No products in the cart.
तर महाराष्ट्रातून चित्रकला पूर्णतः संपलीच समजा!
‘खुर्चीचा खेळ’ आता जेजे कॅम्पसमध्ये सुरु झाला आहे. ‘डिनोव्हो‘चं प्रमुखपद कुणी भूषवायचं यासाठी वाटमारीदेखील सुरु झाली आहे. आपल्या वाटेत जो कुणी आडवा येईल त्याला अक्षरश: कापून काढायचा ही प्रामुख्यानं दिल्लीत प्रचलित असलेली प्रणाली आता इथं बेगुमानपणे वापरली जाऊ लागली आहे. त्याचा पहिला बळी ठरले आहेत जेजे अप्लाइडचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर. शैक्षणिकदृष्ट्या संपूर्ण पात्रता असलेली ही जेजेच्या कॅम्पसमधील कदाचित एकमेव व्यक्ती. पण ते आपल्या उत्कर्षाच्या आड येऊ नयेत म्हणून त्यांच्या विरोधात ‘चिन्ह‘च्या संपादकांचा सतीश नाईक यांचा वापर केला गेला. पण वस्तुस्थिती काय आहे? ते या लेखाद्वारे स्पष्ट व्हावे.
———-
माझी लेखनशैली थोडीशी पसरट आहे. मला मुळातच लिहायचा कंटाळा आहे ते वेगळंच. पण एकदा लिखाण सुरु झालं का मग मात्र मी थांबत नाही. भराभर लिहीत सुटतो. छापील माध्यमासाठी लिहिताना आपण किती लिहितो आहोत याचं भान फारसं बाळगावं लागत नसे, पण त्याच्या विपरीत – वेबसाईटसाठी लिहिताना मात्र पथ्य पाळावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ अलीकडच्या काळात बहुसंख्य वेबसाईट या मोबाईलवरच वाचल्या जात असल्यानं लेख हे पाचशे ते सहाशे शब्दांच्या पेक्षा जास्त मोठे असू नयेत हे पथ्य पाळावं लागतं. कारण मोबाईलवर यापेक्षा अधिक कुणी वाचू शकत नाही असं जाणकार सांगतात.
साहजिकच माझ्यासारख्यावर लिहितांना खूपच मर्यादा येतात. काही विषय असे असतात की इतक्या कमी शब्द मर्यादेत ते लिहिणं किंवा त्यातून आशय व्यक्त करणं हे केवळ अवघड असतं. त्यामुळे दोन चार पाच दिवस त्या विषयांवर सतत लिहावं लागतं. जे अनेकदा वाचकांना कंटाळवाणं देखील वाटू शकतं. किंबहुना वाटतंच असा अनुभव आहे. अनेकदा कमी शब्दात आशय व्यक्त करण्याच्या दबावामुळे अनेक मुद्दे किंवा आठवणी किंवा किस्सेदेखील सांगावयाचे राहून जातात. अगदी मागच्या लेखाचंच उदाहरण घ्या. डॉ संतोष क्षीरसागर यांच्या संदर्भात लिहिताना एक महत्वाची आठवण मात्र सांगायची राहून गेली. ती म्हणजे १९ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाआधी आणखी एक कार्यक्रम ‘एक जेजे’तर्फे झाला होता. तो कार्यक्रम होता राज्य मंत्री मंडळानं डिनोव्हो प्रस्तावाला परवानगी दिल्यानंतर झालेला. जेजे आर्किटेक्चर कॉलेजच्या सभागृहात तो झाला होता. सर्व माजी विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन केलं होतं आणि व्हाट्सअप द्वारे सर्वाना निमंत्रितदेखील करण्यात आलं होतं. पाचशे सहाशे किंवा अधिकही असतील पण जेजेच्या तिन्ही कॉलेजचे माजी विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आवर्जून आले होते. मी काही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नव्हतो कारण त्या कार्यक्रमाचं निमंत्रण काही मला आलं नव्हतं.
त्या कार्यक्रमाची बातमी मात्र आम्ही ‘चिन्ह आर्ट न्यूज’ मध्ये अगदी आवर्जून प्रसारित केली होती. तीस तीस चाळीस वर्षांपूर्वी जेजेत ज्यांनी शिक्षण असे माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते आणि जवळ जवळ चाळीस वर्ष आपल्या लिखाणाद्वारे जेजेचा प्रश्न धसाला लावून देखील आपण मात्र त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही याचं मला अतिशय वाईट वाटलं, पण आयोज़कांकडून जर निमंत्रण आलंच नसेल तर तिकडे फिरकायचं देखील नाही या पत्रकारितेतल्या अलिखित नियमानुसार मी वागलो होतो आणि मुख्य म्हणजे माझा अहंकारदेखील अर्थातच आडवा आला होता. आणि तो का येऊ नये? एक नाही दोन नाही तब्बल चाळीस वर्ष मी जेजेचा प्रश्न कुणाकडूनही एक कपर्दिकही न घेता किंबहुना जेव्हा वृत्तपत्र जेजेच्या बातम्या देण्यास टाळाटाळ करू लागली तेव्हा स्वतःचे काही लाख रुपये खर्च करुन तब्बल साडेतीनशे पानांचा अंक प्रकाशित करुन अत्यंत कठोर अशा लिखाणाद्वारे जेजेचे सारेच प्रश्न मी सातत्यानं मांडतो आहे. आणि मला जर यश साजरं करण्याच्याच कार्यक्रमाला बोलावलं जाणार नसेल तर मला का वाईट वाटू नये? पण मी काही या विषयाचा इश्यू केला नाही, त्यावर कडवटपणे काही लिहिलंदेखील नाही. किंवा फेसबुकवर काही पोस्टलोदेखील नाही.
मी मनात म्हटलं की त्यांना वेळ मिळाला नसेल किंवा कार्यबाहुल्यामुळे मला निमंत्रण पाठवायचे राहूनदेखील गेले असेल किंवा कदाचित चक्क विसरलेदेखील असतील किंवा ‘मला त्या कार्यक्रमाला का बोलावयाचे’ असाही प्रश्न त्यांच्या मनात आला असेल. मी काही त्यावर फारशी प्रतिक्रिया न देता माझ्या कामात गढून गेलो. अनेक आजी माजी विद्यार्थी तसेच त्यावेळी वर्गात असलेल्या मित्रांचे ‘तू का नाही आलास’ म्हणून विचारणा करणारे मेसेजेस आले. काय उत्तर देणार होतो यावर? पण कशीबशी वेळ मारून नेली. ‘डिनोव्हो’चा आमचा सूत्रधार आशुतोष आपटेचा फोन आला. अरे तू का नाही आलास म्हणून विचारणा करणारा. त्यावर त्याला मी शांतपणे उत्तर दिलं. तोही म्हणाला अरे सॉरी त्यांनी तुला निमंत्रण पाठवायला हवं होतं. त्यांनी नाही तर मी तरी पाठवायला हवं होतं. पण त्या कामाच्या धावपळीच्या धबडग्यात ते राहून गेलं खरं! इतक्या प्रांजळपणे त्यानं सांगितल्यावर मी काय बोलणार होतो. आणि खरं सांगायचं तर मला काही बोलायचंदेखील नव्हतं. माझ्या दृष्टीनं तो विषय संपला होता. कुठलाही कडवटपणा न बाळगता मी अतिशय प्रांजळपणे हे लिहितो आहे.
त्या संदर्भात आलेल्या एका फोनबद्दल मात्र मी आवर्जून लिहिणार आहे. तो फोन होता नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या संचालिका नीना रेगे यांचा. त्यादेखील जेजेच्याच माजी विद्यार्थिनी. जराशा घुश्यातच होत्या. म्हणाल्या, सतीश, आम्हीदेखील जेजेचेच माजी विद्यार्थी. आम्हाला या कार्यक्रमाचं साधं निमंत्रणदेखील आलं नाही. आम्ही नसतो का आलो? गंगाराम गवाणकर वगैरे आमच्या वेळच्या साऱ्याच माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला येणं नक्कीच आवडलं असतं. असं का केलं तुम्ही? यावर मी त्यांना म्हटलं. ‘अहो मी काही आयोजकांपैकी नाही. तुम्हाला मी त्यांच्यातला एक वाटलो म्हणून तुम्ही मला फोन केलात पण खरं सांगू का मलादेखील त्या समारंभाचं निमंत्रण आलं नाही म्हणून मीदेखील त्या समारंभाला गेलो नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का?’ माझं सारं बोलणं ऐकून त्या सर्दच झाल्या. मग मी त्यांना सांगितलं ‘असं जरी असलं तरी माझी त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी गेल्या चार-पाच वर्षात डिनोव्हो मिळण्यासाठी त्या साऱ्यांनी जे कष्ट केले आहेत याविषयी मी ऐकून आहे. लॉकडाउनच्या काळातदेखील त्यांनी रात्रंदिवस केलेल्या कामाविषयीदेखील मी ऐकून आहे. त्यातच त्या अर्थानं ते काहीसे अननुभवी आहेत त्यामुळेदेखील त्यांच्याकडून व्यक्तिगत निमंत्रणं गेली नसतील हे मी समजू शकतॊ. हे सारं करत असताना त्यांना शासकीय पातळीवर कुठल्याकुठल्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले असेल याचीदेखील कल्पना मी करू शकत असल्यानंदेखील माझी त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाही. पण त्यांनी म्हणूनच सोशल मीडियावर जाहीर आवाहन केलं होतं. त्या आवाहनालाच प्रतिसाद देऊन तिकडे सहाशे सातशे माजी विद्यार्थी जमले असावेत. आता तुमच्या पिढीतील विद्यार्थी सोशल मीडियावर कार्यरत नसल्यामुळं तुमचा हा गैरसमज झाला असावा. ‘एक जेजे’ ही माजी विद्यार्थी संघटना पूर्णपणे कार्यान्वित होताच असा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही याची मला खात्री आहे. हेही मी त्यांना निक्षून सांगितलं. त्यांना असंही म्हटलं की ‘आता तुम्ही मला विचाराल की मग तू रे बाबा का नाही गेलास तिकडे’ तर त्याचं प्रांजळ उत्तर असं आहे की ‘अहंकार’. मीसुद्धा शेवटीच माणूसच आहे. माध्यमातून चाळीसपेक्षा जास्त वर्षं जेजेसंबंधीचा लढा अत्यंत निरपेक्ष वृत्तीनं लढणाऱ्या मला त्यांनी त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देताना त्यांनी विसरायला नको होतं. इथं माझा इगो आडवा आला आणि मी कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. पण त्यावरून मी काही अकांडतांडव वगैरे करू इच्छित नाही. किंबहुना माझी त्याविषयी काहीही तक्रार नाही. माझ्या या उत्तरानं नीना रेगे यांचं समाधान झालं असावं.
हे सारं मी आताच का लिहिलं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, तर त्याचं उत्तर असं आहे की गेल्या आठवड्यात ‘चिन्ह’चा नवा व्हिडीओ प्रकाशित झाल्यावर चित्रकलेशी ज्यांचा शष्पदेखील संबंध नाही असे जेजे आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आणि महाराष्ट्राचे कलासंचालक राजीव मिश्रा यांनी म्हणे उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना असे कळवले की डॉ संतोष क्षीरसागर हे म्हणे सतीश नाईक यांना जेजे आणि कला संचालनालयाच्या बातम्या पुरवतात. त्यांचं डिमोशन म्हणे त्यामुळेच केलं गेलं. वगैरे. या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे हे कळावं म्हणून हे लिहिलं. या साऱ्याचा संबंध ‘डिनोव्हो’चं प्रमुखपद मिळवण्याशी आहे हे एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच. बातम्या माझ्यापाशी कशा येतात या संदर्भात एक लेख तर मी बहुदा उद्याच लिहिणार आहे. पण एक गोष्ट मात्र निक्षून सांगतो ‘डिनोव्हो’च्या पदी जर कुणी मिश्र व्यक्तिमत्व असलेली फडतूस आणि डफ्फर व्यक्ती नेमली गेली तर महाराष्ट्राच्या कलेची म्हणजेच पर्यायानं कला संचालनालयाची आणि जेजेच्या तीनही महाविद्यालयांची संपूर्ण वाताहत होणार हे निश्चित समजा.
सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
———-
सध्या गाजत असलेला चिन्हतर्फे आयोजित ‘जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!’ विडियो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
जे जे डिनोव्हो: एक स्फोटक चर्चा!
https://www.youtube.com/watch?v=dB2anH4kIcE
———-
———-
चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education
https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc
———-