No products in the cart.
तू चुकलास विजय!
शुक्रवारी रात्री एक धक्कादायक बातमी मिळाली. विजय सुर्वेचं निधन! विजय आणि मी शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद येथे अप्लाइड आर्टला एकत्र शिकत होतो. विजय सुरुवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये परिचित होता. आपली एमबीबीएसची सीट सोडून तो आर्ट कॉलेजला आलेला. आधी बातमी अशी होती की त्याचं निधन हार्ट अटॅकने झालं, पण नंतर जे कळले ते खूपच शॉकिंग होते. विजयने आत्महत्या केली होती! खरं तर यावर लिहावे की नाही या संभ्रमात मी होते. विषय नाजूक होता, अनेकांना ही एखाद्याच्या मृत्यूवर केलेली अनाठायी चर्चा वाटू शकते. पण विजयने आत्महत्या केली या बातमीने मला खूप अस्वस्थ वाटले. यशाच्या शिखरावर असताना असे काय घडले ज्यामुळे विजयला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला हा विचार मला छळत राहिला. विजयचे आणि माझे अधून मधून बोलणे होत असे. चिन्हच्या यूट्यूब चॅनेलसाठी आम्ही त्याची मुलाखत घ्यायचे ठरवले होते. दोन महिन्यापूर्वी आम्ही बोललो तेव्हा असं काही जाणवलंच नाही की तो अस्वस्थ आहे किंवा त्याला काही त्रास आहे.
खरं तर वर्गातले आम्ही बरेचसे विद्यार्थी गावाकडचे होतो. विजय लोणारचा. पण त्याचा स्मार्टनेस कुठल्याही शहरी विद्यार्थ्याला लाजवेल असा होता. बीएफए करतानाच त्याच एनआयडीलाही सिलेक्शन झालेलं पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बीएफए करण्याचा निर्णय घेतला. पुढे बीएफएनंतर अल्पावधीत नामांकित यु आय / यु एक्स डिझाइनर म्हणून विजय प्रसिद्ध झाला. गेले काही वर्ष तो पुणे येथे सिटी बँकेत मॅनेजर पदावर काम करत त्यांचा मोबाईल ऍप्लिकेशन डिझाईनचा कारभार समर्थपणे सांभाळत होता. त्याचे यश डोळे दिपवणारे होते. आर्थिक स्थितीही उत्तम होती, पण कुठेतरी तो अस्वस्थ असावा,वैयक्तिक आयुष्य कुठेतरी बेसूर झालं होत त्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला?
विजय गरीब घरातून आलेला होता. वडील टेलरचं काम करायचे. तेही भाड्याचं दुकान घेऊन किंवा स्वतःच्या दुकानात नाही तर दुसऱ्याच्या दुकानात. जेव्हा मशीन रिकामं असे तेव्हा ते कपडे शिवत. त्यामुळं नियमित असं उत्पन्न नव्हतं. रोज काम मिळण्याची खात्री नसल्याने घरी अठरा विश्व दारिद्र्य. त्याच्या गरिबीमुळे शाळेत त्याला शिक्षक हिणवत असतं, पण तो जिद्दीने शिकला. घरची गरिबी होती पण शिक्षणाला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता. घरच्या परिस्थितीमुळे पैशाचा प्रश्न होता पण विजयची नवोदय विद्यालयात निवड झाली आणि त्याचा बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला. नवोदय शाळेत त्याला खूप शिकायला मिळाले. केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर जगाच्या शाळेत खंबीरपणे कसे उभे राहायचे हे तो शिकला. प्रत्येक अडचणीला मात देत पुढे येत राहिला.
शाळेत असताना विजयची चित्रकला चांगली होती. कला स्पर्धेत त्याला बक्षिसही मिळायचे. बारावीत त्याने मेडिकलचीही सीईटी दिली होती. अकोल्याच्या मेडिकल कॉलेजला त्याच सिलेक्शनही झालं होत. पण सात वर्षाचं मेडिकल की चार वर्षाचं बीएफए या प्रश्नातून त्याने बीएफए करण्याचा निर्णय घेतला. बीएफएमध्ये तो उत्तम मार्काने पास झाला होता. त्याचे कॉलेजचे प्रोजेक्ट हे इतरांपेक्षा वेगळे असत. बीएफएच्या तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाला आम्हाला एक प्रॉडक्ट निवडून त्यावर जाहिरात प्रकल्प करावा लागत असे. त्यावेळी हॅन्ड वर्कला खूप महत्व होत. मला आठवत चौथ्या वर्षाला विजयने ‘शुगर फ्री’ हे प्रॉडक्ट जाहिरात प्रकल्पासाठी निवडलं होत. फक्त हॅन्ड वर्कला महत्व न देता त्याने कल्पकतेचा वापर करून या प्रोजेक्टसाठी खूप छान जाहिराती बनवल्या होत्या.
कॉलेज संपल्यानंतर विजयचं करिअर खूप उत्तम चाललं होतं. काही वर्षांपूर्वी तो डेकोस या युरोपिअन कंपनीत यूआय/ यूएक्स डिझाइनर म्हणून काम करत होता. तिथं त्याच सिलेक्शन केवळ तो आधी एनआयडीची निवड परीक्षा पास झाला आहे हे पाहून झालेलं. कारण ही प्रतिष्ठित कंपनी फक्त आयआयटी आणि एनआयडी पास आउट मुलांनाच आपले कर्मचारी म्हणून निवडते. तिथे मग या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूटमधून आलेली मुलं त्याला हसायची. अशा परिस्थितीत तो जॉब न सोडता दिवसा काम आणि रात्री सेल्फ स्टडी करत युआय/ युएक्स या कॉलेजमध्ये कधीही न शिकवल्या गेलेल्या विषयात तज्ज्ञ बनला. इथेच न थांबता त्याने आमच्या कॉलेजच्या नव्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्याच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले करिअर सुरु करता आले.
एवढ्या जिद्दीने पुढे आल्यानंतर अशी काय परिस्थिती निर्माण झाली आणि एवढा टोकाचा निर्णय विजयने घेतला हे प्रश्न आता गैरलागू आहेत कारण तो असताना आमच्या वर्गमित्रांपैकी कोणालाच हे समजू शकले नाही की तो अस्वस्थ आहे. त्याला काहीतरी समस्या आहे. कॉलेजमध्ये असताना खरं तर सर्वांचीच आर्थिक स्थिती बेताचीच होती. पण सर्व आनंदी असत. आज वर्गातील प्रत्येक जण सेटल आहे पण बदलत्या काळानुसार समस्या वाढल्या आहेत? केवळ आर्थिक स्थिती उत्तम असणे पुरेसे नाही तर जीवनाच्या वाढलेल्या वेगाने आज प्रत्येकजण एकटा पडला आहे. आपल्या मनातील खळबळ सांगण्यासाठी कुणी माणूस नसणे ही आजची खरी गरिबी आहे. आम्ही सर्व वर्गात एकमेकांशी कनेक्टेड होतो. आपापल्या व्यवसायामुळे सर्वजण वेगवेगळ्या शहरात विखुरले. फोनने माणसांना व्हर्चुअली जवळ आणले असले तरी संवाद मात्र कमी झाला आहे. यामुळे अनेक जण नैराश्याला सामोरे जात आहेत.
कलाक्षेत्रासमोर सध्या नवी नवी आव्हाने आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे प्रत्येक जण मानसिक आणि आर्थिक संकटाला समोर गेला आहे. कला क्षेत्रातील अस्थिरतेचाही अनेकांना फटका बसला. कोरोनामुळे घरात बंदिस्त झाल्याने डिप्रेशनच्या समस्येनेही अनेकांना ग्रासले. कोरोना आता नाहीये पण नैराश्य, मानसिक समस्या मात्र अजूनही आहेत. त्याबद्दल बोलण्याची प्रथा आपल्या समाजात नाही. विशेषतः पुरुषाने जर आपली समस्या कुणासमोर मांडली तर काय रडतोस असे त्याला हिणवले जाते. त्यामुळे मनातील अस्वस्थता तशीच दाबून ठेवली जाते. कधीतरी तिचा स्फोट होतो आणि आत्महत्येचा विचार डोके वर काढतो.
जिवंत असणे ही सगळ्यात भाग्याची गोष्ट. कुठलीही समस्या आयुष्यापेक्षा मोठी नसते. त्यामुळे तू चुकलास विजय. तुझा प्रॉब्लेम तू मित्रांशी शेअर करायला हवा होतास. कितीही मोठी समस्या असली तर निश्चित मार्ग निघाला असता. आत्महत्येचा विचार करण्याची एक वेळ येते. तेवढा वेळ जर टाळता आला तर पुढच्या क्षणी माणूस सकारात्मक विचार करू शकतो. त्यामुळे तू बोलायला हवे होते. तुझे यश तू सगळ्यांना सांगितले पण दुःख मात्र जवळच्या मित्रांना सांगितले नाहीस! ते जर झाले असते तर तू आज आमच्यात असतास यशाची अजून नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी!
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion