हाती स्पिंक यांनी लिहिलेले सात खंड आले. ते वाचल्यावर त्यांना असं वाटलं की हे महत्वाचं संशोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवं. ते करण्यासाठी या सात खंडांचा मिळून एकच संक्षिप्त खंड केला तर ? ही कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ती डॉ. स्पिंक यांना सांगितली. पण हे काम त्यांना झेपेल का? याचा अंदाज अल्प परिचयात डॉ. स्पिंक यांना येऊ शकत नव्हता, म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घ्यायला त्यांना थोडा वेळ लागला. दरम्यान दोघांचा मेलवरून संपर्क प्रस्थापित झाला होता.
त्या सुमारासच ‘वन इंडिया वन पीपल’साठी शुभा खांडेकर यांनी डॉ. स्पिंक यांच्यावर एक लेख लिहिला. तो डॉ. स्पिंक यांच्या वाचनात आल्यावर मात्र त्यांची खात्री पटली व शुभा खांडेकर यांना त्यांनी हे अवाढव्य काम हाती घेण्याची परवानगी दिली. आणि मग त्यांच्याशी ईमेलद्वारे रोजच संवाद होऊ लागला. पुस्तकाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मात्र डॉ. स्पिंक हे काही भारतात आले नाहीत. वयोमानपरत्वे त्यांना तो प्रवास झेपेनासा झाला होता.तोपर्यंत शुभा खांडेकर यांनी पुस्तकाचं काम सुरु केलं होतं. दररोज त्या आपण केलेल्या कामाचा मसुदा डॉ. स्पिंक यांना पाठवत. त्यावर साधक बाधक चर्चा ते मेलद्वारेच करत. काही सुधारणा असतील, दुरुस्त्या असतील तर त्या मेलद्वारेच करत. या वयातही त्यांना दररोज जवळ जवळ साठ ईमेलना उत्तरं द्यावी लागत आणि ते ती देत. दररोज आवर्जून ते शुभा खांडेकर यांच्या मेलला उत्तर देत.
डॉ. स्पिंक यांच्या सात खंडांवर आधारित एका खंडाचं काम अजून सुरूच आहे. अजिंठ्याचं काम हे अत्यंत क्लिष्ट आहे. पण डॉ. स्पिंक यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पद्धतीने ते सोपं केलेलं आहे. त्यांनी सात खंडामध्ये जे विस्तारानं मांडलं आहे तेच आता शुभा खांडेकर अजिंठ्याच्या चाहत्यांसाठी संकलित स्वरूपात एकाच खंडांत मांडणार आहेत.
हे सारं वाचल्यानंतर डॉ. स्पिंक यांनी आपल्या ६६ वर्षाच्या संशोधनात जे काही अनुभवलं, मांडलं आणि हे मांडताना त्यांना ज्या काही प्रतिकूल प्रसंगांना, अडचणींना तोंड द्यावं लागलं असेल त्या साऱ्याची आपणास कल्पना येते. हे सर्व सात खंडात्मक काम आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना उपलब्ध होणं आणि ते वाचता येणं केवळ अवघड आहे. पण शुभा खांडेकर यांच्या या अनोख्या कार्यामुळे आपणास ते लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या कार्याचा परिचय व्हावा याच हेतूनं ‘चिन्ह’नं त्यांना ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे. येत्या शनिवारी म्हणजे १६ एप्रिल रोजी सायं ०५.३० वाजता हा कार्यक्रम ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर लाईव्ह स्वरूपात आपणास पाहता येईल.
सतीश नाईक
संपादक
Chinha Art News
Related
Please login to join discussion