No products in the cart.
पाडेकरांनी पिकासोला मोडीत का काढले?
मटा दिवाळी अंकाने यंदा पिकासोवर दत्तात्रय पाडेकर आणि संभाजी कदम यांचे लेख प्रकाशित केले आहेत. दत्तात्रय पाडेकर यांचा लेख हा पिकासोच्या चित्रशैलीवर टीकात्मक समीक्षा करणारा आहे. खरं तर या लेखामध्ये अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत, असे असतानाही फारशी या लेखाची चर्चा झाली नाही याचे आश्चर्य वाटते. दत्तात्रय पाडेकर हे महाराष्ट्रातल्या कलाविश्वातले अत्यंत सन्माननीय नाव आहे. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीने त्यांना प्रतिवाद करणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे याची मला जाणीव आहे. तरीपण काही मुद्दे न पटल्याने किंबहुना पूर्ण अमूर्त शैलीलाच या लेखातून मोडीत काढले गेल्याने हा प्रतिवाद करावा वाटत आहे.
पिकासो हे जागतिक पाटलावरच्या कलाक्षेत्रातील सन्माननीय नाव. आपल्या हयातीत असंख्य चित्रे आणि गॉसिप मागे सोडणार हा चित्रकार. एखाद्या चित्रपटातल्या सेलिब्रिटीला जितकी प्रसिद्धी मिळते किंवा त्याहून जास्तच प्रसिद्धी पिकासोला मिळाली. अर्थात प्रसिद्धी हे महान चित्रकाराचे लक्षण नाहीच. पण तरीही पिकासोचे श्रेष्ठत्व त्याच्या चित्रशैलीमुळे मोडीत काढणे कितपत योग्य हा प्रश्न पडतो.
खरं तर मराठी साहित्य, नाटक, काव्य यात नव्या प्रयोगांना स्थान मिळाले. उदाहरणार्थ ग्रेस यांची दुर्बोध कविता मराठी मनाने डोक्यावर घेतली. नाटकातही बरेच प्रयोग झाले. त्यांनाही मराठी मनाने सन्मान दिला. पण चित्रकलेत मात्र महाराष्ट्रात नव्या प्रयोगांना कितीसे स्थान मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. केवळ अभिजात कला किंवा ब्रिटिश प्रभावात तयार झालेली ‘बॉम्बे स्कुल’ची कला एवढेच मराठी दृश्यकलेचे विश्व सीमित का राहिले हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
पिकासोच्या संदर्भात अगदी जागतिक पटलावर विचार करायचा झाला तर आपण ज्याला क्लासिकल किंवा अभिजात चित्रे म्हणतो त्यांचा एक विशिष्ट काळ होता. त्या काळात म्हणजे १७ व्या शतकात ही शैली बहरास आली. यथातथ्य चित्रणातून जीवनातले सौन्दर्य रसिकांसमोर उभे करण्याचे काम अभिजात चित्रांनी केले. पण पुढे तंत्रज्ञान तसेच सामाजिक बदलांमुळे दृश्यकलेने अगदी वेगळे वळण घेतले. जीवनातील केवळ सुंदरता म्हणजे चित्र का ? असा प्रश्न चित्रकारांना पडू लागला आणि कुरुपतेचे/ मानवी प्रश्नांचे चित्रणही कलेतून होऊ लागले. दोन भीषण महायुद्धांमुळे मानवी जीवन हे तिच्या नीचतम पातळीपर्यंत पोचले होते. या काळातल्या भीषण अनुभवामुळे दृश्यकला बरीच पुढे निघून आली. पिकासोही त्या काळाचा प्रतिनिधी असल्यामुळे त्याने कलेचा वेगळ्या कोनातून विचार केला.
खरं तर पिकासोची चित्र ही अमूर्त शैलीत मोडतात असे मला वाटत नाही. ही चित्रे दुर्बोध नाहीत तर जीवनातली कुरूपता दर्शवणारी आहेत. कुरुपतेतही सौन्दर्य असते कारण ती मानवी मनाला विचार करायला लावते. ( इथे कुरुपतेचा अर्थ मानवी जीवनातील दुःख, समस्या, गरिबी, असमानता, युद्ध इत्यादी असा घ्यावा) कुठल्याही शैली किंवा इझमचा एक काळ असतो. कला जर एकाच साचात अडकून पडली तर ती कालसापेक्ष कशी ठरणार? कला ही कायम प्रवाही असते काळाबरोबर बदलत जाणारी, त्यामुळे नव्या काळाचे प्रश्न, विचार ती नव्या बांधणीत घेऊन येते. प्रतिभावंत चित्रकार तिला आपल्या कुंचल्याने नवे रूप देतात, नवा इझम अस्तित्वात येतो. जसे पिकासोने घनवादाला जन्म दिला. जे दिसत नाही त्यापलीकडचे दृश्य दाखवणे यातून बहुदा घनवादाचा विचार पिकासोच्या चित्रात आला असावा. माणूस बाह्य स्वरूपात जसा दिसतो त्यापेक्षा अंतर्मनात तो खूप वेगळा असू शकतो, याचा थांग पिकासोच्या क्यूबिस्ट पोर्ट्रेटमधून लागू शकतो. फक्त दृष्टीला मोकळेपणा देणे गरजेचे आहे.
वास्तववादी शैलीच्या काही मर्यादा आहेत, चित्रकाराला जे मांडायचे आहे, विशेषतः एखाद्या सामाजिक प्रश्नांवरचे भाष्य इत्यादी त्यासाठी वास्तववादी शैली मर्यादित ठरू शकते. त्यापलीकडे जे सांगायचे असते ते बहुदा अमूर्त असते. त्याला एखाद्या आकारात किंवा शैलीत बांधणे विषयाला न्याय देऊ शकते का हा देखील कलाकारापुढचा प्रश्न असू शकतो.
पाडेकरांच्या लेखात शेवटी एक मुद्दा आला आहे तो लंडनच्या टेट गॅलरी आणि टेट मॉडर्न गॅलरीतील गर्दीच्या तफावतीचा. खरं तर एखाद्या गॅलरीतील गर्दी हा त्यातील चित्रांच्या गुणवत्तेचा निकष कसा होऊ शकतो? तसा विचार करायचा तर एखाद्या गल्लाभरू बॉलिवूड चित्रपटाला होणारी गर्दी आणि समांतर अभिजात चित्रपट बघणारा हाताच्या बोटावर मोजता येणारा प्रेक्षक यांची तुलना होऊ शकते का? जे गर्दी खेचते तेच चांगले असे मुळीच नसते. याचा अर्थ अभिजात कलेला कमी लेखणे हा नसून ती तुलनेने लोकप्रिय आहे,समजायला सोपी आहे त्यामुळे गर्दी खेचते. तर मॉडर्न कला दुर्बोध आहे, आणि समाजाचा वास्तव आरसा ती आपल्यापुढे उभी करते त्यामुळे उगीच डोक्याला ताप कशाला हा भेट देणाऱ्यांचा विचार असू शकतो.
पिकासो हा चांगला की वाईट यात मतमतांतरे असू शकतात. पण त्याची अफाट निर्मिती, त्याच्या निर्मितीमागचे कष्ट, कलाकृतीची भव्यता, चित्र विषय आणि त्यामागचा विचार पहिला की समजते तो एक श्रेष्ठ चित्रकार होता. शेवटी सांगायचं तर पिकासोने म्हटलंय “राफेलसारखी चित्रे काढायला मला चार वर्षे लागली तर एखाद्या लहान मुलासारखं चित्र काढता यावं यासाठी अख्ख आयुष्य खर्ची पडलं”
शेवटी हा सगळं दृष्टीकोनाचा फरक आहे. कलेला फक्त कलेसाठी पाहणं गरजेचं आहे. तिला एखाद्या अमुक प्रकारात ती मोडत नाही म्हणून नाकारणे आजच्या आधुनिक काळात कितपत योग्य आहे?
******
– कनक वाईकर
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion