No products in the cart.
नग्नता : बदलतोय तर समाज (भाग २)
नग्न बाई किंवा पुरुष पाहणं यात फिनलंडमध्ये काही विशेष मानलं जात नाही. फिनलंडसारख्या अतिथंडीच्या प्रदेशात फार कमी वेळा लोक कमी कपड्यात वावरू शकतात. त्याचबरोबर फिनलंडमध्ये सौना बाथ ही थंडीपासून बचाव करण्याची अभिनव कल्पना, त्याबद्दल लेखिकेला आलेले अनुभव तसेच फिनलंडमधील मोकळ्याढाकळ्या समाजाबद्दल जाणून घेऊया ‘नग्नता : बदलतोय तर समाज’ या लेखाच्या दुसऱ्या भागात.
पहिल्या वेळेला मी फिनलंडला गेले ते जूनमधे. त्यांचा उन्हाळा चालू होता. हेलसिंकीच्या मोठ्या चौकात कंडोमचं मोठ्ठं पोस्टर लागलं होतं. कसली एवढी मोठी जाहिरात म्हणून मी तिकडे पाहिलं आणि लगेच मान दुसरीकडे वळवली. मी तिकडे पाहताना कुणी पाहिलं तर नाही ना आपल्याकडे असा विचार मनात येवून मी शरमले. काय पहात होते मी आणि त्याची एवढी मोठी जाहिरात? काय हे !
मग त्या भेटीतच आणखीही गोष्टी कळत गेल्या. मनातल्या मनात माझा ‘आ’ जास्तच मोठा होत गेला. हेलसिंकीतून खूप ठिकाणी समुद्र दिसत होता. लोक त्यात पोहताना दिसत होते. त्यातच त्यांचे कपडे किना-यावर ठेवलेले दिसत होते. माझ्या जिज्ञासू वृत्तीने प्रश्न केल्यावर कळलं की इतर सगळ्या काळात एवढी थंडी असते की कपडे काढणं त्या काळात शक्यच नसतं. त्यामुळे या हंगामात जमेल तेव्हा कपडे काढून समुद्र स्नानाचा आनंद घेतला जातो. शिवाय नग्न बाई वा पुरूष पाहाणं हे आपल्याकडच्यासारखं विशेष नाहीच. अगदी बालपणापासूनच ही सगळी मंडळी एकत्र सौनाला जातच असतात – सगळं कुटुंब एकत्र वा खूपशा बायका वा पुरूष एकत्र . त्यामुळे कपडे अंगावर नसणं यात अप्रूप काहीच नाही.
त्याच भेटीत मला याना भेटली. एका मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पदावर होती ती. आमची चांगली ओळख झाली. त्यामुळे एका रविवारी ती मला फिरायला घेवून गेली. ती युनिव्हर्सिटीत मला घ्यायला आली तेव्हा तिच्याबरोबर तिचा नवराही होता. हेलसिंकीच्या बाहेर पडल्यावर तिने तिची मोटार थांबवली आणि मागचं दार उघडत मला म्हणाली, ” आता तू पुढे बस.”
“ का ग? “ मी विचारलं.
“त्यामुळे तुला आजूबाजूचं सगळं खूप छान दिसेल. मागून एवढं नीट दिसत नाही ना ! उतर चल. “
माझ्यासाठी हे खूप मोठं आश्चर्य होतं. खरंच चांगलं दिसत होतं. तिचा मोकळा स्वभाव त्यातून दिसला. नंतर एकदा तिच्याच ऑफिसमधे ती एक नवीन फ्रॉक घालून आली, तेव्हा मी तिला त्याबद्द्ल चार बायकी प्रश्न विचारले. कुठे घेतलास वगैरे. तर ती लगेच उठून उभी राहिली आणि स्वत:भोवती गिरकी घेत म्हणाली, “छान आहे ना? मलाही फार आवडला म्हणून घेतला मी खास समरसाठी …………” ती उत्साहाने बोलत होती आणि मला मात्र तिच्याकडे बघताना जरा ऑकवर्ड होत होतं. तिथे असलेल्या बाकी दोघी बायका मात्र तिच्याकडे बघत होत्या आणि फ्रॉकचं कौतुक करत होत्या. झालं असं होतं की तिचा तो फ्रॉक जरा झिरझिरीत होता आणि त्यातून तिची अंतर्वस्त्र स्पष्टपणे दिसत होती. मला तसं बघायची सवय नव्हती. आपली दृष्टी प्रदूषित झालेली असते ना !
मला सौना समजायला पुढची भेट घडण्याची वेळ यावी लागली. कारण आधीच्या भेटीचा हंगाम हा समुद्र स्नानाचा होता. सौनाचा हंगाम थंडीच्या दिवसात असतो. अगदी हाडांपर्यंत पोचलेली थंडी कमी करण्याचा हा एकच उपाय आहे, हे तिथे जाऊन पटतं. त्या सौनाचा परीणाम एवढा असतो की सौना घेतलेली बाई षोडशा दिसू लागते, असा फिनीश लोकांचा विश्वास आहे. एवढं नक्की की हाडांपर्यंत बोचणारी आणि अगदी सहन न होणारी थंडी सौना घेतल्यावर जराशी कमी होते. निदान काही दिवसांपुरती तरी. आपण ज्या कौतुकाने सगळं घर दाखवतो त्यापेक्षा काकणभर जास्त कौतुकाने फिनीश माणूस त्याच्या घरातली सौना – रूम दाखवतो. अनेकदा यात बर्च वा आस्पेन वृक्षाचं लाकूड वापरलेलं असतं.
तिथे पोचल्यावर दोन दिवसातच झालेली माझी अवस्था पाहून माझी मैत्रिण लेना मला म्हणाली , “थंडी आहे ना खूप? चल आपण सौनाला जाऊ या.” मी सौनाबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणून सावधपणे विचारलं, “कोण कोण जाऊ या?” तिच्या उत्तरावरून आम्ही दोघीच हे कळल्यावर बरं वाटलं. मग ती मला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि एक टॉवेल माझ्या हातात ठेवत म्हणाली, ’चल. हा घे टॉवेल आणि कपडे काढून इकडेच ठेव.’ असं म्हणत तिने स्वत:चे कपडे काढले आणि मी फक्त तिच्याकडे न बघता बाजूला पहात राहिले. चार वेळा तर भेटलो होतो आम्ही. तेवढ्यात हिला एवढा मोकळेपणा आला !! मी जरा चाचरतच तिला विचारलं, “सगळे काढायला हवेत का?”
“म्हणजे? “ तिला बहुधा माझ्या प्रश्नाचा अर्थच कळला नव्हता.
“ मला ना सवय नाहीये असे सगळे कपडे काढायची. मी टॉवेल गुंडाळला तर ….”
जरा विचार करत ती म्हणाली , ‘बरं.चल.’ मग तिनेही टॉवेल गुंडाळला.
आम्ही दोघी सौना साठीच्या त्या लहान लाकडी खोलीत गेलो. तिने आधीच ती गरम करून ठेवली होती. तिथे एका बाकड्यासारखं बनवलेलं होतं त्यावर आम्ही बसलो. उजव्या हाताला कडी नसलेल्या बादलीसारखं काहीतरी होतं आणि त्यात मोठेसे दगड होते. ते सगळं इलेक्ट्रिसिटीवर गरम होत होतं. गरम हवा तिकडूनच येत होती. हळूहळू ती सगळी खोली गरम होत गेली आणि आमच्या गप्पाही रंगत गेल्या. लेना आमच्या मधे असलेल्या बादलीतून डावेने अधूनमधून त्या दगडांवर पाणी टाकत होती. लगेच त्यातून
ब-याच वाफा येत आणि ती जागा आणखी गरम व्हायला मदत होई. तिथलं तापमान 40 सेंटिग्रेडच्या वर गेल्यावर मला ते जरासं जास्त वाटू लागलं. कातडी भाजते आहे असं वाटू लागलं. मग मीच बाहेर पडण्याचं सुचवलं. बाहेर पडल्यावर थोडं बरं वाटलं.
मग तिने पुढे शॉवर घ्यायचा असतो असं सांगितलं. ती मला एकूणच सौनामधे कसं वागायचं ते शिकवत होती. आता शॉवर घ्यायचा तर कसा? कपडे काढणं तर आलंच. मग टॉवेल काढून आम्ही दोन वेगवेगळ्या शॉवरखाली उभ्या राहिलो. नाही म्हणता म्हणता देखील माझं लक्ष तिनं काहीतरी विचारल्यावर तिच्याकडे गेलंच. मी कधिही एवढा गोरापान देह असा पाहिलेला नव्हता. तिचंही लक्ष माझ्याकडे गेलंच असणार की. पाणी गरमच होतं. ती कोणत्या पाण्याने शॉवर घेत होती माहित नाही. परंतु तिने नंतर सांगितल्याप्रमाणे जेव्हा समर कॉटेज मधे सौना घेतात तेव्हा बरेच जण तिथून बाहेर पडून लगेच तळ्याच्या वा समुद्राच्या पाण्यात उडी मारतात. कधी जर बर्फ जमलेला असला पाण्यावर तर त्यात मोठं भोक करून त्यात ऊडी मारतात आणि मग परत सौनात बसतात.
असंच संपूर्ण कुटुंब एकत्र सौनासाठी जमतं. मित्र मित्र एकत्र जातात. शरीर दिसण्याचं वा दाखवण्याचं कौतुक तिथे संपतं. तिथे डॉक्टरकडे गेल्यावरही प्रथम सगळे कपडे काढूनच उभं राहायचं असतं आणि त्यामुळे समोरच्याच्या शरीरात झाले असलेले कोणतेही रोगिट बदल त्याला लगेच लक्षात येतात.
शरीरसंबंधांची पूर्ण मोकळीक असल्याने त्याबद्दल कुठेही वेगळ्या कौतुकाने बोललं जात नाही. तेथील मुख्य रस्त्यावर जेव्हा मी ‘सेक्स टॉइज’ अशा नावाचं दुकान आणि त्याच्या काचेच्या ‘विंडो’ मधून प्रदर्शिलेली टॉईज पाहिली तेव्हा मी हादरलेच. त्यानंतर भुतानला चिमी लाखांग इथल्या गावातही सर्व ठिकाणी खास पुरूषी, प्रदर्शनात मांडल्यासारखे ठेवलेले अवयव पाहून माझं काहीसं तसंच झालं होतं. तिथे एका रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो तिथेही अगदी मध्यभागी मोठ्या आकारातला तो लाकडातून कोरलेला अवयव मांडलेला होता. तिथल्या सोव्हिनियर शॉप्स मधेही लहान मोठ्या आकारातले अवयव विकण्यासाठी मांडून ठेवलेले होते. कोण विकत घेत असेल ? तिथे तर त्याचं देऊळ होतं.
मी अर्थशास्त्र शिकविण्यासाठी फिनलंडला अनेकदा गेले. वेगवेगळ्या वेळी गेले. एक तासाचा दिवस असतानाही गेले. हवामान अती थंड होतं. माझ्या असं लक्षात आलं की सौना घेतल्यावर थंडी लागणं कमी होतं. मग पुढच्याच वेळेस पहिल्या दोन दिवसातच मीच, माझ्या वासा शहरातील मौत्रिणीला, तारयाला म्हटलं, ‘चल तारया. सौनाला जाऊ या का ग?’
क्रमश:
*****
– मंगल गोगटे
लेखिका या अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची अनेक एकल प्रदर्शने झाली आहेत.
मंगल गोगटे यांच्या वेबसाईटची लिंक: http://www.mangalgogte.com/index.html
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion