No products in the cart.
‘उत्तम’कथा – भाग ३
‘चिन्ह‘चे संपादक सतीश नाईक यांनी त्यांचे जेजे स्कूलमधले सहाध्यायी शिल्पकार उत्तम पाचारणे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं कलावंतांमधील परस्पर नातेसंबंधांमधल्या ताण्याबाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे तो अनोखा ठरावा. या लेख मालिकेचा हा तिसरा भाग.
———
या ज्येष्ठ कलावंतानंच अन्य तरुण कलावंताप्रमाणं उत्तमलाही नादी लावून सोसायटीच्या राजकारणात आमच्याविरुद्ध उभं केलं होतं. एरवी उत्तम आपलं काम बरं की आपण बरं अशा वृत्तीनं आपल्या कामात आणि जीवनाच्या संघर्षात मग्न होता. पण सोसायटीच्या राजकारणात उतरल्यावर मात्र त्यानं मोठ्या दणक्यात सुरुवात केली. उदाहरणार्थ सोसायटीच्या निवडणुकीत आम्हाला पाडण्यासाठी त्यानं त्याच्या पुण्यातल्या शिक्षकाचा उपयोग केला. त्या शिक्षकानं पुण्यातल्या चित्रकार आणि शिक्षकांसाठी खास एक बस केली आणि तो ती मतदानाच्या वेळी घेऊन मुंबईला आला. साहजिकच त्या निवडणुकीत आम्ही सारे पडलो हे वेगळं सांगावयास नकोच. सोसायटीच्या शताब्दी वर्षापर्यंतच्या ९-१० वर्षाच्या काळात आम्ही जी सोसायटी एका वेगळ्याच पातळीवर नेवून ठेवली होती ती त्या घटनेनंतर खाली यायला सुरुवात झाली. जहांगीरच्या समितीवर आपली माणसं घुसवणं, ललित कला अकादमी, सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात आपल्याच कलावंतांना पारितोषिक, शिष्यवृत्त्या, पुरस्कार वगैरे मिळवून देणं किंवा सोसायटीच्या प्रदर्शनात आपल्याच कलावंताची चित्र किंवा शिल्प विकणं किंवा विकून देणं यासारखे सारेच प्रकार सोसायटीत सुरु झाले. त्याविषयी अधिक लिहिण्याची ही जागा नव्हे. म्हणून आता आवरतं घेतो.
उत्तमचा तो शिक्षक नंतर लागलीच महाराष्ट्राचा कला संचालक झाला आणि कला संचालनालयाची पर्यायानं महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची वाताहत व्हायला सुरुवात झाली. कला संचालनालयात याच इसमानं भ्रष्टाचार आणला. संशयाचं वातावरण निर्माण केलं. पुण्यातल्या ज्या शिक्षकांच्या मदतीनं त्यानं सोसायटीची निवडणूक जिंकली होती त्या साऱ्याच शिक्षकांचं या माणसानं नंतर पद्धतशीरपणं खच्चीकरण केलं. त्यांच्या पदोन्नतीच्या संधी दवडल्या. त्यांना शिकवणं आणि जगणं नकोसं करुन टाकलं. पुण्यातल्या एका आमदारानं पुढाकार घेतला आणि हा सर्व भ्रष्टाचार विधानसभेत अगदी पुराव्यानिशी मांडला. दरम्यान मीदेखील या संदर्भात माझ्या लिखाणातून या साऱ्याच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. या साऱ्याचा परिणाम असा झाला की गृहमंत्र्यांनी त्या शिक्षकाच्या अटकेचे आदेशच जारी केले. आमच्या कार्यालयातल्या काही सहकारी पत्रकार मित्रांनी ही बातमी फोडली आणि मग उत्तमनं रातोरात आपल्या राजकीय संबंधांचा वापर करुन एका खासदाराच्या साहाय्यानं ही अटक थांबवली. इतकंच नाही तर माझ्या नाकावर टिच्चून या संदर्भात एक भलीथोरली ‘फेक न्यूज’ देखील त्याच वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन आणली. वृत्तपत्रातल्या बातम्यांनी सरकारवर दबाव येण्याचा तो काळ होता. साहजिकच सरकारनं ती कारवाई थांबवली आणि त्या संचालकाला मुक्तद्वार दिलं.
परिणामी महाराष्ट्रात एक वर्ष दोन वर्षात तब्बल पावणेदोनशे ते दोनशे विनाअनुदानित कला महाविद्यालयं सुरु झाली. आणि कोणे एके काळी संपूर्ण भारतात सर्वोच्च पदावर असलेलं महाराष्ट्राचं कला शिक्षण रसातळाला जाण्यास सुरुवात झाली. ही गोष्ट १९९६ सालातली. आज २८ वर्षानंतर तर ते पूर्णतः नामशेष झालं आहे. इतकं की कला संचालक पद भूषवण्यासाठी देखील या महाराष्ट्रात लायक माणूस मिळत नाही म्हणून इतर क्षेत्रातल्या भंपक आणि भ्रष्ट लोकांची नेमणूक सरकारला करावी लागते आहे. डॉ संतोष क्षीरसागर यांच्यासारख्या अत्यन्त हुशार आणि गुणवंत कलावंत अध्यापकाची आज जी अभूतपूर्व अशी कोंडी करुन टाकली गेली आहे ते उदाहरण डोळ्यासमोर आणा म्हणजे माझ्या बोलण्यातली आणि लिहिण्यातली सत्यता पडताळून पाहता येईल. अक्षरशः गुंडांच्या टोळ्या आज उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि कला संचालनालयात कार्यरत आहेत आणि त्यांच्यापुढं चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम मंत्र्यानंदेखील हात टेकले आहेत ही वस्तुस्थिती आहे.
खोटी बातमी छापणारा तो संपादक तर आता हयात नाही, पण ती बातमी लिहिणारे आणि तो सारा बनाव घडवून आणणारे पत्रकार मात्र हयात आहेत त्यांनी का आता “पापक्षालनार्थ” म्हणून तरी या संदर्भात लक्ष घालू नये? का ‘क्षीरसागर’ असल्यानं आपलं पुरोगामीत्व सिद्ध होणार नाही म्हणून त्यांना भीती वाटतेय? का पत्रकारिता सोडल्यामुळे काही करता येत नाही म्हणून सबब सांगावीशी वाटतेय? मीदेखील २३ वर्षांपूर्वी मेनस्ट्रीम पत्रकारिता सोडली पण जेजे स्कूल ऑफ आर्ट हा विषय काही सोडला नाही. तब्बल २३ वर्ष एकांडी शिलेदारी करीत आधी काही काळ वृत्तपत्र मग फेसबुक आणि सरतेशेवटी ‘चिन्ह आर्ट न्यूज’ द्वारे या साऱ्यांच्या मागे सातत्यानं हात धुवून लागलो, ती या विषयावर माझी नितांत निष्ठा होती म्हणूनच. पण तेव्हा मात्र तुम्ही माझी टर उडवायचा प्रयत्न केला होता. आज २८ वर्षानंतर तरी आपण किती मोठी घोडचुक करुन जेजे स्कूल ऑफ आर्ट सारखं १६६ वर्षाचं कला महाविद्यालय आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं कलाशिक्षण मरणपंथाला आणलं हे मान्य तरी करणार का? तितका तरी प्रामाणिकपणा तुमच्यात अजून उरलाय का?
या साऱ्याला उत्तम तर कारणीभूत होताच. पण ती बातमी लिहिणारा आणि ती छापणारा मूर्ख संपादकदेखील तितकाच कारणीभूत होता असं माझं ठाम मत होतं. आणि नंतरच्या माझ्या लेखनात मी ते वेळोवेळी अगदी स्पष्टपणे आणि नावानिशीवार मांडलं, पण त्यातल्या एकानेही माझं म्हणणं खोडून काढण्याचा साधा प्रयत्नदेखील केला नाही. नाही म्हणायला ज्यानं ती तद्दन खोटी बातमी दिली होती त्या पत्रकारानं नंतर प्रत्यक्ष भेटीत मला ‘सॉरी’ म्हटलं. पण व्हायचं ते नुकसान होऊनच गेलं होतं. आज जेजेसकट महाराष्ट्रातल्या साऱ्याच्या साऱ्या कला महाविद्यालयांची जी भीषण आणि महाभयानक अवस्था झाली आहे तिला सर्वार्थानंच ही घटना कारणीभूत आहे याची जाणीव त्या संपादकाला, त्या वार्ताहराला, आणि ती बातमी छापण्यात पुढाकार घेणाऱ्या अन्य पत्रकारांना होती / आहे किंवा काय याविषयी आता सांगता येणं अवघड आहे. पण उत्तमला मात्र मी ती करुन दिली होती. पण त्यासाठी जवळजवळ २२-२३ वर्षं जावी लागली.
पुढं काय झालं ते वाचा चौथ्या भागात …
सतीश नाईक
Related
Please login to join discussion