Features

‘डी-नोव्हो’ म्हणजे काय रे भाऊ ?

 जेजे अनन्य अभिमत इन्स्टिट्यूट अर्थात डी-नोव्हो म्हणजे काय ? असा प्रश्न केवळ कलाक्षेत्रातीलच नाही तर इतर क्षेत्रातील व्यक्तींनाही पडतो. ही संकल्पना संपूर्णतः नवीन आहे. भारतात आजवर दोनच संस्थांना असा मान मिळाला आहे. आणखीन काही संस्थांना तो मिळू घातला आहे. पण जे जे स्कूल ऑफ आर्टला जर तो मिळाला तर ती कलाशिक्षण क्षेत्रातली पहिलीच घटना ठरेल. या डी-नोव्हो विषयी या चळवळीतले एक खंदे कार्यकर्ते जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी विद्यार्थी सुनील नाईक यांनी लिहिलेला हा लेख. 
“डी-नोव्हो इन्स्टिट्यूशन” म्हणजे “ज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये” शिक्षण आणि संशोधनातील अद्वितीय नवकल्पनांना वाहिलेली अनन्यसाधारण संस्था. अशा संस्थेचा संबंधित विषयातील शैक्षणिक दर्जा किंवा अनन्य वेगळेपणा त्या संस्थेतून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या समकालीन क्षेत्रातील कामगिरीवरून जोखता येतो आणि म्हणूनच त्या त्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसारख्या नावाजलेल्या व अनेक दशकांपासून दर्जेदार विद्यार्थी घडविणाऱ्या या संस्थेला विशेष डी-नोव्हो श्रेणीतील अनन्य अभिमत संस्थेमध्ये रुपांतरीत करण्याची संधी मिळाली आहे.

जेजेची होऊ घातलेली डी-नोव्हो अनन्य अभिमत इन्स्टिट्यूट ही खाजगी संस्था असणार नाही. ती कायम महाराष्ट्र शासन पुरस्कृतच राहणार आहे. परंतू आपला आंतरराष्ट्रीय दर्जा राखण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणात स्वायत्तता मिळणार आहे. इतकंच नाही तर शैक्षणिक निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. ( जेजे ही आपली आई आहे. ती आज संपूर्ण अंगानं म्हातारी होत चालली असून तिला वाचविणं फार गरजेचं आहे. )  सरकारचंच अनुदान असलं तरी प्रत्येक बाबतीत सरकारवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आपण स्वतंत्ररित्या फंड उभा करु शकतो.. त्यामुळे पारदर्शकता ठेवूनही सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रिया जलद गतीने होऊ शकतात. डीम्ड-टू-बी इन्स्टिट्यूट हे यूजीसीच्याच नियमानुसार असतं. परंतु नवनवीन अभ्यासक्रम, शिक्षकभरती आणि कॉलेज प्रवेश प्रक्रिया इत्यादी ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे त्यांनाच प्रदान केलेला असतो. म्हणूनच कोणत्याही निर्णय प्रक्रियेत विलंब तसेच हस्तक्षेप न होता तातडीनं निर्णय घेतल्यानं त्याचा झालेला चांगला फायदा दिसून येतो. तसेच ते सरकारच्या अनुदानाशिवायही माजी विद्यार्थ्यांमार्फत किंवा इतर खाजगी संस्थांमार्फत व्यक्तिगत स्वरूपाच्या देणग्या किंवा शैक्षणिक सहकार्य प्राप्त करु शकतात. त्यामुळे संस्थेला निर्णयाची आत्मनिर्भरता आपोआप प्राप्त होते. ( याचा अर्थ असा, अप्लाइड आर्ट, फाईनआर्ट, शिल्पकला, आणि त्यात येणारे इतर म्हणजे सिरॅमिक, मेटल क्राफ्ट, ग्राफिक, टेक्सटाईल्स डिझायनींग आणि आर्किटेक्ट हे सर्व बदलत्या काळानुसार संशोधनातील नवकल्पनांना जन्म देणारे अभ्यासक्रम जेजेच्या परिसरात शिकवता येतील. त्यातील काही विषयांची परंपरा तर १५० वर्षांपासूनची जुनी आहे. केवळ सरकारी अनुदान आणि नको तिथे देखरेख तसेच वारंवार सरकारी हस्तक्षेप होत असल्याकारणानं, व्यवस्थापनात स्वतःची निर्णयक्षमता न दिल्यानं आज जेजेची अवस्था एका अनुभवी, सर्वगुण संपन्न परंतु गलितगात्र म्हाताऱ्या माणसाच्या मरणासन्न अवस्थेसारखी झाली आहे. आणि म्हणूनच हे माझ्या आजी माजी विद्यार्थ्यांनो… आता आपण आपल्या जेजेला वाचवण्याचा प्रयत्न करूया ! अभी नही तो कभी नही.. कारण जेजेतल्या आपल्या याच पवित्र मातीतील आपलाच एक माजी विद्यार्थी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.

डी-नोव्हो इन्स्टिट्यूटमध्ये कोणती कॉलेजेस सामील होऊ शकतात?

कोणतीही प्रायोजक संस्था, शिक्षणातील विद्यमान ट्रॅक रेकॉर्ड असलेली संस्था डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी UGC कडे अर्ज करू शकते. जी कोणत्याही विद्यमान संस्थेद्वारे ऑफर न केलेल्या ज्ञानाच्या अद्वितीय आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये अभ्यास आणि संशोधन करेल अशा संस्थेला डी-नोवो डीम्ड युनिव्हर्सिटी घेता येते.

फक्त त्यांनी खालील नियमांचे पालन त्यांनी योग्य रित्या केलेले असावे
किंबहुना ते करावेच लागते.

१) तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) ज्यामध्ये त्याचा १५ वर्षांचा तपशीलवार धोरणात्मक दृष्टीकोन आराखडा आणि ५ वर्षांची रोलिंग अंमलबजावणी योजना. उदा. शैक्षणिक योजना, विद्याशाखा भरती योजना, विद्यार्थी प्रवेश योजना, संशोधन योजना, नेटवर्किंग योजना, पायाभूत सुविधा विकास योजना, वित्त योजना, प्रशासकीय योजना, गव्हर्नन्स प्लॅन, इत्यादींचे स्पष्ट वार्षिक टप्पे आणि डीम्ड टू बी विद्यापीठ कसे सेट केले जावे यावरील कृती योजना सादर करून मंजुरी घ्यावी लागते.

२) संस्थेच्या स्थापनेसाठी ताब्यात असलेल्या जमिनीचा तपशील टायटलच्या कागदपत्रांसह

३) तयार केलेल्या कॉर्पस फंडाचा तपशील

४) संस्थेच्या आर्थिक स्थिरतेचा तपशील

५) प्रायोजक संस्थेचे तपशील; प्रमुख शैक्षणिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह

६) UGC (विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या संस्था) विनियम, 2019 च्या सर्व तरतुदींचे पालन करेल असे वचन

७) राज्य/केंद्र सरकारद्वारे निधी उपलब्ध झाल्यास, विद्यापीठ म्हणून घोषित केल्यानंतरही संस्थेला आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्यासाठी संबंधित सरकारकडून वचनबद्धतेचे पत्र

८) प्रस्तावित मानल्या गेलेल्या विद्यापीठाची नोंदणी नफा नसलेली संस्था/ट्रस्ट/कंपनी म्हणून करावी लागेल.

९) केवळ शैक्षणिक संस्था चालवण्यासाठी प्रायोजक संस्था जर शासन असेल तर स्वतंत्र सोसायटी/ट्रस्ट/कंपनी नोंदणी करण्यापासून सूट दिली जाते.

१०) शासन प्रायोजित असेल तर, सोसायटी/ट्रस्ट/कंपनीकडून प्रस्तावित डीम्ड टू बी विद्यापीठाकडे मालमत्ता हस्तांतरित करण्याची गरज नाही, त्याऐवजी संस्था नोटरीकृत प्रतिज्ञापत्र प्रदान करेल की डीम्ड टू बी विद्यापीठाला वाटप केलेली संपूर्ण जंगम आणि स्थावर मालमत्ता भाडेपट्टीवर दिली जाणार नाही. किंवा UGC च्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही विल्हेवाट लावता येणार नाही. आणि भविष्यात सर्व विस्तार केवळ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी स्थापन केलेल्या सोसायटी/ट्रस्ट/कंपनीद्वारे केला जाईल.

मग आता या जेजेच्या डीनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीला विरोध कोणाचा आणि का आहे ?
आपल्याला कल्पनाच आहे की मागे डिग्रीसाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तेव्हाची नेमकी भूमिका काय होती. अ) की डीग्रीमुळे उच्च शिक्षण घेता यावे ब) तसेच ज्या शासकीय नोकऱ्यांमध्ये चित्रकार, फोटोग्राफर तसेच आर्किटेक्टचीच गरज असूनही केवळ ती जागा पदवीधरांसाठी असल्याने ती पदेच भरली जात नसत. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून क) शिक्षकांचा विनाकारण जाच कमी होण्यासाठी, त्यांची अरेरावी आणि मीपणा कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेला तो एक अतिशय शिस्तप्रिय लढा होता. त्यावेळी जेजेतसेच नागपूर औरंगाबाद येथील शासकीय आर्ट कॉलेजला डिग्री मिळाली. पण शिकवणारे आजही तेच पुरातन शिक्षण घेतलेले डिप्लोमा धारक शिक्षकच राहिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत पदभरती असल्याने पदे धड कधीच भरली गेली नाहीत. शासनाने तर या कॉलेजकडे संपूर्णतः दुर्लक्षच केल्याने निधीअभावी कित्येक उपक्रम बंद पडले. कारण शासनानं या संस्थांना सापत्न भावानं वागवलं. मुळात या संस्थांचा अभ्यासक्रम हा व्यावसायिक आहे याचा त्यांना विसर पडला आणि याचाच फायदा घेत, विचारणारा किंवा नियंत्रण ठेवणाराच कमकुवत असल्याचा फायदा घेत बरेच नवीन शिक्षण महर्षी तयार झाले नसते तर आश्चर्यच ठरले असते. नवीन नवीन जी कॉलेजेस तयार झाली त्या ठिकाणी शिकविणारे सारेच जेजेच्याच मुशीतून तयार झालेले नव्हते. काहींनी फक्त नावालाच जेजेच्या आवारातील छोट्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतलेलं. पण तेच सारे जेजेचेच नाव सांगायला लागले आणि मग सुरु झाले पैसे कमविण्याचे कारखाने आणि बेकारी वाढविणाऱ्या शिक्षण संस्था… त्या कुठे देवळात तर कुठे ओसरीवर तर कुठे  म्हशींच्या गोठ्यात, तर काही चक्क खाटीक खान्यात भरल्या होत्या ! भरमसाठ फी घेऊन सुमार शिक्षण दिलं जाऊ लागलं आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रामाणिक शिक्षणाच्या नावाने शिमगा सुरु झाला. मग अनुदान नसणाऱ्या कॉलेजांचा भरणा दिवसेंदिवस वाढतच चालला. मुळातच शिक्षकांना काहीच जमत नाही त्यामुळे प्रॅक्टिकल्स कमी आणि बोलबच्चनगिरी जास्त असा प्रकार झाला.

एक तर त्यांनी त्यांना अपग्रेड करायला हवं होतं किंवा नव्यानं होणाऱ्या जेजेच्या डी-नोव्हो इन्स्टिट्यूटला पाठिंबा देऊन, तिथल्या अभ्यासक्रमाला प्रधान्य देऊन आपापल्या कॉलेजची दिशा बदलायला हवी होती. पण होतं काय ? १०० विद्यार्थ्यांमध्ये एका दोघांचं ड्रॉईंग गॉडगिफ्ट म्हणून चांगलंच असतं. यात खरं तर शिक्षकांचा काहीच रोल नसतो. मग सुरु होतो त्याचंच भांडवल करण्याचा व्यवसाय आणि प्रचार आणि प्रसार केल्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढत जातात. त्याबरोबरच बेकारीही ! कारण एकच, बदलत्या काळाप्रमाणे शिक्षणात काडीचाही बदल न झाल्याने तसेच कॉलेजला आवश्यक म्हणून असणारे किमान इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने त्यांचा काय दर्जा असेल ते तुम्हीच समजा.. अशा ठिकाणच्या शिक्षकांना डी-नोव्हो इन्स्टिट्यूट त्यांच्या नोकऱ्या खाणारा राक्षस वाटणे साहजिकच आहे. तसेच काही न करता काहीजण डिपार्टमेंट हेड झाले किंवा तेथील प्राचार्य झाले तर काही बोर्ड ऑफ डायरेक्टर.. त्या सगळ्यांची आता पळता भुई थोडी होणार आहे. ते सहाजिकच आहे. त्यामुळे नवीन शिक्षण पद्धतीच्या जेजेच्या विकास धोरणाला त्यांचा विरोध आहे. आणि त्यांचा खोटेपणा झाकण्यासाठी, त्यांचे पाप झाकण्यासाठी आणि काही न करता त्यांना जेजेया नावामागे लपण्यासाठी ‘जेजेचे राज्यस्तरीय कलाविद्यापीठ’ म्हणून त्यांना मान्यता हवी आहे. ज्यात त्यांची कॉलेजेस लपली जातील असा त्यांचा भ्रम आहे. मुळात त्यांच्या या कुपमंडु वृत्तीमुळं ते ज्याच्या शिक्षणामुळे नावारूपास आले त्या जेजे कॉलेजचे ते स्वतःच्या स्वार्थासाठी बळी देत असून जेजेच्या शिक्षणपद्धतीत जर नवीन बदलत्या काळानुसार बदल झाला तर त्यांना त्यांची पोटे भरणे कठीण होईल अशी त्यांना भीती वाटते आहे. आणि म्हणूनच ते जेजे डी-नोव्हो इन्स्टिट्यूट करण्यास विरोध करत आहेत. माझे तर ठाम मत आहे.. ते त्यांची तोंडे लपवत आहेत. जरा विचार करा, १६५ वर्ष असलेले कॉलेज आज आधुनिकता नसल्याने नामशेष होत आहे. त्याला सावरण्यासाठी, संवर्धनासाठी जर आम्ही तिचे माजी विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असू तर त्यात कुणाचं काय बिघडलं ?

– सुनील नाईक

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.