No products in the cart.
गणपती पावला !
जेजेला डी-नोव्हो मिळावं यासाठी मनापासून प्रयत्न करणारे साठीच्या घरातले असंख्य जेजेचे माजी विद्यार्थी यानिमित्तानं शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशाच एका गाठीभेटीत त्यांनी आयसीटीचे पहिले कुलगुरू पद्मश्री डॉ. प्रा. (गणपती) जी. डी. यादव यांना भेटले. जेजेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये लिंटासचे माजी आर्ट डायरेक्टर सुनील नाईक हे देखील होते. यादव सरांच्या व्यक्तिमत्वानं ते अतिशय भारावून गेले. त्यातूनच त्यांनी लिहिलेला हा लेख.
जेजे अनन्य अभिमत आंदोलन चालवत असताना शिक्षण आणि कला क्षेत्रातील विविध मान्यवरांची आम्ही भेट घेत आहोत. या भेटी घेत असतानाच एके दिवशी आम्हाला चक्क गणपती बाप्पा भेटले आणि खरंच सांगतो आम्ही अगदी भारावून गेलो ! १६ मे रोजी रात्री ९ वाजता मला आशुतोष आपटेचा फोन आला, ‘आपल्याला उद्या ३ वाजता एका मोठ्या व्यक्तीच्या भेटीला माटुंग्याला जायचं आहे, तयार रहा !’ मी ओके म्हटलं. तसेच कोणाकोणाला बरोबर घ्यायचं याविषयी चर्चा केली.
दुसऱ्या दिवशी आशुतोषचा सकाळी फोन आला, ‘अरे भेटीची वेळ तीच आहे, परंतु जागा बदलली. आपल्याला त्या व्यक्तीच्या घरी ऐरोलीला भेटायचं ठरलं असून वेळेवर सगळ्यांनी हजर व्हायचं आहे. सतीश नाईक काही येणार नाही.’ ‘अरे, पण ती व्यक्ती कोण आहे, काही तरी सांगशील का ?’ मी आशुतोषला म्हणालो, ‘अरे बाबा, त्यांनी त्यांच्या आय.सी.टी. ( पूर्वीचे नाव युडीसीटी ) या माटुंग्यामधील कॉलेजला डीम युनिव्हर्सिटी मिळवून दिली. भारतात त्या संस्थेचं नाव सगळ्यात चांगली शिक्षणसंस्था म्हणून प्रथम श्रेणीत आणलं. ते त्या आयसीटीचे पहिले कुलगुरू होते, त्यांनी त्यांच्या कॉलेजला जवळ जवळ १८०० कोटी रुपयांचा निधी जमा करून शिक्षणात विविध प्रयोग करून शिक्षणाचा दर्जा उंचावला आणि शिक्षणक्षेत्रात संस्थेचं एक अढळस्थान निर्माण केलं. ज्यांचे अनेक पीएचडीचे विद्यार्थी आज जगभरात संशोधन, शिक्षण, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात नाव कमावत आहेत. ज्यांना भारत सरकारनं पद्मश्री किताब बहाल केला. जे शिक्षणक्षेत्रातील विविध शिक्षणसंस्थात व गोदरेजसारख्या व्यावसायिक संस्थांतही संचालक तसेच सल्लागार म्हणून काम करतात अशा एका शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपल्याला भेटायचं आहे. त्यांचं नाव आहे पद्मश्री डॉ. प्रा. (गणपती) जी. डी. यादव सर. आपण या संधीचा फायदा घेऊया !
मी पहिल्यांदा ऐकलं, ज्या व्यक्तीला आम्ही भेटणार होतो, तिचं नाव गणपती होतं. मला जरा आश्चर्यच वाटलं की पालकांनी मुलाचं नाव गणपती कसं ठेवलं असेल ? बहुतेक नवसानं झालेले असतील. मी माझ्या मनाचं समाधान केलं. चला भेट तर घेऊया..! आणि भेटीनंतर आम्हाला कळलं, ती व्यक्ती खरंच गणपतीच होती. साक्षात विद्यावाचस्पती गणपतीचाच अवतार. त्यांची बोलण्या-चालण्याची पद्धत, आचार – विचार आणि भारतीय मुलांच्या शिक्षणबाबतीत त्यांची तळमळ पाहता ती व्यक्ती जन्मता हाडाचा शिक्षक वाटत होती. ते खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी होते. त्यांच्या मागे फोटो फ्रेम केलेले त्यांना मिळालेलं पद्मश्री त्याची साक्ष देत होतं. तसेच मागच्या दोन्ही कपाटात व्यवस्थित लावलेलं त्यांचे मानसन्मान आमच्यासमोर टकमका एकटक पाहत होते. अर्थात त्यांनी या पूर्वी पाहिले असतील त्यांच्याकडे आलेले विविध क्षेत्रातील नामांकित वैचारिक पाहुणे. मग हे कोण असतील म्हणून कपाटातील सन्मानचिन्ह आमच्याकडे आश्चर्यानं पाहत असल्याचा मला भास झाला.
गणपती सरांनी आमची ओळख करून घेतल्यानंतर आम्ही कोणत्या कामासाठी आलो आहोत हे ऐकताच ते खुश झाले आणि आम्हाला म्हणाले, ‘तुमच्यासारखे माजी विद्यार्थी आपल्या कॉलेजचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी धडपडत आहेत याचा मला फार आनंद झाला. निस्वार्थपणे तुम्ही हे काम करत आहात, मला तुमचा हेवा वाटतो. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन ! कारण या जगात कशात काही नसताना कॉलेज काढण्याची स्वप्ने बाळगून, खोटे नाटे पुरावे जमा करून शासनाला आणि समाजाला गंडा घालणारे मी बरेच पाहिलेत. पण तुम्ही चक्क तुमच्या कॉलेजचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आपल्या कॉलेजला मातेचा दर्जा देऊन त्याच्या प्रगतीसाठी कष्ट घेत आहात, मी तुमच्या सोबत आहे ! मला सविस्तर सगळं सांगा’ मग आमचं ही दडपण संपलं आणि सुरु झाला आमचा सुसंवाद.
आम्ही म्हणालो, ‘सर जेजेचे आजी – माजी विद्यार्थी लढत आहोत ते केवळ जेजे या आमच्या आईला वाचवण्यासाठी. आम्ही लढणारे सारे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात स्थिरावलेले व्यावसायिक चित्रकार आहोत. बरं आमच्या सगळ्यांची वयं नोकरी मिळण्याच्याही पलीकडे गेलेली, म्हणजेच या लढाईत भाग घेऊन आमचा तसा काहीच वैयक्तिक फायदा नाही. या आंदोलनात आमच्या सोबत अनेक आजी विद्यार्थी लढत आहेत. त्याचे कारण त्यांना जेजेमध्ये या कॉलेजच्या नावाप्रमाणे शिक्षण मिळत नाही. त्यांना शिकवायला पुरेसे शिक्षकच नाहीत. जे आहेत त्यातील बहुतेकांना विशेष काही त्या शिक्षणातलं येतच नाही. सगळे वशिल्यानं तट्टू आणि हंगामी पगारदार. त्यामुळे मुलांचा पूर्णपणे भ्रमनिरास झालाय. त्यामुळे ते पण या लढाईत उतरले तर नवल नाही.
आमची १६५ वर्षाची जुनी कलाक्षेत्रातील शिक्षणसंस्था म्हणजे आमचं जेजे. त्याला संपूर्ण भारतात कलाक्षेत्रातला राजमुकुट म्हणतात. कित्येक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विविध पुरस्कार मिळालेल्या कलाकार आणि त्यांच्या कलाकृतीच्या हिऱ्या मोत्यांनी सजवलेला तो राजमुकुट काढून त्याला चक्क टोपी घालण्याचा घाट काही व्यावसायिक लाभार्थी विचारांच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून घातला जात आहे आणि त्याला दुर्दैवानं आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री साथ देत आहेत. कारण काय ? तर म्हणे, महाराष्ट्राच्या शहर – तालुक्यातील काना कोपऱ्यात वसलेल्या सर्व कला महाविद्यालयांना एकत्र आणून त्यांना म्हणे त्यांचा विकास साधायचा आहे. त्यासाठी ते जेजेला राज्य कला विद्यापीठाचा दर्जा देऊन इतर सगळ्या कॉलेजेसना सांभाळण्यासाठी किंवा त्यांची हमाली करण्यासाठी त्यांना जेजेचा वापर करायचा आहे. त्यांना ‘जेजे’ या नावाचा फक्त व्यावसायिक फायदा उचलायचा आहे.’
त्यावर ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील अन्य कलाशिक्षण संस्थांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या भल्यासाठी जेजे या १६५ वर्षाच्या जुन्या सर्जनशील संस्थेचा नाहक बळी का द्यायचा ? डी-नोव्हो युनिव्हर्सिटी ही एक चांगली संधी मिळाली आहे जी आपल्याच शासनानं जर स्वतः पुढाकार घेऊन, विविध अर्ज करून, यु.जी.सी.ला १५ लाख भरून. मुंबई विद्यापीठाला ५-५ लाख भरून यु.जी.सी.नं डी-नोव्हो युनिव्हर्सिटीसाठी देऊ केलेल्या संधीला लाथाडायचं, हे अतिशय अयोग्य आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही.
खरंच जेजेसारख्या सर्जनशील कला शिक्षणाला याची गरज आहे. तेव्हा आता तुम्ही मागे हटू नका !’ अशा स्पष्ट शब्दात श्री. गणपती यादव सरांनी ओरडूनच आम्हाला सांगितलं. तसंच ‘शासन आणि राजकर्ते यांना शिक्षणाचं ज्ञानच नसल्यानं तसेच प्रयोगशीलता नसल्यानं आपल्या देशाचं बरंच नुकसान हे होतच आलं आहे. तुमच्या सुदैवानं सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे हुशार आहेत आणि तुमच्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडून तुमच्या कॉलेजला अनन्य विद्यापीठाचा दर्जा मिळणं अत्यंत गरजेचं आहे.’ त्यांच्या या मनमोकळ्या बोलण्यानं आम्हा सगळ्यांनाच एक नवीन ऊर्जा मिळाली. आम्ही एक मुखानं त्यांना विनंती केली की, सर, या पवित्र अशा जेजेच्या डी-नोव्हो युनीव्हर्सिटीच्या कामी तुम्हीच आमचे सल्लागार व्हा ! आमची तळमळ पाहून त्यांनी लागलीच ती विनंती मान्य केली आणि आनंदानं आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. खरंच नावाप्रमाणे आज आम्हाला श्रीगणेशाचंच दर्शन झालं होतं. हा एक आमच्या लढाईसाठी चांगला शुभशकुन होता. याचाच अर्थ असा की, आपण ही लढाई जिंकणारच ! सर जे. जे. स्कूल डी-नोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी होणारच !
सुनील नाईक
Related
Please login to join discussion