No products in the cart.
जेजे : नेमकं काय चाललंय ?
जाहिरात क्षेत्रात आर्ट डिरेक्टर म्हणून नाव कमावलेले, विद्यार्थी दशेत पदवी मिळावी म्हणून आंदोलनात अग्रगणी असलेले, जुने जाणते चित्रकार, लढवय्ये व्यक्तिमत्त्व असलेले श्री. सुनिल नाईक यांनी इतरांच्या मनातली शंका कुशंका लक्षात घेऊन, ‘जेजे डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी’ आंदोलनासंदर्भात एक छान सुटसुटीत प्रश्नावली आशुतोष आपटे यांना पाठवली. हे सुनील नाईक महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री, छायाचित्रकार श्री. उद्धव ठाकरे यांचे जेजेतील वर्गमित्र आहेत. जेजेसंदर्भात सुरु झालेले वाद त्यांनी वृत्तपत्रात वाचले आणि ते अस्वस्थ झाले. यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटलं म्हणून त्यांनी आशुतोष आपटे यांना एक प्रश्नावली पाठवली. त्याच प्रश्नावलीला आशुतोष आपटे यांनी दिलेली ही उत्तरं. यातून जेजेच्या संदर्भात अत्यंत जाणीवपूर्वक जे गैरसमज करून दिले जात आहेत ते निश्चितपणे दूर होतील याची खात्री आहे.
१. आपला लढा काय आहे ?
संपूर्ण सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची महाराष्ट्र शासन पुरस्कृत डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी ( अनन्य अभिमत विद्यापीठ ) व्हावी हा आपला लढा आहे.
हे झाले तर जेजेची आर्ट, आर्किटेक्चर व अप्लाईड आर्ट ही तिनही कॉलेजेस् एकत्र येतील, महाराष्ट्र शासनाची ग्रांट त्यांना असेलच पण शैक्षणिक दृष्ट्या जेजे संपूर्ण स्वायत्त होईल. शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल, सगळी पदे भरली जातील. विद्यार्थ्यांना फीमधील आहे त्या सर्व सवलती मिळूनही, सर्व शाखांमध्ये अभ्यासाची संधी मिळून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल.
विशेष म्हणजे यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. उदय सामंत यांच्या व शिक्षण सचिवांच्या तसेच जेजेचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, आर्किटेक्चरचे प्रा. राजीव मिश्रा व अप्लाइडचे प्रा. संतोष क्षीरसागर यांच्या सहीनिशी व महाराष्ट्र शासनाने पंधरा लाख रुपये भरून लेखी अप्लिकेशन ( UGC ) युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनला पाठवीले आहे व तत्वतः ते मान्यही झाले आहे.
२. मग घोडे अडले कुठे ? आपला लढा कशासाठी आहे ?
परंतु हल्ली कुणीतरी कान भरले असावेत व जेजेला स्वायत्तता मिळू नये, जेजे नेस्तनाबूत व्हावं यासाठी जेजेचे राज्य विद्यापीठ व्हावं अशी अकारण मोहीम काढलेली आहे. जेजेचे राज्य विद्यापीठ होणे म्हणजे पुन्हा शासनदरबारी हाजी हाजी करत जेजेची बटिक करण्याचा घाणेरडा डाव आहे. जेजेचे राज्य विद्यापीठ करुन इतर कॉलेजेस जोडणे म्हणजे जेजेवर अकारण अतिरिक्त भार टाकून जेजेचे कंबरडे मोडणे. आज इतर कॉलेजेस स्वतंत्र कला संचालनालयाचा पदविका अभ्यासक्रम किंवा तेथील विद्यापीठांचे पदवी अभ्यासक्रम स्वतंत्रपणे राबवत आहेत. ती जेजेला जोडणे म्हणजे पोत्यात पाय घालून पळण्याची शर्यत लावण्यासारखे आहे. बजबजपुरी माजवायची व पर्यायाने इतरही कॉलेजसची दुरावस्था करुन टाकायची असे कारस्थान आहे. या कारस्थानाविरुध्द लढायचे आहे.
शिक्षकांची पदेच भरायची नाहीत, वर्षानुवर्षे शिक्षकांना कमी पगारावर कंत्राटी ठेवायचे, अगदी लेडीज टॉयलेट बांधणे, विद्यार्थ्यांचा छोटा कार्यक्रम असो, कुणा तज्ञाला बोलवायचे असो, सेमिनार घ्यायचा असो, आर्ट मटेरियल पुरवायचे असो, अशा छोट्या छोट्या मान्यतेसाठीही, आर्थिक तरतुदीसाठी जेजेच्या माननीय अधिष्ठात्यांना शासनदरबारी खेटे घालायला लावणे व लाचारी पत्करायला लावणे, असा हा आज चालू असलेला सावळा गोंधळ उद्या आणखी दुप्पट करण्याचा हा गलिच्छ डाव आहे. तसेच राज्य विद्यापिठाच्या आडून जेजेच्या आणि जेजेच्या वसतीगृहासाठी दिलेल्या बांद्रा कलानगरमधील जागेवर डोळा ठेवणे हा त्याहूनही कुटील डाव आहे. हा डाव हाणून पाडून जेजे डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच व्हावी यासाठी आपला लढा आहे. जेजेच्या भल्यासाठी, जेजेच्या स्वातंत्र्यासाठी हा लढा आहे.
३. सुनील: आपण कोणाविरुध्द लढत आहोत ?
या जेजे डिनोव्हो स्वायत्ततेला विरोध करणारे काही आपमतलबी लोक, खोटे समज पसरविणाऱ्या वृत्ती, स्वतःचे अज्ञान व स्वार्थापायी विद्यार्थ्यांचे, जेजेचे व कला जगताचे नुकसान करु पाहणाऱ्या भ्रष्ट राजकीय प्रवृत्ती यांच्या विरुद्ध आपण लढत आहोत. जेजेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, आपल्या देशातील किंबहुना परदेशातीलही विद्यार्थी शिकायला येत असतात. म्हणजेच जेजेचे नुकसान म्हणजे संपूर्ण कलाशिक्षणाचे नुकसान.
या आपल्या लढ्यात संपूर्ण जेजेचे आजी माजी विद्यार्थी, विद्वान व नामवंत मंडळी साथ देत आहेत. जेजेसाठी हा लढा आपण जिंकणार आहोत.
४. आतापर्यंत आपण कशा प्रकारे लढाई लढत आहोत ?
खरे तर आतापर्यंत लढाई लढण्याचा प्रश्नच आला नव्हता. कारण तिन्ही जेजेतले प्रमुख व चार प्राध्यापकांमार्फत एकूण सात जण मिळून सर्व काही शासन दरबारी लिखीत स्वरुपात अर्ज वगैरे तसेच अधिकृत बैठका घेऊन राज्य व केन्द्र शासनाच्या पातळीवर कार्य करत होते. अत्यंत सहजपणे सर्व सकारात्मक घडतही होते.
ढोबळ घटनाक्रम असा :
- २७ फेब्रुवारी २०१७ला तत्कालीन शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांच्या अधिकारात ‘जेजेच्या स्वायत्ततेसाठी पुढील प्रस्तावाची प्रक्रिया सुरू करावी’ असा महाराष्ट्र शासनाचाच जीआर ( शासन निर्णय ) निघाला होता. मग मुंबई विद्यापीठ, शासनाचे विभाग अशा सर्वांच्या परवानग्या, बैठका, तांत्रिक मुद्दे असे सर्व सोपस्कार करुन
- ६ सप्टेंबर २०१९ला सदर लेखी अर्ज युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनला पोहचला.
- २६ फेब्रुवारी २०२०ला स्वतः उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. उदय सामंत यांनी ही प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून सही शिक्क्यासह पत्र पाठवले.
- १७ मार्च २०२०ला महाराष्ट्र शासनाने युजीसीला १५ लाख रुपये प्रोसेसिंग फी म्हणून भरले.
- १५ जुलै २०२१ला युजीसीने या जेजे डिनोव्हो प्रस्तावास मान्यता देऊन तो प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयात पाठवला.
- ७ ऑक्टोबर २०२१ आपल्या मा. शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांनी स्वतः केंद्रीय शिक्षणखात्याला हे लवकर व्हावे म्हणून पत्र पाठवले.
- २७ ऑक्टोबर २०२१ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयातून LOI म्हणजे Letter of intent म्हणजे तद्अनुषंगिक पुढील कार्यवाही करावी असे उद्देशीय पत्र मिळाले.
- २ नोव्हेंबर २०२१ला जेजेची डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी होण्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन ठरविण्यासाठी शासकीय पातळीवर अधिकृत बैठक झाली. त्या बैठकीच्या मसुदा नोंदी ( मिनिटस् ) अधिकृत आहेत…
आणि… आणि…
माशी शिंकली… कुणीतरी कान भरले… घोडा अडला..
वगैरे वाक्प्रचार यापैकी काही काळेबेरे घडले. मा. शिक्षण मंत्र्यांनी जेजेचे राज्य कला विद्यापीठ कसे करता येईल याचा तातडीने अहवाल देण्यासाठी समिती नेमली. त्यात आपल्या जेजेचेच सुहास बहुळकर व प्रकाश राजेशिर्के हे आपल्या परिचयाचे व आत्तापर्यंत अत्यंत सज्जन असा परिचय असणारे दोघे जण आहेत. अर्थात त्या दोघांशी संपर्क झाला तेव्हा कळले की त्यांना आधी काय घडले आहे याची कल्पना देण्यात आलेली नव्हती. पण आता ही वस्तुस्थिती समजल्यावर जेजे हिताशी प्रतारणा करण्याचे पाप त्यांच्या हातून घडू नये यासाठी ते नक्कीच काळजी घेतील व जेजेची डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी होऊ द्या असा रास्त अहवाल देतील.
किंबहुना राज्य कला विद्यापीठ स्थापनच करायचे तर प्रख्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार व आपल्या सगळ्यांचे हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कला विद्यापीठ कोकण किंवा महाराष्ट्राच्या मध्यभागी जालना, लातूर येथे दोनशे-तिनशे एकर जागेवर भव्य दिव्य स्वरूपात उभे करावे यासाठीही हे दोघे प्रयत्नशील राहतील अशी खात्री आहे. मात्र बेसावध न राहता जेजे डिनोव्हो डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी साठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन तीव्र आंदोलन उभारण्याची गरज आहे.
५.आपण समजा लढाई जिंकलो तर फायदा कोणाचा आणि काय होणार..?
मुख्य फायदा जेजेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा होईल. आता तिथे शिकवत असलेल्या सर्व शिक्षकांचा होईल. त्यांना नियमित करुन जास्त चांगला पगार मिळण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अशी सगळी पदे भरली जातील, त्यामुळे अनेकांना नोकरीची संधी मिळेल. जेजे नोकरशाहीच्या कचाट्यातून सुटेल. सर्व एकत्र आल्यामुळे खऱ्या अर्थाने बाउ-हाउसची जागतिक आंतरशाखीय शिक्षणप्रणाली राबवणारे जेजे हे संपूर्ण जगातील एकमेव अद्ययावत असे केंद्र बनेल.
६. आपल्याला कोणाचा विरोध होत आहे…आणि तो ते विरोध का करता आहेत…?
बराचसा विरोध हा अज्ञानापोटी किंवा गैरसमजातून होत आहे. काहींचे वैयक्तिक स्वार्थ दडलेले आहेत म्हणूनही विरोध होतो आहे. किंवा काहींना वाटतं की जेजे डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी झाली तर त्यांचे व इतर कॉलेजचे भवितव्य धोक्यात येईल की काय अशी अनाठायी भीती त्यांना वाटते. खरे तर त्यांचा आणि जेजेचा व्यवस्थापन, अभ्यासक्रम, अध्यापन या संदर्भात सुतरामही संबंध नाही. त्यांच्या हिताला काडीचाही धक्का लागणार नाही. काहींनी आवई उठवली आहे की खासगीकरण होईल, फी वाढेल पण हे धादांत खोटे आहे. जेजे कायम शासन पुरस्कृतच राहणार आहे, फी खूप वाढण्याचे तर काहीच कारण नाही. फी परतावा, फी माफी हे तसंच राहणार आहे.
७. या लढाईत माजी विद्यार्थ्यांनी भाग घेण्यासाठी कोणाला आवाहन करावे लागेल.. तसेच कोणा-कोणाला जवळ घ्यावे लागेल…?
सर्वांना समजावून सांगावे लागेल. संपूर्ण जेजे आजी-माजी विद्यार्थी संघटन तयार करावे लागेल. येतील त्या सगळ्यांनाच जवळ करावे लागेल.
८. सध्याचे कॉलेजचे विद्यार्थी यात भाग घेतील का…?
हे आंदोलन उभे करण्यासाठी आत्ताच्या विद्यार्थ्यांनी तर स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे. जेजे डिनोव्हो डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा फायदा त्यांनाच आहे. चांगले शिक्षण त्यांना मिळेल. आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होतील. त्यांच्यापैकी काही जणांना जेजेत चांगल्या पगारावर शिक्षकी पेशाची सन्मानाची संधी मिळेल. आणि जसं आपल्या विद्यार्थी काळात आपण डिग्रीसाठी व अन्य आंदोलने उभी केली होती त्याचा फायदा आजच्यांना होतो आहे. तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी पुढच्यांसाठी आंदोलन करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि लक्षात घ्या जेजेच्या विद्यार्थ्यांचा आवाज खरोखर बुलंद असतो.
९. शिक्षकांची यात नेमकी भूमिका काय आहे…?
जे आज जेजेत शिक्षक आहेत त्यांना इतकी वर्षे जेजेनी सन्मानाची रोजी रोटी दिलेली आहे. त्यांची सर्वाधिक जबाबदारी आहे की त्यांनी जेजे डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या आंदोलनाचा झेंडा उचलला पाहिजे. त्यांनी नीट समजावून घेतलं पाहिजे व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे. यात चांगला पगार मिळणे, नियमित होण्याची संधी मिळणे हा त्यांचाच फायदा आहे. अधिक शिक्षकांची पदे भरली गेली तर त्यांच्यावरचा ताण हलका होईल. मुख्य म्हणजे योग्य भूमिका घेतल्याचे समाधान मिळेल.
१०. तरीही जेजे डिनोव्हो डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीला विरोध करतील त्यांचे काय ?
जेजेशी प्रतारणा करण्याचे पाप कायमचे त्यांच्या माथ्यावर लागेल. सगळ्या जेजेचे तळतळाट लागतील आणि जेजेच्या विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागेल. त्यापेक्षा आपला विरोध सोडून सत्याच्या बाजूला या. महाराष्ट्र शासन पुरस्कृत जेजे डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या दिंडीत सामील व्हावे. आपले स्वागत आहे.
– आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]
Related
Please login to join discussion