No products in the cart.
हा खेळ कला परीक्षेचा !
३१ मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्रातील सर्व कला महाविद्यालयांमध्ये उच्च कला परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. विना अनुदानित कला महाविद्यालयांनी या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आणि तो लगेच अंमलातही आणला. याची सविस्तर बातमी आम्ही त्या दरम्यान केली होती. या विना अनुदानित महाविद्यालयांच्या बहिष्कार मोहिमेत अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला तर बऱ्याच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. सरसकट बहिष्कार काही यशस्वी झाला नाही. या बहिष्कार मोहिमेमुळे आगामी शैक्षणिक वर्षाचे तीन तेरा वाजणार अशी शंका आमच्या मनात आली होतीच. कारण या बहिष्कार मोहिमेत मोजकी महाविद्यालये सहभागी झाली. आणि आता या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा उच्च कला परीक्षा ३० जून २०२३ पासून आयोजित करण्यात येत आहेत. त्या अर्थाचं पत्रही कला संचालनालयानं जारी केलं आहे.
या महाविद्यालयांनी जेव्हा मार्च महिन्यात परीक्षेवर बहिष्कार घातला, तेव्हा कला संचालकांनी संबंधित महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला होता. पण बहुतेक या निर्णयाला आता केराची टोपली दाखवली गेली असावी. कारण अशी कुठली मान्यता तर रद्द झाली नाहीच उलट या महाविद्यालयांच्या मागण्यांवर कला संचालनालयानं सपशेल लोटांगणंच घातलं. हेच या नव्याने आयोजित करण्यात आलेल्या परिक्षांवरून दिसत आहे.
मार्चमध्ये झालेल्या परीक्षेवर बहिष्कार घालून विना अनुदानित महाविद्यालयांनी कला संचालनालयाच्या आदेशांना ते किती किंमत देतात हे दाखवून दिलंच होतं. अशा वेळी कला संचालकांनी कठोर होऊन आपल्या मान्यता रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम राहायला हवं होतं. पण खात्रीलायक सूत्रावरून असं कळतं की विदर्भातल्या एका कला महाविद्यालयाच्या प्रमुखांनी कला संचालनालयाच्या आवारात मागील आठवड्यात प्रचंड राडा केला. त्यांचा संताप एवढा टीपेला पोहोचला होता की कला संचालनालयानं आपले निर्णय म्यान केले आणि निमूटपणे या महाविद्यालयाच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा परीक्षा आयोजित केल्या. तिथे असलेल्या ‘वाघ’ अधिकाऱ्यांची पार शेळी झाली म्हणे!
या सगळ्या गोंधळात ज्या विद्यार्थ्यांनी कला संचालनालयाचा आदेश प्रमाण मानून प्रामाणिकपणे मार्च महिन्यात परीक्षा दिल्या त्यांचा काय? त्यांचा निकाल कधी लागणार? का केवळ विना अनुदानित महाविद्यालयांच्या अवाजवी मागण्या मान्य करायच्या म्हणून या विद्यार्थ्यांनीही आपल्या निकालासाठी तिष्ठत बसायचं? उच्च कला परीक्षा ही दोनदा घेण्यात येत असल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाचाही बट्याबोळ झाला आहे. म्हणजे मार्च मध्ये झालेली एक परीक्षा. जे परीक्षेला आले नाहीत त्यांची 30 जून २०२३ पासून नवीन परीक्षा. अशा दोन, दोन तारखांमुळे या परीक्षांचा निकाल उशिरा म्हणजे साधारण ऑगस्ट महिन्यात लागेल. मग शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार? दिवाळी नंतर का? आणि ज्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचे आहेत त्यांनी काय दिवाळीतले फटाके फोडत बसायचं का वर्षभर?
एकदा निर्णय घेतल्यानंतर या परीक्षा पुन्हा आयोजित करणं हे अतिशय चुकीचं होतं. पण या परीक्षा पुन्हा आयोजित केल्यांनतर परीक्षेचं केंद्र काय असावं हे ठरवण्याचा अधिकारही कला संचालनालयाला असू नये ? या परीक्षांचं केंद्र हे अनुदानित महाविद्यालयांमध्ये देण्यात आलं होतं. तो निर्णयही मागे घेऊन आता विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्येच परीक्षा देणार आहेत. म्हणजे ही विना अनुदानित महाविद्यालयं म्हणतील तेव्हा, म्हणतील त्या जागी कला संचालनालय परीक्षा आयोजित करणार. उद्या विद्यार्थ्यांचा निकालही आम्हीच आम्हाला वाटेल तसा लावू अशी मागणी ही महाविद्यालयं करतील यात आम्हाला मुळीच आश्चर्य वाटत नाही. मग कला संचालनालयाची गरज कशाला आहे? केवळ कागदी घोडे नाचवायला का?
फिचर इमेजमधील फोटो प्रतीकात्मक.
*****
Related
Please login to join discussion