No products in the cart.
कला संचालकांची दिल्लीतली ‘विजयी’ मोहीम
गेला संपूर्ण आठवडा आम्ही ‘चिन्ह’च्या माध्यमातून जेजेच्या दुर्दशेचे लेख प्रसारित करत आहोत. ‘चिन्ह’चे संपादक आपल्या लेखणीची तलवार अथकपणे चालवत आहेत. जेणेकरून संबंधित अधिकारी, शिक्षक यांनी थोडी तरी जाग यावी. जेजेची अवस्था इतकी वाईट झाली आहे की एआयसीटीईने जेजेची मान्यता काढून टाकली असताना देखील संस्थेतील दोन शिक्षक आणि कला संचालक २९ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान निर्लज्जपणे कॉलेजमध्ये गैरहजर आहेत. कारण काय तर तर म्हणे ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ या केंद्र सरकार पुरस्कृत कार्यक्रमासाठी ते दिल्लीला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आता ज्यांनी जेजेच्या शिक्षण व्यवस्थेची माती केली आहे ते महाराष्ट्राचं शैक्षणिक प्रतिनिधित्व करणार आहेत. म्हणजे बघा !
तर कला संचालक राजीव मिश्रा, जेजेमधील शिक्षक विजय सकपाळ आणि विजय बोण्डर हे बुधवार, गुरुवार, शुक्रवार जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये हजरच नव्हते. ते अशा कुठल्या महत्वाच्या कामगिरीसाठी बाहेर होते याची माहिती काढली असता पुढील माहिती समजली. जेजेमधील दोन शिक्षक विजय सकपाळ ((हंगामी शिक्षक) आणि विजय बोंदर (कंत्राटी शिक्षक) यांना घेऊन कला संचालक राजीव मिश्रा सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ हा इव्हेंट मोठ्या स्तरावर भारत सरकारने आयोजित केलेला आहे. तीन दिवस विविध कार्यक्रम, मान्यवरांची भाषणे असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. तिथे महाराष्ट्राचा एक स्टॉल आहे. या स्टॉलचं काम करण्यासाठी जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट किंवा झालंच तर इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटर, आय आय टी पवई अशा हा डिस्प्ले डिझाईन हा विषय शिकवणाऱ्या संस्था असताना देखील हे काम जेजे स्कूल ऑफ आर्टने पळवलं असंच म्हणता येईल. कारण डिस्प्ले डिझाईन हे काही जेजे स्कूल ऑफ आर्टचं कार्यक्षेत्र नव्हे. मग हे काम जेजे स्कूल ऑफ आर्टला का देण्यात आलं? दिलं तर कोणी दिलं? यात काही ‘अर्थ’पूर्ण विचार करून हे काम जेजे स्कूल ऑफ आर्टला देण्यात आलं आहे का? या प्रश्नांची उत्तरे कला संचालक देतील अशी आम्ही अपेक्षा करतो.
आणि याहून मोठी गम्मत बघा या स्टॉलचं प्रतिनिधित्वही कला संचालक, आणि दोन ‘विजयी’ शिक्षक करत आहेत. ज्यांनी महाराष्ट्राच्या कला शिक्षणाची धूळधाण उडवली, ज्यांच्या कार्यकाळ जेजे स्कूल ऑफ आर्टची मान्यता एआयसीटीईनं काढून टाकली ते आता महाराष्ट्राच्या एकूणच शिक्षण व्यवस्थेचं प्रतिनिधित्व दिल्लीत करत आहेत. इथे मुंबईत विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु आहेत. इथे नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. सीईटी देऊन नव्यानेच मुलं कॉलेजात प्रवेश घेत आहेत. अशा परिस्थितीत जे कॉलेज हंगामी आणि कंत्राटी शिक्षकांच्या जीवावर चाललं आहे त्या कॉलेजमधील वर्ग चुकवून शिक्षक दिल्लीला जाऊन बसले आहेत. हे असंच गेली अनेक वर्ष चालू आहे. शिक्षकांची जबाबदारी काय आहे? शिकवायचं? का धंदेवाईक काम करत गावभर फिरायचं? हा प्रश्न महाराष्ट्र सरकार या लोकांना आता तरी विचारणार आहे का?
आपल्याला कोणी जाब विचारू नये म्हणून कला संचालक सगळीकडे सांगत आहेत की ही जबाबदारी म्हणे त्यांना खुद्द शिक्षण सचिव रस्तोगी यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रातले सगळे डिस्प्ले डिझायनर किंवा डिस्प्ले स्पेशलिस्ट संपले का की ही जबाबदारी कला संचालक आणि जेजेचे कंत्राटी प्राध्यापक यांना द्यायच वेळ शिक्षण खात्याला यावी. आता ही जबाबदारी खरंच शिक्षण सचिवांनी कला संचालक आणि कंत्राटी शिक्षकांना स्वतःहून त्यांचं कर्तृत्व पाहून दिली की ती त्यांनी भूलथापा देऊन पळवली याचा खुलासा शिक्षण सचिवच करतील अशी अपेक्षा करावी का ?
*****
Related
Please login to join discussion