Features

आला पावसाळा, चित्रं सांभाळा!

पावसाळ्यात जीवन नव्याने सुरू होते, पण त्याच वेळी वस्तू शिळ्यासुद्धा होतात! अशा वेळी वस्तूंना लागणारी बुरशी हेदेखील जीवनच आहे! चित्रांवरही दुष्परिणाम करणाऱ्या या अवघड हंगामी समस्येकडे पाहता, चिन्हने यामधील अनुभवी अभ्यासकाचा सल्ला घेण्याचे ठरवले. मुंबईतील ज्येष्ठ कलाकार प्रकाश वाघमारे यांच्याशी केलेल्या सविस्तर संवादातून समोर आलेल्या युक्तीच्या चार गोष्टी विनील भुर्के सादर करत आहेत.

पावसाळ्यात चित्रांची काळजी कशी घ्यावी? चित्रांवर परिणाम करणारे प्रमुख घटक कोणते?

सर्वप्रथम आपण हे स्पष्ट करूया की चित्रांवर हवेतील बाष्प किंवा आर्द्रतेचा परिणाम होतो आणि पावसाळ्यात याची शक्यता जास्त असते. परंतु योग्य काळजी न घेतल्यास कोणत्याही ऋतूमध्ये हे होऊ शकते. चित्रावर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे घटक एकतर जैविक आहेत – जसे की सूक्ष्मजीव – किंवा पर्यावरणीय आहेतजसे की तापमान आणि सापेक्ष आर्द्रता (हवेतील बाष्पाचे प्रमाण). चित्राच्या पृष्ठभागावर होणारी बुरशीची वाढ ही सर्वात जास्त प्रमाणात येणारी समस्या आहे. चित्राच्या सभोवतालच्या हवेतील आर्द्रतेमुळे हे घडते. ही आर्द्रता वातावरणातील आर्द्रता असू शकते किंवा कुठूनतरी झालेली पाण्याची गळती किंवा चित्र जिथे लावले आहे त्या किंवा शेजारच्या ओलसर भिंतींमधून झिरपणारा ओलावा यामुळे आलेली असू शकते. त्यामुळे पावसाळ्यात याची शक्यता जास्त असली तरी ते कोणत्याही ऋतूत होऊ शकते. म्हणूनच व्यावसायिक कलासंग्राहक चित्रांच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी वातानुकूलित कक्षाचा (Air conditioned warehouse) वापर करतात, ज्यामध्ये १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान आणि कमी सापेक्ष आर्द्रता राखली जाते. साठवण कक्षाचे वातावरण थंड आणि कोरडे ठेवणे महत्वाचे आहे.

एक ओलसर भिंत (स्रोत: Shutterstock)

सर्व प्रकारच्या चित्रांवर वातावरणातील आर्द्रतेचा सारखाच परिणाम होतो का?

खरंतर तसं नाही. चित्र रंगवताना कोणतं माध्यम वापरलं आहे यावरही बरंच काही अवलंबून असतं. अॅक्रिलिकमध्ये रंगवलेल्या चित्रांच्या तुलनेत तैलरंगांमध्ये रंगवलेली चित्रं पूर्णपणे सुकायला जास्त वेळ लागतो. एखादे चित्र साठवण्याआधी किंवा पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्णपणे वाळवले नाही तर त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. तेल हे हळूहळू सुकणारे होणारे माध्यम असल्याने, तैलचित्रांसाठी या पैलूकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

तैलचित्रे बुरशीला अधिक संवेदनाक्षम असण्याचे एक संभाव्य कारण म्हणजे तेल हा मुळात एक जैविक घटक आहे, जो बुरशी अन्न म्हणून वापरू शकते. अॅक्रिलिक रंग हे रासायनिक किंवा प्लास्टिकवर आधारित असतात, जे बुरशीला अन्न म्हणून वापरता येत नाहीत. शिवाय, तैलरंग पातळ करण्यासाठीही तेल वापरले जाते, तर अॅक्रिलिक रंगांसाठी पाणी वापरले जाते. त्यामुळे, तैलरंगांच्या तुलनेत अॅक्रिलिक रंग लवकर सुकतात, त्यामुळे ते बुरशीला कमी बळी पडतात. तसेच पोस्टर रंग वापरण्यासाठी तुलनेने स्वस्त आहेत. त्यासाठी हाताने तयार केलेला कागद पाण्यात भिजवून वापरता येतो. असे केल्यास पोस्टर रंग कागदात पूर्णपणे शोषला जातो ज्यामुळे कागद सुकल्यावर बुरशीची वाढ रोखली जाते.

काळा आणि कोबाल्ट ब्लू हे रंग इतर रंगांच्या तुलनेत बुरशीला जास्त प्रमाणात बळी पडतात. याचे निश्चित कारण सांगता येणे कठीण आहे. कदाचित हे त्यांच्या रासायनिक संरचनेशी संबंधित असावे.

याचा अर्थ, चित्र पूर्णपणे सुकल्याची खात्री झाल्यावर ते साठवण्यासाठी सुरक्षित आहे, बरोबर?

अगदी तसेही नव्हे. कसे ते मी स्पष्ट करतो. साठवणुकीमधील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वायुवीजन – हवा खेळती राहणे. चित्रं हवेशीर खोलीत ठेवणे आवश्यक आहे. वायुवीजन नसेल तर बुरशीची समस्या उद्भवू शकते.

मागील बाजूस बुरशीचा प्रादुर्भाव झालेला कॅनव्हास (स्रोत: https://stellaartconservation.com)

ठीक आहे, पण बुरशी येते कुठून?

बुरशी हे सूक्ष्मजीव आहेत जे अतिसूक्ष्म आकाराच्या बीजाणूंद्वारे पसरतात. बुरशीचे बीजाणू धुळीच्या कणांमध्ये असू शकतात. बुरशीच्या बीजाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चित्रांच्या पृष्ठभागाची अधूनमधून साफसफाई करणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धूळ साफ केल्यास पावसाळ्यात नवीन भागात बुरशीचा प्रसार रोखण्यास मदत होते. बुरशीचे दोन प्रकार आहेत: पृष्ठभागावर वाढणारा आणि खोलवर वाढणारा. यापैकी पहिला प्रकार ओलसर सुती कापडाने सहज साफ करता येतो. दुसरा प्रकार स्वच्छ करणे मात्र कठीण असते आणि त्यामुळे चित्राचे नुकसान होऊ शकते. असे झाले तर मात्र त्या चित्राचे Restoration करावे लागते, ती एक मोठी प्रक्रिया असते.

चित्र पूर्णपणे वाळवले आणि व्यवस्थित साफ केले की, योग्य साठवणीसाठी ते प्लास्टिकने झाकून ठेवले तर चांगले राहील ना? त्यामुळे धूळ आणि ओलावा देखील टाळेल!

पुन्हा एकदा सांगतो, नाही. चित्रापासून धूळ दूर ठेवण्यासाठी प्लास्टिकमध्ये गुंडाळणे हा एक चांगला मार्ग आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु चित्रांची साठवणूक करण्याची  ही काही चांगली पद्धत नाही. कारण त्यात चित्रांच्या अवतीभोवती हवा खेळती राहत नाही. त्यामुळे जर हवेत आर्द्रता जास्त असेल आणि बुरशीचे बीजाणू तिथे आधीपासूनच असतील चित्रांभोवती गुंडाळलेल्या प्लास्टिकच्या आत बुरशीची वाढ होऊ शकते. त्याऐवजी, चित्रं झाकण्यासाठी पातळ सुती कापड वापरता येते, ज्यामुळे वायुवीजन होऊ शकते, आणि बुरशी लागत नाही.

A well-preserved canvas (Private collection)

एक चांगला जतन केलेला कॅनव्हास (खाजगी संग्रह)

याचा अर्थ, वाळवणे, साफ करणे आणि कापडात गुंडाळणे या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एवढेच ना?

नाही, एवढेच नाही. चित्र ज्या पद्धतीने ठेवली जाते त्याचाही ते किती चांगल्या अवस्थेत टिकून राहते त्यावर परिणाम होतो. चित्रं साठवण्याची एक पद्धत म्हणजे त्यांना स्ट्रेचर फ्रेमवर लावून ताणणे आणि नंतर त्यांना पातळ सुती कापडाने झाकणे किंवा कोरड्या जागी उघडे ठेवणे. दुसरी पद्धत म्हणजे चित्रं रोल किंवा गोल गुंडाळी करणे आणि झाकून ठेवणे. स्ट्रेच केलेल्यापेक्षा गुंडाळलेलं चित्र जास्त चांगलं सुरक्षित राहतं कारण त्याचा पृष्ठभाग पूर्णपणे झाकलेला असतो. परंतु गुंडाळी करताना कॅनव्हासला घड्या पडू नयेत याची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे, अन्यथा अशा घड्यांमुळे रंगवलेल्या पृष्ठभागाचे नुकसान होऊ शकते. मात्र या दोन्ही प्रकारांमध्ये चित्र रंगवून पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे कोरडे झालेले असणे आवश्यक आहे.

यावरून मला लक्षात येतंय की कलाकारांनीही चित्र काढताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांची चित्रे नंतर चांगली टिकून राहतील. बरोबर ना?

होय, अगदी बरोबर. कलाकाराने कोणती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल बोलूया. खरं तर याची सुरुवात कॅनव्हासपासून होते, कारण कॅनव्हास म्हणजे कापूस आहे जो जैविक घटक आहे. जेव्हा एखादा कलाकार कॅनव्हास रोल वापरतो तेव्हा वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे वाळलेला आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. नुकत्याच तयार केलेल्या कॅनव्हास रोलमध्ये ओलावा असू शकतो, जो कॅनव्हास निर्मिती करताना केलेल्या प्राइमिंग प्रक्रियेतून येतो. नवीन विकत घेतलेला कॅनव्हास रोल वापरण्यापूर्वी काही दिवस उघडून ठेवावा, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल. पेंटिंग करताना सुरुवातीला कॅनव्हास प्राइमिंगसाठी टेक्सचर व्हाइट किंवा गेसो वापरला जातो. असे प्राइमिंग केल्यानंतर प्रत्यक्ष रंगवायला सुरू करण्यापूर्वी ते प्राइमिंग पुरेसे कोरडे होईपर्यंत थांबणे आवश्यक आहे.

हे नियम सर्वत्र लागू होतात, बरोबर?

प्रत्येक ठिकाणी एकसारखे नाही लागू होत. चित्रांच्या साठवणीवर ते कुठे आहे त्या ठिकाणाचा मोठा प्रभाव पडतो. कारण ठिकाणानुसार हवामान बदलते. मुंबई हे समुद्रकिनारपट्टीलगतचे शहर असल्याने, तिथे संपूर्ण वर्षभर भरपूर आर्द्रता असते, तर दिल्लीमध्ये मुंबईच्या तुलनेने कमी आर्द्रता असते. एखाद्या पृष्ठभागावर बुरशीचे बीजाणू असले तरीही कोरडे हवामान बुरशीची वाढ रोखेल. त्याचप्रमाणे तापमानाचा बुरशीच्या वाढीवर निश्चित परिणाम होतो. सर्वसाधारणपणे, साठवणुकीमध्ये कमी तापमानात चित्रांचे चांगले संरक्षण होते आणि बुरशीची वाढ कमी होते. मुंबईसारख्या किनारपट्टीच्या ठिकाणी, समुद्राच्या जवळ असणे देखील चित्रांची देखभाल करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर ते ठिकाण समुद्रकिनाऱ्यालगत असेल, तर चित्रांवर क्षारांचा पांढरा थर साचतो, जो समुद्राकडच्या वाऱ्याने येतो. अशा वेळी केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर अधूनमधून साफसफाई करणे आवश्यक असते.

समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामधून येणाऱ्या मिठाचा उल्लेख आपण केला. त्यावरून प्रश्न पडतो, चित्र काढताना वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या गुणवत्तेचा चित्राच्या साठवणुकीवर काही परिणाम होतो का?

चित्र काढताना पाणी वापरताना क्षारयुक्त किंवा जड पाण्यात असलेले कोणतेही अतिरिक्त क्षार टाळले पाहिजेत. पण त्यासाठी चित्र काढताना डिस्टिल्ड वॉटर वापरावे असा माझा आग्रह नाही. थोडक्यात, सामान्यत: पिण्याच्या दर्जाचे पाणी असावे.

हे सगळे सोपे करण्यासाठी काही आधुनिक साहित्य किंवा पद्धती उपलब्ध आहेत का?

अँटी-फंगस उपचार केलेले, आयात केलेले आणि भारतीय बनवाटीचे कॅनव्हास बाजारात उपलब्ध आहेत. यांवर मागील बाजूने पिवळ्या रंगाचे रासायनिक आवरण असते. परंतु मी पाहिले आहे की अशा प्रकारचे कॅनव्हासदेखील भारतीय हवामानात विशेषतः किनारपट्टीच्या ठिकाणी बुरशीला बळी पडू शकतात. कोरियन शास्त्रज्ञांनी चित्रांना बुरशी लागू नये यासाठी व्यापक प्रमाणात संशोधन केले आहे. तरीही, विशेषत: समुद्रकिनारी साठवलेल्या चित्रांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही पूर्ण भरवशाची आधुनिक पद्धत उपलब्ध नाही.

पेंटिंगच्या पृष्ठभागावर तडे जाणे किंवा फ्लेक होण्याची संभाव्य कारणे कोणती?

प्रामुख्याने, जर रंग जाडसर असेल आणि साठवणुकीपूर्वी पूर्णपणे वाळलेला नसेल तर तडे जाण्याची शक्यता असते. तसेच, काहीवेळा काही कलाकार विशिष्ट दृश्य परिणाम साधण्यासाठी विविध प्रकारच्या रंगांचे दुहेरी किंवा अनेक थर वापरतात. जसे की आधी ऍक्रेलिक व त्यावर तैलरंग इत्यादि. अशा परिस्थितीत, दुसरा थर लावण्यापूर्वी जर पहिला थर पूर्णपणे वाळला नाही, तर काही ओलावा मधेच अडकून नंतर समस्या निर्माण होऊ शकते. तैलचित्रांच्या बाबतीत तडे जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे रंग पातळ करण्यासाठी टर्पेन्टाइनचा जास्त वापर. तेल आणि टर्पेन्टाइनचे गुणोत्तर योग्य राखणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

जुन्या काळात चित्रांचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी शिळ्या पावाचा वापर केला जात असे, हे खरे आहे का?

चित्रांचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी कापलेला बटाटा किंवा पाव वापरणे यासारख्या काही जुन्या पद्धती आहेत. परंतु सध्याच्या काळात रंगसाहित्य आणि कॅनव्हास बनविण्याची प्रक्रिया बदलली असल्याने याची शिफारस करता येत नाही. तसे तर माणसाची लाळदेखील बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करते असे मानले जाते, परंतु संपूर्ण चित्रावर लाळ लावणे अगदीच अव्यवहार्य आहे. पावाच्या वापराबाबत बोलायचे झाले तर, पाव चित्राच्या पृष्ठभागावर घासल्याने नुकसान होण्याची शक्यता असते. कारण तसे करताना पावाचे बारीक कण चित्राच्या पृष्ठभागावर चिकटतात आणि लवकरच त्यांना बुरशी लागते. त्यामुळे अशा जुन्या पद्धती सोडून दिलेले बरे.

सरतेशेवटी, चित्रं कोरडी आणि हवेशीर जागी ठेवणे ही दीर्घकालीन साठवणुकीची गुरुकिल्ली आहे. यामध्ये साठवणुकीचे ठिकाण कुठले आहे यामुळेही मोठा फरक पडतो. वासुदेव गायतोंडे मुंबई सोडून दिल्लीला गेले त्यामागे हेच कारण असेल का, असा प्रश्न कधीकधी मला पडतो. माझे स्टुडिओ अपार्टमेंट मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील एका ओढ्यालगत आहे. तिथे मला मुंबईच्या पावसाचा आनंद मिळतो आणि मला हे ठिकाण खूप आवडते; मला ते बदलायचे नाही. गेली अनेक वर्षे इथे राहून मी चित्र काढण्यापासून अधूनमधून साफसफाईपर्यंत आणि दीर्घकाळ साठवणुकीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात आवश्यक ती सगळी खबरदारी घ्यायला शिकलो आहे.

आपल्या ज्ञानाचा हा खजिना चिन्हच्या वाचकांसाठी खुला केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

मला खात्री आहे की आमचे वाचक यातून बरेच काही शिकले असतील!

——

अशा प्रकारे ज्येष्ठ चित्रकार प्रकाश वाघमारे यांच्याशी विनील भुर्के यांनी संवाद साधला.

प्रकाश वाघमारे हे जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि मुंबईस्थित ज्येष्ठ कलाकार आहेत. स्वतंत्र व्यावसायिक चित्रकार म्हणून तीन दशकांहून अधिक अनुभव त्यांच्याकडे आहे.

——

अस्वीकरण: या लेखात वापरलेली छायाचित्रे मूळ स्त्रोतांकडून केवळ प्रातिनिधिक हेतूने पुनरुत्पादित केली गेली आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.