No products in the cart.
सांभाळ रे विश्वनाथा… जेजेला!
परवा रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली जे जे स्कूल ऑफ आर्टची सांगितलेली महती ऐकून जे कुणी धन्य जाहले असतील त्यांच्यासाठी हा विशेष लेख. जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या जागतिक प्रसिद्धी लाभलेल्या संस्थेचा कारभार आज कशा आणि किती घटिया पद्धतीनं चालवला जातो आहे याची बित्तंबातमी पुराव्यानिशी देणारा ! या लेखात व्यक्त केलेल्या शक्यता संबंधितांनी जे जे संदर्भात जागरूक राहावं यासाठी केलेल्या आहेत. एरवी जे जे संदर्भात अशा कुठल्याही गोष्टींची स्वप्नात देखील कल्पना करणं जेजेशी संबंधितांना केवळ अशक्य आहे. त्या वाचून कुणाच्या जर भावना दुखावल्या तर त्यासाठी आम्ही आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
नुकत्याच गेल्या आठवड्यात चार रजा लागोपाठ आल्या. पहिली होती आंबेडकर जयंती, दुसरी होती गुड फ्रायडे, तिसरी होती हनुमान जयंती, पण त्या दिवशी शनिवार असल्यानं जे जे स्कूल ऑफ आर्टला रजा होती आणि रविवारी तर सारं बंदच असतं. या चार दिवसांच्या सुट्ट्यांची पर्वणी साधून जेजेचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे आपल्या पत्नी समवेत दिल्लीला गेले. खोटं वाटतं तर त्यांचं फेसबुक पेज पहा ! ललित कला अकादमीचं प्रदर्शन पाहून ते पुढे आग्र्याला देखील गेले ताजमहाल पाहायला. खोटं वाटतं तर त्यांचं अकाउंट उघडून पहा, ताज समोर काढलेला फोटो त्यांनी फेसबुक अकाउंटच्या कव्हरला शेयर केलाय !
साहजिकच आहे प्रा.साबळे हे स्वतः चित्रकार आहेत. अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयातून त्यांनी आपला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मग पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला त्यांचं कर्तृत्व एवढं भावलं की त्यांनी त्यांची नेमणूक थेट जेजेमध्येच करून टाकली. जेजेमध्ये ते रुजू झाले आणि अवघ्या पाच वर्षात त्यांनी एवढं अफाट कर्तृत्व दाखवलं की त्या पाच वर्षातच ते साहाय्यक अधिव्याख्याता पदावरून थेट प्राध्यापक झाले. प्राध्यापकाचे थेट एच.ओ.डी. झाले. एच.ओ.डी.चे थेट अधिष्ठाता कसे झाले कोणालाच कधी कळलं नाही. तिथून खरं तर ते महाराष्ट्राचे कला संचालकच व्हायचे, पण तो पर्यंत महाराष्ट्राच्या शिक्षण सचिवादी अधिकाऱ्यांना किंचित का होईना जाग आली आणि ती नेमणूक आतापर्यंत राहिली ती राहिलीच !
अशा तऱ्हेने महाराष्ट्राच्या अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयातील महाराष्ट्रातल्या कुठल्यातरी एका खेड्यातून साधी जी डी आर्टची पदविका घेऊन आलेला तरुण १६५ वयाच्या जेजेसारख्या कला महाविद्यालयात, जेथे मुंबई विद्यापिठासारखे विद्यापीठ पदविका नव्हे तर पदवी देते तेथे शिक्षणदानाचे पवित्र कार्य करू लागला. त्यांच्या या अफाट कर्तृत्वानं जेजेचा हा ऐतिहासिक परिसर अक्षरशः थक्क झाला. कला संचालनालय आणि महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षण खात्यानं सोयी-सुविधा आणि सवलतींचा त्यांच्यावर इतका वर्षाव केला की काही विचारू नका.
आता उदाहरणार्थ परवाचंच बघा, मोजून चार दिवस सलग रजा आल्यावर साबळेसाहेब आपल्या पत्नीसह दिल्लीला ललित कला अकादमीला चित्र प्रदर्शन पाहावयास रवाना झाले. आता आलोच आहोत दिल्लीत तर आग्र्याला का जाऊ नये ? अनायासे पौर्णिमेच्या चांदण्यात देखील ताज बघता येईल अशा रम्य विचारानं ते आग्र्याला देखील रवाना झाले.
साबळेसाहेबांचं भलं झालेलं मात्र अनेकांना बघवत नाही, ते मग त्यात सारखी काहीना काही खुस्पटं काढत राहतात की उदाहरणार्थ साबळेसाहेब सततच फिरतीवर असतात, शासकीय कामांमध्ये ते इतके व्यग्र असतात की त्यांना रजेचा साधा अर्ज लिहायला देखील वेळ नसतो. खरं तर त्यांनी हेडक्वार्टर सोडताना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची म्हणजेच महाराष्ट्राच्या कला संचालकांची रीतसर लेखी परवानगी घ्यायची असते, पण बहुदा कला संचालकपदी महाराष्ट्र शासनाने प्रभारी व्यक्तीची नेमणूक केली असल्यामुळं. ‘आपण काय या परिसरातले कायमस्वरूपी मोठे वरिष्ठ अधिकारी आहोत !’ या भावनेनं ते बहुदा कला संचालकांची रीतसर परवानगी घेणं टाळत असावे. या संदर्भात प्रभारी कला संचालकांनी देखील त्यांना रीतसर पत्र देऊन विचारणा केली, पण साबळेसाहेबांनी ती पत्रं देखील केराच्या टोपलीत टाकून देऊन आपण कोणाला जुमानत नाही हे कला संचालकांना दाखवून दिलं.
पुढं काय ? काहीच नाही झालं. आता काल परवा साबळेसाहेब कुटुंबियांसह आधी दिल्लीला, मग आग्र्याला गेले तो काही त्यांचा शासकीय दौरा नव्हता, खासगी दौरा होता. त्यामुळे त्यांनी कला संचालकांची रीतसर परवानगी घेणं गरजेचंच होतं. केवळ गरजेचं नव्हे तर नियमानुसार ते करावयासच हवं होतं. हे झालं त्यांचं जाण्यायेण्याबद्दल, पण पुढे तर त्यांनी आणखी एका नियमाचं उल्लंघन केलं ते म्हणजे आपण जर हेडक्वार्टर सोडणार असू तर शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या कामाचा चार्ज आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्याला द्यायचा असतो, पण साबळेसाहेबांनी या नियमांकडे देखील दुर्लक्ष केलं. आता तुम्ही म्हणाल, चार दिवस संस्थेला सुट्टीच होती तर त्यांनी का बरं चार्ज कुणाकडे द्यायचा ? तर या प्रश्नाचं उत्तर असं की जरी चार दिवस सुट्टी जाहीर केली असली तरी जे जे स्कूल ऑफ आर्टची वास्तू या चारही दिवशी उघडी होती. मुख्य इमारतीतील पहिल्या मजल्यावर एमएफएची १५-२० मुले काम करत होती. इतकंच नाही तर आर्ट अँड क्राफ्ट इमारतीतील टेक्सटाईलच्या वर्गात १५-१६ मुले काम करत होती. याचा अर्थ जेजेच्या दोन्ही इमारती सुट्टीच्या काळात देखील उघड्या होत्या. हे कमी झालं म्हणून की काय, जेजेमधलं रेस्टोरेशनचं काम करणारी लोकं देखील इमारतीत मुक्तपणे वावरत होती आणि इमारतीचा चार्ज कोणाच्या हातात होता, तर एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या !
१६५ वयाच्या या वास्तूत जेजेचा समग्र इतिहास दडलेला आहे. माजी विद्यार्थ्यांची, जे नंतरच्या इतिहासात मोठे चित्रकार म्हणून नावाजले गेले त्यांची आज एक एक कोटी रुपयांपासून तीस पस्तीस कोटी रुपयांपर्यंत किंमत होऊ शकेल अशी अक्षरशः हजारो चित्र जेजेच्या संग्रहात आहेत आणि तो सारा संग्रह या वास्तुतच ठेवलेला आहे. बाकी मशीनरी, ऐतिहासिक वस्तू, अँटिक्स यांच्याविषयी काय बोलावे ? आणि या साऱ्याची सर्व जबाबदारी जेजेच्या अधिष्ठात्यावर असते. त्यांनी ते पाहावं, त्यांच्या डोळ्यासमोर ते सतत राहावं, त्यांनी त्या वस्तूची काळजी घ्यावी यासाठीच तर जेजे कॅम्पसमध्ये डीनचे बंगलो बांधण्यात आले. त्या बांधणाऱ्या इंग्रजांनी त्या काळात स्वप्नात देखील कल्पना केली नसेल, नंतरचे म्हणजे १५० वर्षानंतरचे आचरट, बेअक्कल, मूर्ख, गाढव, नेटिव्ह अधिकारी आणि मंत्री तिथं त्या ऐतिहासिक जागेत वस्तू संग्रहालय उभे करण्याची भाषा करतील. इंग्रजांनी ते बंगले उभारले ते मोठी दूरदृष्टी दाखवून. त्यांना ठाऊक होतं त्या वास्तूत पुढं जे काही ठेवलं जाणार आहे आणि जगाच्या बाजारात त्यांची किंमत खूप मोठी असणार आहे !
अर्थात साबळेसाहेबांना जेजेची वैभवशाली परंपरा ठाऊक असण्याची मुळीच शक्यता नाही, कारण ते पुण्यातल्या अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयातून इथे येऊन रुजू झाले. बरं आल्यानंतर हे समजून घ्यायला तरी हवं होतं, पण त्यांना त्याचं महत्व कधी कळलंच नसावं. त्यामुळेच ते जेजेत रुजू झाल्यापासून खासगी किंवा सरकारी काम काढून फिरतीवर जातात. जाताना कुणाही जबाबदार व्यक्तीकडे चार्ज देत नाहीत. नाही म्हणायला एकदा दोनदा नाईलाजास्तव दिला होता, पण तो देखील कुणा तरी टेम्पररी किंवा कंत्राटावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या हातात. गेल्या १५-२० वर्षात त्यांनी आपल्यापेक्षा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कुणाही कायमस्वरूपी शिक्षकाच्या हातात कधीच चार्ज दिला नाही ही वस्तुस्थिती आहे. परवा ही तसेच झाले, दिल्लीला देखील ते तसेच गेले. त्यांनी कोणाला कळवलं नाही किंवा कोणाची परवानगी देखील घेतली नाही.
समजा ते नसताना जर इमारतीत एखादी शॉर्टसर्किटची घटना घडली असती आणि इमारतीला आग लागली असती किंवा एखाद्या फर्नेसमध्ये स्फोट झाला असता किंवा काही समाजकंटक इमारतीत घुसले, जसे मागे एकदा एका कंत्राटी शिक्षकाला शिवसेनेच्या महिला विभागाने कपडे काढून बडवले होते, तसे झाले असते तर ? झालंच तर कसाब प्रकरण देखील अद्याप आपण विसरलो नाहीत. कसाब त्यावेळी जेजेच्या इमारतीत घुसू शकला नव्हता, पण अशा १५० वर्षांचा संस्थेच्या अशा निर्नायकी अवस्थेत कसाबसारखा एखादा दहशवादी शिरला तर कोण काय करणार आहे ?
साबळेसाहेबांना असे प्रश्न विचारण्यात अर्थच नाही कारण त्यांना त्याचे गांभीर्य कळले असते तर ते असे हेड क्वार्टर सोडून बेजबाबदारपणे कधीच गेले नसते. आश्चर्य वाटते ते कलासंचालकांचे ! त्यांनी या संदर्भात साबळेंना कधीच जाब विचारला नाही आणि समजा विचारला असेल आणि त्यावर साबळे यांनी काहीच उत्तर दिलं नसेल तर शिक्षण सचिवांकडे या बाबत काही तक्रार केली होती का ? आणि केली असेल तर शिक्षण सचिवांनी यावर काही कारवाई केली का ? का यावर काहीच कारवाई करू नये असे आदेश महाराष्ट्र मंत्री मंडळातील कोणा ज्येष्ठ मंत्र्याने शिक्षण सचिवांना दिले आहेत.
त्या ज्येष्ठ मंत्र्याने मागे अकलेचे तारे तोडले होते की, ‘शिक्षण देणं हे शासनाचे काम नाही !’ आणि दुसरं भयंकर विधान दिलं होतं ते, ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद पडलं तर कोणाचं काय बिघडणार आहे ?’ ही असली बेअक्कल विधान करणाऱ्या ज्येष्ठ मंत्रीसाहेबांना सध्याचा उच्च शिक्षण मंत्रीसाहेबांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा किस्सा सांगावा किंवा आपल्या रत्नागिरीच्या भाषणाचा व्हिडीओ पाठवावा. म्हणजे त्यांना जेजेचे महत्व कळेल.
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना आमचा एकच प्रश्न आहे, ‘आता तरी यावर कारवाई करणार का ? का नेहमी प्रमाणे काही तरी भयंकर घटना घडल्यावर जागे होणार ?’ उच्च शिक्षण मंत्र्यांना जेजेचं खूप काहीतरी भलं करायचंय ना ? तर त्यांनी या साऱ्याची चौकशी लावावी आणि जे दोषी ठरतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. साबळे यांनी आतापर्यंत सरकारकडून खूप सोयीसवलती घेतल्या आहेत ( त्याविषयी वृत्तपत्रात खूप काही आलेलेच आहे ), कुणालाही ते जुमानासे झाले आहेत. इतके की, त्यांचे वरिष्ठ असलेल्या कलासंचालकांना देखील ते फाट्यावर मारू लागले आहेत. १६५ वर्षाच्या कला महाविद्यालयातले कुठलेच नियम ते पाळू इच्छित नाही. ‘मी म्हणेल तो कायदा आणि म्हणेल तो नियम’, अशी त्यांनी जेजेची अवस्था करून टाकली आहे.
एकच उदाहरण आम्ही देतो, कुठल्याही आस्थापनांमध्ये उपस्थिती नोंदवायची प्रथा असते. हल्ली तर काही ठिकाणी यंत्रांच्या साहाय्यानं नोंदवली जाते, पण इथं मात्र साबळेसाहेब साऱ्याला अपवाद आहेत. मस्टरवर देखील ते सह्या करत नाहीत. बाकी सगळ्यांच्या सह्या घेतल्या जातात, पण साबळे साहेब याला अपवाद आहेत. काय साबळे साहेब आकाशातून पडलेत ? ही काय चेष्टा चाललीय ? जे जे स्कूल ऑफ आर्टची अक्षरशः जिल्ह्याची प्राथमिक शाळा करून टाकली यांनी ! ‘चिन्ह’नं तर आता ठरवलंय की आता हात धुवून या साऱ्यांच्या मागे लागायचं. गेले तीन चार महिने आम्ही पुरावेच गोळा करत होतो. आता कुणाचीच खैर नाही, हे आता सर्वांनीच लक्षात ठेवावं. तूर्त इतकेच !
ला.ल. कट्टावाला
वि.सू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी लिहिलेलं अनावृत्त पत्र लवकरच वाचा !
Related
Please login to join discussion