No products in the cart.
वो कौन शिल्पकार है?
शास्त्रीय संगीताचे जाणकार इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या कला – साहित्य वर्तुळात ज्यांच्या शब्दाला मोठा मान आहे असे पुण्याचे उद्योजक राम कोल्हटकर यांच्याशी व्हाट्सअपवर सातत्यानं संपर्क असतो. ‘ चिन्ह’च्या ‘ वाचता वाचता ‘ या व्हाटसअप ग्रुपमध्येही ते आहेत. अधनं मधनं ते त्यांच्याकडच्या मैफिलींची देखील निमंत्रणं पाठवत असतात . पण ती पुण्यात असल्यानं खूप इच्छा असूनदेखील मुंबईहून जाणं काही होत नाही . या रामभाऊंनी गेल्या आठवड्यात व्हाट्सअपवर काही फोटो पाठवले आहेत . ते फोटो आहेत संगीताचार्य भास्करबुवा बखले यांच्या पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात बसवलेल्या पुतळ्याचे . बहुदा रामभाऊंनी त्यांना आलेली पोस्ट ‘चिन्ह’कडे फॉरवर्ड केली असावी . त्या पोस्टमधल्या मजकुराचा आशय असा आहे की हा पुतळा कोणी केला त्या शिल्पकाराचं नाव देखील तिथं दिलेलं नाही .
मुद्दा अगदी रास्त आहे . ज्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं त्या महापालिकेच्या सदस्याचं नाव दिलं आहे ( आता मात्र ते दिसत नाही अक्षरात भरलेला रंग हलक्या दर्जाचा असल्यानं तो अर्थातच उडून गेला आहे . आणखीन काही काळानंतर भास्करबुवांचं नाव देखील त्या पाटीवरून उडून जाईल आणि मग आम्हाला खात्री आहे की सदर पुतळा कुणाचा आहे हे शोधून काढण्यासाठी काही तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल .) अगदी महापालिका आयुक्तांचं आणि महापौरांचं देखील नाव त्या पुतळ्याच्या पेडस्टलवर लावलेल्या संगमरवरी पाटीवर कोरण्यात आलं आहे . पण इतका सुंदर पुतळा ज्या कोणी केला त्या शिल्पकाराचं नाव मात्र सोयीस्कररीत्या टाळण्यात आलं आहे .
१९७० साली हा पुतळा तिथं बसवण्यात आला आहे . म्हणजे आता जवळ जवळ ५२ वर्ष म्हणजे अर्धशतकापेक्षा अधिक काळ लोटला त्याला . मग आता कोणाला तरी त्या शिल्पाचे फोटो का काढावेसे वाटले आणि काढल्यावर ते रामभाऊंना ते ‘चिन्ह’कडे का पाठवावेसे वाटले ? उत्तर अगदी स्पष्ट आहे . ‘चिन्ह’नं कलाक्षेत्रातल्या कमतरतांविषयी वेळोवेळी आत्यंतिक सडेतोड अशी जी भूमिका घेतली आहे तिची ही जाणकारांकडून घेतलेली दखल आहे असं आम्ही मानतो . रामभाऊंनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे . त्या शिल्पकाराचं नाव त्या संगमरवरी पाटीवर कोरलंच जायला हवं होतं यात शंकाच नाही . पण तसं होत मात्र नाही ही वस्तुस्थिती आहे . आणि वर्षानुवर्षे हा प्रघात चालत आला आहे .शिल्पकार करमरकर , फडके , सोनवडकर , साठे यांच्यासारखे अपवाद वगळता बहुसंख्य शिल्पकारांकडून डोक्यावर बसून कामं करुन घेतली जातात आणि नंतर मात्र त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात . नामोल्लेख तर सोडाच पुतळ्याच्या अनावरण समारंभाला देखील त्याला बोलावलं जात नाही मग सत्कार वगैरेची बातच सोडा . वर्षानुवर्षे हे सारं असंच चाललं आहे .
हे एक प्रकारचं शोषणच आहे . आता अलीकडे तर परिस्थिती फारच बिघडली आहे . आता या मध्ये देखील कंत्राटदार शिरले आहेत . ते टेंडर वगैरे भरुन कामं हडपतात . ती कशी हडपली जात असतील त्याविषयी म्या पामराने काय सांगावे ! महाराष्ट्राचा प्रत्येक सुजाण नागरिक ते जाणतोच. कंत्राटदार मग ते काम कुठल्या शिल्पकाराकडून करुन घ्यायचं ते ठरवतो. आता ते एखाद्या चांगल्या शिल्पकाराकडून करुन घ्यायचं का नवशिक्या शिल्पकाराकडून का एखाद्या शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांकडून हा सर्वस्वी त्याचा निर्णय असतो. त्यांना किती पैसे द्यायचे हे देखील तोच ठरवतो. अलीकडे एक शिल्प वृत्तपत्रं आणि वाहिन्यांवर खूप गाजलं होतं आठवतं ? त्या कंत्राटदाराने म्हणे त्या शिल्पाचे १२० कोटी घेतले होते असं सांगितलं जातं . ज्यानं ते केलं त्या शिल्पकाराला त्यातले फक्त २० कोटी दिले गेले असतील अशीही कलाक्षेत्रात कुजबुज आहे . कुणास ठाऊक ? मियाबिबी राजी तो क्या करे काजी ?
याही पेक्षा भयंकर परिस्थिती महाराष्ट्र्रात झाली आहे . बाबुराव सडवेलकर यांच्यानंतर महाराष्ट्राला सुशिक्षित – सुसंस्कृत कलासंचालक लाभलाच नाही . एक जो आला त्याने महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेवर चक्क नांगरच चालवला तर दुसऱ्यानं आपल्या मूर्ख वर्तनांनं अक्षरश: वाताहतच करुन टाकली . बाकीचे सारे तर इकडून तिकडून आणलेले प्रभारीच होते त्यांनी आपापल्या परीनं महाराष्ट्राच्या गौरवशाली शिक्षण परंपरेचा अक्षरश: सत्यानाशच केला . याच काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसवलेल्या शिल्प किंवा पुतळ्यांच्या नष्टचर्याला सुरुवात झाली . या पुतळ्यांना मान्यता देण्याचं काम कला संचालनालयाच्या अखत्यारीत येत होतं .
कलाशिक्षणावर नांगर फिरवणाऱ्यानी इथूनच आपल्या कृष्णकृत्यांना सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावर बेंगळूर शिल्पं उभी राहू लागली . त्याचे एकेक किस्से भयंकर आहेत . एक ब्लॅक लिस्टेड प्राध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला तर एका आचरट तंत्र शिक्षण सचिवानं त्याची नेमणूक प्रभारी कलासंचालक म्हणून करुन टाकली . आणि मग काय त्या गृहस्थांनी अक्षरश: रंगच उधळले . त्याचे ते नाना धंदे सांगावेत तर पुस्तकच लिहावे लागेल . पण आजच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून एकाच किस्सा सांगतो. एका मोठ्या शहरात महामानवाचा पूर्णाकृती पुतळा उभारायचा होता . याना लोभ सुटला . वास्तविक पहाता हे गृहस्थ उपयोजित कला शिकलेले आणि पुढं आयुष्यभर मुलांना ती शिकवलेले ( ? ) पण आयुष्यात ओल्या मातीला देखील कधी स्पर्श न केलेल्या या गृहस्थांना कोट्यवधी रुपयांचं काम मिळालं देखील . आता ते काम कसं झालं असेल या विषयी आम्ही लिहायलाच पाहिजे का ?
याची पुढची पायरी नंतर आलेल्यानी गाठली . शिल्पकलेचं प्राथमिक ज्ञान देखील नसलेले लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शिल्पाना , पुतळ्यांना मान्यता देऊ लागले . मान्यता देण्याचे दर देखील ठरवून टाकले गेले. त्याच्या नंतर आलेले तर या साऱ्यांच्या पेक्षा सवाई निघाले . त्यांनी सारी यंत्रणाच आपल्या हाती घेतली . टेबलाच्या एका बाजूला बसून संस्थेसाठी मुलांसाठी म्हणून काम घ्यायचं आणि मग टेबलाच्या दुसऱ्या बाजूला बसून आपल्याच कंपनीला आणि आपल्याच पार्टनरला काम देऊन टाकायचं . म्हणजे हे सरकारकडून नोकरीचं लाखो रुपये वेतनदेखील घेणार आणि अशी कामं विद्यार्थ्यांसाठी करतो म्हणून अक्षरशः कोट्यवधी रुपये देखील उकळणार . मुलांना ५०० रुपये रोजावर राबवायचं , त्यांच्याकडून मजुरासारखी कामं करुन घ्यायची . पैसे दिले तर दिले नाहीतर धमक्या , नापास करुन टाकू वगैरे .
पास झालेल्या मुलांचे हाल तर यापेक्षाही वाईट . सारी मोठी मोठी शिल्पं , पुतळे यांच्याकडून करुन घ्यायचे आणि नाममात्र मानधन देऊन त्यांना वाटेला लावायचे .ती मुलंही गरजू . इतक्या मोठ्या शिक्षणसंस्थेत शिकल्यावर काही काम करावं तर हे असे झारीतले शुक्राचार्य जागोजागी बसलेले वाट अडवून . त्यांच्या पुढे दुसरे पर्यायच नाहीत अशी कामं स्वीकारण्यावाचून . रामभाऊ म्हणूनच हल्ली शिल्पांवर ती घडवणाऱ्या कलावंताची नावं नसतात . पूर्वीचा काळ वेगळा होता . शिल्पकाराला निदान शिल्पाच्या मागच्या बाजूला आपली नावं निदान कोरता तरी येत होती . त्यामुळे बखले बुवांच्या शिल्पात देखील मागच्या बाजूला त्या शिल्पकारानं आपलं नाव कोरून ठेवलं आहे . पण आता मात्र ते चालत नाही. काम देणार कोण ? ते घेणार कोण ? ते करणार कोण ? त्याचं मानधन काय ? सारं काही रस्त्याच्या कामासारखं मंत्रालयातून ठरतं . आणि मग तिथून झिरपत झिरपत ते त्यांच्या माणसांपर्यन्त पोचतं . आक्षेप घ्यायचा कुणी कुणावर ? आणि उत्तरं देणार तरी कोण ?
आम्हाला ठाऊक आहे उच्च शिक्षण मंत्री महोदय , शिक्षण सचिवआणि बडे अधिकारी हे वाचतील . पण होणार मात्र काहीच नाही . पण आपण मात्र लिहीत राहायचं . त्याला पर्यायच नाही !
****
– सतीश नाईक
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion