No products in the cart.
वीण…धाग्यांची…अन् जगण्याची!
कॅनव्हास किंवा कागदावर ब्रश किंवा पॅलेट नाईफने रंगलेपन करून काढलेलं असतं, ते म्हणजे चित्र असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. औरंगाबादचे सुप्रसिद्ध कलाकार दिनेश कुरेकर यांची चित्रं मात्र याला अपवाद आहेत. कारण या चित्रांमध्ये कॅनव्हास किंवा कागद नाही, त्यांच्यात सुंदर रंग दिसतात तरीही रंगलेपन मात्र केलेलं नसतं. ही चित्रं ते हातमागावर रंगीत धाग्यांचं नाजूक विणकाम करून साकारतात. त्यांच्या या असामान्य कलाकृतींचं Wovenscapes नावाचं प्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलं आहे. मराठी साहित्य विषयाच्या प्राध्यापिका आणि रेडियो जॉकी डॉ. गौरी कुलकर्णी यांनी लिहिलेला ही चित्रं पाहताना त्यांना आलेला अनुभव कलारसिकांना नक्कीच आवडेल.
———
“वीण म्हणजे काय? तर गुंफणं. दोन गोष्टींना एकमेकांत गुंफत जाणं. त्यातून एक घट्ट वीण तयार होत असते. तुमच्या माझ्या जगण्याला आपल्यात सामावून घेणारी अशी ही एक घट्ट वीण आहे. नात्यांची, शब्दांची, भावनांची, विचारांची वीण विणत जाणं हे आपण प्रत्येकजण करत असतो आणि त्यातूनच आपलं जगणं एक असा आकार घेत असतं.”
आजच मी आकाशवाणीवर माझ्या कार्यक्रमात ‘वीण’ हा विषय घेतला होता आणि त्या अनुषंगाने हे बोलले.
आणि त्यानंतर जहांगीरला दिनेश कुरेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन पाहायला गेले होते. सतीश काकांची पोस्ट वाचून गेले होते. पण पाहण्यासारखं काहीतरी तिथे आहे इतपतच वाचलं होतं. अगदी घाईघाईत त्या पोस्टवरून नुसती नजर फिरवली होती. त्यामुळे या चित्रांचा वेगळेपणा तिथे प्रत्यक्षात गेल्यावरच लक्षात आला.
आत त्या दालनात शिरल्याशिरल्या लक्षात आलं की ही चित्र, हा कॅनव्हास काहीसा वेगळा आहे. म्हणजे याआधी मी जी चित्र पाहिली होती त्यापेक्षा खूपच निराळा.
ज्याला आपण ‘velvety texture’ म्हणतो ना तशी होती ती चित्र सगळी. विणलेली होती. नेहमीप्रमाणे चित्र आणि रंग डोक्यात घेऊन आपण त्या दालनात शिरतो आणि त्यानंतर एक वेगळीच अनुभूती आपल्याला येते. हातमाग आणि वेगवेगळ्या रंगाच्या लोकरीच्या गुंड्या….
‘चित्रांना हात लावायचा नसतो. त्यांच्यापासून काही अंतर राखूनच चित्र पाहायची असतात.’ या गोष्टींची जाण असलेल्या मलाही मनातून मात्र त्या चित्रांवरून हात फिरवण्याचा विलक्षण मोह होत होता. पण मी मोहाला शरण गेले नाही हे आधीच सांगते. कारण हे लिहितानाही मला थोडीशी धास्ती वाटतेय. याचं कारण असं की मागच्या महिन्यात पालेकर सरांची अमूर्त शैलीतली चित्र पाहायला मी त्याच दालनात अनेकदा गेले होते आणि आजही मी तिथे गेले असताना लोकांचं वेड्यासारखं वागणं पाहत होते. खरोखर लोक चक्रमसारखे का वागतात? या विचाराने हैराण झाले जशी मी तेव्हाही झाले होते.
(नका ना हात लावू चित्रांना!…….. कुणीतरी जिवापाड घेतलेली मेहनत / श्रम असतात ते. कला असते. त्याचा आदर राखायला नको का? ती जपायलाच हवी.)
पण इथे मला आलेला अनुभव व्यक्त करण्यासाठी माझ्या मनात काय आलं ते लिहिणं भाग आहे. मी म्हटलं तसं की एखादी वीण गुंफत जाणं. ती रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफताना अनुषंगाने मनात येणाऱ्या भावना, विचार, रंग रेषांचं अद्भुत जग विणलं होतं माझ्या भोवती. ज्यामध्ये गुंतायला होत होतं. आजच म्हटलं मी कार्यक्रमात “गुंफत जाण्यामध्ये गुंतत जाणं हे आलंच, त्यापासून सुटका नसते.”
ही चित्र म्हणजे मूर्त आणि अमूर्ताची एक सुरेख गुंफण होती. मूर्त आणि अमूर्ताचा त्या सुंदर रंगीबेरंगी धाग्यांच्या साहाय्याने कुरेकरांनी एक गोफ विणला होता. त्या प्रत्येक चित्रामध्ये काहीतरी ओळखीचं, काहीतरी अनोळखीसं सापडू शकत होतं.
कितीतरी चित्रांमध्ये मला कुठे मध्यान्हीचा तर कुठे कातरवेळेचा सूर्य दिसत होता. कुठे तलावात फुलून आलेली कमळं होती तर कुठे रात्रीच्या अंधारातही आकाशाच्या निळाईत रंगून गेलेला चंद्र दिसत होता…..आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी धुसर, अंधुक कळतंय नकळतंय असं मनात आकार घेत होतं.
काही आठवणी होत्या आणि डोळ्यांना सुखावणारा, स्पर्श करू पाहण्यासाठी मनाला भुरळ पाडणारा असा त्या चित्राचा पोत होता.
मस्तच.
चित्र पाहत असताना दिनेश कुरेकर आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी सगळ्यांची भेट झाली. गप्पाही झाल्या छान.
कुरेकर यांच्याशी गप्पा मारत असताना, “तुला काय वाटतं या सगळ्या चित्रांबद्दल?”असं अगदी सहज विचारलं त्यांनी…. आणि माझ्या मनात आलं की असं थोडक्यात कसं बुवा सांगायचं त्यांना…. मी म्हटलं काका, मला काय वाटतंय ते शब्दबद्ध करायला थोडा वेळ लागेल. मग त्यांच्या पत्नीने छान मार्ग सुचवला. सांगितलं की तुला जे वाटतंय ते या वहीत लिहून ठेव. आठवण म्हणून. मग मी दोनच ओळीत जे वाटलं ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला.
पण तेवढ्याने समाधान नाही झालं म्हणून आता इथे हे जरा अधिक सविस्तर.
गौरी कुलकर्णी
Related
Please login to join discussion