No products in the cart.
‘उत्तम’कथा – भाग ४
‘चिन्ह‘चे संपादक सतीश नाईक यांनी त्यांचे जेजे स्कूलमधले सहाध्यायी शिल्पकार उत्तम पाचारणे यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं कलावंतांमधील परस्पर नातेसंबंधांमधल्या ताण्याबाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे तो अनोखा ठरावा. या लेख मालिकेचा हा चौथा आणि शेवटचा भाग.
———
बहुदा २०१९ साल असावं. आणि अचानक उत्तमची ललित कला अकादमीच्या चेअरमन पदी निवड झाल्याची बातमी आली. साऱ्या कलाविश्वालाच आश्चर्याचा धक्का बसला. पण जे उत्तमला जवळून ओळखत होते त्यांना फारसं नवल वाटलं नाही. आम्ही ती बातमी दिली. त्या बातमीत मी ८०च्या दशकात त्रिनाले प्रदर्शन पाहावयास गेलो असता ललित कला अकादमीच्या गेस्ट हाऊस समोरच्या लॉनवर आम्ही सारे बसलो आहोत असा जो फोटो तेव्हा मी काढला होता तो टाकला. काही वेळातच तो फोटो कलाविश्वात हल्लीच्या भाषेत व्हायरल म्हणतात तसा झाला. अभिनंदनासाठी त्याला फोन केला तर तो लागेच ना. मग काही वेळानंतर त्याचाच फोन आला. तोपर्यंत मी प्रसिद्ध केलेल्या त्या दुर्मिळ फोटोची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली असावी. मला म्हणाला ‘शतीस’, माझ्या नावाचा उल्लेख बहुतेकदा तो असाच करायचा. ‘तू जे लिहिलं आहेस त्या बद्दल आभार, त्या फोटोची एक प्रत मला हवी आहे. देशील का? मी आता परदेशात आहे. मुलीकडे आलो आहे. चार्ज घ्यायला मला आता लगेचच भारतात यावं लागणार आहे. चार्ज घेतल्यावर तुझ्याशी सविस्तर बोलतो. मला तुझीही मदत लागणार आहे. पुन्हा एकत्र येऊन काहीतरी काम करु, वगैरे.’ त्यावर मी त्याला अडवलं, आपण एकत्र येऊन कधीच काम केलं नाही. आपण जेजेत असताना फक्त दिल्लीला एकत्र गेलो होतो. तो प्रवास आपण एकत्र केला पण एकत्र काम करण्याचा योग काही आला नाही, त्यामुळे तू जे पुन्हा एकत्र येऊन काम करू वगैरे म्हणतोस ना ते योग्य नाही. हा आता एकत्र येऊन काम करू म्हणालास तर ठीक आहे, पण आता मी पासष्टीत पोहोचलो आहे आता नव्यानं काही करणं केवळ अशक्य आहे. मी माझ्या नेहेमीच्या फटकळ पद्धतीनं त्याला थेट सांगून टाकलं. तर तो काही ऐकून घेईना. म्हणाला मी भारतात आलो का तुझ्याशी बोलतो.
आणि खरोखरच भारतात येताच ललित कलाच्या चेअरमनपदी विराजमान होताच त्यानं मला त्याच्या ऑफिसमधूनच पहिला फोन केला. त्यानंतर त्याचे मला सतत फोन येऊ लागले. फोनवर भरपूर बोलायचा, गप्पाच मारायचा. त्याचा फोन आला म्हणजे आता अर्ध्या तासाची तरी निश्चिंती हे मी समजून जायचो. तो खूप काही सांगत असे. ललित कला अकादमीच्या राजकारणाविषयी भरपूर काही बोलत असे. आपण आता काय करणार आहोत, पुढचे प्लॅन्स काय आहेत याविषयी अगदी भरभरून बोलत असे. ललित कला अकादमीचं प्रादेशिक केंद्र आता कुठल्याही परिस्थितीत मुंबईत करायचंच या भावनेनं तो कामाला लागला होता. त्याचं भारतभ्रमण प्रचंड वेगानं सुरु झालं होतं. आज कन्याकुमारीला तर उद्या अंदमानमध्ये, परवा दिल्लीत तर तेरवा केरळात असा पायाला भिंगरी बांधल्यागत तो भारतभर हिंडत होता. जेव्हा जेव्हा त्याचा फोन यायचा तेव्हा तेव्हा तो आपल्या भटकंतीविषयी आवर्जून सांगायचा. राष्ट्रपतींना कसा भेटलो? पंतप्रधानांची कशी भेट झाली? दिल्लीतले मंत्री कसे वागतात? साऱ्यांविषयी तो फोनवर अगदी भरभरून बोलायचा. मग हळूहळू तो आर्टिस्ट कॅम्पस् विषयी सांगू लागला. भारतभर त्यानं चिक्कार कॅम्पस् घेतले होते. विशेषतः आदिवासी कलेच्या संदर्भात त्यानं जे कॅम्पस् आयोजित केले होते त्यांचा विषय निघाला की त्याविषयी सांगावयास तो अधिक उत्साहित असे. मोठया प्रमाणावर तो हे सारे कार्यक्रम आयोजित करीत असे. त्यांचे फोटो तो मला आवर्जून पाठवत असे.
याच कालखंडात पुन्हा कोरोना लॉकडाऊन आला आणि काही काळ तो मुंबईतल्या घरात अडकून पडला. त्यावेळीच ‘चिन्ह’तर्फे मी फेसबुकवर ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमात कलावंताच्या लाईव्ह मुलाखती घेऊ लागलो होतो. तिसऱ्या का चौथ्या आठवड्यातच मी त्या कार्यक्रमात उत्तमला पाचारण केलं. तो कार्यक्रम फेसबुकवर मोठया प्रमाणावर पाहिला गेला असावा. फेसबुकवर खूपच प्रतिक्रियादेखील आल्या. त्यानंतर त्याच्या माझ्यात अधिकच संवाद होऊ लागला. आता तो ललित कला अकादमीचं काम करताना काय काय अडचणी येत आहेत याविषयी मला अधिक मोकळेपणानं सांगू लागला. अधनंमधनं हे सारं लिहिण्यासाठी नाही असंही मला बजावू लागला. संभाषणात जेजेचा विषय निघाला का तो मला वारंवार सांगायचा की ‘जेजे तुझ्यामुळे वाचलं आहे, तू तो विषय लावून धरून वारंवार लिहिलं नसतंस तर काय झालं असतं कुणास ठाऊक, वगैरेदेखील तो वारंवार मोकळेपणानं सांगून टाकत असे. ‘तुझ्यामुळे मला ही संधी मिळाली’ असं मी अतिशय कुजकटपणे बोलून दाखवत असे. त्यावर तो नुसताच हसत असे. तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर आला होता. शिक्षण घेताना त्याला अनेक शिक्षकांनी मदत केली होती, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी म्हणून त्यानं त्या शिक्षकाला अटकेपासून संरक्षण मिळवून दिलं होतं. तो शिक्षक इतका उलट्या काळजाचा होता की त्या घटनेतून बोध घेऊन काहीतरी चांगले घडवण्याऐवजी त्यानं महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात सुमारे २०० विनाअनुदानित कला महाविद्यालयं उभी करुन संपूर्ण कलाशिक्षण व्यवस्थाच खिळखिळी करुन टाकली. ते दुखणं आता तब्बल दोन दशकानंतर पार विकोपाला गेलं आहे. महाराष्ट्र सरकारनं आता वेळीच पावलं उचलली नाहीत तर महाराष्ट्रातून कला शिक्षण पूर्णतः संपून जाणार हे निश्चित. आज नालंदा – तक्षशिला विद्यापीठासंदर्भात आपण जे बोलतो तेच उद्या जेजे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय यांच्या बाबतीत बोलले गेले तर आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे. त्या आधी आपले डोळे मिटावेत हीच आता इच्छा आहे. असो! खूप दिवस, म्हणजे जवळजवळ २८ वर्षे हे सारे मनात खदखदत होते म्हणून हे सारे या निमित्ताने लिहिले, इतकेच.
तसा उत्तम अत्यंत प्रामाणिक होता. त्याची चूक दाखवून दिली की तो मोकळेपणानं मान्य करायचा. एखाद्याला शब्द दिला की तो पूर्ण करण्यासाठी तो मनापासून प्रयत्न करायचा. त्याचाच गैरफायदा त्याच्या अनेक शिक्षकांनी (जेजेतल्या नव्हे) आणि काही कलावंतांनीदेखील उठवला. ज्यानं त्याला आर्ट सोसायटीच्या राजकारणात आणलं त्यानं त्याला मोठा शिल्पकार होण्याच्या त्याच्या ध्येयापासून दूर नेलं असं माझं स्पष्ट मत आहे. ललित कलाचा तो चेअरमन झाला आणि अक्षरशः पायाला भिंगरी बांधून तो भारतभर फिरला. या काळात त्यानं स्वतःच्या प्रकृतीची अतिशय हेळसांड करून घेतली. खाण्यापिण्याची वेळदेखील त्यानं कधी नीटशी पाळली नाही. मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार असताना त्यानं औषधं घेण्याच्या वेळादेखील पाळल्या नाहीत. ऍलोपॅथी की होमियोपॅथी याबाबत त्याच्या मनात द्वंद्व होतं. आणि या द्वंद्वानंच त्याचा अखेरीस घात केला. तो गेला त्याच्या १५ – २० दिवस अचानक त्याचा फोन आला. फोन तब्बल अर्धा तास चालला. महाराष्ट्राच्या राजभवनात मोठे कॅम्प घेतो आहे आणि मोठं प्रदर्शन भरवतो आहे. तू त्यात मला पाहिजेसच असं मला त्यानं दरडावूनच सांगितलं. प्रदर्शन कसं करणार आहे वगैरे त्यानं मला सविस्तर समजावलं. फोन ठेवताना म्हणाला तब्येत थोडी ठीक नाही, बहुदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागणार आहे. तिथून परत आलो की आपण भेटू असं आश्वासन देऊन त्यानं फोन ठेवला. पण यानंतर आपण त्याच्याशी कधीच बोलू शकणार नाही, हे आपलं शेवटचंच संभाषण ठरणार आहे असा विचारदेखील मनात आला नाही, पण घडायचं ते वेगळंच होतं हेच खरं. उत्तमला आज सकाळी तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे असं सांगणारा एका मित्राचा फोन आला तेव्हा मी मालवण मध्ये होतो. या बातमीवर कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं. मुंबईला परत येईपर्यंत साराच खेळ संपला होता. एका चळवळ्या कलावंताचा शेवट झाला होता.
सतीश नाईक
Related
Please login to join discussion