No products in the cart.
आईचं पेन्शन !
डिग्री मिळवण्यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्याचा म्होरक्या आशुतोष आपटे हाच विद्यार्थी होता. आज जवळजवळ तीन-चार दशकानंतर जेजेला डी-नोव्हो दर्जा मिळावा म्हणून जे आंदोलन होऊ घातलंय त्याचं सूत्रधारपण आशुतोष आपटे हेच करीत आहेत. या निमित्तानं जे विचार येतात ते सारे फेसबुकवर मांडत असतात आणि त्याला प्रतिसाद देखील प्रचंड मिळत असतो. नुकताच त्यांनी नवा लेख फेसबुकवर प्रसारित केला आहे. ‘Chinha Art News’च्या वाचकांसाठी त्यात किंचित सुधारणा करून तो इथं प्रकाशित करीत आहोत.
काही मुलं इतकी अवगुणी असतात की आई आई म्हणतात अन् आई म्हातारी झाली की आईला कधी एकदा तीर्थयात्रेला पाठवतो आणि पहिले एखादी क्वार्टर घरी आणतो. असं होतं त्यांना, आई आता म्हातारी झाली, तिची काळजी घ्यायला हवी, आईची थोडीफार तरी सेवा करायला हवी. पण छे छे !सगळीच मुलं अशी गुणी कुठे असतात ? आई मेली तरी चालेल, पण आईचं पेन्शन आपल्याला मिळायला पाहिजे असा विचार करणारीही काही मुलं दुर्दैवानं असतात !
बघा नं आता, जे जे स्कूल ऑफ आर्टला मातृसंस्था म्हणायचं म्हणजे आईचा दर्जा द्यायचा आणि महाराष्ट्र शासन प्रायोजित सर जेजेचे अनन्य अभिमत विद्यापीठ होण्याच्या अंतिम टप्प्यावर काहीतरी खो घालण्याचा प्रयत्न करायचा. ते म्हणतात, ‘जेजेचे राज्य विद्यापीठ करा !’ अरे आधीही शासनच चालवत होतं जेजे..!
काय अवस्था झाली आहे ? शिक्षकांच्या, शिपायांच्या पोस्टच नाही भरल्यात. पर्मनंट चांगले शिक्षक नाहीच. काहींना अक्षरश: कंत्राटी कामगार म्हणून राबवतात. माळ्याची पोस्ट सुध्दा भरली नाही. राज्य विद्यापीठ करायचं म्हणजे पुन्हा तेच करायचं ? अर्थात अशी सगळीच मुलं स्वार्थीही नाहीत, काहींची दिशाभूल केली गेली आहे. आणि खूपशी मुले अशीही आहेत की ती जेजेवर जीव ओवाळून टाकतात. आज जेजे विषयी सच्ची तळमळ असलेला जेजेचा विद्यार्थी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आज माननीय श्री. उदय सामंत हे शिक्षणाचा कळवळा असलेले चांगले शिक्षणमंत्री आहेत. छान ! पण उद्या असतीलच का हे ? मग तेव्हा शासनदरबारी आपल्या जेजेचा कोण असेल वाली ? आणि हीच गोष्ट मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या आपल्या जेजे माजी विद्यार्थी प्रतिनिधींच्या बैठकीत स्पष्ट अधोरेखित केली गेली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की “मला माझ्या जेजेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार विद्यापीठ करायचं आहे आणि हे मी आहे तोवरच करायला हवं.“ तेव्हा मी म्हणालो होतो की, “मुख्यमंत्री महोदय, अनन्य अभिमत विद्यापीठ केले तरच हे सहज शक्य आहे ! आणि आज आपण जेजेचे माजी विद्यार्थी आहात, त्यामुळे आपल्या कालखंडातच हे झालं तर होईल आणि तुम्हीच हे करू शकता. पुढे काही आशा नाही !“
तेव्हा माननीय शिक्षणमंत्री म्हणाले, “आमचा हाच प्रयत्न होता अनन्य अभिमत विद्यापीठ करण्याचा, डी-नोव्हो करण्यासाठी आपल्याला लेटर ऑफ इंटेण्ड (हमीपत्र) आलेले आहे. त्यात युजीसीने काही अटी घातल्या आहेत आणि त्या पूर्ण करणे अवघड आहे.” तेव्हा चर्चेतून हे स्पष्ट झालं की ‘बऱ्याचशा अटी या डी-नोव्होच्या अंतर्गत व राज्य सरकार पुरस्कृत असलेल्या जेजेसारख्या संस्थेस शिथिल आहेत.‘ तेव्हा मुख्यमंत्री ताबडतोब म्हणाले की, ‘ज्या अटी शिथिल आहेत त्या बाजूला ठेवा व जेवढ्या आपण पूर्ण करावयाच्या आहेत तेवढ्याच सांगा आणि त्या पूर्ण करता येतील की नाही हे पंधरा दिवसात सांगा. पूर्ण करता येत असतील तर किती कालावधीत पूर्ण करता येतील हे पाहूया व डीनोव्होची पूर्ण मान्यता मिळवून जेजेचं डीनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी सुरु करूया.“
दोस्तांनो, आम्ही तसा आराखडा तयार केला आहे. लवकरच त्यावर निर्णय होऊन सर जे. जे. स्कूल अनन्य अभिमत विद्यापीठाची घोषणा होईल अशी आशा करूया ! मग आपल्या या जेजे आईला
नवचैतन्य प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तळागाळातून इथं शिकायला येणाऱ्या आपल्याच पुढच्या पिढ्यांचं खरंच कल्याण होईल, उलट मी तर म्हणतो, ‘जुनं द्या नं सोडून ! चांगला सकारात्मक विचार करूयात. जेजेच्या उज्वल भवितव्यासाठी जेजेचं अनन्य अभिमत विद्यापीठच होईल यासाठी आपणही सगळ्यांनी एकदिलाने प्रयत्न करुयात !
बघा… कोता विचार करून पुढच्या पिढ्यांचे गुन्हेगार म्हणून ओळखले जाण्यापेक्षा आधुनिक जेजेचे शिल्पकार होऊया ! खरंच सांगतो त्या जुन्या दगडी भिंतीतून आपली जेजे आई आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, जमशेदजी जीजीभाई यांचा धातूचा पुतळाही आल्हाद स्मित करु लागेल. खरंच !
आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]
Related
Please login to join discussion