Features

बारसू सडा इतका महत्वाचा का ?

सध्या बारसू प्रकरण कोकणात धगधगत आहे. रिफायनरीमुळे तिथली प्रागैतिहासिक शिल्पं धोक्यात येत आहेत. ही कातळशिल्पं युनिस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळवून आहेत. त्यांचं महत्व काय आहे ? इतिहासाचे कोणते तुटलेले सांधे ही शिल्पं जोडतात याची तर्कसंगत मांडणी चित्रकार, कातळशिल्प अभ्यासक ओंकार क्षीरसागर यांनी या लेखात केली आहे.

बारसू सड्यावरील आंदोलन हा सध्या ज्वलंत विषय आहे. या सड्यावर होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक लोकांकडून जबरदस्त विरोध होताना दिसतोय. त्यामुळे बारसू सडा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे, पण महाराष्ट्रातील प्रागैतिहास बदलण्याची ताकद या बारसू सड्यामध्ये आहे हे निश्चित. असं काहीतरी या सड्यावर आहे ते म्हणजे या सड्यावर आढळणारी कातळ खोद शिल्पे. या सड्यावर १०० पेक्षा अधिक कातळशिल्पांची नोंद झाली आहे. या कातळशिल्पांमधील कलाकुसर बघता कोकण पट्ट्यातील सर्वात सुंदर कातळशिल्पे या सड्यावर आहेत असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 

या सड्यावरील सर्वात मोठं आणि महत्वाचं कातळशिल्प हे ” ऍनिमल मास्टर ” या संकल्पनेवर आधारित असल्यासारखं दिसून येतं. बारसू सड्यावरील कातळ खोद शिल्पांना नुकतंच युनिस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या टेन्टीटीव्ह यादीत स्थान मिळालं आहे . यावरून या कातळशिल्पांचं महत्व अधिक प्रकर्षानं जाणवतं.

‘तारेवरचा सडा’ येथील कातळशिल्प देखील अप्रतिम आहे. तांत्रिकदृष्ट्या तर हे कातळशिल्प इतर कातळशिल्पांच्या तुलनेत खूप वरचढ आहे.  ऍनिमल मास्टर या संकल्पनेची चिन्ह काही आदिम सभ्यतेमध्ये सापडतात. सिंधू सभ्यतेचे सुमेरियन सभ्यतेशी व्यापाराचे संबंध होते. त्यामुळे सुमेरियातील आदिम कथा व त्यांची झालेली नाणी त्यामुळे हे संदर्भ सिंधू सभ्यतेत दिसून येतात. त्यातील हे गिल्गमेश ही आदिम कथा आपल्याला सील स्वरूपात इथं पाहावयास मिळते. या सील मध्ये जर आपण पाहिले तर त्यावरही ऍनिमल मास्टर या संकल्पनेशी आधारित आकृत्या दिसून येतात. एक मनुष्य वाघ सदृश्य प्राण्यांना धरून ठेवतो आहे असे हे चित्रण आहे आणि त्या सारखीच आकार आपल्याला तारेवरच्या सड्यावरील या कातळचित्रात दिसून येतात. बारसू  सड्यावरील प्राण्यांची कातळशिल्पं जर आपण पाहिली तर नैसर्गिक आकारापेक्षा मोठ्या आकारात प्राण्यांचं रेखन केलेलं इथं दिसून येतं. 

सिंधू संस्कृतीमधील एक सील

ऍनिमल मास्टर या संकल्पनेतील हे कातळचित्र देखील आकारानं फार मोठं  आहे. मध्यभागी मानवाकृती आणि दोन्ही बाजूस वाघ सदृश्य प्राणी असं हे कातळचित्र आहे. येथील मनुष्यकृतीनं ते दोन्ही वाघ पेलून धरल्याचे भास या रेखनातून दिसून येतं. मानवी आकाराचं अंकन हे त्याच्या नैसर्गिक उंचीपेक्षा जास्त मोठं केलं आहे. त्याच्या दोन्ही हातांचे आकारीकरण हे नैसर्गिक नाहीये.  छातीकडील भागाकडून चौकोनी होत वरच्या भागात ते गोलाकार दाखवले आहे. छातीवरील मध्यभागात एक चिन्ह कोरलं आहे. मानवाकृतीच्या बाजूस मासा आणि सशाचे आकार कोरले आहेत. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या सड्यावर जलचरांची कातळशिल्पं देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. 

या कातळशिल्पाकडे कलात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ” ऍनिमल मास्टर” ही एक आदिम कथा आहे. जगातील महत्वाच्या सभ्यतांमध्ये ही कथा आढळते. त्या कथेचे संकल्पनेत आणि नंतर बोधचिन्हात रूपांतर होत गेलेलं दिसून येतं. कथा तयार करणं आणि त्या भोवती संकल्पना गुंफणं यासाठी कल्पकतेची गरज असते. त्या आदिम कथेचं महत्व हे अनन्य साधारण असणार त्यामुळेच ती या जगातील विविध भागांमध्ये आढळून येते आणि मग अनेक पिढ्यांमध्ये तिचं चिन्हांमध्ये रूपांतर झालं आहे. आजच्या काळात आपण कथा चित्रं बऱ्याच प्रमाणात पाहतो. आजच्या काळात भाषा या फार प्रगत असूनही कथा लोकांपर्यंत अजून योग्य प्रमाणात पोहचवण्यासाठी चित्रांचा वापर केला जातो, मग आपण जर १० हजार वर्षा पूर्वीचा विचार केला त्यावेळी भाषा तितक्या प्रगत स्वरूपात नव्हती. त्यावेळी ती कथा टिकून ठेवण्यासाठी व पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कातळशिल्पं कोरली गेली असावीत असा तर्क करता येतो. या कातळशिल्पाचे निरीक्षण केल्यास लक्षात येते की ही शिल्पं नैसर्गिक आकारात तयार न करता त्यांचं मोठ्या प्रमाणात अलंकरण केलं आहे. वाघांचं चित्रण आणि त्याच्या शरीरातील आतील भागांचं केलेलं अलंकरण हे उल्लेखनीय आहे. आकाराला समजून त्याचं अलंकरण केलं गेलं आहे आणि ही मोठी कलात्मक गोष्ट आहे. कथा, त्याची झालेली संकल्पना आणि त्याचं झालेलं आकारीकरण या विविध टप्यांवर आपल्याला कलात्मकतेच्या वेगवेगळ्या पातळ्या दिसून येतात.

त्यामुळे बारसू सड्यावरील ही शिल्पं ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहेत. मानवी सभ्यतेच्या विविध टप्प्यावरील हरवलेले दुवे जोडण्याची शक्यता या शिल्पांमध्ये आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपणं खूप महत्वाचं आहे.

*****

– ओंकार क्षीरसागर,
लेखक हे चित्रकार आणि कातळशिल्प अभ्यासक आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.