Features

जेजेचे विद्यार्थी संपावर का गेले ?

जेजे स्कूल ऑफ आर्ट! बस नाम ही काफी है! पण या प्रतिष्ठित संस्थेला गेल्या काही वर्षात कशी उतरती कळा लागली हे आपण ‘चिन्ह’च्या माध्यमातून वाचतच असाल. पण आता मात्र जेजे सध्या आपल्या १५० वर्षाच्या कारकिर्दीत अगदी नीचतम पातळीवर पोचले आहे. तुम्हाला माहितेय का जेजे स्कूल ऑफ आर्टसारख्या संस्थेत टॉयलेटच उपलब्ध नाहीये. कुठलेही गल्लीबोळातले अगदी टिनपाट कॉलेजसुद्धा विद्यार्थ्यांच्या टॉयलेटची व्यवस्था सगळ्यात आधी करते, मग जेजे सारखी संस्था काय झोपा काढते आहे का? या गंभीर समस्येमुळे विद्यार्थिनींनाही अगदी वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थिनी या टॉयलेट शोधात वणवण भटकत असतात. मग कधी हिमालय स्टोर, कधी हॉटेल तर कधी बाकी कॉलेजेस( अप्लाइड आणि आर्किटेक्चर) ने जाऊ दिले तर तिथे त्या जात असतात. विद्यार्थिनीसाठी ना रेस्टरूमची सोय ना टॉयलेटची. हीच परिस्थिती विद्यार्थ्यांबाबतीतही आहे बर का! हे कमी की काय मग कॉलेजजवळ ना कम्प्युटर लॅब आहे, ना लाईट, ना पंखे. भरीस भर म्हणजे पुढच्या महिन्यात सर्व कंत्राटी प्राध्यापक सेवेतून मुक्त होणार आहेत. बहुदा जेजेमध्ये आता विद्यार्थ्यांना वर्गातल्या भिंतीच शिकवणार पुढच्या महिन्यापासून.

या सगळ्या गंभीर परिस्थितीवर विद्यार्थी वेळोवेळी डीन साहेबांना पत्र पाठवत आहेत. पण कुठलीही कारवाई न झाल्याने दि १६ नोव्हेंबर पासून जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी संपावर गेले आहेत. अर्थात ते याला संप असे नाव न देता निषेध असे गोंडस नाव देत आहेत, पण असे असले तरी या त्यांच्या चळवळीची गंभीरता कमी होत नाही. जेजेचे विद्यार्थी दोन दिवस वर्गाबाहेर बसून काम करत आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अडचणी संस्थेच्या प्रमुखांकडून सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत ते वर्गाबाहेर म्हणजे संस्थेच्या आवारात बसूनच काम करणार आहे. निषेधाची ही त्यांची अभिनव पद्धत आहे आणि ‘चिन्ह’चा या विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठिंबा आहे.

हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला हे समजेल की जेजे स्कूल ऑफ आर्ट हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. जर जेजे सारखी प्रतिष्ठित संस्था विद्यार्थ्यांच्या टॉयलेटसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करू शकत नसेल तर मुंबई विद्यापीठ झोपा काढत आहे का? या अक्षम्य चुकीबद्दल विद्यापीठाने जेजे स्कूल ऑफ आर्टची मान्यताच रद्द करायला हवी.

गेले सहा महिने विद्यार्थी संस्थेच्या डीनकडे आपल्या समस्या अर्जाच्या रूपात मांडत आहेत पण डीन मात्र या अर्जाचा कुठलाही विचार न करता पत्रे तशीच ठेऊन देत आहेत असे कळते. विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत हे खालील मुद्यातून जाणून घेऊया. हा लेख वाचून संस्थेचे आजी माजी विद्यार्थी या विद्यार्थ्यांना पाठिंबा देतील याची आम्हाला खात्री आहे.

जेजेच्या व्यवस्थापनाचा पुरता फज्जा उडालेला आहे. जेजेमध्ये आता पुढील महिन्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या शिक्षकांना सेवामुक्त करण्यात येणार आहे. शासनाने दोन महिन्यापूर्वीच जीआर काढून पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्याचे आदेश जेजेच्या कॅम्पस मधील जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अप्लाइड आर्टस् या दोघांना दिले होते. अप्लाइड आर्ट्सच्या संस्थेने या शिक्षकांची नेमणूक तर केली पण जे जे स्कूल ऑफ आर्टने पर्यायी शिक्षकांची कुठलीही व्यवस्था केली नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुढील महिन्यापासून शिकवायला शिक्षकच नसणार आहेत!

त्याचबरोबर जेजेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. टॉयलेट नाही. शिल्पकला विभागाच्या वर्गांमध्ये ना फॅन आहेत ना लाईट. अशा परिस्थितीत मुलं काम तरी कसं करणार? मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाहीये. त्यामुळे मुलांनी मुंबईसारख्या जागेच्या बाबतीत अत्यंत महागड्या शहरात राहायचं कुठे? विद्यार्थ्यांसाठी ना संसाधने आहेत ना कम्प्युटर लॅब. सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलमध्ये काही जागा जेजेच्या विद्यार्थ्यांना देण्याचं नियोजन झालं होत पण डीननी या पत्रव्यवहाराचा कुठलाही पाठपुरावा केला नाही आणि याचं पर्यवसान हे विद्यार्थ्यांना हॉस्टेल न मिळण्यात झालं आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या नावाजलेल्या संस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आज या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी टॉयलेटच उपलब्ध नाहीये. अशा वेळी विद्यार्थिनींची भयंकर गैरसोय होत आहे. त्यामुळे संस्थेतील मुली या एकतर आर्किटेक्चर नाहीतर अप्लाइड आर्टच्या विभागाचे टॉयलेट वापरतात. तिथे आधीच टॉयलेटची संख्या कमी असल्याने तिथले विद्यार्थी या मुलींना तिकडे येऊ नका असे सांगतात. मग विद्यार्थिनींनी टॉयलेटला जायचे कुठे? विद्यार्थिनींसाठी रेस्ट रूमची सुविधा देणे हे प्रत्येक शैक्षणिक संस्थेला अनिवार्य असते. पण या संस्थेकडे ना टॉयलेट आहे ना रेस्टरूम. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनी अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जात असतात, अशा वेळी रेस्टरूमचा त्यांना मोठा आधार असतो पण या नावाजलेल्या संस्थेत ही सुविधाच उपलब्ध नाहीए!

खरं तर अगदी खेडोपाडीही स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकार टॉयलेट बांधून देत आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट ही मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतील प्रतिष्ठित संस्था. तिथल्या प्रमुखांना विद्यार्थ्यांसाठी साधे टॉयलेट बांधून देता येऊ नये? जेजे स्कूल ऑफ आर्टच्या एकूण ३०० मुलींसाठी फक्त १ टॉयलेट उपलब्ध आहे! आता इथे गंमत अशी आहे की काही मुली संस्थेजवळ असलेल्या हिमालय स्टोरचे टॉयलेट वापरतात. काही तर संस्थेच्या आजूबाजूला असलेल्या हॉटेलमध्ये टॉयलेटसाठी जातात. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की इतर विद्यार्थिनी टॉयलेटसाठी वणवण भटकत असताना डीन साहेबांची कन्या मात्र डीन साहेबांसाठी राखीव असलेले टॉयलेट वापरते! विद्यार्थ्यांबाबतीत असा दुजा भाव का? जर स्वतःच्या मुलींसाठी टॉयलेट उपलब्ध आहे तर इतर विद्यार्थिनीसाठी का नाही?

मुळात डीन साबळे यांना संस्थेच्या भल्यासाठी काही देणे घेणे आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. डीन विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून कॅम्प आयोजित करणे, शिक्षकांची प्रदर्शने आयोजित करून येन केन प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे आहेत. विद्यार्थ्यांना शिकवणं सोडून डीन इतर सर्व कामे करतात. जर अशा संस्थेच्या जबाबदार पदावर राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे त्यांना जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन मोकळे होणे कधीही उत्तम. या अशा गंभीर समस्यांमुळे संस्थेची किती नाचक्की होत आहे.

दुसरी गंभीर समस्या ही आहे की आर्ट अँड क्राफ्ट विभागाची इमारत सध्या रिस्टोरेशनच्या प्रक्रियेतून जात असल्याने विद्यार्थ्यांसाठी वर्गच उपलब्ध नाहीत. जिथे जमेल तिथे वर्ग भरवले जात आहेत. काही वर्ग हे ऐतिहासिक वारसा असलेल्या डीनच्या बंगल्यात भरवले जात आहेत. जे की पुरातत्वखात्याच्या नियमांच्या विरोधात आहे. पुरातत्त्व विभाग आता याबद्दल संस्थेला नोटीस पाठवणार आहे असेही कळते.

शिल्पकला विभागात लाईट आणि पंखे दोन्ही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काम कसं करायचं? अशा परिस्थितीत एमएफचे वर्ग बंद आहेत. प्रिंटिंग, क्राफ्ट चे वर्ग व्यवस्थित सुरु नाहीत. बीएफएचा पहिल्या वर्षांचा वर्ग हा जिमखान्यात भरतो. सिरॅमिकचे क्लास बंद आहेत. मेटल क्राफ्टचे क्लासही बंद आहेत. परिस्थिती इतकी गंभीर असताना जेजे स्कूल ऑफ आर्टचे जबाबदार शिक्षक हे इतर दुय्यम उपक्रमात व्यस्त आहेत आणि विद्यार्थी अडचणीत.

शेवटचा विषय म्हणजे जेजे डिनोव्हो.
जेजे आता डिनोव्हो होणार या गोष्टीला प्रत्यक्ष ब्रह्मदेवही रोखू शकत नाही. पण डीन साबळे यांनी गेले सहा महिने डिनोव्होच्या संदर्भात कुठलीही मिटिंग घेतली नव्हती. आता ज्या मिटिंग होत आहेत त्यांना ते सहकार्य करत नाहीत.

निपुण विनायक यांनी डिनोव्होच्या बाबतीत मुलांची मते जाणून घेण्यासाठी एक मिटिंग घेतली होती. या मीटिंगमध्ये प्रत्येक विभागाच्या (पेंटिंग, आर्किटेक्चर, अप्लाइड ई. ई) विद्यार्थी प्रतिनिधींना बोलावले होते. या मीटिंगमध्ये जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तर डिनोव्होच्या विरोधात आपली मते नोंदवली. डिनोव्होमुळे गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असं संस्थेतल्याच कुणीतरी त्यांच्या मनात भरवलेलं असावं अशी दाट शंका आहे. या मीटिंगमध्ये असे समजले की विद्यार्थ्यांना डिनोव्होबद्दल योग्य माहितीच मिळाली नाही. डिनोव्होच्या बाबतीत जी काही पत्रे जेजे स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुखांना मिळाली ती त्यांनी वेळोवेळी दाबून ठेवली. डिनोव्होच्या संदर्भात होणाऱ्या मीटिंगला अनुपस्थित राहणे असे प्रकार त्यांनी केले. डिनोव्होच्या बाबतीत जेजेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी चळवळ उभी केली. वेळोवेळी पाठपुरावा करून ही मोहीम यशस्वी केली. असे असताना जेजे स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुखांनी मात्र वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करून या कामात खोडा घालण्याचाच प्रयत्न केला आहे असे दिसून येते. त्यामुळे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुखांना या पदावरून हटवावे अशी मागणी जे जेच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

(जेजेमधील विद्यार्थी तीव्र समस्यांना सामोरे जात असताना डीन या कॅम्पच्या आयोजनात व्यस्त होते. आंदोलनाचे स्वरूप पाहून ते तिकडे गेलेच नाहीत. आणि आज डीन साहेबांचे खंदे कार्यकर्ते मा. काकडे साहेब हा सगळा घोळ निस्तरण्यासाठी अजिंठा कॅम्प सोडून वापस आले आहेत !)

डिनोव्हो हे महाराष्ट्र शासन पुरस्कृत असल्याने जे जे स्कूल ऑफ आर्टच्या डीननी संबंधित विद्यार्थी आणि शिक्षक यांची वेळोवेळी मीटिंग घेऊन डिनोव्होच्या संदर्भात त्यांना योग्य ती माहिती देणे गरजेचे होते. असे असताना त्यांनी एकही मिटिंग या संदर्भात घेतली नाही. डिनोव्होच्या प्रक्रियेला अडथळा आणणे, ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी संबंधित अधिकारी आणि संस्था याना मदत करणे या कामामध्ये त्यांनी अक्षम्य दिरंगाई आणि अडथळेच वेळोवेळी आणले. हे काम सोडून ते स्वतः डीन म्हणून आर्ट डायरेक्टरला ( जे साबळेच आहेत) पत्र पाठवून प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रस्ताव पाठवतात. तो प्रस्ताव साबळे स्वतः मंजूर करतात. आणि मग महाराष्ट्रातील कला महाविद्यालयांच्या शिक्षकांचे प्रदर्शन आयोजित करतात. या दुय्यम कामासाठी आपला महत्वाचा वेळ खर्च करतात ते कशासाठी? बरं या प्रदर्शनासाठी किती खर्च येतो? या प्रदर्शनाचा लाभ कुणाला होतो? मुळात तीनही शासकीय महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकच बोटावर मोजण्याइतके असताना या प्रदर्शनात भाग किती शिक्षक घेतात ? प्रदर्शनात भाग घेणाऱ्या शिक्षकांच्या कामाचा दर्जा काय? मग अशा दुय्यम कामांसाठी महत्वाची कामे सोडून वेळ का घालवला जातो? आर्ट डिरेक्टर आणि डीन या दोन्ही व्यक्ती एकच असल्याने या कार्यक्रमात खर्च किती झाला यावर लक्ष कोण ठेवणार?

त्यामुळे या गंभीर प्रश्नात सरकार आणि विशेषतः महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षण खात्याचे सचिव यांनी तातडीने लक्ष घालणे अतिशय गरजेचे आहे. नाहीतर या एवढ्या मोठ्या संस्थेच्या नावाला काळिमा फासला जाणे अटळ आहे.

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.