No products in the cart.
एका ‘रंग’विक्रेत्याची कहाणी !
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दर मंगळवारी भेट देण्याचा एक फायदा म्हणजे कला क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींची भेट होते. अशाच एका मंगळवारी चिन्हचे मुख्य संपादक सतीश नाईक यांनी माझी भेट कॅम्लिनचे माजी मार्केटिंग मॅनेजर श्री चंद्रशेखर ओझा यांच्याशी भेट घडवून दिली. पहिल्याच भेटीत त्यांची कला क्षेत्राबद्दलची तळमळ दिसून आली. ओझा सर खरं तर वाणिज्य शाखेचे विद्यार्थी. कलाक्षेत्राशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. पण नवीन आव्हान स्वीकारायचं म्हणून त्यांनी कॅम्लिनची नोकरी स्वीकारली. कॅम्लिन कंपनीमध्ये ते १९८५ मध्ये रुजू झाले. हल्लीच्या जमान्यात कोणी सहसा एकाच कंपनीत टिकत नाही. संधी मिळताच कर्मचारी मोठ्या पगारासहित लगेच कंपनी बदलतात. पण ओझा यांची कॅम्लिन कंपनीशी नाळ अशी काही जुळली होती की त्यांनी या एकाच कंपनीत तब्बल ३८ वर्षे काम केलं!
कॅम्लिनमध्ये काम करताना त्यांचा कलाक्षेत्राशी अतूट बंध निर्माण झाला. त्यांच्या मनात कलेबद्दल प्रेम निर्माण झालं. या प्रेमातूनच ते आजही निवृत्तीनंतर नियमितपणे कलादालनांना भेटी देतात. नव्या चित्रकारांचं काम पाहतात. कोणता मार्केटिंग क्षेत्रातला मॅनेजर जो भले रंग विकणाऱ्या कंपनीशी संबंधित असो, कलेशी एवढी बांधिलकी दाखवेल? ओझा यांची ही बांधिलकी कलेबद्दलच्या प्रेमातून आलेली आहे.
जहांगीरमधील भेटीत ओझा यांच्याशी तब्बल दीड तास गप्पा झाल्या. या गप्पांमधून त्यांनी अनेक किस्से सांगितले, कॅम्लिन कंपनीची भरभराट कसकशी होत गेली याबदल माहिती दिली. त्यातूनच अशी कल्पना सुचली की त्यांनी त्यांचे अनुभव चिन्ह आर्ट न्यूज मध्ये लिहावेत. ‘अडव्हेंचर्स ऑफ अ सेल्समन इन आर्ट वर्ल्ड ‘ या आगामी लेखमालिकेतून वाचकांना हे अनुभव वाचता येतील.
या माणसाचं कॅम्लिनवरचं प्रेम एवढं आहे की त्यांनी आपलं पहिलं ओळ्खपत्रही अजून जपून ठेवलंय! ८० च्या दशकात कॅम्लिनचा पसारा एवढा वाढला नव्हता. रंगांच्या निर्मितीबाबतीत तरी कॅम्लिन तेव्हा एक स्टार्ट-अपच होतं. या काळात ओझा यांची पहिली नेमणूक जोधपूर येथे झाली. पुढे ते दिल्लीला गेले आणि त्यानंतर मुंबईमध्ये आले. दिल्लीमध्ये असताना दिल्लीतल्या कलाक्षेत्राशी त्यांचा जवळून परिचय झाला. तिथल्या चित्रकारांसाठी त्यांनी अनेक कार्यशाळा आणि कार्यक्रमांचं यशस्वी आयोजन केलं.
दिल्ली आणि मुंबईमधील कलाक्षेत्रातील फरकाबद्दल ओझा यांची विशेष मत आहेत. ती त्यांच्या आगामी लेखमालिकेत वाचकांना वाचायला मिळतीलच. पण विशेष बाब ही आहे की ओझा यांची काम करताना अनेक कलाकारांशी ओळख झाली. त्यांचे भन्नाट किस्सेही या आगामी लेखमालिकेत वाचकांना वाचायला मिळतील.
आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत ओझा यांनी लहान मुलांसाठीही विशेष कला कार्यशाळा आयोजित केल्या. त्यापैकी अनेक कार्य शाळांना त्यांनी मान्यवर पाहुण्यांना आमंत्रित केलं. कला क्षेत्रातही मुलांना पुढे जाऊन यशस्वी करिअर करता येतं, असा विश्वास पालकांच्या मनात यामुळे निर्माण झाला. लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विशेष अभ्यास करून त्यांनी मुलांसाठी कला कार्यशाळा कशा असाव्यात याच दस्तऐवजीकरण केलं. हे त्यांचं एक विशेष महत्त्वाचं काम आहे.
ओझा आपल्या कलेबद्दलच्या बांधिलकीमुळे अनेक वर्ष रंग-निर्मिती करणाऱ्या कंपनीशी बांधील राहिले. कॅम्लिनच्या रजनी दांडेकर वहिनी (कॅम्लिन समूहाच्या मार्केटींग विभागाच्या प्रमुख) यांचे ते उजवा हात समजले जात. कॅम्लिनमध्ये काम करून अनेक कर्मचारी पुढे दुसऱ्या संस्थांमध्ये गेले पण ओझांची कॅम्लिनसोबतची बांधिलकी बघता त्यांना इतर कंपनीने कधी ऑफरचं दिली नाही असं ते प्रामाणिकपणे सांगतात.
रंगांच्या दुनियेत मुशाफिरी करणाऱ्या या ‘सेल्समन’च्या आठवणींच्या रूपातील ही लेखमालिका वाचकांना आवडेल, याची आम्हाला खात्री आहे. खरं तर मार्केटिंग क्षेत्रातल्या लोकांना स्वतःला सेल्समन म्हणून घ्यायला आवडत नाही. पण ओझा स्वतःला सेल्समन म्हणून घेतात! त्यांच्या प्रांजळ व्यक्तिमत्वाचं दर्शनच यातून होतं. असं म्हणतात की टक्कल असलेल्या व्यक्तीला कंगवा विकून दाखवतो तो खरा सेल्समन. पण जिथे रंगांचं अस्तित्व नव्हतं अशा दुर्गम भागातही ओझा सरांनी रंग-विक्री केली. त्यात नवीन प्रयोग केले. लोकांच्या गरजा ओळखून कंपनीला आपल्या उत्पादनात बदलही करायला लावले. त्यामुळे ओझा यांची ही कहाणी वाचली की लक्षात येतं की हा खरा सेल्समन. पण ही सेल्समनशिप फक्त नफा या एकाच उद्देशातून पुढे आलेली नाही तर त्याला कलेबद्दलच्या प्रेमाची, आणि तळमळीची किनार आहे हे निश्चित.
******
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion