No products in the cart.
नग्नता : बदलतोय तर समाज !
‘नग्नता’ ही तीन अत्यंत खळबळजनक अक्षरं आहेत. अनेकजणांची हा शब्द वाचला की भंबेरी उडते. खूप जणांना उत्सुकता निर्माण होते तर काही आंबटशौकीन लोक या विषयाच्या हात धुवून मागे लागतात. खरं तर चित्रकलेला नग्नता अस्पृश्य नाही. पण कलेतली नग्नता ही श्लील-अश्लीलाच्या नाजूक दोरीवर तोल सांभाळत उभी आहे. जरा तोल गेला की तिच्यावर अश्लीलतेचा ठपका बसणारच असे समजा. अशी नाजूक कसरत ‘चिन्ह’ने ‘नग्नता’ विशेषांकाच्या वेळी लीलया पेलली. प्रस्तुत नग्नता लेखातही लेखिका मंगल गोगटे यांनी नग्नतेवर सामाजिक आणि कलेच्या अंगाने आपले अनुभव मांडले आहेत. त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची अनेक चित्र प्रदर्शनेही झाली आहेत. मंगल गोगटे या अर्थशास्त्रातील डॉक्टर आणि प्राध्यापिका. चित्रकलेची आवड असल्यामुळे नग्नता हा विषय त्यांच्या परिचयाचा.
हा लेख तीन भागात प्रसारित करत आहोत. पहिल्या भागात नग्नतेचा भारतीय सामाजिक अंगाने परामर्श घेतला आहे. तर दुसऱ्या दोन भागात लेखिकेला पाश्चात्य देशात नग्नतेच्या संदर्भांत काय अनुभव आले ते मांडले आहे. भारतीय समाज आजही नग्नतेच्या बाबतीत नकारात्मक पूर्वग्रह बाळगून आहे तर पाश्चात्य समाज मोकळाढाकळा! हेच या लेखातील गमतीदार अनुभवातून समजते.
आपण ‘नंगे पॉंव” हे किती सहजपणे म्हणतो , परंतु ते कदाचित परक्या वा दुस-या भाषेतलं असल्याने असेल. नाहीतर आपल्या भाषेत वा संस्कृतीत ‘नग्न’ या शब्दाला कुणी फारसं जवळ उभं देखील करत नाही. निदान चार चौघात तरी नाहीच. या शब्दापासून वा वाक्यप्रयोगापासून आपण जरा दूरच जागा शोधतो, विशेषत: जरा जुन्या पिढीतले लोक. असं म्हणत की नवरा – बायकोने देखील एकमेकांना पूर्णपणे बिना कपड्यांचं पाहिलेलं नसतं, अगदी अंधारात सुध्दा. अंधारात त्यांनी एकमेकांना पूर्णपणे चाचपडलेलंही नसतं. जागेची टंचाई हा त्यातला महत्त्वाचा अडथळा असतो. दुसरा असतो तो एकत्र कुटुंबाचा. स्वत:चं घर विकत घेणं भारतासारख्या देशात खूप जिकीरीचं आहे आणि त्याहीपेक्षा मुंबईसारख्या शहरात. जिथे कितीतरी तरूणांना लग्न करता येत नाही, कारण त्यांना घर विकत घेणं परवडत नाही. एकांत मिळत नाही म्हणून तर कितीतरी जोडपी कुठेतरी घराबाहेर थोडा आडोसा शोधून बसतात व अंधार होण्याची वाट पाहतात, हे दुर्दैवी सत्य मुंबईसारख्या शहराचं दु:ख आहे.
आपल्याकडे तर मुलं मोठी झाली की आईनेही त्यांना कधी बिना कपड्यांचं पाहिलेलं नसतं. सर्वसाधारणपणे एक बाळंतपण होईपर्यंत बाईची लाज कमी झालेली नसते. घरातही ती अगदी व्यवस्थित कपडे करूनच बसते. एकतर पूर्वी घराची दारं सारखी बंद नसत आणि कुणीही केव्हाही घरात येत असे. त्यामानाने पुरूष मात्र कमी कपडे करून घरात वावरत असतो. कारण आपली संस्कृती त्यांना तशी मुभा देते. पूर्वीच्या हिंदी सिनेमातील नायिकांचे पोहण्याचे पोशाख पहा. आतातर अगदी अंगभर म्हणावे असे कपडे त्या तेव्हा घालत.
आम्ही तरूण असताना कोणती पुस्तकं वा मासिक आम्ही वाचावीत यावर बंधन होतं. जे आता इंटरनेटमुळे अगदी सहज शक्य होतं तसं करणं. तेव्हा एकतर आम्ही दिवसभर काय करतोय हे बघायला कुणी ना कुणी घरभर असायचंच. बरीच माणसं होती घरात आणि प्रत्येकाची वेगळी खोली आणि इतरांच्या तिथे जाण्यावर मर्यादा, अशी संस्कृती नव्हती. सगळी मंडळी घरभर असायची. शिवाय जिथून पुस्तकं घरात आणली जायची त्या वाचनालयातील पुस्तकं देणारी – घेणारी माणसं आमच्या पालकांच्या ओळखीची. कुठून काही वेगळी पुस्तकं बघणार वा वाचणार ?
आमच्या आईची नजर देखील तीक्ष्ण होती. सगळीकडे असायची. घरभर वावर असायचा सगळ्यांचा, नोकराचाकरांचा देखील. त्यामुळे कपडे बदलायला वेगळ्या खोलीत जाणं क्रमप्राप्त होतं. आईसमोर कधीच नाही. कपड्यांना मोठा गळा असणं वा साडीचा पदर नीट नसणं वा तो सरकणं वा पडणं ही कृत्य तर समाजमान्य नव्हतीच. त्यावेळी हिंदी सिनेमात देखील नव्हती. बलात्कार वा जबरदस्ती हे शब्द आमच्या समोर उच्चारले जाणं, हेही कठीण होतं. आमच्या शेजारच्या कुटुंबातील एका अत्यंत हुशार मुलाचे पालक जेव्हा माझ्या पालकांकडे माझ्यासाठी मागणं घेवून आले त्यावेळी मी महाविद्यालयात जाणारी मुलगी असून देखील ते मला सांगितलं गेलं नाही. मला तर तो मुलगा आवडतही होता. ते मला खूप उशीरा कळलं, सांगितलं.
ही झाली विचारांची झाकपाक. सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर बोलायच्या नाहीत, ही तर पध्दतच होती. कितीतरी गोष्टी अशा होत्या ज्या मुलांना सांगायच्या नाहीत वा मुलांसमोर बोलायच्या नाहीत अशी विचारधारा होती. कधीकधी तर असं वाटायचं की या मोठ्या माणसांना तरी सगळं माहिती आहे का तर ते आपल्याला सांगतील. कारण अशा अनेक गोष्टी होत्या ज्या लपवूनच ठेवल्या जायच्या. काही गोष्टींनी तर नुकसान जास्त व्हायचं. जसं मुलींना मासिक पाळी आली, ठेवा लपवून मुलग्यांपासून. मुलीला बाळ होणार तर ते होतं कुठून, हे ठेवा लपवून तिच्यापासून. मुलीला मासिक पाळी आली वा ती बंद झाली, ते का, हे ठेवा लपवून तिच्यापासून आणि मुलग्यांपासून तर खचितच. देवाची पूजा का करायची, बाहेरून आल्यावर पाय का धुवायचे, उपास का करायचे, देवळात का जायचं, अगदी लहान बाळाला हात का लावायचा नाही, रोग का होतो, …. सगळं ‘पध्दत म्हणून’ वा ‘चालरीत म्हणून’ वा ‘आम्ही सांगतोय म्हणून’; अशीच उत्तरं असायची. त्यामुळे एकूणच सगळी, अगदी आचार आणि विचारांची, नग्नता ही नेहमीच झाकली जायची. जुने विचार, आचार, संस्कृती, देवभोळेपणा वा अंधविश्वास म्हणून.
मी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा त्यातली एक जागा होती सोमैय्या महाविद्यालय. परंपरा सांभाळणारं आणि चांगलं म्हणून त्यावेळी ते प्रसिध्द होतं. त्याकाळात अधूनमधून मी स्लीवलेस ब्लाऊज वापरत असे. पहिल्या आठवड्यात मी एकदा तसा ब्लाऊज घालून गेले तर हात व खांदे झाकून घेण्यास मला माझ्या विभाग प्रमुख बाईंनी सांगितलं. संस्कृती व परंपरा सांभाळण्याचा तो एक भाग होता. त्याच दिवशी मी हाताचे ब्लाऊज शिवून घेतले. मग त्याचीच इतकी सवय झाली की ब्लाऊजला हात नसतील तर मी अर्धे कपडे घातलेलेच नाहीत असं वाटू लागलं. तेच छान व योग्य वाटू लागलं. सवय, मग ती जबरदस्तीची असो वा परीस्थितीमुळे आपोआप लागलेली असो, विचारात केवढा बदल घडवून आणते नाही?
अशा बंद संस्कृतीत वाढलेली मी 1995 च्या सुमारास फिनलंड सारख्या देशात जाणं, ही फार मोठी गोष्ट होती.
क्रमश:
*****
– मंगल गोगटे
लेखिका या अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांची अनेक एकल प्रदर्शने झाली आहेत.
मंगल गोगटे यांच्या वेबसाईटची लिंक: http://www.mangalgogte.com/index.html
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion