No products in the cart.
उत्तम आणि मी! – १
नुकतंच ज्यांचं निधन झालं ते शिल्पकार उत्तम पाचारणे हे ‘चिन्ह‘चे संपादक सतीश नाईक यांचे जेजे स्कूलमधले सहाध्यायी. आपल्या सहाध्यायाला श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं सतीश नाईक यांनी जो कलावंतांमधील परस्पर नातेसंबंधांमधल्या ताण्याबाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे तो अनोखा ठरावा.
———
मालाडच्या रहेजा कॉम्प्लेक्समधील सचिनम इमारतीच्या तळमजल्यावरील छोटेखानी स्टुडिओत काचेच्या पेटीत ठेवलेला त्याचा निश्चल देह पाहिला आणि काही क्षण का होईना गलबलून आलं. त्याची जेजेत झालेली पहिली भेट इथपासून ते ३५ – ४० वर्षांपूर्वी तो जेव्हा बोरिवलीच्या रस्त्यांवरील झोपडीमधून त्या आलिशान इमारतीत राहावयास आला ते सारेच्या सारेच दिवस अगदी क्षणभरातच माझ्या नजरेसमोरुन अगदी झरकन सरकून गेले.
जे जे स्कूल ऑफ आर्ट. एलिमेंट्रीचा वर्ग. १९७६-७७ साल असेल. अनिल नाईकने वर्गात आलेल्या नव्या विद्यार्थ्यांची मला ओळख करुन दिली. हा उत्तम पाचारणे. नगरचा आहे. पुण्याहून आपल्या वर्गात शिकायला आला आहे. नमस्कार चमत्कार झाला. पण नंतर आठ दहा दिवसांनी त्याची भेट झाली ती तळमजल्यावरच्या शिल्पकला विभागात. ‘अरे वर्गात तर दिसत नाहीस आणि इथं काय करतोस?’ मी उत्तमला विचारलं. तर म्हणाला मी विषय बदलला आहे. पेंटिगऐवजी शिल्पकला हा विषय घेतला आहे. त्यानंतर मात्र मधल्या सुट्टीत किंवा शिल्पकला विभागात कधी गेलो तरच कधीमधी भेटी होऊ लागल्या. तसा तो तेव्हा कमीच बोलायचा. त्यामुळे फारसा संवाद असा व्हायचा नाही. शिकत असताना पहिल्याच वर्षीं राज्य कला प्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागात माझ्या चित्राला बक्षीस मिळालं. त्याच्याही शिल्पाला मिळालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा तसंच घडलं. पुन्हा दोघांना बक्षिसं. पण अशी बक्षिसं साजरी करण्याची ऐपत आणि पद्धत त्या काळात तरी प्रचलित नव्हती. त्यामुळे मधल्या सुट्टीत क्वचित हाय हॅलो वगैरे करण्यापलीकड़े आमचे संबंध कधी गेलेच नाहीत. शिक्षणाची तीन वर्षे तर अशीच गेली. फारसं काही घडलं नाही.
त्या काळात दिल्लीविषयी जेजेमध्ये खूपच आकर्षण होतं. म्हणजे ललित कला अकादमी, वार्षिक प्रदर्शन किंवा त्रिएनाले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन याविषयी सर्वानाच भयंकर उत्सुकता होती. साहजिकच जेजेमधून मोठ्या संख्येने घोळक्याघोळक्याने विद्यार्थी आणि शिक्षक दिल्लीत जात असत. बहुदा शेवटच्या वर्षाला असताना असंच त्रिएनाले, वार्षिक प्रदर्शन आणि कला मेळा इत्यादी ललित कलावाल्यानी एकाच महिन्यात आयोजित केला होता. आम्ही ठरवलं की ही संधी काही आपण सोडायची नाही. कुणी पुढाकार घेतला होता आता ४०-४२ वर्षानं काही आठवत नाही, पण मी, अनिल नाईक, श्रीराम खाडिलकर, उत्तम पाचारणे, श्रीकांत जाधव सर आणि नलिनी भागवत मॅडम असे सारे बहुदा दादर अमृतसर एक्स्प्रेसनं तीन साडेतीन दिवसाचा भयंकर प्रवास करुन अखेरीस दिल्लीत पोहोचलो होतो.
खूप छान अनुभव होता तो. ललित कलाच्या गेस्ट हाऊस समोरच्या किंवा बहावलपूर हाऊसच्या लॉनवर सायंकाळी अर्थातच चित्रकलेच्या (आणि अर्थातच स्वतःच्या) भवितव्याच्या संदर्भात आम्ही गप्पा मारत बसत असू. त्या काळात माझ्याकडे एक जुनाट सेकंड हॅन्ड कॅमेरा आला होता. त्यानं मी फोटो काढत होतो. त्या आठ दिवसाच्या मुक्कामात आम्ही अगदी आग्र्याच्या ताजमहालपर्यंत मजल मारली होती. पौर्णिमेच्या रात्री ताज पाहण्याचं आणि फोटोग्राफी करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. असंख्य फोटो त्या काळात मी काढले होते. त्यातले दोन फोटो मात्र तब्बल ३८ वर्षानंतर खूप गाजले. आताच्या भाषेत म्हणायचं तर चक्क व्हायरल झाले. ते फोटो होते ललित कला आणि बहावलपूर हाऊसच्या लॉनवर बसून आम्ही गप्पा मारत असतानाचे. त्यातल्या एका फोटोत तर प्रख्यात कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी देखील होते. उत्तम जेव्हा ललित कला अकादमीचा चेअरमन झाला तेव्हा त्याच्यावर काहीतरी लिहावे म्हणून संदर्भ शोधत असताना अचानक ते मला सापडले होते. आणि फेसबुकवर ते टाकताच अक्षरशः व्हायरल झाले होते. ललित कला परिसरातील लॉनवर आम्ही मुंबईकर गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मीच काय पण आमच्यापैकी अन्य कुणी – इतकंच काय पण खुद्द उत्तमनंदेखील कल्पना केली नसेल की आणखी ३८ वर्षानंतर आपण या ललित कला अकादमीचे चेअरमन होऊ. पण तो चमत्कार घडला होता. त्यामुळेच तब्बल ३८ वर्षांपूर्वी काढलेले ते फोटो व्हायरल झाले होते.
ते फोटो बहुदा उत्तमनं पाहिले असावेत. अचानक त्याच मला फोन आला. त्याची मुलगी परदेशात असते. बहुदा तिला भेटायला फ्रान्समध्ये गेला होता तो. तिथं त्या फोटोंविषयी त्याला कळलं असावं. किंवा व्हाट्सअपवर त्याला ते कुणीतरी पाठवले असावेत. अतिशय भावनिक होऊन तो फोनवर बोलत होता. त्याला ते फोटो हवे होते. आणि तो सारखा मला सांगत होता, “पुन्हा एकत्र येऊया. मोठं काम करूया” वगैरे. आणि मी त्याला सतत म्हणत होतो ‘पुन्हा’ हा शब्द का वापरतो आहेस? आपण कधीच एकत्र आलो नाही, आपण कधीच एकत्र काम केलं नाही, तरी देखील तू हा ‘पुन्हा’ शब्द पुनःपुन्हा का वापरतोयस? आता एकत्र येऊन काम करुया असं म्हण हवं तर. माझं मराठी जरा बरं आहे! हो नाही हो नाही करता करता अखेरीस त्यानं माझं म्हणणं मान्य केलं.
भारतात येऊन ललित कलाच्या चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारताच त्याचे मला वरचेवर फोन येऊ लागले. काही तरी एकत्र येऊन करू या म्हणून सांगणारे. पण मी मात्र त्याला ‘आता साठी ओलांडली आहे’ याची जाणीव करुन देऊ लागलो. पण तो काही थांबलाच नाही. सतत मला दिल्लीला बोलावू लागला. ललित कलाच्या राष्ट्रीय प्रदर्शनाच्या ज्युरीमध्ये मी यावं असा त्याचा आग्रह होता. आणि मी काही ना काही कारणं सांगून तो टाळत होतो. ललित कलावाल्यांची कार्यपद्धती मला चांगलीच ठाऊक असल्यानं १९९० सालापासून मी प्रदर्शनाच्या निमित्तानं दिल्लीला जाणंदेखील थांबवलं होतं. हे सारं त्याला मी त्याला सांगत होतो पण त्याला काही ते पटत नव्हतं. दोन वेळा तर ललित कलाच्या कार्यालयातून एका तरुणीचा देखील फोन आला होता की ‘ज्यूरीची मिटींग अमुक तारखेला आहे. कुठल्या फ्लाईटचं तिकीट बुक करु? याची विचारणा करणारा. ते फोन थोपवता थोपवता माझ्या अक्षरश: नाकी नऊ आले होते. ज्युरींमध्ये जायचं नाही हा माझा निर्णय योग्य होता हे नंतर माझ्या अगदी जवळच्या अनेक मित्रांनी आवर्जून कळवलं.
पहिला भाग समाप्त
सतीश नाईक
Related
Please login to join discussion