Features

जे जे चुकीचे लिहिले ते ते…

‘सकाळ’ दि ७ जुलै २०२३ च्या अंकात प्रसिद्ध झालेला जे जे स्कूल ऑफ आर्टच्या डि – नोव्हो संदर्भातला श्री संजीव भागवत यांचा लेख अतिशय अत्यंत चुकीच्या माहितीवर तसेच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन धरुन लिहिलेला असावा असे वाटते. १६६ वर्ष जुन्या आणि आशिया खंडात नावाजलेल्या या संस्थेचे नाव देखील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट हे कला महाविद्यालय आहे. ‘आर्ट’ स्कूल आहे. ‘आर्ट्स’ कॉलेज नव्हे. तिथं कुठलीही भाषा शिकवली जात नाही. फक्त चित्रकलेचंच शिक्षण दिलं जातं. म्हणूनच त्याला आर्ट स्कूल असं संबोधलं जातं. आर्ट्स कॉलेज नव्हे. ही प्राथमिक गोष्ट देखील त्यांना माहित नसताना त्यांनी या विषयावर लेख लिहिणं किंवा बातम्या देणं ही गोष्ट सर्वथैव अनुचित आहे.

मुंबईतील कला शिक्षणाची मुहूर्तमेढ १ मार्च १८५६ रोजी ‘स्कूल ऑफ आर्ट’च्या निमित्तानं रोवली गेली. हे त्यांच्या लेखाचं पहिलं वाक्यच मुळी चुकीच्या माहितीवर आधारित आहे. ही तारीख त्यांनी कुठल्या संशोधनातून काढली हे कळावयास मार्ग नाही. साधं जेजेचं नाव गुगल जरी केलं असतं तरी त्यांना ही सर्व माहिती मिळू शकली असती.
जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना २ मार्च १८५७ रोजी झाली. तेव्हापासून आजतागायत हा स्थापना दिवस जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. हा सर्व इतिहास जे जे स्कूल ऑफ आर्टच्या शताब्दी वर्षात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात पुराव्यानिशी दिलेला आहे. तो जरी त्यांनी पाहिला असता तर लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात चुकीचं विधान करण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं. याचं परिच्छेदातलं लेखातलं दुसरं वाक्य देखील असंच अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. सर जमशेदजी जिजिभॉय यांचा त्यांनी केलेला ‘कपडा व्यापारी’ हा उल्लेख अत्यंत अवमानकारक आहे.

७ जुलै रोजी दै. सकाळमध्ये आलेला लेख.

जेजेच्या वैभवशाली इतिहासाच्या तपशिलाबाबत त्यांनी ज्या चुका केल्या आहेत तशाच चुका त्यांनी लेखातील पुढील परिच्छेदातही केल्या आहेत. पण त्या विषयी लिहावयाचे झाल्यास या लेखाची व्याप्ती खूपच मोठी होईल म्हणून त्याविषयी लिहिणं तूर्त टाळतो. पण या लेखाच्या शेवटच्या दोन परिच्छेदांमध्ये त्यांनी जेजेला दिल्या जाणाऱ्या डि – नोव्हो दर्जा बाबत त्यांनी अतिशय चुकीची माहिती दिली असल्यामुळे, इतकंच नाही तर अत्यंत चुकीची विधानं केली असल्यामुळे या कला महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा, इतकंच नाही तर माजी विद्यार्थ्यांचा किंबहुना आगामी काळात जेजेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा किंवा त्यांचा पालकांचा आत्यंतिक गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या लेखाची दखल घेणं भाग पडलं आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्टचा मी माजी विद्यार्थी आहे इतकंच नाही तर १९८२ सालापासून जेजे संस्कृतीच्या झालेल्या ऱ्हासाबाबत मी वेळोवेळी परखड लिखाण केलं आहे. त्या संदर्भातल्या बातम्या मुंबईतल्या विविध वृत्तपत्रांना देत आलो आहे. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करुन देखील सरकार या प्रश्नाकडे लक्ष देईना तेव्हा ‘चिन्ह’ या कला वार्षिकाचा २००८ साली मी तीनशे पन्नास पानांचा ‘कालाबाजार’ विशेष अंक प्रसिद्ध केला होता. या अंकाचीच दखल भाजप नेते यांनी घेतली. तेव्हा ते विरोधी पक्षात होते. पण नंतरच्या काळात शिक्षणमंत्री होताच विनोद तावडे यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आयएस ऑफिसर्स यांच्या सल्लामसलतीने हा विषय केंद्र सरकारकडे नेला. केंद्र सरकारने या विषयाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली.

त्याच सुमारास एका विषयाचा अभ्यास करण्यासाठी अठ्ठावीस खासदारांचं एक पथक चार्टर्ड विमानाने मुंबईला आलं होतं. या पथकाने जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य दोन महाविद्यालयांची देखील पाहणी केली आणि त्यांनी दिलेल्या अहवालानंतर जेजेला डिनोव्हो दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु झाली. जी नुकतीच संपली. पण तिला गती मिळावी यासाठी ‘चिन्ह’ने www.chinha.in ही वेबसाईट सुरु करुन जेजेच्या विविध प्रश्नांना सातत्याने चालना दिली. माझा या साऱ्यांशी संबंध काय ? असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असल्यामुळे हे सारे विस्ताराने लिहिले. असो.

श्री संजीव भागवत यांनी लिहिलेल्या लेखातील शेवटच्या दोन परिच्छेदामध्ये त्यांनी जी विधानं केली आहेत ती अत्यंत अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. त्यांचा कुणीतरी हेतुपुरस्सर गैरसमज करुन दिला आहे. त्यांचं प्रत्येक विधान खोडून काढायचं ठरवलं तर या लेखाची व्याप्ती खूपच मोठी होईल म्हणूनच दि ६ किंवा ७ रोजी प्रसिद्ध झालेल्या राज्यशासनाच्या प्रसिद्धी परिपत्रकातील मुद्दे अनुक्रमांकासह जसेच्या तसे देत आहे त्यावरुन आजी – माजी आणि भावी विद्यार्थी, कलाक्षेत्रातील नामवंत आणि पालकांचे गैरसमज दूर होऊ शकतील.

परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे असे :
३) “SIR J. J. SCHOOL OF ART, ARCHITECTURE AND DESIGN FOUNDATION” या नावाने भारतीय कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ८ (Section ८) खाली (Sponsoring Body) म्हणून प्रायोजक संस्थाकरिता कंपनीची नोंदनों णी करण्यास व ही कंपनी १००% शासनाच्या मालकीची ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

(५) शासकीय कंपनी स्थापन झाल्यानंतर शासन स्तरावरुन तिन्ही संस्थाची मालमत्ता “SIR J. J. SCHOOL OF ART, ARCHITECTURE AND DESIGN FOUNDATION” या शासकीय कंपनीच्या नावावर करण्यास मान्यता देण्यात आली.

(६) तज्ञ समितीने शिफारस केल्यानुसार प्रस्तावित विद्यापीठामध्ये एकुण ७ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यास व प्रत्येक अभ्यासक्रमाची विद्यार्थी क्षमता निश्चितीस मान्यता देण्यात आली.

(८) सदर अभिमत विद्यापीठाकरिता तयार करण्यात आलेले Revised DPR, Strategic vision Plan and Rolling implementation plan च्या मसुदयास मान्यता देण्यात आली.

(९) डि – नोव्हो प्रकारांतर्गत प्रस्तावित अभिमत विद्यापीठाकरिता तयार करण्यात आलेल्या नियम आणि विनियम ( Rules and Regulation ) च्या मसुदयास मान्यता देण्यात आली.

(१०) सदर अभिमत विद्यापीठासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन व इतर अत्यावश्यक बाबींकबीं रिता रू. ५०,३७,९०,८६६/- इतक्या आवर्ती वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली.

(१२) प्रस्तावित डि – नोव्हो विद्यापीठ स्थापनेनंतरसुध्दा या विद्यापीठाला वेतन व वेतनेतर बाबींसाठी शासनाने अर्थसहाय्य करण्यास मान्यता देण्यात आली.

(१३) SIR J. J. SCHOOL OF ART, ARCHITECTURE AND DESIGN FOUNDATION या स्थापन होणाऱ्या शासकीय कंपनीद्वारे प्रस्तावित डि – नोव्हो विद्यापीठास दैनंदिन वापरासाठी आवश्यक जागा मोफत देण्यास मान्यता देण्यात आली.

हे सर्व मुद्दे शासनाच्या ६ किंवा ७ जुलैच्या परिपत्रकातून जसेच्या तसे घेतले आहेत. यावरुन डि – नोव्होला जो मुख्य आक्षेप म्हणजे ‘जेजेचं खाजगीकरण झालं’ असं म्हणणे अत्यंत चुकीचं आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून येईल. जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्रा त गल्लोगल्ली स्थापन झालेली टिनपाट कला महाविद्यालयं यांचा एकमेकांशी दूरान्वयानं देखील संबंध नाही हे देखील या परिपत्रकावरुन लक्षात येईल म्हणूनच या लेखामध्ये त्यांच्याविषयी विधान करणं टाळलं आहे. यानिमित्तानं एवढंच सांगावसं वाटतं की मी किंवा माझ्यासारख्या तिथं शिक्षण घेतलेल्या अनेक चित्रकारांवर जे जे स्कूल ऑफ आर्टचं किंवा त्या मंतरलेल्या परिसराचं आत्यंतिक गारुड आहे. शिक्षण संपून चार किंवा पाच दशकं झाली तरी ते अद्याप उतरलेलं नाही म्हणूनच गेल्या पस्तीस वर्षात महाराष्ट्र शासनाने या कला महाविद्यालयांची जी अवस्था करुन टाकली तिच्या विरोधात असंख्य माजी विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारलं त्याचीच परिणती जेजेला डिनोव्हो दर्जा मिळण्यात झाली आहे. या साऱ्या मागच्या आमच्या भावनेची चुकीच्या बातम्या किंवा लेख छापून कृपा करुन अवहेलना करु नका.

*******
सतीश नाईक
माजी विद्यार्थी आणि
Editor, ‘Chinha Art News’
https://chinha.in/

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.