No products in the cart.
तेव्हा कुठं गेला होता तुमचा धर्म! (पूर्वार्ध)
कंत्राटी शिक्षक नेमण्यासंदर्भातल्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कडाडून टीका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? शरद पवारांच्या लक्षात हे आत्ताच का यावं? चाळीस वर्षांपूर्वी जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेत कंत्राटी शिक्षक नेमले गेले तेव्हा त्यांनी का नाही आक्षेप घेतला. तेव्हा तर उच्च व तंत्रशिक्षण खातं कोणे एके काळी त्यांचेच स्वीय साहाय्यक असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडेच तर होतं. मग का नाही पवार साहेबानी तेव्हा त्यांना अडवलं? ‘चिन्ह‘चे संपादक सतीश नाईक यांनी घेतलेला रोखठोक परामर्श.
गेल्या शनिवारच्या मुंबईच्या वृत्तपत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संदर्भातली एक बातमी अतिशय ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत नामदार शरद पवार यांनी कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भात अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मते कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरती होणार असेल तर त्या शिक्षणाची गुणवत्ता काय असणार आहे? असा त्यांचा सवाल आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात राज्यातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातले महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या मताला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातच मानाचं स्थान आहे. त्यांनी अत्यंत परखडपणे कंत्राटी शिक्षकांसंदर्भात जी मतं व्यक्त केली आहेत त्याची नोंद महाराष्ट्र शासन घेणार आहे का? हाच मुळात कळीचा मुद्दा आहे.
गेली सुमारे चाळीस वर्ष जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसंदर्भात मी वृत्तपत्रातून आवाज उठवत होतो. १९८२ किंवा १९८३ साली या संदर्भातली पहिली बातमी मी दिली होती. कारण त्यावेळी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापकांच्या दोन जागा रिकाम्या होत्या. हळूहळू तिथले जुने प्राध्यापक सेवानिवृत्त होऊ लागले आणि त्यांच्या जागी नवीन प्राध्यापकांची भरती करण्यास महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करू लागलं.
त्यावर प्रचंड टीका मी माझ्या लेखनातून केली जिथंजिथं मला भाषण देण्यासाठी बोलावलं गेलं तिथंतिथं मी जाहीर टीका केली. अखेरीस त्यावर उपाय म्हणून सरकारनं जेजेमध्ये कंत्राटी शिक्षक भरण्यास सुरुवात केली. अवघा रुपये १२ हजार इतकाच त्यांना पगार होता. सेवाशर्तीचे कुठलेही लाभ त्यांना मिळणार नव्हते. पण या क्षेत्रात मुळातच नोकऱ्या कमी असल्यामुळं गरजवंतांनी १२ हजार रुपयात नोकरी करणं पसंत केलं.
सरकारला आता दाखवता येत होतं की बघा कायमस्वरूपी नोकऱ्या जरी देता येत नसल्या तरी आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पाहा कसे आम्ही कंत्राटी शिक्षक नेमतो आहोत. मंत्रालयात काचेच्या दालनात बसणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरचा सफाई कामगार किंवा बिगारी काम करणारा कामगार आणि भावी पिढीचं आयुष्य घडवणारा शिक्षक बहुदा एकाच लायकीचा वाटला असणार. त्यामुळे ते निर्णय घेऊन मोकळे झाले. आणि तिथून पुढं कंत्राटी शिक्षक भरण्याची जी प्रथा सुरु झाली ती गेली तब्बल चार दशकं म्हणजेच चाळीसहून अधिक वर्ष अव्याहतपणे तशीच सुरु आहे.
‘चिन्ह’ हे चित्रकला विषयक पोर्टल असल्यामुळं इथं चित्रकला शिक्षणासंदर्भातच मी सातत्यानं लिहितो आहे, टीका करतो आहे. अन्य क्षेत्रातलं मला काही एक ठाऊक नाही. कदाचित तिथं याहीपेक्षा भीषण परिस्थिती असण्याची शक्यता आहे. तिथं जे काही घडतं आहे त्याची नोंद घेण्यास त्या क्षेत्रातली लोकं समर्थ आहेत. चित्रकलेच्या बाबतीत मात्र तसे नाही. या क्षेत्रात इतक्या सातत्यानं फक्त मीच लिहितो आहे. (यातून कुठलीही प्रौढी मिळवण्याचा मला हव्यास नाही) म्हणूनच इथं फक्त चित्रकलेच्या संदर्भातच मी पवार यांच्या विधानावर प्रतिवाद करणार आहे.
हे कंत्राटी भरतीचं प्रकरण इतकं वाढलं की आज तब्बल चाळीस वर्षानंतर जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील सुमारे पावणेदोनशे अध्यापक प्राध्यापकांच्या पदांपैकी फक्त दहा किंवा बारा पदं ही कायमस्वरूपी आहेत बाकी सारी कंत्राटी किंवा हंगामी स्वरूपाची आहेत. जी दहा किंवा बारा कायमस्वरूपी पदं उरली आहेत त्यांनादेखील भूतसंवर्गात टाकण्याची प्रक्रिया उच्च व तंत्रशिक्षण खात्यातले एक अधिकारी सातत्यानं करत आहेत. एकीकडे लोकसेवा आयोगातर्फे दीडशे कायमस्वरूपी पदं भरण्याचं नाटक करायचं आणि दुसरीकडे पावणेदोनशे पदांमधली जी काही दहा-बारा पदं उरली आहेत त्यांना भूतसंवर्गात टाकण्याचा प्रयत्न करायचा यामागचा कार्यकारण भाव समजून घेणं माझ्या माणसाला तरी अवघड झालेलं आहे.
कुणी तरी त्यादिवशी सांगत होतं की मुंबई आणि संभाजीनगर येथील दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांबाबत शासकीय पातळीवर जी गंभीर चूक किंवा जो भष्टाचार झाला आहे तो झाकण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्याची ही धडपड आहे. खरंखोटं कुणास ठाऊक? पण कधीनाकधी यामागचं सत्य उघड होईलच. पण तूर्त विषय हा नाही.
आता पवारांच्या मूळ विधानाकडे येतो. मागच्या जवळजवळ तीस-चाळीस वर्षात शरद पवार यांच्या कर्तृत्वाचा खूप मोठा ठसा महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे. अगदी पुलोद काळापासून मी ते पाहतो आहे. फार खोलात जाऊया नको गेल्या फक्त पंधरा-वीस वर्षाचाच हिशोब करूया. या काळात तब्बल दोन टर्म महाराष्ट्रावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि कॉग्रेस पक्षांच्या आघाडीचं राज्य होतं. अगदी दोन्ही पक्षांनी मिळून ते अगदी पुरेपूर उपभोगलं. या काळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याची धुरा राष्ट्रवादी पक्षानं दिलीप वळसे पाटील यांच्याकडं सोपवली होती.
दोन टर्म म्हणजे तब्बल दहा वर्ष. या दहा वर्षात दिलीप वळसे पाटील यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयांची तसेच कला संचालनालयाची अक्षरशः वाताहत केली. या कला संचालनालयाच्या अखत्यारीत महाराष्ट्रात सुलभ शौचालयांप्रमाणे पसरलेली दीडशे ते दोनशे कला महाविद्यालयं होती. त्यांचीही अर्थातच वाताहत झाली. या काळात पवारांच्याच हातात त्यांच्या पक्षाची सूत्र होती. आणि पूर्णपणे त्यांनी आपल्या हाती लगाम ठेवले होते. त्याच काळात मी वळसे पाटील यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली नव्हती. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा अनेक वर्तमान पत्रातून मी सातत्यानं उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या म्हणजे पर्यायानं श्री वळसे पाटील यांच्या कारभारावर सातत्यानं टीका करत होतो. त्या काळात मी केलेलं लिखाण प्रचंड वाचलं गेलं होत. जेजेला दीडशे वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं मी जी लेखमाला लिहिली होती ती लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांनी एक संपूर्ण आठवडाभर लोकसत्ताच्या पहिल्या पानावर छापली होती. त्यामुळे जेजेचा कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आला आणि कर्णोपकर्णी झाला.
(उर्वरित दुसरा भाग उद्या वाचा…)
सतीश नाईक
संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’
संबंधित बातम्या
Chinh editor promises another issue on JJ malpractices
Special issue on JJ ‘Scams’
Related
Please login to join discussion