Features

शुभलक्ष्मी शुक्ला: एक स्वप्नवत कलाप्रवासी!

१४ ऑक्टोबर रोजी कला अभ्यासक, क्युरेटर शुभलक्ष्मी शुक्ला यांचे निधन झाले. तरुण वयातच त्यांनी कला इतिहास आणि विशेषतः संयोजक म्हणून आपला ठसा उमटवला होता. स्वभावाने अतिशय शांत आणि लाघवी असलेल्या शुभा आपले कलेविषयीचे मत मात्र अत्यंत ठामपणे मांडत असत. त्यांचे सहाध्यायी असलेले कला अभ्यासक निखिल पुरोहित यांनी या लेखातून शुभलक्ष्मी शुक्ला वाहिलेली श्रद्धांजली.

findsubu@**** तिचा हा  ई-मेल चा पत्ताच तिच्या शोधवृत्तीची ओळख करून देतो. शुभलक्ष्मी शुक्ला(शुभा)  दि: १४ ऑक्टोबर २०२२  रोजी सकाळी विरार येथील तिच्या निवासस्थानी निधन झाले. भारतीय कलाक्षेत्रात या बातमीने शोककळा पसरली. शुभाचा व्यक्तिमत्वच वस्तुतः लाघवी आणि प्रेमळ, मितभाषी, संवेदनशील, आणि काहीसं हळवं. पण थेट व स्पष्ट भूमिका घेणारं – आपल्या मतांवर टिकून राहणारं. एखाद्याला आवडावं किंवा कलाक्षेत्रातील आपलं स्थान आणि संलग्न आर्थिक व्यवहार बलिष्ठ व्हावा म्हणून तिनं आपले विचार कधीही वळवले नाहीत. आपल्या मूल्यांशी आणि वैचारिक धोरणाशी एकनिष्ठ राहून कलाविश्वातील वरिष्ठ आणि नवोदित अशा अनेकांच्या मनात तिनं आपली  स्वतंत्र जागा सहज व्यवहारानं  मिळवली. अशा व्यक्तीची भूमिका आणि त्यातून निर्माण झालेले योगदानाचा लेखाजोखा थोडक्यात घेणं तसं  कठीणच काम असलं तरी काही नेमक्या संदर्भातून ते कळण्यास कदाचित सोयीचं होऊ शकेल. 

शुभलक्ष्मी (शुभा) मूळ बिलासपूर, मध्य प्रदेश मधील एका सुविद्य मध्यमवर्गीय कुटुंबातुन आलेली.  तिनं  चित्रकलेचं  शिक्षण शांतिनिकेतनच्या कलाभवनात पूर्ण केलं (१९९३). पुढं  (१९९७) कला इतिहासात महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा इथं पदव्युत्तर शिक्षण घेऊन कालांतराने ती मुंबईत स्थायिक झाली. एक संवेदनशील आणि विचारवंत कला अभ्यासक, क्युरेटर (गुंफणकार), कलासमीक्षक, कला-अध्यापक म्हणून ती साऱ्यांना परिचित होती. काहीशा बंडखोर आणि अपारंपरिक वृत्तीमुळे जे स्वतःला प्रस्थापित करण्यास गरजेचं असलेलं व्यवहार चातुर्य तिच्यात नव्हतं.  हे अगदी जगजाहीर होतं. त्याबरोबर पिंडानं  कलाकार असल्याने कला निर्मिती आणि कलेतील व्यवहारांकडे तिची दृष्टी ग्रांथिक (सामाज शास्त्रीय), अध्यात्मिक आणि स्वानुभवावर आधारित होती.   

शुभलक्ष्मी शुक्ला लिखित ‘Imagined Locals’ हे पुस्तक.

अलीकडच्या काही वर्षांत तिच्यातील क्यूरेटरने प्रस्थापितच नाही तर अप्रस्थापित आणि नवोदित अशा विविध कलाकारांचा संदर्भानुसार सहभाग मिळवला  होता. सध्या चलनात असलेल्या रॅप संस्कृतीतील प्रादेशिक (मराठी – रॅप) नमुने देखील Text as Text II या प्रदर्शनात व्यक्त झाले. सामाजिक जीवनातील मुख्य प्रवाहात उपेक्षित अशा अनेक विषयांबद्दल, उदा: मुंबई शहरातील बहुसंख्य जीवन आणि त्यांचे संघर्ष, लैंगीकता आणि शरीर भान, कृषी-अन्न, दारिद्र्य, सामाजिक भेद-भाव ई, कलाकार आपल्या निर्मिती प्रक्रियेतून  व्यक्त झाले. दृश्य आणि शब्द यांच्यातील साम्य-भेद, आणि संयोगातून निर्माण होणारे अर्थ-छटा शुभा लिलया गुंफत गेली. 

शुभा तशी स्वप्नाळू वृत्तीची होती! ती बोलता बोलता एखाद्या विचारात इतकी गुंगून जाई की अनेकदा वास्तवाचं भान हरपून जात असे. पण हे होताना तिचं मन भरलं की बरोबर फिरून वास्तवात सुरु असेलेल्या मुद्द्याकडे आपसूक पोहोचत असे. पण स्वभान न हरवता ती मुग्ध चर्चेत बोलत असे आणि तितक्याच गांभीर्याने समोर असलेल्या व्यक्तीचं  विश्लेषण ऐकत असे. कधी एखाद्याला ती आपले तीव्र मत ताडकन बोलून दाखवत असे  तर त्याविषयी  चूक जाणवल्यास तितक्याच विनम्रतेने माफी मागत असे. या अशा स्वच्छ वृत्ती मुळेच विद्यार्थी, कलाकार समूहांमध्ये तिची उपस्थिती हवीहवीशी वाटत असे. कारण वक्तव्य कुण्या निहित हेतूने ती करत नसे. तिच्या बोलण्यात एक स्थैर्य होतं, जणू एक प्रकारचं संथपणा जे तिच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीला शांततेने आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया देण्यास आपोआपच प्रवृत्त करत.  

राष्ट्रीय पातळीवर महत्वपूर्ण अशा विविध ठिकाणी तिचे लेखन प्रसिद्ध झाले ज्यात ठळक नमूद करता येईल असा एक लेख नसरीन मोहमदी आणि अनिता दुबे यांच्या विषयी Body and Transcendence शीर्षकाचा आहे. हा लेख डॉ. रतन परिमू यांच्या सन्मानार्थ प्रकाशित Towards New Art History: Studies in Indian Art, २००२ या ग्रंथाचा भाग आहे. २०१५ मध्ये तिनं विविध कलाकारांच्या मुलाखती आणि विवेचन यांवर आधारित एक ग्रंथ Imagined Locales प्रकाशित केला. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर गिव्ह पटेल यांचे एक चित्र आहे. 

शुभा विषयी बोलताना तिचे एकेकाळचे विद्यार्थी आणि नंतर सहाध्यापक स्थपती अनुज डागा म्हणतात “शुभलक्ष्मी जरी उपेक्षित समाज आणि त्यांच्या जगण्यातल्या गोष्टीबद्दल संवेदनशील होती तरी तिची भूमिका मार्क्सवादी नव्हती. असं तिनेच एकदा म्हणून दाखवलं होतं आणि तिच्या Imagined Locales पुस्तकातून हे स्पष्ट होण्यास मदत देखील होते”. 

‘Body as  text’ प्रदर्शनात शुभलक्ष्मी शुक्ला.

शुभाने लिहिलेले प्रदर्शन समीक्षा, कला विश्लेषण, भारतातील प्रमुख इंग्रजी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.  २ ऑक्टोबर रोजी जॉली आर्ट अड्डा येथे तिने गुंफलेले Photograph as Text I या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ती आलेल्या सर्वांशी चर्चा करताना ‘विचारातील’ वैविध्यतेचा नमुना दाखवत तिने एक प्रश्न विचारला, “तुम्हाला जर एक गुलाब दिला तर तुम्ही काय कराल?”  कुणी म्हटलं पुस्तकात जपून ठेवेन, तर कुणी म्हटलं की आनंद घेईन ई. ई. …पण या शुभा मात्र कला प्रवासातील आनंदमयी जाणिवांचा सुगंध पसरवत आपल्यातून निघून गेली!. 

*****

– निखिल पुरोहित 

चित्रकार, कला संशोधक 

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.