Features

ते इथंही आले आहेत !

आज सकाळी प्रख्यात व्यंगचित्रकार किंवा अर्कचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचा फोन आला. वाईरकर खरं तर माझे जेजे स्कूल ऑफ आर्ट मधले सहाध्यायी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी जाहिरात क्षेत्रात नोकरी पत्करली. थोडंसं स्थिरस्थावर होताच जाहिरात क्षेत्र सोडून व्यंगचित्रकला क्षेत्राची वाट पकडली. त्यांची रेषा इतकी बोलकी होती की फारच थोड्या अवधीत त्यांनी खूप मोठं यश संपादन केलं. मूळ गाव मालवण असल्यामुळं तिरकसपणा नसानसात भिनलेला. साहजिकच त्यांच्या व्यंग आणि अर्क चित्रांना मोठी मागणी आली नसती तर ते नवलच ठरलं नसतं. भारतीय माध्यमातूनच नव्हे तर परदेशी माध्यमातून देखील त्यांचं प्रचंड कौतुक झालं.

ते माझे जवळचे मित्र असल्यामुळं अर्थातच त्यांचं नाव मी ‘चिन्ह’च्या व्हाट्सअप समूहात समाविष्ट केलं. तिथं ते आपली व्यंगचित्र, रेखाचित्र तसेच कार्यक्रमांविषयीच्या पोस्ट टाकू लागले. एकदा पोस्ट टाकली की त्यांचा त्या समूहाशी संबंध यायचा तो पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा पोस्ट टाकण्याच्या वेळीच. समूहात काय घडामोडी घडतात किंवा घडल्या आहेत या विषयी त्यांना काहीही देणं घेणं नसायचं. ज्याला टिपिकल कमर्शियल आर्टिस्ट अप्रोच म्हणतात तसा काहीसा हा प्रकार.

अशा या प्रभाकर वाईरकरांचा सकाळीच फोन यावा याचं मला म्हणूनच आश्चर्य वाटलं. म्हटलं काय काम काढलंस सकाळी सकाळी ? प्रभाकर विचारता झाला ‘तुझा तो काय तो व्हाट्सअपचा ग्रुप आहे ना रेखाटता का काय तो’ हे ऐकताच मी काहीसा बिथरलोच. कारण दोन दिवसांपूर्वी ‘चिन्ह’चा हा जवळ जवळ २३० मातब्बर चित्रकार असलेला समूह मी लेफ्ट केला होता. मी त्याला जवळ जवळ अडवतच म्हणालो ‘रेखाटता का काय तो नाही ‘रेखाटता रेखाटता’ आणि आता नुकताच मी तो ग्रुप सोडला आहे. त्यावर प्रभाकर विचारता झाला का रे काय झालं ! तर मी त्याला म्हटलं आता तू जो प्रश्न विचारलास त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. इतकी वर्ष तू त्या ग्रुपमध्ये आहेस आणि आता अचानक सकाळी उठून तू त्या ग्रुपचं नाव मला विचारतोस, तो ग्रुप तुझाच आहे ना असं विचारतोस इतकंच नाही तर व्यवस्थित निवेदन करुन मी तो ग्रुप सोडला ते देखील तुला माहित नसतं कारण तू काही वाचलंस नाहीस. हेच कारण आहे मी तो ग्रुप सोडण्यामागचं. पण त्याला बहुदा मी काय म्हणत होतो ते कळत नसावं. तो आपला मला सतत विचारत होता कशाला तू तो ग्रुप सोडायचास वगैरे.

मी म्हटलं ते राहू दे बाजूला तू कशाला फोन केला आहेस ते सांग. त्यावर त्यानं ते कारण सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो. तो सांगत होता सकाळीच त्याला त्या ग्रुपवरच्या कोणा सदस्यानं फोन केला होता आणि तो सदस्य त्याला विचारात होता तू पंतप्रधान मोदींवरचं कार्टून का काढलंस ? तर प्रभाकरनं त्याला उत्तर दिलं मी कार्टूनिस्ट आहे म्हणून. त्यावर तो तरुण म्हणाला पण मोदींचं कार्टून तू का काढलंस ? तुला माहित आहे ना ही कुठली वेळ आहे ती वगैरे. त्यावर प्रभाकर म्हणाला व्यंगचित्र काढणं हा माझा व्यवसाय आहे. आणि मी वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठीच व्यंगचित्र काढतो. आता तू जे कुठलं व्यंगचित्र म्हणतो आहेस ते व्यंगचित्र मी एका सदरासाठी संपादकांच्या मागणीनुसार काढलं आहे. तर तो तरुण विचारता झाला कुठल्या पेपरसाठी तर त्याला प्रभाकरनं उत्तर दिलं ‘सकाळ’ वृत्तपत्रासाठी तिथं ब्रिटिश नंदी यांच्या सदरासाठी मी चित्र काढतो. तुला जर त्यात वावगं वाटत असेल तर तू त्या संपादकांना फोन कर त्यावर तो तरुण म्हणाला मी ‘सकाळ’ सारखे पेपर वाचत नाही.

आता तो तरुण हळूहळू चिडू लागला होता. त्यानं प्रभाकरचा निषेध नोंदवला. म्हणाला तू हे जे करतोयस ते बरोबर नाही. मोदींवर व्यंगचित्र काढायची ही वेळ नाही. आणि तो अद्वातद्वा बोलू लागला. चिडला, संतापला, नको नको ते बोलू लागला. खरं तर प्रभाकर आता सत्तरीत पोहोचला आहे. प्रभाकरच्या म्हणण्यानुसार तो फोन करणारा अगदी तरुण असावा. किमान वयाचा मान राखण्याइतकं सौजन्य देखील त्याच्यात नव्हतं. आपण भारतासारख्या लोकशाही मानणाऱ्या देशात राहतो याचं भान असण्याचं त्याला कारणच नव्हतं. प्रचंड संतापला होता तो प्रभाकरच्या त्या व्यंगचित्रावर. शेवटी शेवटी तर तो धमक्यांवर उतरला.

प्रभाकर तसा बिचारा अगदी गरीब कुणाच्या अध्यात न मध्यात नसणारा. पण तो ही ते मोदी पुराण ऐकून काहीसा वैतागला. म्हणाला तू आवरतं घे, मी हा फोन आता ठेवणार आहे. पण तो मोदी भक्त आता पिसाटला होता. तो तसाच बोलत राहिला. शेवटी प्रभाकरनं तो फोन ठेऊन दिला. पण पुन्हा त्या तरुणानं फोन केलाच. पुन्हा तोच प्रकार. पुन्हा प्रभाकरनं फोन ठेऊन दिला. फोन ठेऊन दिल्यावर बराच काळ तो सतत वाजतच राहिला. प्रभाकरनं मग काही तो फोन उचलला नाही.

आणि मग त्यानं मला फोन लावला. मी आधीच पाच सहा वर्ष मेहनत करुन उभा केलेला पण ग्रुपचे सदस्य चर्चेत भाग घेण्यात किंवा मतं प्रदर्शन करण्यात देखील सहभागी होतं नसल्यानं तो ग्रुप सोडला असल्यामुळं अस्वस्थ होतो. त्यामुळे त्यानं सुतोवाच करताच त्याला सारं काही धडाधडा बोलून दाखवलं. तो ही बिचारा माझं सारं ऐकून घेत राहिला.

मी त्याला म्हटलं माझा त्या ग्रुपशी आता काहीही संबंध नाही. काल परवाच मी तो ग्रुप सोडलाय. आता तिथं काय घडतंय या विषयी निदान मी तरी मतं प्रदर्शन करणं योग्य नव्हे. तिथं आता जे कोणी ऍडमिन असतील त्यानं तो प्रश्न सोडवावा. तू हवं तर त्यांच्याशी बोल. तर प्रभाकर म्हणला तू त्या ग्रुपवर नसशील तर मी तिथं राहून काय करु. मीही त्या ग्रुपमधून लेफ्ट होतो. कारण हे जे काही चाललं आहे ते योग्य नव्हे.

मी त्याला म्हटलं तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपलं एकच क्षेत्र असं राहिलं होतं की जिथं या लोकांनी प्रवेश केला नव्हता. पण नवीन संसद भवनाच्या छतावर अशोक स्तंभ बसवताना त्यांनी सिंहांच्या बाबतीत जो काही घोळ घातला तो पाहिल्यावर तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की कलेच्या क्षेत्रावर देखील यांची गदा आता आली आहे. तेव्हाही सारे मूग गिळून गप्प राहिले. कुठल्याच प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. तो शिल्पकार मात्र बिचारा सारं काही सोसत राहिला. परवा तर हजारो वर्षांपूर्वीच्या मोहन जो दारो मधल्या नर्तिकेच्या शिल्पाला कपडे चढवून तर त्यांनी मूर्खपणाचा अक्षरशः कळस केला. त्यावरही कुणी उत्तर द्यायला पुढं आलं नाही. मधल्या काळात अनेक ‘संस्कार’ क्षम कलावंतांना राष्ट्रीय पुरस्कार, सन्मान किंवा पदांची खिरापत कशी वाटली गेली ते तर आपण उघड्या डोळ्यानं पाहिलं. आता ही पुढची पायरी आहे. आता ते तुमची तोंडं बंद करतील. कुठली चित्रं काढायची कुठली नाही ते देखील सांगतील. इतकंच नाही तर त्यांच्या नेत्यांची व्यंगचित्रं देखील काढायची नाहीत असा फतवा देखील जाहीर करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. ही त्याची सुरुवात आहे. पुढं काय झालं ठाऊक नाही प्रभाकरनं फोन ठेऊन दिला. त्यानं फोन ठेवण्याआधी मी त्याला म्हटलं होतं की कुठलं व्यंगचित्र ते मला पाठव मी त्यावर लिहीन. पण प्रभाकरनं काही ते ही पाठवलं नाही.

फोन ठेवल्या नंतर मात्र सकाळ मधलं मी ते व्यंगचित्र पाहिलं. ब्रिटिश नंदी यांच्या ‘ढिंग टांग’ या सदरात ते प्रसिद्ध झालं होतं. खरं तर मी त्या सदराचा चाहता आहे. नियमितपणे मी ते वाचतो. त्यातलं लिखाण आणि प्रभाकरचं चित्र दोन्ही मला आवडतं. ०१ तारखेला ते प्रसिद्ध झालं तेव्हा ही मी ते वाचलं होतं. पण तेव्हा मला त्यात काही खटकलं नव्हतं. हे लिहिण्याआधी आज तो अंक काढून सारं पुन्हा वाचलं. तेव्हाही मला त्यात काही खटकलं नाही. उलट ब्रिटिश नंदी यांनी केलेलं नमोजी भाईंचं वर्णन वाचून मी पुन्हा एकदा जाम हसत सुटलो. खरं तर ज्याच्यावर टीका टिपणी केली आहे त्याला देखील आवडावं असं हे सदर आहे. आणि त्यातली प्रभाकरची चित्रं ही तर भन्नाटच आहेत. मुद्दाम या लेखासोबत हे सदर देतो आहे. तुम्हीच वाचा आणि तुम्हीच ठरवा. प्रभाकर वाईरकर या जागतिक कीर्ती मिळवणाऱ्या व्यंगचित्रकाराला कुणा ‘प्रशांत’ पोरसवदा शेंबड्या चित्रकारांनं अद्वातद्वा बोलावं आणि धमकी द्यावी असं त्यात काही आहे का ? तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरु नका.

*****

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.