No products in the cart.
गायतोंडे : सतीश नाईकांचा एक न संपणारा शोध…
लेखक : प्रा. मं.गो. राजाध्यक्ष (माजी अधिष्ठाता जेजे उपयोजित कला महाविद्यालय)
‘चिन्ह पब्लिकेशनने’ २०१६ मध्ये जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील ‘गायतोंडे’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेबाबत जेजे उपयोजित कला महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता प्रा. मं.गो. राजाध्यक्ष यांनी लिहिलेला हा लेख आज गायतोंडे यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त ‘चिन्ह’ आर्ट न्यूजवर प्रसिद्ध करत आहोत.
एखादा माणूस एका विलक्षण वेडाने झपाटलेला असतो. त्यासाठी येणारी संकटे आनंदाने अंगाखांद्यावर कुरवाळण्याची त्याला सवय असते. आणि आपण योजलेले काम पूर्ण झाले की आनंदाने थपथपलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणून तृप्त मनाने त्या कामापासून दूर होतो. किती विलक्षण स्थितप्रज्ञाप्रमाणे वागण्याची क्षमता बाळगून असतो हा माणूस ? आणि हा विलक्षण, चतुरस्त्र असा एकमेव माणूस म्हणजे आमचा मित्र तसेच चित्रकार, लेखक, पत्रकार, संपादक, साहित्यिक, कला समीक्षक, वास्तू विशारद अशा अनेक बिरुदानी नावाजलेला, ‘चिन्ह‘ या आपल्या कलेला वाहिलेल्या वार्षिकाला जीवापलीकडे जपणारा व लोक प्रबोधन करणारा सतीश नाईक नावाचा अवलिया. कलाविश्वात नावाजलेला. जे.जे.स्कूलमध्ये गाजलेला, आणि अफाट मित्रसंग्रह जमा केलेला.
सतीश नाईक यांनी अलीकडेच आपल्या सर्व कमाईची, वेळेची, आजवर जमवलेल्या पुण्याईची बाजी लावून अनेक संकटांना तोंड देऊन प्रकाशित केलेल्या ‘गायतोंडे‘ ग्रंथाची भेट प्रत मला पाठवली. आजवर त्यांच्या या ‘गायतोंडे‘ पुस्तकाबद्दल मी बरेच ऐकून होतो. मध्यंतरी माझाही त्यांच्याशी संपर्क तुटला होता. अर्थात सतीशच्या ‘चिन्ह‘ प्रकाशनाचा प्रत्येक अंक अत्यंत देखणा, माहितीपूर्ण आणि जतन करून ठेवावा असाच असतो. मी देखील मला मिळालेले सर्व अंक जपून ठेवले आहेत, पण जेव्हा मी ‘गायतोंडे‘ ग्रंथाचे वेष्टन उघडले ( (मुळात वेष्टनच इतके सुंदर होते की त्यावरून आतील खजिन्याची कल्पना येत होती) आणि क्षणभर थक्क झालो. इतके सुंदर पुस्तक, केवळ ‘कॉफी टेबल बुक‘ म्हणून जपावे असे, परदेशी पुस्तकांच्या तोडीचे आणि तेही मराठीत, अद्यापही माझ्या पहाण्यात आले नव्हते. अनेक मोठमोठ्या लोकांवर पुस्तके आली, त्याचा कागद, छपाई, मुबलक अशी रंगीत छायाचित्रे, हार्ड बाईंडींग सर्व काही उच्च प्रतीचे असूनही त्यामागे सौंदर्य दृष्टी नसल्याने सुबकपणा नसतो. पण सतीश स्वतः चित्रकार, त्यात त्यांचा चोखंदळपणा, प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेण्याची प्रवृत्ती, त्यांचे डिझाईनिंग, पेज लेआऊट, छायाचित्रांचा दर्जा, टाईप निवड आणि त्यातील विषय संगती या बाबी मोजून मापून, आधी स्वतःचं समाधान करून मगच ते वाचकांसाठी देणं हे सतीशचं पहिलं काम असे. आणि हे पुस्तक देखील त्याला अपवाद नव्हते. ‘गायतोंडे‘ हा ग्रंथ हातात घेतल्यावरच त्याच्या संग्राह्य मूल्याचा, त्याच्या देखणेपणाचा, केवळ एकमेव असण्याचा अंदाज आपणास येतो. हा ग्रंथ करताना सतीशला किती मेहनत, किती मानसिक दडपण, किती मैलोंमैलाची पायपीट, संदर्भ–छायाचित्रे, गायतोंडेंच्या कलाकृती मिळवताना किती कष्ट भोगायला लागले असतील त्याची मला सतीशच्या स्वभावामुळे कल्पना होती. शिवाय दर्जापुढे तडजोड नाही हा बेलभंडारा त्याने केव्हाच उधळला होता. त्यातच त्याचा स्पष्टवक्ता स्वभाव. त्यामुळे कोणाच्या लांगूलचालनाला तो बधणाराही नाही. तेव्हा हे शिवधनुष्य त्याने कसे पेलले ते मला माहिती करून घ्यायचेच होते. आणि ‘गायतोंडे‘ ग्रंथ उघडताच मी एखाद्या अधाशाप्रमाणे भराभर तो वाचण्यास आरंभ केला.
जसा जसा मी ‘गायतोंडे‘ वाचत गेलो, तसतसा माझ्या मनातील भावनांचा बांध तुटू लागला. सतीश नाईक यांनी लिहिलेले ‘शब्दाच्या पलीकडले‘ असो तसेच प्रभाकर कोलतेंचा ‘बाकी इतिहास‘ असो दोघांनीही या ग्रंथाला शब्दरूपी ओंजळींचे अर्घ्य देऊन आपले अनुभव व्यक्त केले आहेत. तिथूनच आपला ‘गायतोंडे‘ या कलंदर अवलियासह एक गूढ असा प्रवास सुरु होतो. त्यांच्या लहान बहिणीने – किशोरी दासने आपल्या या विक्षिप्त भावाचं उलगडलेलं अंतरंग आपल्याला त्या कुडाळदेशकर चाळीतील जिन्याजवळील खोलीकडे घेऊन जातं. जमदग्नी स्वभावाच्या बापाने त्याच्या कोवळ्या मनावर केलेले अनन्वित अत्याचार, त्यांची अवाजवी शिस्त, अवहेलना, अपमानास्पद वागणूक यामुळे संपूर्ण कुटुंबासोबतचे तोडून टाकलेले पाश, आणि चित्रकलेत समाधिस्त अवस्थेला पोचलेली त्यांची सतत मौन धारण करणारी वृत्ती या गोष्टी जसजशा आपल्या मनात उलगडत जातात, तसतसा आपला मेंदू बधीर होऊन सुन्न होतो. आणि मनाला उगीचच वाटते की जर का त्याकाळात एका सुखी मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेल्या वासुदेव संतू गायतोंडेला घरातून आईवडिलांचे प्रेम–ममता–लाड मिळाले असते तर गायतोंडे खरोखरीच ‘गायतोंडे‘ झाले असते का ? सोन्याने जसे मुशीतून लाल होऊन आपला बावन्नकशीपणा सिद्ध करावा लागतो, त्याप्रमाणे त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले ते झाले असते का ?
आणि याच गायतोंडे यांच्या इतिहासाने सतीश भारला गेला. एखाद्या झपाटलेल्या माणसाप्रमाणे त्याने त्यांच्यावर पुस्तक बनवायचे ठरवले. तसा सतीश व त्याची पत्नी नीता हे दोघेही जेजेचे विद्यार्थी. स्वभावाने बंडखोर अन विचाराने क्रांतिकारक. कोठेही अन्याय दिसला की परिणामांची पर्वा न करता त्यावर तुटून पडणारा. लिखाणाची आवड ही होतीच. त्यामुळे जेजेतील अभ्यासक्रम संपल्यावर सरळ ‘लोकसत्ता‘ मध्ये पत्रकारीतेला आरंभ केला. त्यावेळी माधव गडकरी संपादक होते. त्यावेळी देखील त्याने कला क्षेत्रातील अनेक अन्यायकारक गोष्टींना वाचा फोडली. त्यामुळे त्याच्या नावाचा एक दबदबा निर्माण झाला होता. दरम्यान काही काळ त्या वृत्तपत्रात संप घडवून आणण्यात आला. सर्वच संपादकीय विभागातील लोकांना तसे काहीच काम नव्हते. मग हे चार पाच जण लंचच्या वेळेत मुंबई विद्यापीठाच्या हिरवळीवर गप्पा मारीत बसत. अशातच या सर्वानी ठरवले की आपण एखादे क्रांतिकारी असे वार्षिक का काढू नये ? विचार सर्वाना पटला. जुळवाजुळव सुरु झाली. पहिला अंक प्रसिद्ध झाला. अन खरोखरीच तो एका दिवसात संपलाही. खरीच क्रांती निर्माण केली त्या अंकाने. मराठी वाचकांत, साहित्यात त्या अंकानं क्रांती केली, नवे पायंडे पाडले, क्रांतीची मशाल पेटवली. पण त्यांच्याच ग्रुपमधील एकाने ती मशाल चूड बनवून त्यांच्या खुर्चीखाली लावून त्यांची स्वप्नं उद्ध्वस्त केली. त्यानंतर सतीशने आपले स्वतःचे ‘चिन्ह‘ प्रकाशन सुरु करून त्याखाली ‘चिन्ह‘ हे कलाविषयाला वाहिलेले वार्षीक सुरु केले. पहिल्याच अंकातून त्याने वाचकांना चमचमीत मेजवानी दिली. त्यातील विषयही स्फोटक असे होते. कलाशाळेच्या आवारात ज्या विषयावर हळू आवाजात कुजबुज होत असे, तेच विषय सार्वजनीक करण्यासाठी ‘चिन्ह‘ने व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे बाबुराव सडवेलकर, इर्शाद हाश्मी अशा अन्याय झालेल्या व्यक्तींना आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याची संधी मिळाली. पुढे काही वर्षे झाल्यावर आर्थिक घडी जुळत नसल्याने सुमारे १९८९ ते २००० हे पूर्ण एक तप ‘चिन्ह‘ बंद होता. सतीशने संपूर्णपणे पेंटींगला वाहून घेतले. दरम्यान त्याने पत्रकारिता सोडून सर्व वेळ ‘चिन्ह‘ आणि चित्रकलेलाच वाहून घेतलं.
सतीशने त्यानंतर एकामागोमाग एक ‘चिन्ह‘च्या अशा दर्जेदार वार्षिकांचे प्रकाशन केले. त्यामध्ये अनेक कलाकारांना उदयास आणले. त्यांच्या ‘कालाबाजार‘ या खास अंकाने सर जे.जे. कॅम्पसमधील कित्येक दुष्कृत्ये बाहेर काढली. त्यानंतरच्या न्यूड विशेषांकाने तर एकच खळबळ माजवली. अनेक धमक्या, फोन येऊनही सतीश आपल्या निर्णयावर ठाम राहिला. कारण या अंकात होत्या त्या चित्रकाराच्या आविष्काराच्या पूर्ततेच्या कलाकृती. ज्यांच्या नजरेतच विकृती होती, त्यांनी अंक प्रकाशित होण्यापूर्वीच तो न पहाताच फैसला सुनावला होता. यात सतीशचे धाडस म्हणजे सर्व संपादक आपल्या अंकाच्या आरंभीच एक टीप देतात, की ‘या अंकातील कोणत्याही लेखातील मतांशी संपादक सहमत आहेत असे नाही‘ असे सांगून आपली जबाबदारी झटकून देतात. पण सतीश मात्र आपल्या अंकात सुरुवातीलाच देत असे की, ‘या अंकातील प्रत्येक लेखाची जबादारी संपादक घेत आहे‘ असे म्हणून सर्व लेखकांना तो एक प्रकारचं संरक्षण देत असे.
या महत्वाकांक्षी तरुणाला मध्येच केरळमधील चोलामंडल प्रमाणे आपल्याकडे असे कलाग्राम का नसावे ? असे वाटू लागले. सतीशच्या हातात केरळचे जगविख्यात वास्तुविशारद लॉरी बेकर यांची अल्प किंमतीतील घरांच्या योजनेची माहिती आली. आणि सतीशने कंबर कसली. सुरुवातीला माझ्यासह आणखी चार पाच जण त्यांच्या या योजनेत सामील झालो. त्यासाठी कित्येक एकरची जागा घेऊन त्यावर खाली स्टुडिओ आणि वर राहण्यासाठी छोटेसे घर अशी ती कल्पना प्रत्येकी चार एक लाख रुपयात होईल अशी कल्पना होती. मुख्य म्हणजे लॉरी बेकर हे केवळ कमी किमतीत घरे बांधणारे नव्हते. तर ज्या ठिकाणी घरे बांधायची आहेत, तेथील उपलब्ध साहित्य, मजूर, विटा बनविण्याचे साहित्य अशा गोष्टी विचारात घेऊन त्यांचे प्रकल्प सुरु करीत असत. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सौंदर्य शास्त्रात बसलेली ही घरे कोणाच्याही मनात ओढ निर्माण करीत असत. भिंतींना ते कधीच गिलावा करीत नसत. कारण विटांचा मूळ रंग हा त्याचे सौंदर्य खुलवीत असतो.
या प्रकल्पाची हळूहळू जाहिरात होत गेली. ‘चित्रकुटीर कलाग्राम‘ हे नाव देखील ठरले. मग मात्र या प्रकल्पामध्ये जागा मिळवण्यासाठी मराठी नाट्य सृष्टी, चित्रपट सृष्टी यामधील अनेकजण सामील झाले. तेव्हाच माझ्या मनात एक धोक्याची घंटा वाजत होती, व सतीशला मी तशी जाणीवही दिली. कारण आम्ही मूळ सभासद एका विचाराने, ध्येयाने प्रेरित होऊन काम करीत होते. त्यात नफा – तोटा हा भागच नव्हता. त्यामध्ये अशा पैसेवाल्यांचा भरणा झाला की, त्यांना केवळ आपल्या हक्काची जाण असते. पण तोपर्यंत सर्वच जण चित्रकुटीर मध्ये मनाने जाऊन पोचलेही होते. माझ्याच जे.जे.उपयोजित कला संस्थेच्या केबिनमध्ये या बैठका होत असत. बैठकींना प्रफुल्ला डहाणूकर, शरयू दोशी, वंदना गुप्ते, मीनल परांजपे, शुभदा पटवर्धन, माधव इमारते, मनोहर म्हात्रे, मृगांक जोशी अशी तोलामोलाची नांवे होती. पेण येथे सुमारे चौदा एकरांची डोंगरावर जागा घेतली. आम्ही सर्व सभासद एक दिवस पिकनिकसाठी तेथे गेलो. आणि तेथील जागेचे छायाचित्रे व व्हिडीओ काढून मी स्वतः तिरुअनंतपुरम ( तेव्हाचं त्रिवेंद्रम) येथे लॉरी बेकर यांना भेटायला गेलो. त्यांचे स्वतःचे निवासस्थान ‘हॅम्लेट‘ ‘देखील अशाच पद्धतीने बांधलेले आहे. शिवाय केरळमध्ये अनेक इमारती त्यांच्या वास्तुकलेची साक्ष देत आज उभ्या आहेत.
लॉरी बेकर यांना आमची कलाग्रामची कल्पना खूपच भावली. त्यांनी पेन घेऊन एका कागदावर भराभरा रेखाटने करण्यास आरंभ केला. व त्यांनी एका विचारांच्या लोकांची तीन घरे एकत्र करून त्याच्या मागील बाजूमध्ये तुम्ही बसून गप्पा मारू शकता. अशी ती कल्पना होती. त्याचसोबत त्यांनी सांगितले की तेथील एकही दगड हलवायचा नाही. मी त्याचा वापर करूनच घरे बांधणार आहे. मी परत येताच त्यांचा होकार ऐकून सतीशचा चेहरा हर्षाने फुलला. पण दुर्दैवाने त्याच वेळी श्री लॉरी बेकर यांना अपघात होऊन त्यांच्या पायाचे फ्रॅक्चर झाले. त्यावेळी त्यांचे वय होते ऐंशी. पण त्यांचा सहाय्यक येऊन ती कल्पना पुढे राबवणार होता. आणि इकडे ‘चित्रकुटीर‘ मध्ये कुरबुरी सुरू झाल्या. ज्याअर्थी आपण पैसे दिलेत, त्याअर्थी आपली घरे मिळालीच पाहिजेत ही एखाद्या बिल्डरकडून घर घेणार असल्याप्रमाणे भाषा सुरु झाली. आणि याचे पर्यवसान सतीशच बाहेर पडण्यात झाला. पण तरीही सतीश डगमगला नाही. त्याने दुसऱ्या एका मित्राचे त्याच पद्धतीचे अल्प किमतीत घर बांधून आपण वास्तूविशारद देखील आहोत हे सप्रमाण सिद्ध केले. आणि एक दिवस त्या बातमीने सतीशच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
तो दिवस होता ऑगस्ट १०, २००१. गायतोंडे गेल्याची बातमी आली. दुसऱ्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडीया‘ मध्ये केवळ चार–पाच ओळीची बातमी होती, Noted painter Gaytonde died’. सतीश संतापाने पेटून उठला. एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या पेंटरची केवळ चार ओळीची बातमी टाइम्स सारख्या दर्जेदार वृत्तपत्रात येते. आणि त्याच तिरीमिरीत सतीशने आपली बॅंक गाठून त्यातील शिल्लक पाहिली. घरी जाऊन पत्नीशी चर्चा करून ठामपणे ठरवले, ‘ चिन्ह‘ काढायचा. त्यातील गायतोंडे यांच्यावरची २३ पानांची पहिली पुरवणी खूप गाजली. त्यानंतर बातमी आली ‘गायतोंडेंचे पेंटींग ५ कोटीला गेले.‘ नंतर सतीशने २००६ मध्ये ‘गायतोंडे‘ विशेषांक काढला. गायतोंडेंनी आपल्या मागे काहीही ठेवले नव्हते. त्यामुळे संदर्भ मिळवणे तितकेच कठीण होते. त्यांना ओळखणारी माणसे शोधणेही कठीण होते. बरेचसे हयात नव्हते. जे होते त्यांना बोलकं करणं हे तर त्याहून अवघड होतं. त्यासाठी सतीशला काय काय प्रयास करावे लागले असतील तोच जाणे. ज्या माणसाचा कसलाही मागोवा नव्हता, त्याच्या कुटुंबियांचे कोण आहे नाही याचा पत्ता नव्हता, कुठुन सुरुवात करायची याचे मार्गदर्शन नव्हते, होते ते समोर एक भले मोठे प्रश्नचिन्ह !
आता प्रश्न होता गायतोंडेंच्या घराण्याची माहिती घेण्याचा. ते गिरगावात कुडाळदेशकर वाडीत राहत एवढी माहिती मिळाली. त्यांच्या तीन बहिणी होत्या. त्यातील दोघी हयात नसल्याची माहिती मिळाली. तिसरीविषयी काहीच माहिती नव्हती. त्यांच्या परिचयातील एका महिलेने आपण तिचा पत्ता देतो असे सांगून वर्ष दीड वर्ष फक्त झुलवले. पण अचानक एके दिवशी प्रफुल्ला डहाणूकर यांनीच तिचे नाव किशोरी दास असल्याचे सांगून तिचा फोन नंबर देखील मिळवून दिला. हा अंधारातील एक मोठा प्रकाशझोत सतीशच्या वाट्याला आल्याबरोबर त्यांनी भराभर प्रश्नावल्या केल्या व कमलेश देवरुखकर याने त्या सुंदरररित्या अंकामध्ये मांडल्या. पहिल्याच किशोरी दासच्या मुलाखतीतून आपल्याला गायतोंडे समजत गेले. त्यांचे जमदग्नी वडील, मुलाने जेजेला जाण्यास त्यांचा असलेला विरोध, त्यावरून बाप लेकामध्ये आलेला दुरावा, परिणिती गायतोंडेंनी तोडलेले संपूर्ण घराशी असलेले नाते, स्वतःला मिळालेल्या मानसन्मानाचा किंचितही मोठेपणा न मिरवणे, मित्र आले तरी कधीही त्यांना घरात न आणता आपण त्यांच्या सोबत बाहेर जाणे अशा कित्येक गोष्टी आपण जेव्हां वाचतो तेव्हा आपल्या मनाला असंख्य इंगळ्या डसून दंश करीत असल्याची जाणीव होते. त्यांनी भोगलेले हाल हेच पुढे कदाचित त्यांचे भवितव्य घडविण्यास कारणीभूत ठरले असावेत. त्यानंतर ते दिल्लीला गेले ते मुंबईला पुन्हा आलेच नाहीत. आपण गोव्याला आपल्या मूळ गावी कधी गेलात का? असा एकाने त्यांना प्रश्न विचारताच ते ताडकन म्हणाले, ‘मी जेथून एकदा निघतो तेथे पुन्हा पाय ठेवत नाही.’
यानंतर मुलाखत आहेत प्रफुल्लाबाई, मनोहर म्हात्रे, सच्चिदानंद दाभोळकर, शरद पाळंदे, शांतू आमोणकर, त्यांचे मामेभावू शांताराम वर्दे वालवलीकर, फिरोझ रानडे आणि विश्वास यंदे यांच्या! या सर्वांनी गायतोंडे यांच्यासोबत आपणास सर्वंभर फिरवून आणले. आणि हे सारे केवळ शक्य झाले ते सतीश नाईकांमुळे, त्यांच्या अथक परिश्रमामुळे. त्यांच्या ‘गायतोंडे‘ नामक मनस्वी चित्रकारावर असलेल्या श्रद्धेमुळे ! पण आतापर्यंत झाले ते ‘गायतोंडे‘ ग्रंथाचे संकल्पन. त्याची रचना. त्याचा एकंदरीत आकारबंध, ज्याचा आतापर्यंत कोणीच कधी विचार केला नसेल. पण पुढचा प्रवास होता तो, या अभूतपूर्व ग्रंथांची तितकीच आकर्षक आणि सुंदर छपाई. म्हणतात ना, सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. आणि त्याचा प्रत्यय आता येऊ लागला. ग्रंथाचे देखणेपण त्याच्या डमीमधूनच दिसत होते. त्यासाठी कागद वापरला होता तो खास असा इमोटे प्लस हा कोरीयन कागद, मराठी ग्रंथात अद्यापपर्यंत हा कागद कोणीच वापरला नव्हता. पण आर्थिक गणित जुळत नव्हते. कुमार केतकरांनी ही डमी जेव्हां पाहीली, तेव्हा त्यांनी अंतिम निर्णयच दिला, बस, याच कागदावर हा ग्रंथ छापला पाहीजे. आणि एवढे बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुढील व्यवस्थाही पाहिली.
मधल्या काळात बेंगळुरूचा सलील साखळकर हा ‘चिन्ह‘च्या कुटुंबियात आला, आणि ‘चिन्ह‘शी एकरूप झाला. जेजे – आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेला सलील बेंगळुरूमध्ये स्वतःची डिझाईन फर्म चालवत होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रकाशनांची डिझाइन्स त्याने केली होती. आणि त्याने या ग्रंथाची जबाबदारी उचलली. ‘गायतोंडे‘ ग्रंथासाठी वापरात आलेला कागद हा छपाईचे दर्जेदार कागद विविध देशातून भारतात आयात करणारी कंपनी ‘क्युरीयस पेपर्स‘ हिनं उपलब्ध करून दिला. सलील या कंपनीचा आधीपासूनचा ग्राहक. त्याच्यामुळे हा कागद सवलतीच्या दरात त्याने मिळवून दिला. शिवाय ग्रंथाची छपाई बंगळुरूमध्ये करायची जबाबदारी सलीलने घेतली, मनमोकळेपणाने सतीश त्याला श्रेय देऊन मोकळा झाला. आणि सतीशच्या ‘गायतोंडे‘ या ग्रंथाने एक आकर्षक रूप धारण करून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.
२०११ साली सतीशने ‘गायतोंडे’ ग्रंथ प्रसिद्ध करायचे ठरवले. सतीशला वाटले होते की कोणीतरी गायतोंडेंवर ग्रंथ काढील. मराठीप्रमाणे इंग्रजीत तो येईल, पण तसे काहीच घडले नाही. तोपर्यंत ‘गायतोंडे‘ हे नाव प्रकाशमय झाले होते. खूप मोठे वलय त्यांच्या मागे पसरले होते. ज्या ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ने त्यांच्या निधनाची बातमी तीन ओळीत दिली होती, त्याच टाइम्सने गायतोंडे यांचं चित्र सुमारे २९ कोटीला गेल्यानंतर ती बातमी टाइम्सच्या पहिल्या पानावर प्रकाशित केली. आता गायतोंडे हे नाव हेडलाईनमध्ये देखील येऊ लागले. अनेक लोकांना ‘गायतोंडे‘ या नावाबद्दल उत्सुकता वाटू लागली. काल परवा उगवलेल्या व प्रसिद्धी पावलेल्या अनेक कलाकारांवर मोठमोठी पुस्तके–कॅटलॉग तयार होत होते. पण गायतोंडे मात्र कोणालाच आठवत नव्हते. आणि अखेरीस ‘गायतोंडे‘ ग्रंथ प्रकाशित करण्याची घोषणा सतीशनं केली. सतीशच्या वाट्याला आल्या अडचणीच्या पायवाटा. अर्थात सतीश नाईक आणि अडचणी नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालूनच चालत असतात. कलाक्षेत्रातील राजकारण येथेही त्यांना नडले. त्यांचा ‘गायतोंडे‘ आकाराला येऊ नये, तो प्रसिद्ध होऊ नये, यासाठी कित्येकांनी आपले देव पाण्यात बुडवले होते. संदर्भासाठी अनेकांच्या गाठीभेटी घेणे सुरूच होते. दरम्यान गायतोंडेंची चित्रे कोटींमधे गेल्यावर त्यांची अनेक चित्रे बाजारात येऊ लागली.
‘गायतोंडे‘ ग्रंथाचे प्रकाशन देखील तितक्याच दिमाखदार पद्धतीने करायचे सतीशने ठरवले. आणि त्यासाठी त्यांनी निवडले ते मुंबई विद्यापीठाचे पदवीदान सभागृह. जेथून अनेक विद्वान लोकांनी पदवी ग्रहण केली. त्यांच्या नांवाने, अस्तित्वानं पावन झालेल्या त्या वास्तूत गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन हा दुग्धशर्करा योग लाभला होता. शिवाय गायतोंडेंचे महत्व वर्णन करण्यासाठी जोडीला गायतोंडेंशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले वास्तुविशारद नरेंद्र डेंगळे, लक्ष्मण श्रेष्ठा, गायतोंडेंचे मामेभाऊ शांताराम वर्दे वालावलीकर हजर होते. प्रभाकर कोलते व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख देखील या प्रसंगी हजर होते.
(‘गायतोंडे ग्रंथ प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी आणि त्यानिमित्त झालेली मान्यवरांची भाषणे ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ‘चिन्ह’ च्या Youtube Channel ला भेट द्या.)
या कार्यक्रमात अनेकांनी गायतोंडेंच्या आठवणी जागवल्या. दिल्लीला गायतोंडे राहत असत त्या जागेला बरसाती म्हणत. तेथील घराची घंटा वाजवली की बहुदा गायतोंडे दरवाजा उघडत नसत. मग त्यांना भेटायला आलेले हुसेन आदी चित्रकार त्या दरवाजावर आपली सही करून त्या खाली चित्र काढीत व आपण येऊन गेल्याची जाणीव देत असत. तो दरवाजा जरी जपून ठेवला असता तरी तो अनमोल झाला असता, असे डेंगळेंनी गायतोंडेंबद्दल सांगितले. तसेच त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या अमूर्त चित्रविषयी देखील त्यांनी प्रबोधन केले.
प्रभाकर कोलतेनी आपण त्यांना दिल्लीत भेटायला गेलो असता, आपण पळशीकरांचा शिष्य आहोत हे सांगूनही सतत तीन दिवस त्यांच्या घराची घंटी वाजवत होतो, पण त्यांनी दार न उघडल्याचे सांगितले. मात्र तिसऱ्या दिवशी त्यांनी घरात घेतले. आणि आत जाताच त्यांनी ग्रामोफोनवर मोझार्टच्या सिम्फनीची रेकॉर्ड लावली. कोलतेंना त्यांनी संगीत आवडते का ही विचारणा केली. व शांतपणे ते तल्लिन होऊन ती सिम्फनी ऐकत बसले. रेकॉर्ड संपताच पुन्हां त्यांनी साऊंड बॉक्स उचलून मूळ जागी पिन ठेवली व परत तीच ऐकू लागले. असे दोन–तीन वेळा झाल्यावर कोलतेंचा धीर सुटला. ते त्यांना म्हणाले, ‘सर मला तुमच्याशी बोलायचे आहे, तुमची चित्रे समजून घ्यायची आहेत, यासाठी मी आलो आहे.’ पण गायतोंडे यांनी ‘आता माझी जेवणाची वेळ झाली‘ असं सांगून कोलते यांना निघून जायला सांगितलं. अर्थात पुढे त्यांच्याशी कोलतेंचा बराच संबंध आला.
तसेच एकदा गायतोंडे मुंबईला गेले व त्यांनी आपण आल्याचा शंकर पळशीकरांना निरोप दिला व ठरावीक वेळी जहांगीर कलादालनात भेटायला बोलावले. वेळ जसजशी जवळ आली तेव्हा गायतोंडे जहांगीरच्या पायऱ्यांवर आले. दुरूनच त्यांना पळशीकर गडबडीत येत असल्याचे दिसल्यामुळे ते देखील रस्त्यावर त्यांना सामोरे गेले. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. पळशीकरांच्या हातात एक पिशवी होती. त्यातून त्यांनी आणलेली खास अशी नागपूरची रेशमी शाल बाहेर काढली. रस्त्यावरच गायतोंडेंच्या अंगावर त्यांनी ती पांघरली, व एकही शब्द न बोलता दोघेही आपापल्या वाट्याने निघून गेले. केवळ मौनातून अभिव्यक्त होणाऱ्या या महान कलाकारांपुढे नकळत आपले हात जोडले जातात. पण घरी जाताच गायतोंडेंनी सांगितले, ‘ पळशीकर माझ्यापेक्षा मोठे, वयाने, अनुभवाने आणि चित्रकार म्हणून. त्यांनी आज माझा सत्कार केला. हा माझा सत्कार मला कोणतेही मोठे पारितोषिक मिळाल्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. केवढा जाज्वल्य अभिमान होता त्यांना पळशीकरांबद्दल? म्हणजे ते सत्कार करून घेत नाहीत, त्यांना मुलाखती द्यायच्या नसतात, अशा ज्या वावड्या त्यांच्याबद्दल उठत, त्यांना हे प्रत्युत्तर आहे. सत्कार ते घेत, पण विद्वानांकडून, ज्याला चित्रकार म्हणून त्यांच्या लेखी मान्यता आहे, त्यांच्याकडून. उगाचच कोणी त्यांची खोटी स्तुती केलेली त्यांना सहन होत नसे.
गायतोंडे हे किशोरीताईंच्या गाण्याचे चाहते. त्यामुळेच सतीशने किशोरीताईंना या समारंभासाठी आमंत्रित केलं होतं. किशोरीताईंनी तर या समारंभाला एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले. त्या म्हणाल्या, ‘गायतोंडे जिवंत आहेत आणि जिवंत राहतील. कलाकारांपेक्षा कलाकाराने काय काम केलं याची आपल्याला जास्त किंमत असते. त्यामुळे गायतोंडेंना तुम्ही सर्वानी पुन्हा जिवंत केलं याचा मला आनंद आहे. कलेची साधना करणारा प्रत्येक कलाकार हा आनंदाच्या शोधात असतो. मग माध्यम कोणतेही असो. रंग असो वा स्वर. परमानंद हेच खरं सुख असतं. आणि याची प्रचिती ज्याला येते, तो खऱ्या अर्थाने आपल्या विषयांमध्ये उच्चता गाठतो. त्यालाच अंतिम सत्याची प्रचिती येऊ शकते. यातलाच एक कलाकार म्हणजे गायतोंडे असे मी मानते. वेगवेगळ्या रंगातून विश्वरंगाची ओळख करून देणं हेच त्यांचं ब्रीद असावं असं म्हणायला हरकत नाही‘! किशोरीताई बोलत होत्या, त्यांच्या मुखातून शब्द – सुमनांच्या ओंजळी ओसंडून वाहत होत्या. त्याचा दरवळ सर्वत्र पसरलेला होता. गान सरस्वतीने चित्र भास्करावर वाहिलेली ही शब्द–सुरांची बरसात होती. तिच्यातील भक्तीभावाने मनं भिजून चिंब झाली होती. आणि त्याच आठवणींचा सुगंध मनाशी साठवत रसिक श्रोते तृप्त होऊन बाहेर पडत होते. जातांना ‘गायतोंडे‘ – न संपणाऱ्या शोधाची कहाणी सोबत घेऊन.
लेखक : प्रा. मं.गो. राजाध्यक्ष (माजी अधिष्ठाता जेजे उपयोजित कला महाविद्यालय)
चिन्ह प्रकाशित ‘गायतोंडे’ ग्रंथाची डिलक्स आवृत्ती आणि जनआवृत्ती मागवण्यासाठी +91 90040 34903 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Related
Please login to join discussion