No products in the cart.
गुरुदत्तशी जोडणारा शेवटचा दुवा गेला…
ललिता लाजमी यांचं नुकतंच निधन झालं. गुरुदत्त आणि ललिता लाजमी हे सक्खे बहीण भाऊ. जेजेमध्ये ग्राफिक स्टुडिओत प्रिंट घेण्याच्या निमित्ताने येणाऱ्या ललिता लाजमी यांच्या विषयीची ही माहिती जेजेमध्ये फारशी कुणालाच नव्हती. १९८९ साली गुरुदत्त हा विषय ‘चिन्ह’च्या अंकात घ्यायचाच असं ठरलं. त्यानिमित्ताने ललिता लाजमी या संदर्भात ‘चिन्ह’शी सविस्तर बोलल्या आणि त्यांचं आत्मकथन शब्दांकित झालं, जे त्या काळात खूप गाजलं. चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या पुस्तकानिमित्त त्यांच्या स्नेही असलेल्या आणि अस्तित्व ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या ललिता लाजमींना पुन्हा बोलतं करण्याचा संपादक सतीश नाईक यांचा मानस होता. पण आता ते शक्य होणार नाहीये. ललिता लाजमी आता आपल्यातून गेल्या असल्या तरी सध्या म्युझिअम समोरच्या नॅशनल गॅलरीत त्यांचं रेट्रोस्पेक्टिव्ह प्रदर्शन सुरु आहे, तुम्ही ते नक्की पहाच.
रविवारचीच गोष्ट. चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरच्या ‘चिन्ह’च्या आगामी पुस्तका संदर्भात एका मित्राशी फोनवर बोलत होतो. या पुस्तकाचं बरंचसं काम झालं आहे. उरलेलं येत्या चार – सहा महिन्यात आटपायचंय. साहजिकच या संदर्भात त्यांच्या आप्त – स्नेही, मित्र – मैत्रिणींची जी यादी तयार केली होती. ती नजरेखालून घालत घालत त्या मित्राशी चर्चा करीत होतो. ते करीत असताना असं लक्षात आलं की, ललिता लाजमी यांच्याशी संपर्क साधायचा राहूनच गेलाय. त्या बरवे आणि त्यांच्या मित्रांनी काढलेल्या ‘अस्तित्व ग्रुप’च्या सदस्या होत्या. त्यामुळे बरवे यांच्या विषयी त्या खूप काही माहिती देतील असं मला वाटत होतं. त्यामुळे त्यांचं नाव यादीत आलं असावं.

बरवे गेले. ९५ साली आणि ‘चिन्ह’ची विशेष पुरवणी प्रसिद्ध झाली ती २०१० साली. मधल्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं. या संदर्भात काही अत्यंत कडवट घटना देखील घडल्या होत्या. त्यामुळे देखील असेल कदाचित बरवे यांच्यावरचा भला मोठा विशेष अंक प्रसिद्ध करण्याचं राहून गेलं ते गेलंच. खरं तर बरवे यांच्या डायरीतली पानं पहिल्यांदा प्रसिद्ध झाली ती ‘चिन्ह’मध्येच, त्यामुळेच ‘चिन्ह’चा बरवे विशेष अंक प्रसिद्ध होऊ शकला नाही याची खंत वाटत राहिली. मधल्या काळात देखील दोन ते तीन प्रयत्न मी अगदी मनापासून केले होते. पण संबंधितांचं साहाय्य मिळू न शकल्याने ती कल्पना प्रत्यक्षात येऊच शकली नाही.

कालच्या रविवारी मित्राशी चर्चा करत असताना ललिता लाजमी याचं नावं पटकन तोंडी आलं. आणि त्या मित्राला मी विनंती केली की तू त्यांच्याशी बोलून एक प्रदीर्घ शब्दांकन करशील का ? तर तो म्हणाला आता या वयात त्या जिथं राहतात तिथं जाऊन शब्दांकन करणं मला जरा अवघड वाटतंय. पण मुख्य म्हणजे त्या बोलू शकतील का ? हे आधी तू पाहून घे.

आज सोमवार. कुणाशी बोलावं, कुणाला शब्दांकन करायला सांगावं हे मनाशी ठरवतअसतानाच व्हाट्सअपवर बातमी आली. ‘ललिता लाजमी’ गेल्या. पुन्हा काहीतरी हातातून निसटल्यासारखं वाटलं.
मला जेजेतले दिवस आठवले. जेजेत सकाळी आलो का रात्रीपर्यंत मुक्काम असायचा. त्या काळात पांढऱ्या साडीतल्या अत्यंत गोऱ्यापान बाई जाताना येताना दिसायच्या. बहुतेकदा त्या ग्राफिक डिपार्टमेंटमध्ये जाताना किंवा काम करताना दिसायच्या. त्या काळात जेजेमध्ये खूप ज्येष्ठ चित्रकार जात येत असत. एके दिवशी कुतूहलानं मी जेजेतल्या एका सिनियरला विचारलं की या कोण ? तर तो म्हणाला या ललिता लाजमी. त्या ग्राफिक डिपार्टमेंटमध्ये येतात काम करायला. त्यावर हातातला चहा टाकून मी अक्षरशः किंचाळलो. अरे म्हणजे गुरुदत्तची बहीण ? तर तो सिनियर उलटा विचारू लागला कोण गुरुदत्त ? तर मी त्याला म्हणालो बाजी, प्यासा, कागज के फूल , मि. फिफ्टी फाईव्ह या सारखे चित्रपट ज्याने दिग्दर्शित केले तो. (अर्थात असे अनुभव जेजेमध्ये अगदी सर्रास.) त्या काळात मी खूप वाचत असे. चित्रपट पाहत असे. आकाशवाणीवर गाणी ऐकत असे. एखादा कलावंत मला आवडला भावला की त्याच्या विषयी सारीच्या सारी माहिती गोळा करायची. ही माझी सवय होती त्यातूनच मी हे पटकन बोलून गेलो होतो.

जेजेत काही त्यांच्याशी फारसा संवाद झालाच नाही कारण त्या सतत कामातच असत. आणि मी देखील त्यांच्यापेक्षा तुलनेनं लहान होतो. पण मी मात्र त्यांचा ट्रॅक ठेऊन राहिलो. गॅलरीमध्ये प्रदर्शित होणारी चित्रे पाहत राहिलो. अधनंमधनं त्यांच्यासोबत गॅलरीत संवाद देखील होई पण तो अगदी जुजबी. गॅलरीत त्या दिसल्या म्हणजे ‘ही गुरुदत्तची बहीण’ अशी माहिती सोबतच्या मित्रांना देण्यात मला अतिशय आनंद होत असे आणि ऐकणारा देखील ते ऐकून चक्रावून जात असे. मध्यंतरी सायन माटुंग्यात एका मित्राकडे जाणं झालं. तो राहतो नव्या कोऱ्या टॉवरमध्ये. पण तो त्याच्या घरात जाताना आजूबाजूच्या जुन्या इमारतींकडे हात दाखवून सांगत होता इथे तो अमुक चित्रपट कलावंत राहायचा, तिथे अमुक कलावंत राहायचा. ५० – ६० च्या दशकात ही चित्रपटवाल्यांची लेन होती. वगैरे. मी त्याला विचारलं गुरुदत्त कुठे राहायचा ? तर त्यानं मला आपादमस्तक न्याहाळलं आणि जवळ नेऊन ती इमारत दाखवली. गुरुदत्तचा कागज के फूल किंवा प्यासा पाहताना आजही अस्वस्थपणा येतो. आजही त्याच्या चित्रपटातली गाणी दुरवरुन ऐकू आली की मी यु ट्यूबवर जाऊन ती लावतो. पूर्वी विविध भारती किंवा सिलोन लावायला लागायचं. आता तंत्रज्ञानानं खूप मोठी सोय केली आहे. असं हे गुरुदत्त पुराण. त्यामुळेच ललिता लाजमी विषयी खूप आस्था आणि आपुलकी होती.


*****
– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion