Features

ग्रेस आणि कला आस्वाद !

काही दिवसांपूर्वी आपण चिन्हवर चं. प्र. देशपांडे यांचा चित्र कळणे म्हणजे काय हा लेख प्रकाशित केला होता. या लेखावर प्रतोद कर्णिक यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून दीर्घ प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत जे विचार मांडले होते त्यातील आशय वाचून हा स्वतंत्र लेख होईल असे वाटले. त्यामुळे हा अनुभव स्वतंत्र लेखस्वरुपात देत आहोत. प्रतोद कर्णिक यांनी कला आस्वादाबद्दल महत्वाचे मुद्दे या लेखात मांडले आहेत. विशेष म्हणजे कवी ग्रेस यांनी कर्णिक यांच्यासोबत जी चर्चा केली ती देखील या लेखात वाचायला मिळेल.

चं. प्र. देशपांडे सरांची मतं तीन वेळा वाचून त्यावर विचार केला आणि आता व्यक्त होत आहे.
मुळात मी प्र. चं., सर, चं. प्र. तेवढंच काय ते साम्य. बाकी कहां राजा भोज… असो.
पण मुळात या विषयालाआपण सुरवात केलीत, त्याबद्दल देशपांडे सर, आपले मन:पूर्वक आभार.

मी सरांच्या व्यक्त होण्याशी पूर्ण सहमत आहे. जसं ज्यांच्यावर “लेखक”, हा शिक्का बसलाय त्यांनीच लिहावं आणि त्यांच्या लेखनावर फक्त तज्ञांनीच / समीक्षकांनीच व्यक्त व्हावं असं नसावं, म्हणजे असू नये.

जो जे वांछील तो ते लिहो, अगदी तसंच कुणाच्याही चित्रावर आपलं मत द्यायचा प्रत्येकाला अथिकार आहे. त्यासाठी तज्ञ असण्याचीच आवश्यकता नाही. ज्याला जसं वाटेल तसं व्यक्त व्हावं. फक्त सामाजिक बंधन पाळून शब्द वापरावेत इतकंच . (हे आजकालच्या सो कॉल्ड, सोशल मिडिया भोवती घोटाळणाऱ्या ट्रोलर्ससाठी)

असं व्यक्त झाल्यावर दोन गोष्टी होतात.

एक तर एखादी कलाकृती पाहून आपल्या मनात उमटणाऱ्या विचार तरंगांना मोकळी वाट करून दिल्याने, आपल्याला समाधान तर मिळतंच. दुसरी अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर इतरांकडूनही मत प्रदर्शन व्हायला सुरुवात होते. आणि या मंथनातून समाजाचा त्या कलाकृतीकडे पहाण्याचा दृष्टिकोन त्या कलाकृतीच्या निर्मात्याला समजतो. आणि अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मंथनातून, चर्चांमधून सामान्य माणसं म्हणजे जे कलाकार नाहीत, त्यांनाही अमूर्त कला समजायला मदत होते, अशा मंथनांनंतर कलेचा आस्वाद घेताना ते जास्त चांगल्या प्रकारे नवनवीन कलाकृतीं समजून घेऊ शकतील आणि  त्यांचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतील.

मुळात आपल्याकडे, उपयोजित कला ही समाजाला काही समजावणे किंवा विकणे यासाठी असल्याने तिच्या निर्मितीत प्रेक्षक, ग्राहक हाच केंद्रबिंदू असतो. या उलट फाईन आर्ट किंवा पेंटिंग हे फक्त आणि फक्त कलाकाराचं एक्सप्रेशन, व्यक्त होणं असतं किंवा असावं. पण हे जितकं सत्य आहे त्याचबरोबर, यामुळे सर्वसामान्य माणसांसाठी ही कला ही दुर्बोध, आकलना पलीकडची असंच फक्त समाज मनावर  दृढ झालं आहे.

यामुळे पेंटिंग पासून सर्वसामान्य रसिक हा बराच लांब राहिला आहे.

पेंटिंग हे भोवताली, समाजात घडणाऱ्या घटनांवरची अभिव्यक्ती असते, अगदी कुठलंही. मग त्यापासून समाज लांब राहून कसं चालेल ?

अशा वेळी सगळा समाज या पासून लांब आणि फक्त मुठभर तज्ञ किंवा कलाकार हेच त्यावर बोलणार, हे योग्य नाही. सर्वसामान्य रसिक यावर बोलायला लागला पाहिजे.

यातून कलाकारांना पण नवे विषय अथवा प्रेरणा मिळू शकेल आणि मुळात दुर्बोधतेचा शिक्का बसलेली अमूर्त कला समजण्यासाठी त्याचा खरा रसास्वाद घेण्यासाठी, त्यातील मर्म समजण्यासाठी सामान्य रसिकांना मोलाची मदत होइल आणि आत्ता ही जी दरी आहे अमूर्त कला आणि समाज यांमधे, ती निश्चितच कमी होत जाईल.

व्यक्त तर जरुर व्हावं, पण उचलली जीभ…, असं व्यक्त होऊ नये. हे मी सगळ्यांसाठी सांगतोय. देशपांडे सरांसाठी अजिबात नाही. प्रत्येकाला काय आवडलं, काय खटकलं ते जरुर व्यक्त व्हावं.

फक्त उगाचच अती चिकित्सा करत बसू नये, मग त्यातील अमूर्ततेचा गाभाच नष्ट होईल,इतकंच.

यावरुन एक आठवणं ताजी झाली. ती मला जे सांगायचं आहे, ते जास्त परिणामकारकपणे सांगेल, म्हणून इथे सांगतो आहे.

ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात कवी ग्रेस येणार आहेत असं मला समजलं. या गोष्टीला साधारण बारा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असावा. नक्की आठवत नाही. मी लोअर परळला जाहिरात एजन्सीत नोकरी करत होतो. जायची वेळ ठरलेली असे, यायची वेळ कधी रात्रीचे दहा, कधी मध्यरात्र. पण त्या दिवशी मी दुपारीच एजन्सीतून सुसाट सुटलो. घरी जाऊन कपडे बदलून थोडा सजधजके कार्यक्रम स्थळी पोहोचलो.

“संध्यापर्वातली वैष्णवी” या ग्रेस यांच्या कविता संग्रहाने आणि त्यावरील श्री. सुभाष अवचट सरांच्या अप्रतिम कव्हर डिझाईननेही मी पुरता झपाटलो होतो.

कार्यक्रम संपल्यावर मी ग्रेस यांना भेटलो. माझ्या हातात तो कविता संग्रह होताच. सही घेणं वगैरे यात मला काडीचा इंटरेस्ट नव्हता.

मी एक, एक करत विचारत सुटलो. म्हणजे या अमुक कवितेत आपण जे लिहिलयं, त्या नेमक्या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत असणारा अर्थ कवितेच्या जन्माच्या वेळी तुमच्या मनात काय होता ? वगैरे.

ते समोरच्या खुर्चीवर बसले. बाजूच्या एका खुर्चीवर बसण्याची मला खूण केली. मग मी सुटलोच. माझं पूर्ण विचारुन होईपर्यंत ते ऐकत होते. मुळात, जे मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, त्यावरुन हाही मला मोठा धक्का होता.

मग ते शांतपणे म्हणाले, मला तेव्हा काय अपेक्षीत होतं हे नाही महत्वाचं, वाचताना तुला काय वाटलं, जाणवलं ते महत्वाचं. मी व्यक्त झालो. मोकळा झालो. ते झालं माझं एक्सप्रेशन. वाचताना तुझं मन तुझ्याशी जसं व्यक्त झालं, जे तुला जाणवलं तेच तुझं एक्सप्रेशन.

जर मी तुला आत्ता, तेव्हा मला काय वाटलं, माझ्या मनात तेव्हा काय होतं, हे जर सांगायला लागलो, तर त्यातली अमूर्तता संपेल. मी एक उदाहरण बऱ्याचदा देतो, गाईचा डोळा म्हटलं की त्यातली करुणा मला पहिली जाणवते. पण तो डोळा तिकडून काढला आणि मी माझ्या तळव्यावर घेऊन तुला सांगायला लागलो, की माझ्या मनात किती करुणा दाटली आहे, तर त्या सांगण्याला अर्थ उरणार का ? ते बीभत्सच दिसणार. तो जिथे आहे तिथेच असताना मला जे वाटतं ते मला वाटू द्यावं, तुला करुणे ऐवजी त्यातला टपोरा पाणीदारपणा जास्त भावेल.

पॉल क्ले यांचे ‘फ्लॉवर मिथ’ हे ऍबस्ट्रॅक्ट चित्र.

मी माझ्या मनाला जे वाटेल तसा व्यक्त होईन, तू तुझ्या मनाला वाटेल तसा व्यक्त हो. त्यातच खरी गम्मत आहे. अन्यथा डॉक्टर जसं एक, एका अवयवाचं डिसेक्शन करतात तसं ते होईल. मूळ अमूर्तताच नष्ट होईल.

ही घटना, त्यातलं कवी ग्रेस यांचं भाष्य अमूर्त शब्दांबद्दल असलं, तरीही कुठल्याही कलेतील, प्रतिभेतील अमूर्ततेबद्दल बोलताना, व्यक्त होताना तंतोतंत लागू होते असं मला वाटतं.

आता आपल्या लक्षात येईल, माझं असं व्यक्त होत असताना, मला जे जाणवलं, वाटलं, आठवलं ते मी लिहीलं. आपल्यापैकी प्रत्येकजण आपलं मत जेव्हा व्यक्त करेल, तेव्हा ही नुसती चर्चा न रहाता, त्यातून बरच काही आपल्याला प्रत्येकाला मिळेल.

अगदी हीच गोष्ट अमूर्त कलेवर व्यक्त होण्याची आहे. सगळेच कलाकार आणि रसिक अमूर्त कलेवर व्यक्त होतील, तस तसं अमूर्त कलेच्या सौंदर्याचे एक, एक पदर नव्याने उलगडत जातील. अगदीं आपणा कलाकारांसाठीही आणि सामान्य रसिकांसाठी देखील.

*****
– प्रतोद कर्णिक, ठाणे.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.