No products in the cart.
‘नग्नता’ : कॅब्र करावं ?
सोबत फेसबुकवरची ही जी पोस्ट आम्ही खाली दिली आहे ती का कुणास ठाऊक फेसबुकवाल्यानी ब्लॉक करून टाकली होती. तीन दिवस त्यांनी आमचं अकाऊंट देखील बंद करून ठेवलं होतं. ना आम्ही त्या अकाउंटवर काही शेअर करू शकत होतो किंवा नवी पोस्ट देखील लावू. हा असा अनुभव हल्ली फेसबुककडून वारंवार येतो. एखादी पोस्ट लावली आणि शेअर करू लागलो का, लागलीच त्यांच्याकडून मेसेज येतो’ तुम्ही शेअर करू शकत नाही. दुसरा संदेश येतो की तुम्ही आमच्या अटींचं पालन करताना दिसत नाही आहात. तुम्ही आमच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे सारं काही बंद वगैरे.
हे बहुतांशी घडतं ते ‘ नग्नता’ अंकाची एखादी पोस्ट लावली का ? परवाही असंच झालं. ‘ नग्नता ‘ अंकाच्या प्रकाशनाला तब्बल एक तप पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काही तरी लिहावंसं वाटलं, म्हणजे अंक काढतानाचे अनुभव वगैरे. आणि ते लिहिले देखील, पोस्ट देखील लावली, पोस्टमध्ये फोटो देखील टाकले. फोटो अर्थातच २०१०-११ साली ‘नग्नता’ अंक प्रसिद्ध झाला किंवा कदाचित २००८-०९ साली ‘नग्नता’ अंकाचं फेसबुक पेज सुरु केलं त्यामधूनच घेतलेले होते. गेल्या दहा वर्षात ते फोटो अनेकवेळा रिपीट देखील केले होते. त्यातला एकही फोटो नवा नव्हता. तरी देखील ती पोस्ट पाहून फेसबुकवाल्यांचं माथं फिरलं आणि त्यांनी ती पोस्टच ब्लॉक करून टाकली.
कॅब्र करावं ?
हे असंच हल्ली होत असतं. ‘नग्नता’ अंकासंदर्भातली कुठली पोस्ट कधी ब्लॉक होईल याचा नेम नसतो. केलेली सारी मेहनत अक्षरशः मातीमोल होते. बरं त्यात काही आक्षेपार्ह लिहिलेलं असतं तर तसंही नाही. अतिशय काळजी घेऊन आम्ही लिहीत असतो आणि फोटो देखील टाकत असतो. पण त्यांच्यावर संक्रांत येते ती येतेच ! त्यामुळं इथून पुढं फेसबुकवरचं लिखाण कमी करायचं असंच आम्ही ठरवलं आहे. ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर मात्र आता सारं काही वाचता येईल. फेसबुकने ब्लॉक केलेली ती पोस्ट ‘चिन्ह’च्या नेहमीच्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. आता तुम्हीच सांगा यात काही आक्षेपार्ह आहे का ?
झालं एक तप त्याला… अर्थात ‘नग्नता’ अंकाची गोष्ट ! भाग १
येत्या जुलै महिन्यात ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या ‘चिन्ह’च्या बहुचर्चित अंकाच्या प्रकाशनाला तब्बल १२ वर्षं पूर्ण होतील. १२ वर्ष म्हणजे एक तप. कसं गेलं ते कधी कळलंच नाही. पण या १२ वर्षातला प्रत्येक क्षण या अंकाच्या संपादनानं किंवा निर्मितीनं आनंद देऊन गेला यात शंकाच नाही. या उण्या पुऱ्या १२ वर्षात एक क्षणही असा कधी आला नाही की ज्यात वाटावं उदाहरणार्थ आपण हा अंक काढला आणि चूक केली किंवा काय ! नाही असं एकदाही कधी वाटलं नाही. चुकूनही मनात कधी आलं नाही. उलट या अंकाच्या तीनही आवृत्त्यांमधील प्रत्येक प्रतींनं नवी नवी अनेक माणसं जोडली गेली, अजूनही जोडली जात आहेत. फोनमधल्या कान्टॅक्ट्सच्या यादीत केवळ या अंकामुळंच जवळ जवळ रोज़च असंख्य वाचकांची भर पडत गेली , अजूनही पडली जात आहे. केवळ या अंकामुळं गावोगावची अशी असंख्य वाचक मंडळी जोडली गेली जी आजही सतत संपर्कात असतात. आजही ही मंडळी नवं काही वाचलं का आवर्जून प्रतिक्रिया कळवतात. अंकातल्या मजकुराची आठवण करून देतात.
व्हॉट्सऍपचा उदय हा या अंकाच्या प्रकाशनाच्या थोडासा आधी किंवा नंतरच्या काळात झाला. त्यामुळे या अंकाच्या थोड्या बहुत यशात व्हॉट्सऍपचा देखील वाटा आहे यात शंकाच नाही. कारण त्याच वेळी झालेल्या व्हॉट्सऍपच्या या उदयामुळेच आम्ही आकर्षक जाहिराती अथवा आवाहनं अगदी प्रत्येक वाचक पर्यंत पोहोचवू शकलो होतो. आजही ते दिवस आठवले का हसू फुटतं, पण तेव्हा मात्र आमची चांगलीच सटारली होती. याचं कारण उघड होतं ‘नग्नता’ हा विषय तेव्हा पूर्णपणे त्याज्य होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या ६३ वर्षात किंवा स्वातंत्र्यपूर्व पन्नास किंवा कदाचित मुद्रण कलेचा शोध लागल्या नंतरच्या काळात देखील असा विषय घेऊन अंक काढण्याचं धाडस कुणी केलं नव्हतं. साहजिकच या अंकाची घोषणा करताना आमची चांगलीच तंतरली होती. कारण तो पर्यन्त अश्लीलतेसंदर्भात असंख्य खटले महाराष्ट्र्रात लढवले गेले होते, ते बरेच वादग्रस्त ठरले होते. मी त्या भानगडीत अडकून पडू नये म्हणून अनेक मित्रांनी त्या संदर्भातली पुस्तकं, लेख, कात्रणं मला आणून दिली होती. ती वाचल्यावर माझी तर झोपच उडाली होती.
पण अंकाची घोषणा तर करून बसलो होतो. तो न प्रकाशित करणं म्हणजे एक प्रकारचं पलायनच ठरलं असतं ते. जे मी करणं कदापिही शक्य नव्हतं. पण मग काय करायचं ? माझी तर झोपच उडाली होती. रात्री अपरात्री हातात सोटा घेतलेले कृष्णराव मराठे स्वप्नात यायचे आणि ते मला बडवताहेत असे काही तरी भास व्हायचे. कृष्णराव मराठे म्हणजे पुण्यातलं स्वातंत्र्यपूर्व काळातलं एक प्रस्थ होतं. अश्लीलतेच्या विरोधात त्यांनी त्याकाळी आंदोलनं करून एकच धमाल उडवून दिली होती. हे वाचल्यावर ज्यांना कुणाला अधिक वाचायची इच्छा होईल त्यांनी गुगल सर्च करावं, भरपूर वाचायला मिळेल. ठणठणपाळांनी देखील कृष्णराव मराठेंची यथेच्छ टिंगल केली होती. ती देखील ठणठणपाळांच्या पुस्तकात वाचायला मिळेल. तर असे हे कृष्णराव मराठे रात्री अपरात्री माझ्या स्वप्नात येत आणि अंक काढण्यापासून मला परावृत्त करीत.
पण मी कसला ऐकतोय ? अंक काढायचं तर जाहीर करून बसलो होतो. आणि ते देखील कुठे ? तर पुण्यात ! त्यामुळं माघार घेता येणं केवळ अशक्य होतं. यासंदर्भात बरंच काही लिहावंसं वाटू लागलं आहे. कारण नाही म्हटलं तरी एक तप झालं त्या अंकाला आणि त्या अंकाची लोकप्रियता अद्याप तशीच टिकून आहे. मागे एकदा यासंदर्भात लिहायचा प्रयत्न देखील केला होता, फेसबुकवर काही लिखाण केलं देखील, पण नंतर मात्र ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या निर्मितीत ते सारं राहून गेलं. पण आता मात्र जरा ठिय्या मारून बसायचं आणि लिहायचं असं ठरवलंय खरं. त्यातलाच हा पहिला लेख. पुढचा पाहूया कधी लिहून होतो !
अजूनही अनेक लोकं, अनेक वाचक अंकासाठी संपर्क साधतात. अशा नव्या वाचकांसाठी एकच विनंती आहे की, या अंकाच्या आता अगदी थोड्याच प्रती उरल्या आहेत. ‘चिन्ह’ आता संपूर्णपणे डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागलं असल्यानं छापील स्वरूपातील सर्व प्रती आम्ही विशेष सवलतीत देत आहोत. ज्यांच्याकडे त्या नसतील त्यांनी कृपया ‘नग्नता’ अंकासाठी ९००४० ३४९०३ या ‘चिन्ह’च्या व्हॉट्सऍप नंबरवर ‘NAGNATA’ हा मेसेज स्वतःच्या पत्त्यासह पाठवावा. ७५० रुपये किंमतीचा हा अत्यंत संग्राह्य अंक कोरोगेटेड बॉक्ससह ८२५ रुपये गुगलपे करताच दोन दिवसातच घरपोच येईल. विशेष म्हणजे त्यासोबत ५०० रुपये किंमतीचा ‘गायतोंडे’ ग्रंथ आणि १०० रुपये किंमतीची ‘चित्रसूत्र’ ही पुस्तिका देखील भेट म्हणून मिळेल.
या अंकासंदर्भात अधिक जणू घ्यायचं असेल तर ‘नग्नता’च्या पेजला भेट द्या ! पेजची लिंक पुढीलप्रमाणे https://www.facebook.com/Chinha.Nagnataa
Related
Please login to join discussion