No products in the cart.
चित्रकलेतले ‘राऊत’ !
सांप्रतच्या महाराष्ट्रात राऊत हे नाव खूप गाजू लागलं आहे. असेच एक राऊत आमच्या जेजेच्या माजी विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहेत. आपल्या अत्यंत गचाळ आणि अशुद्ध भाषेचा आणि आचरट विचारसरणीचा कुठलाही न्यूनगंड न बाळगता ते डी-नोव्हो चळवळीसंदर्भात जी काही गरळ समाज माध्यमांवर ओकत आहेत तिचा समाचार घेणं क्रमप्राप्त होतं. त्याचाच हा पहिला अध्याय… वाचा आणि मित्रांशी अवश्य शेयर करा. इतकंच नाही तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवा. म्हणजे विजय राऊत यांच्यासारखे जे कोणी भंपक डी-नोव्होला विरोध करीत आहेत त्यांना आपली पात्रता तरी कळेल.
हे जे कुणी ‘ विजय राऊत ‘ नावाचे जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे माजी विद्यार्थी आहेत ते गेल्या काही दिवसात माझ्याबद्दल किंवा आशुतोष आपटे यांच्याबद्दल किंवा जेजेला डी-नोव्हो दर्जा मिळावा म्हणून जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपण होऊन उत्स्फूर्तपणे जी चळवळ उभी केली आहे तिच्याबद्दल समाज माध्यमांवर जी काही गरळ ओकत आहेत त्यासाठी त्यांना कुणीतरी ठाण्याच्या वेड्याच्या इस्पितळात भरती केलं पाहिजे असं माझं मत झालं आहे.
आता उदाहरणार्थ पहाना… त्यांचा माझा तसा काही फारसा परिचय नाही. कधी दोन चार वेळा जहांगीरवर किंवा जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये समोरा समोर आलो असू आणि कुणीतरी ओळख करुन दिली असेल म्हणून हाय – हॅलो केलं असेल इतपतच आमचा परिचय. जेजेमधला प्रसंग अगदी अलीकडचा. मला अगदी छान आठवतोय.
ललित कला अकादमीनं आपला आर्टिस्ट कॅम्प जेजेत आयोजित केला होता आणि अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांच्या विनंतीवरून मी त्या कॅम्पच्या उद्घाटनाच्या दिवशी जेजेत गेलो होतो. तर तितक्यात श्री विजय राऊत तिथं आले. मला नमस्कार वगैरे केला. त्यांनी नमस्कार केल्यावर मला नमस्कार करणं क्रमप्राप्तच होतं. मी ही केला आणि मग ते थेट पाचारणे यांच्याकडे वळले. ‘ उत्तमराव, आमालाबी यात घ्या ना !’ ( म्हणजे कॅम्पमध्ये. अशा कॅम्पमध्ये ललित कला अकादमी निवडलेल्या अभिजात चित्रकारांना रंग, कॅनव्हास, जागा इत्यादी साहित्य पुरवत असते, इतकंच नाही तर भरपूर मानधन देखील देत असते ) म्हणून मोकळे झाले. ललित कला सारख्या अभिजात चित्रकारांच्या संस्थेच्या अखिल भारतीय स्तरावरच्या आर्टिस्ट कॅम्पमध्ये जर कुणी लुंगे सुंगे आयत्या वेळी येऊन घुसखोरी करीत असतील तर हे काही खरं नाही असं मनातल्या मनात म्हणून मी पाचारणे यांचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडलो. ही जेजेतली त्यांची पहिली आणि एकमेव ओझरती भेट.
अन्य भेटी या त्या आधी जहांगीरच्या पायरीवर किंवा गॅलरीच्या दालनात झाल्या असाव्यात. त्या फार फार तर तीन चार किंवा जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या असाव्यात. मी कधीही त्यांच्याबरोबर चहा घेतला नाही किंवा त्यांच्या बरोबर ‘बसलो’ देखील नाही. जे काही बोलणं झालं ते उभ्या उभ्याच तेही जहांगीरच्या पायऱ्यांवर किंवा दालनात.
असं असताना त्यांनी माझ्याविरोधात समाजमाध्यमांवर वाटेल ते लिहावं किंवा बरळावं हे कशासाठी याचं कारण काही मला अद्याप कळालेलं नाही. अगदी अलीकडेच माझे मित्र श्री अजित वहाडणे यांच्या ‘इंडियन आर्टिस्ट नेटवर्क’ या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांनी असाच प्रकार केला. त्यावर मी अत्यंत सडेतोड अशी उत्तरं दिली होती. खरं तर विजय राऊत यांच्यासारखी माणसं ज्या ग्रुपवर असतात त्या ग्रुपमध्ये मी जातही नाही. विजय राऊत यांचा नंबर माझ्या फोनमध्ये सेव्ह नसल्यामुळे वहाडणे यांच्या ग्रुपवर ते आहेत त्याविषयी मलाही काही कल्पना नव्हती. एके दिवशी त्यांनी तिथं तारे तोडल्यावर मला ते कळलं आणि त्यावर सणसणीत उत्तर देऊन मी त्या ग्रुपमधून लेफ्ट देखील झालो. त्यावेळी मी जे काही लिहिलं होतं ते इतकं जहाल होतं की ते वाचल्यावर श्री राऊत पुन्हा अशा भानगडीत पडणार नाहीत असं मला वाटलं होतं. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. पुन्हा काहीतरी त्यांनी वाकडं तिकडं लिहिलं. ते कुणीतरी माझे तरुण चित्रकार मित्र राजेश पुल्लरवार यांना पाठवलं. पुल्लरवार यांनी ते मला पाठवलं. म्हणून मला ते कळलं. आता कळल्यावर त्याला उत्तर देणं क्रमप्राप्तच आहे.
श्री विजय राऊत यांच्याविषयी मला काहीएक माहिती नाही. ते जेजेमधून शिकले आणि मग त्यांनी ऍनिमेशन क्षेत्रात प्रवेश केला. ऍनिमेशन क्षेत्राचे आणि यांच्या तथाकथित स्टुडियोचे बारा वाजल्यावर म्हणे त्यांनी ऍनिमेशन शिकवणारी इन्स्टिट्यूट अमरावतीत काढली. मधल्या काळात ते बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष देखील झाले. एवढीच त्यांच्याविषयीची छापण्यासारखी चार ओळीची माहिती माझ्याकडे आहे. आणखीन बरीच सांगोवांगीची माहिती माझ्याकडे आहे, पण ती इथं पुराव्याशिवाय देणं मला तरी योग्य वाटत नाही. तशी जर दिली तर मग विजय राऊत आणि मी यांच्यात काय फरक राहिला ? असो.
जेव्हा त्यांनी डी-नोव्हो संदर्भात विरोधी भूमिका घेऊन आमच्यावर खोटेनाटे आरोप करायला सुरुवात केली ( आम्ही म्हणजे मी, आशुतोष आपटे आणि डी-नोव्होसाठी उभे राहिलेले जेजेचे असंख्य माजी विद्यार्थी ) तेव्हा मात्र श्री राऊत यांच्याविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. माहितीचा स्रोत आताच्या काळात अर्थातच फेसबुक असतो. फेसबुकवर पाहिलं तर त्यांचा जन्म १९७२ साली अमरावतीत झाला असल्याचे कळले.
१९७४ साली मी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला. तेव्हा श्री राऊत हे दोन-अडीच वर्षाचे होते आणि अर्थातच ते तेव्हा उघड्या नागड्या अवस्थेत अमरावतीच्या रस्त्यावर फिरत असणार. तेव्हा मी मात्र जेजेमध्ये आधी कमर्शियलला, मग इंटिरियर डेकोरेशनला आणि सरतेशेवटी फाईन आर्टला शिकत होतो. १९८१ साली माझा फाईन आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, पण त्याच्या एक वर्षाआधीच मी पूर्णवेळ पत्रकारितेत शिरलो होतो. श्री राऊत यांनी १९८६ किंवा ८७ साली ( बहुदा ) जे जे अप्लाइड मधला आपला डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचाच अर्थ असा की ते फेसबुकवर म्हणतात तसा त्यांचा जन्म जर १९७२ साली झाला असेल तर जेजेमधला डिप्लोमा त्यांनी १४व्या वर्षीच पूर्ण केला असा त्याचा अर्थ होतो. जेजेतला हा डिप्लोमाचा अभ्यासक्रम पाच वर्षाचा होता. याचा अर्थ वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी एसएससीचा अभ्यासक्रम पूर्ण करून जेजेत प्रवेश घेतला होता असा धरायचा का ? याचाच अर्थ श्री राऊत हे थापेबाजी करताहेत हे उघड आहे. त्यांचे अनेकांना चुना लावण्याचे जे असंख्य खोटे धंदे आहेत त्याचप्रमाणे हा देखील खोटाच उद्योग म्हणायला पाहिजे, नाही का ?
मी १९८१ साली जेजेमधून बाहेर पडलो, १९८३ पासून पुढे नऊ वर्ष सलग बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्टिस्ट सेंटर ( एक वर्षासाठी जहांगीरच्या कार्यकारिणीवर देखील ) यांच्या कार्यकारिणींवर निवडून आलो. श्री राऊत हे तेव्हा जेजेमध्ये शिकत होते. ( १९८८ साली बॉम्बे आर्ट सोसायटीच्या आमच्या कार्यकारिणीने शताब्दी वर्ष दणक्यात साजरं केलं आणि इमारतीसाठी वांद्र्यातला प्लॉट देखील मिळवला. ) असं असताना कुठल्या अंतर्ज्ञानानं ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संदर्भात माझ्यावर नाना पद्धतीचे आरोप करत सुटले आहेत ? हे कळणं माझ्यासाठी तरी अतिशय अवघड आहे.
वर लिहिलंय त्याप्रमाणे त्यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही. असं असताना त्यांनी हे सारे उपद्व्याप करावेत याचं मला खरोखर आश्चर्य वाटतंय. खरं तर चित्रकार गोपाळ आडिवरेकर यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या निवडणुकीचा जो एपिसोड घडवला त्यानंतर मात्र मी बॉम्बे आर्ट सोसायटीवर काहीसा बहिष्कार टाकला ( आडिवरेकरांचं राजकारण नंतर त्यांच्यावरच उलटलं आणि अतिशय अपमानित होऊन त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीतून निघावं लागलं हे वेगळंच ). आमच्याच काही मित्रांनी आचरटपणा करून श्री विजय राऊत यांना ( वास्तविक ते उपयोजित चित्रकार ) यांना बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या अभिजात कलेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आणलं, तेही मला फारसं आवडलं नव्हतं. त्या नंतर तर याच आमच्या मित्रांनी त्यांना चक्क बॉम्बे आर्ट सोसायटीचा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं, हे पाहिल्यावर तर मी बॉम्बे आर्ट सोसायटीवर पूर्णपणे बहिष्कारच टाकला. ( याच मित्रांनी नंतर श्री राऊत याना देखील अत्यंत अपमानीत करून सोसायटी सोडावयास भाग पाडलं ) आणि बॉम्बे आर्ट सोसायटीनं देखील माझ्यावर बहिष्कार टाकला असावा. कारण गेल्या २५ एक वर्षात मी लाईफ मेम्बर असून देखील एकाही कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलं नाही.
त्याला अपवाद ठरला तो बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीच्या उदघाटनाचा पंतप्रधानांच्या हस्ते झालेला कार्यक्रम. सोसायटीचे चेयरमन आणि माझा मित्र अनिल नाईक याच्या वैयक्तिक निमंत्रणावरूनच मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. अन्यथा बॉम्बे आर्ट सोसायटीशी माझा कुठलाही संबंध राहिलेला नाही. असं असताना श्री राऊत यांनी हा आचरटपणा करावा, याचं मला निश्चितपणं वाईट वाटलं आणि आता तर जेजेला डी-नोव्हो देण्याची जी चळवळ आम्ही जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे तिच्याविरोधात ते समाजमाध्यमांवर सातत्यानं गरळ ओकण्याचा प्रयत्न करत आहेत.
कालच रात्री त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेली पोस्ट मला राजेश पुल्लरवार या तरुण चित्रकारानं फॉरवर्ड केली आहे. त्यात श्री राऊत यांनी आपल्या अकलेचे जे काही तारे तोडले आहेत ते पाहिल्यावर आम्ही जेजेला डी-नोव्हो दर्जा मिळवून देण्यासाठी का प्रयत्नशील आहोत ते सहज कळून येतं. या असल्या आचरट विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी व्हावं, चांगले सुशिक्षित, सज्जन, सुसंस्कृत विद्यार्थी जेजेमधून बाहेर पडावेत यासाठीच तर हे सारं चाललंय. पण हे बहुदा राऊत यांना मान्य नसावं. कारण जहांगीर आर्ट गॅलरीसारख्या सार्वजनिक ठिकाणी भर दिवसा त्यांनी आपल्या एका शिक्षकावरच हल्ला चढवला होता. त्यामुळं त्यांनी जर ऍनिमेशन इन्स्टिट्यूट काढली असेल आणि त्यात जर काही विद्यार्थी शिकत असतील तर त्यांना शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही.
ते असे आचरटपणाची जी मुक्ताफळं उधळत आहेत त्यातून त्यांनी जी पोस्ट लिहिली आहे ती इथं वेगळी दिलीच आहे आणि तिला आशुतोष आपटे यांनी दिलेलं समर्पक उत्तर देखील सोबत जोडलं आहे. आशुतोष आपटे यांनी माझ्या वतीनं दिलेलं उत्तर देखील इतकं मुद्देसूद आणि थेट आहे की त्यावर आणखीन काही लिहावं असं मला वाटत नाही. यावर आणखीन काही लिहायची वेळ आली तर मी नक्की लिहिनच. तोपर्यंत धन्यवाद !
आणखीन एक. विजय राऊत साहेब, ही चळवळ आता काही आमच्या हातात राहिलेली नाही. ती जेजेच्या साऱ्याच माजी विद्यार्थ्यांची झाली आहे. परवाच्या मंगळवारी आम्ही समाजमाध्यमांवर आवाहन करून जेजेच्या माजी विद्यार्थ्यांना स्नेहमिलन कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, पण दुर्दैवानं राजकीय परिस्थिती बदलल्यामुळं मुंबईत अस्थिरता निर्माण झाली असल्याकारणानं तो कार्यक्रम आयत्यावेळी रद्द करावा लागला. तेही आम्ही समाज माध्यमांवर जाहीर केलं, पण तरी देखील अगदी पुणं सुरत सारख्या शहरातून जेजेचे माजी विद्यार्थी जेजेत येऊन पोहोचले. कल्याण, कर्जत सारख्या ठिकाणाहून ७०-७० वर्ष वयाचे ज्येष्ठ नागरिक देखील पावसात आलेले पाहून आम्हाला अतिशय वाईट वाटलं, पण या साऱ्या घटनांनी आम्हाला एक आत्मविश्वास देखील मिळवून दिला. आता डि-नोव्हो होणार. ज्यांनी तुम्हा मंडळींना भरीस पाडलं ते आता मंत्रालयातून गायब झाले आहेत. त्यांच्या एकूण उपद्व्यापांमुळे पुन्हा काही ते खातं त्यांच्याहाती येईल असं वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे डी-नोव्होचा प्राथमिक प्रस्ताव हा देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच तयार झाला होता, हे लक्षात ठेवा. आम्ही लढतो आहोत ते आमचं कॉलेज नीट व्हावं यासाठी. आमची दुकानं चालवण्यासाठी नाही, हे ध्यानात ठेवा !
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
श्री विजय राऊत यांनी तोडलेली मुक्ताफळं संपादित न करता जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत. ती वाचल्यावरच वाचकांना कळेल की आम्ही डी-नोव्होचा का आग्रह धरतोय ते !
जे.जे. डिनोव्हा.( अनन्य... कोठेही नाहीं असे.)
नमस्कार
माझ्या जेजे करांनो…..
आपले एकदा का जेजे डिनोव्हा (अनन्य …कोठेही नाही असे.) झाले याचे सगळे श्रेय.. महान चित्रकार श्री. आशु आपटे आणि श्री. सतीश नाईक (?) यांनाच द्यावे लागणार …
त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच मग जेजे द्वारातून प्रवेश मिळणार ….
आता आल्याबरोबर स्वर्गात आल्याचा आनंद होणार सगळीकडे भारतातील आणि भारत बाहेरील विद्यार्थी कलावंतांच्या कळपांचे दर्शन होणार…
चुकूनही एखादा महाराष्ट्रातील विद्यार्थी दिसला तर आपल्याला खुप आनंद होणार आणि किती बोलू आणि किती नको असे आपल्याला वाटायला लागणार ..
पण तो न बोलताच निघून जाणार कारण तो इथे जगप्रसिद्ध आर्टिस्ट बनण्यासाठी आलेला आहे ..
सगळे विद्यार्थी कसे इथे जगप्रसिद्ध आर्टिस्ट होणार कारण जगप्रसिद्ध पीएचडी प्रोफेसर कम आर्टिस्ट इथे शिकवायला येणार आहेत ना…
डिनोव्हा (अनन्य.. कोठेही नाही असे )झाल्यावर शिक्षण झाले न झाले की लगेच कॅम्पस इंटरव्हीव होणार आणि कंपनिज लाखो रुपयाचे पॅकेजेस देऊन आमच्या जेजेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार ..
150 वर्षे जे इथे शिकलेल्या लोकांनी वाया घालविले सगळे.. त्याची आता आम्ही पूर्ण भरपाई करणार .
भारतात फक्त आता जेजेचेच शिक्षण सशोधनात्मक असणार प्रयोगशील असणार . भारतात फक्त जेजे चेच विद्यार्थी दर्जात्मक असणार …
डिप्लोमा धारकाना इथे काहीच थारा नसणार ..
महाराष्ट्रातील इतर भागातून किंवा इतर कॉलेज मधून आलेल्या विद्यार्थ्यांना आधी आम्ही…
पैसे आहेत का शिकायला तुझ्याजवळ ??? नसतील तर चल चालता हो इथून…
तुझी लायकी नाही..
असे सांगून मोकळे होणार .
चांगले काम असूनही पैशाअभावी जेजे डिनोव्हाला ऍडमिशन नाही मिळणार…
पण असो ….आम्हाला कसे डिनोव्हा (अनन्य.. कोठेही नाही असे )हवे आहे… सगळे एकदम चकचकीत नवीन सगळे ….जुने काहीच नको आम्हाला ..
ना टीचर्स ना ती गावाकडची मुले ..
सगळे कसे फक्त इंग्रजीतीतून बोलणारे आणि गाडीतून फिरणारे हवेत आम्हाला .
मग जगात फक्त जेजे आणि जेजे चाच बोलबाला असणार..
हे सगळे बघून जमशेटजी जिजीभाई पुतळ्यावर पण एक स्मित हास्य फुलणार आणि खुश होऊन पुतळा मनाशीस पुटपुटणार….
बरे झाले माझ्या स्वप्नाना इथेच सीमित केले या जेजे च्या आवारात नाहीतर विनाकारण जेजे राज्य विद्यापीठ करून प्रत्येकाला माझ्या नावाचे प्रमानपत्र दिले असते …
त्यांची लायकी नसताना.
मी फक्त जेजे च्या माजी विद्यार्थ्यांचा बाप आहे बाकी त्यांचे त्यांचे बाप बघून घेतील आपल्या मुलांना …
आणि पुतळा पुन्हा स्तब्ध झाला पुन्हा कधीही न बोलण्यासाठी …
आपला..
विजय राऊत..
विजय राऊत यांच्या पोस्टला आशुतोष आपटे यांचं उत्तर !
आदरणीय श्री. विजय राऊत यांनी जेजे डी-नोव्हो व्हायला हवे असे मान्य केले तर… तसंही त्यांच्या ॲनिमेशन कॉलेजच्या फी पेक्षा कोणत्याही संस्थेची फी परवडणारच की गरीब विद्यार्थ्यांना.. असो, आम्ही त्यांची कोणतीही दखल न घेता, त्यांना माझी व सतीश नाईक यांची दखल घ्यावी लागली हेच आम्हास किती गौरवास्पद आहे. धन्यवाद राऊत साहेब. परंतु एक लक्षात घ्या जेजे डी-नोव्होत महाराष्ट्रातील कोणीही विद्यार्थी कमी फी मध्ये शिकेल याची काळजी शासन घेणार आहेच. हो आणि नक्कीच फुकटचा गर्व नसलेले पण जागतिक दर्जाचे शिक्षक आपल्या जेजेत शिकवायला येतील याचीही खात्री बाळगा. अर्थात आपला लौकिक पाहता कदाचित आपणास शिकवण्यासाठी बोलावणे जेजेला शक्य होईलच असे नाही. आणि बरं का १५० नाही हो १६५ वर्षे झाली जेजेला. त्यातले आता जिवीत असलेले खूपसे चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार, डिझायनर, वास्तूविशारद जेजे डी-नोव्हो व्हावे म्हणून प्रत्यक्ष झटत आहेत. मा. वासुदेव कामत, मा. अनिल नाईक, मा. गोपी कुकडे झालेच तर मा. कोलते सर, तुमचे आदरणीय शिक्षक मा. राजाध्यक्षसर व मा. विचारे सरही जेजे डीनोव्हो व्हावे म्हणून सक्रिय आहेत. अहो, प्रत्यक्ष जमशेटजी जीजीभॉय यांचे पणतूही जे. जे. डी-नोव्होच्या पाठी खंबीर आहेत. आणि हो अहो, फ्रीशीप, स्कॉलरशिप, फी सवलती या सगळ्या शासनाच्या फी विषयक योजना सुरूच असणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रातील गरीब श्रीमंत विद्यार्थी इथे शिकायला येईल. इथे जेजेत पैसे नाही मेरीट नक्कीच बघीतले जाईल.
आणि हो,
जीजीभॉय यांच्या पुतळ्याचे माहिती नाही, पण आपण एकदा स्मित करून स्तब्ध झालात तर नक्कीच चालेल.
जीजीभॉय यांच्या पुतळ्याचे माहिती नाही, पण आपण एकदा स्मित करून स्तब्ध झालात तर नक्कीच चालेल.
बाकी काय आपण महाराष्ट्राचे तारणहार आहातच… व कर्तबगारही आहात.. तेव्हा द्या जेजेत शिकणाऱ्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी घसघशीत रक्कम…
पुन्हा पुन्हा धन्यवाद,
आपल्या मुखी आमचे नाव
आम्हास परम भाग्याचे वाटते…
स्नेह आहेच
आपलीही सेवा जेजे डी-नोव्हो चरणी लागो ही सदिच्छा…!
आपले स्नेहांकित,
आशुतोष राम आपटे व सतीश नाईक
Related
Please login to join discussion